तुमचा डेटा खरंच सुरक्षित आहे का? :केम्ब्रिज अॅनलिटिका – कोळ्यांचं जाळं भाग १
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्या Cambridge analytica (लेखात पुढे ह्याचा CA हा अपभ्रंश वाचावा) नावाची बूम सायबर विश्वात सुरुय. अर्थात प्रत्येक बूम ही सापेक्ष असते. काही लोकांसाठी ती चांगली आणि काहींसाठी ती वाईट असते. ह्याचा निर्णय तुम्ही काय विचार करता ह्यावर ठरतो. मागे एका ज्युलियन असांजे नावाच्या ऑसी प्रोग्रामरने #विकिलीक्स च्या माध्यमातून अशीच धमाल उडवून दिली होती. बरेच धमाके उडवून देत आंतरराष्ट्रीय राजकारणात त्याने खळबळ उडवून दिली होती, इकडे मनमोहनसिंगांची देखील पळताभुई झाली होती. तर सायबर विश्वात असे प्रयोग निश्चित एक केस स्टडी म्हणुन बघायचे असतात.
जेंव्हा ह्या विषयातील एक जाणकार विद्यार्थी म्हणून याच क्षेत्रात करिअर करणाऱ्या माझ्यासारख्याला कायम एक गोष्ट टोचत राहते की माझ्या भारतातील सामान्य लोक ह्या विषयी जागतिक पातळीवर कितपत तग धरतात? CA ची बातमी आली तेंव्हा “भारतातल्या फेक युजर्सचा डेटा काय चाटणार आहे?? आम्ही काय सामान्य युजर्स काय फरक पडतोय आम्हाला आमचा डेटा गेला काय आणि न गेला काय?” अनेकांनी दिलेली ही प्रतिक्रिया बघितली, त्यात अगदी मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमधले तंत्रज्ञ, डॉक्टर, इंजिनिअर, मिड लेव्हल मॅनेजर, सामान्य नोकरदार, गृहिणी सगळ्यांचा समावेश होता. ह्यावरून एक प्रसंग जो मी स्वतः बघितला आहे तो सांगतो.
मी आखाती देशात असताना जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीत ज्याचं उत्पन्न जवळजवळ १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर आहे त्यात सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट म्हणुन काम केलं होतं.
कंपनीत त्यांच्या कामगारांना एक टास्क दिला जायचा, अचानक वर्षभरात कधीही त्यांना एक मेल येत असे, अगदी त्यांच्या कंपनीचा खरा वाटावा असा ज्यात “तुम्हाला सुट्टी जाहीर केलीय, तुमच्या सुट्ट्या प्लॅन करा”, किंवा दोन मि आधी ती व्यक्ती हॉटेल बुकिंगसाठी कूपन शोधत असेल आणि लगेच त्याच्या ऑफिस मेल आयडीवर,फेसबुकवर (जे कंपनी वाय फाय वर चालायचं) एक लिंक यायची “तुम्ही जे कूपन शोधत होतात ते इकडे आहे, क्लिक करा आणि घ्या” त्या व्यक्तीने त्या मेलवर नुसतं क्लिक केलं (लिंक उघडलेली नाही) तरी त्याचं काम झालेलं असायचं.
त्या व्यक्तीचं नाव कंपनीतल्या सायबर हल्ला पीडित मध्ये कंपनीच्या सगळ्या इ नोटिस फलकांवर झळकायचं, आणि वर्षभरात ५ पेक्षा अधिक वेळा ते झळकलं त्या व्यक्तीला नोकरीवरून बाहेरचा रस्ता दाखविला जात. ब्राऊझर, ऍप, मेल ह्या सगळ्यांवर ह्या परिक्षा व्हायच्या.आता भारतात हे चित्र बसवून बघा, ह्या टेस्ट केसेस बनविणारे आणि माझ्यासारखे सिक्युरिटी एडमीन सोडले तर सगळेच घरी बसतील बहुदा…
डेटा सायन्स, डेटा एनॅलिटिक्स, आणि बिग डेटा ह्या संदर्भात काम करतात. ह्या मोठाल्या शब्दांकडे जाऊ नका पण ह्याचं काम संपूर्ण जगातील डेटा म्हणजे माहिती ह्यावर काम करून त्यांना योग्य त्या रुपात संग्रहित आणि अपेक्षितरीत्या कार्यान्वित करणं.
म्हणजे कसं तर एक उदा बघा, तुम्ही एखाद्या वेबसाइटवर मुंबई-नागपुर विमान, किंवा ट्रेन बद्दल माहिती बघितली, त्यानंतर केवळ २-३ मि तुमच्या ब्राऊझर वर सगळीकडे स्वस्त विमान, इतक्या किमतीत, नागपुरला इतक्या किमतीत स्वस्त हॉटेल, नागपुरला आजुबाजुला बघण्यासारखा जागा ह्याच्या जाहिराती यायला लागतात, तुम्ही फेसबुकवर चेक इन करा, आजूबाजूचे हॉटेलची जाहिरात येईल, फ्लिपकार्ट, ऍमेजॉन वर एखादा मोबाईल बघा त्यासंदर्भात जाहिराती येतील.
एकूण काय तर तुम्ही काय करता ह्याबाबत तुमचे ब्राऊझर कुकीज (एक प्रकार जो तुमचे चॉईस, आवड, तुम्ही काय बघता याची नोंद ठेवतो) किंवा ऍपची कॅश मेमरी (कुकीजच्या जवळ जाणारा प्रकार) ह्याची माहिती ठेवते आणि ती दुसऱ्या ऍप किंवा कंपनीला विकते. ह्या सगळ्यात आता तुम्ही फ्लाईट तिकीट पासुन तर जेवण, कपडे, युट्युब ते अगदी साईटवर सनी लिओनी ला बघण्यापर्यंत ह्या इतक्या मोठ्या रॉ माहितीला वेगवेगळ्या श्रेणींमध्ये रूपांतरित करून ती साठविणे आणि मग त्याचा उपयोग करून घेणे ह्याला डेटा सायन्स आणि त्याचं एनॅलिटिक्स म्हणतात.
एकूण काय तर गुगल असो की ऍपल किंवा ब्लॅकबेरी असो की मायक्रोसॉफ्ट किंवा फेसबुक ही तुमची माहिती बाळगणाऱ्या आणि तुमच्या माहितीला काही प्रमाणात पूर्वपरवानगी ने विकणाऱ्या मोठाल्या गँग आहेत. व्हाट्स ऍप आणि इतर काही चॅट ऍपचा अल्गोरिथम थोडा वेगळा आहे ते RSA सारखे काही माहिती एनक्रिप्ट (कुणी वाचु शकणार नाही ह्या प्रकारे) करतात त्यामुळे सरळ चॅटचा भाग शेअर होत नाही पण मागे त्यांनी देखील बराचसा डेटा फेसबुक सोबत शेअर केला होता पण नंतर ह्याचा बोभाटा झाल्यावर युजर्सची परवानगी घेणं त्यांनी सुरु केलं.
इतका इंट्रो कदाचित वाचकांना पुरेसा आहे की एकूण डेटा सायन्स कसं काम करतं. अर्थात मला तुम्ही विचाराल तर एक जाणकार म्हणुन मी कधीच माझी माहिती वापरू देणार नाही. मी चारही ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे आयओएस, अँड्रॉइड, मायक्रोसॉफ्ट आणि ब्लॅकबेरी वापरल्या आहेत, ब्लॅकबेरी सोडून बाकी तीन अजुनही वापरतो आहे ह्या संदर्भात आयफोन हा कुठल्याही अँड्रॉइड, मायक्रोसॉफ्ट मोबाईल पेक्षा काही प्रमाणात पारदर्शी आहे.
पण खरा प्रश्न तर अजुनही अनुत्तरीतच आहे की निवडणुकींसंदर्भात माझ्या फेसबुकच्या माहितीचा उपयोग काय?? तर गृहीत धरा की तुम्ही मोदी समर्थक आहात आणि फेसबुकवर तुमचे फेसबुकचे ग्रुप,मित्रयादी ही त्याच प्रकारात मोडते. तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून काही थर्ड पार्टी लिंक बघितल्या ज्या मोदी सरकारच्या काही कामा संदर्भात त्यांच्या भाषणासंदर्भात आहेत.
तुमचा हाच डेटा केंब्रिज अनालिटीका ह्या कंपनीने फेसबुकच्या माध्यमातून मिळविला, पण त्यानंतर तुमचाच डेटा वापरून काही दिवसात तुम्हाला मोदी सरकार विरोधात, मोदींच्या विरोधातील लिंक तुम्हाला तुमच्या फेसबुक ऍप वर दिसू लागल्या तर?? आणि जर तुम्ही मोदी विरोधक असाल तर तुम्हाला विरोधकांची चांगली काम, त्यांच्या नेत्यांनी केलेली मोदींवरची टीका ह्याची लिंक तुम्हाला येतील.
ह्याला म्हणतात डार्क पोस्ट..!! म्हणजे काय तर ह्या सगळ्या पोस्ट ह्या कुठल्यातरी फेसबुक (राजकीय पक्ष प्रेरित) पेजच्या वाटतात, पण त्या पोस्ट त्या पेजवर जाऊन बघितले तर पेजच्या होम फीड मध्ये दिसत नाहीत, ह्या सगळ्या पोस्ट ज्या व्यक्ती किंवा अकाउंटला टार्गेट करायचं असतं त्यांनाच दिसतात. ह्यासाठी डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील बरीचशी टूल वापरतात जेणेकरून ह्या पोस्टचे सोर्सेस दिसत नाहीत.
फेडरल इलेक्शन कमिशनच्या अधिकृत आकड्यांनुसार अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये मेक अमेरिका नंबर वन ह्या संस्थेने १.२ मिलियन डॉलर्स २७ डार्क फेसबुक ads वर खर्च केले होते. स्टीव्ह बेनॉन, रॉबर्ट मार्सेर ह्या प्रो ट्रम्प समर्थकांनी हजारो मिलियन डॉलर्स ह्या सगळ्या माहितीच्या खजिनाच्या त्यांच्या उपयोगासाठी खर्च केले होते. आणि ह्या सगळ्या मागे डोकं होतं अर्थातच केंब्रिज अनालेटिका चं..!! मानसशास्त्राचा एक वैचारिक भाग असतो Modus Operandi ज्याचा सिद्धांतच असतो ‘exploring the mental vulnerability of people’ ह्या खेळाचा साधा सरळ नियम असतो तो म्हणजे कोळी जाळं विणतो तसं एक सत्यविरहित एक अगम्य जाळं विणायचं आणि ज्याची शिकार करायची आहे त्याला त्या जाळ्यापर्यंत आकर्षित करून आणायचं, एकदा ते टार्गेट जाळ्यात आलं की त्याला परतीचा मार्ग नाही.
जितका तो लिंक,डार्क पोस्ट, व्हिडिओ बघत जाईल किंवा दुर्लक्ष देखील करत जाईल तितका ह्याचा ट्राफिक तुमच्या फेसबुकवर हळूहळू वाढवता येतो तुम्हाला शंका देखील येत नाही की हे सगळं जाणूनबुजून टार्गेट केलं जातंय आणि मग हळूहळू तुम्ही समर्थक श्रेणीतून कुंपणावर बसता आणि कुंपणावरून तुम्ही विरोधक कधी बनता हे तुमचं तुम्हालाच कळत नाही..!! हा प्रयोग मी मौखिक तत्वावर चर्चेदरम्यान काही सरकार पर्यायाने मोदी समर्थकांवर आणि राहुल समर्थकांवर केला आहे विरुद्धार्थी डार्क पोस्ट वापरून,विश्वास ठेवा अत्यंत परिणामकारक निकाल दिले आहेत ह्याने.
त्यामुळे ‘व्हेलॉसिटी’ ‘व्हेरायटी’ आणि ‘व्हॉल्यूम’ ह्या श्रेणीत किंवा गणितीय परिमेयातील डेटा सायन्सचे अल्गोरिथम बनतात तेंव्हा ते मानसशास्त्रच्या परिभाषेत तात्कालिक परिणाम जरूर दाखवितात.
मग तुम्ही फेक युजर असा, की जेन्युईन, अथवा माणुस असा वा बाई ह्या अल्गोरिथम काहीही फरक पडत नाही, त्याला निव्वळ सजीव म्हणुन तुम्ही ज्या विचारसरणीने ह्या मायाजालावर वावरता त्यात डार्क पोस्ट इंजेक्ट करायच्या असतात बास, आणि त्याला तुम्ही एक युजर म्हणुन काहीच करू शकत नाही, ना ज्या IT Act चा धाक परवा रविशंकर प्रसाद देत होते तो ह्या संदर्भात काही करू शकेल.एकच गोष्ट तारू शकते ती म्हणजे तुमच्या ठायी असलेली जागृत सद्सदविवेक बुद्धी.
आहे की नाही रंजक..? बरं इथपर्यंतच ही कंपनी थांबते का? की या पुढेही ही कंपनी अजुन काही करण्याची ताकद ठेवते? ही कंपनी कुणा नेत्याचं राजकीय जीवन उध्वस्त करू शकते? डेटा एनॅलिटिक्सच्या आउटपुट मुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकतं? भाजपचं आयटी सेल आणि केंब्रिज अनालेटिका मध्ये काय फरक आहे? आणि मुळ प्रश्न भारताच्या संदर्भात ही कंपनी जर खरंच काँग्रेस/भाजपसाठी काम करायला आली तर त्याचा कार्यकारण भाव कितपत साधेल. हे सगळं बघुयात पुढच्या भागात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.