Banned नोटांचं काय करावं ही चिंता वाटतीये? हे वाचा!!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
काळ्या पैश्याच्या वाढत्या समस्येला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारातून हद्दपार करण्याची घोषणा केली. हा निर्णय जाहीर झाल्यावरच तो किती योग्य आणि अयोग्य यांवर सगळीकडे चर्चा रंगू लागली. पण या निर्णयामुळे साहजिकच सर्वात जास्त धक्का कोणाला बसला असेल तर तो सामान्य माणसाला…!
(ह्या निर्णयांचे संभाव्य परिणाम काय असतील? वाचा: १) ५००, १००० च्या नोटांवर बंदी: तुम्हाला वाटतंय ते १००% खरं “नाही”! २) नोटांवरील बंदीचे आपल्याला ‘माहित नसलेले’ उत्कृष राजकीय आणि सामाजिक परिणाम!
हा निर्णय चूक किंवा बरोबर ते गेलं तेल लावत, पण आता माझ्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० च्या नोटांचं मी करायचं काय? आता माझ्याकडे असणाऱ्या ५०० आणि १०००च्या नोटांना काही किंमतच उरली नाही का? या ५०० आणि १००० च्या नोटा मी बदलायच्या कश्या? असे एक ना अनेक प्रश्न खायला उठल्यामुळे सामान्य जनता रात्रभर नीट झोपली ही नसेल.
तुमच्या मनातील या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं या लेखात तुम्हाला सापडणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर तुमच्याजवळ असणाऱ्या ५०० आणि १००० च्या नोटांपासून सुटका कशी करून घ्यायची याची सदर माहिती रिझर्व बँकेकडून जारी करण्यात आली आहे.
1) तुम्ही या नोटा कोठे बदलून घेऊ शकता?
तुम्ही ५०० आणि १००० च्या विद्यमान नोटा रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सर्व १९ शाखांमध्ये, कोणत्याही बँकेमध्ये आणि कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून बदलून घेऊ शकता.
2) नोटा बदलून घेण्यासाठी काही शुल्क आकारण्यात येते का?
नाही. तुम्हाला तुमची संपूर्ण रक्कम कोणत्याही वजावटी शिवाय बदलून मिळेल.
3) मला माझे सर्व पैसे बदलून मिळतील का?
नाही. एका व्यक्तीला एकावेळेस केवळ ४००० रुपयेच बदलून मिळतील. त्यावरची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
उदा. तुमच्या जवळ ५०० आणि १००० च्या नोटा असलेली १०,००० ची रक्कम आहे, तर त्यापैकी तुम्हाला ४००० रुपये रोख (कॅश) मिळतील आणि उर्वरित ६००० ची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये डीपोजीट केली जाईल.
4) पैसे बदलून घेताना एका व्यक्तीला मिळणारी केवळ ४००० रुपये ही रक्कम माझ्यासाठी अपुरी आहे, तर मग मी काय करावे?
तुम्ही तुमच्या इतर व्यवहारांसाठी चेक, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट्स, ऑनलाईन पेमेंट इत्यादींच्या माध्यमातून बँकेतील रक्कम वापरू शकता. या सर्व सुविधा जश्या पूर्वी सुरु होत्या तश्याच सुरु राहतील.
५) जर माझे बँक खातेच नसेल तर मी काय करावे?
तुमच्या जवळ ५० दिवसांचा अवधी आहे. या कालावधीत शक्य तितक्या लवकर तुम्ही नवीन बँक खाते उघडू शकता.
6) जर माझ्याकडे फक्त जनधन योजने अंतर्गत उघडलेले खाते असेल तर मी काय करावे?
ज्यांचे जनधन योजने अंतर्गत खाते आहे अश्या व्यक्ती देखील आपले पैसे त्या खात्यामार्फत बदलून घेऊ शकतात.
7) माझे बँकेच्या ज्या शाखेत खाते आहे त्याच शाखेत मला जाणे भाग आहे का?
असे बंधनकारक नाही. तुम्ही तुमच्या ओळखीचा कोणताही एक पुरावा (आयडेंटीटी प्रूफ) घेऊन कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन ४००० रुपयांपर्यंतची रक्कम बदलून घेऊ शकता. परंतु आधी सांगितल्याप्रमाणे एका व्यक्तीला एकावेळेस केवळ ४००० रुपयेच बदलून मिळतील. त्यावरची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. तेव्हा ४००० च्या वरची तुमची रक्कम तुमच्या ज्या बँकेच्या खात्यात डीपोजीट केली आहे, त्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही उर्वरित रक्कम मिळवू शकता.
जर तुम्ही अगदीच घाईत असाल आणि तुम्हाला तुमचे बँक खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेत जाणे शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही बँकेत जाऊन, सोबत ओळखीचा कोणताही एक पुरावा (आयडेंटीटी प्रूफ) आणि बँक खात्याचा तपशील घेऊन इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर द्वारे रक्कम मिळवू शकता.
8) ओळखीचा पुरावा अर्थात आयडेंटीटी प्रूफ मध्ये कोणत्या ओळखपत्रांचा समावेश आहे?
आधार कार्ड, ड्राईव्हिंग लाइसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, नरेगा कार्ड, पॅन कार्ड, तसेच सरकारी कर्मचारी असाल तर संबंधित ओळखपत्र
9) मी माझ्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊ शकतो का?
होय. तुमचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही पैसे जमा अथवा रुपांतरीत करू शकता.
१०) मी कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊ शकतो का?
होय. फक्त सोबत ओळखीचा कोणताही एक पुरावा (आयडेंटीटी प्रूफ) आणि बँक खात्याचा तपशील बाळगावा.
११) मी एटीएम मधून पैसे काढू शकतो का?
सध्या नाही..! परंतु एटीएम पुन्हा सुरु झाल्यावर १८ नोव्हेंबर पर्यंत तुम्ही एका कार्डने जास्तीत जास्त २००० रुपयेच काढू शकणार आहात. त्यानंतर १९ नोव्हेंबर पासून ही मर्यादा वाढवून ४००० रुपये करण्यात येईल.
१२) मी चेकच्या सहाय्याने पैसे काढू शकतो का?
होय, पहिले १४ दिवस म्हणजे २४ नोव्हेंबर पर्यंत तुम्ही चेक च्या सहाय्याने दिवसाला १०,००० आणि आठवड्याला २०,००० रुपये काढू शकता. (यामध्ये तुम्ही एटीएम मधून काढलेली रक्कम देखील मोजली जाईल)
१३) मी एटीएम, कॅश डीपोजीट मशीन्स, कॅश रिसायकलर्स यांच्या माध्यमातून ५०० आणि १००० च्या नोटा डीपोजीट करू शकतो का?
होय. तुम्ही एटीएम,कॅश डीपोजीट मशीन्स, कॅश रिसायकलर्स यांच्या माध्यमातून ५०० आणि १००० च्या नोटा डीपोजीट करू शकता.
१४) नोटा बदलून घेण्यासाठी माझ्याकडे किती दिवस बाकी आहेत?
तुमच्याजवळ ३० डिसेंबर २०१६ पर्यंत वेळ आहे. जर काही कारणास्तव तुम्ही या तारखेपर्यंत नोटा बदलू शकला नाहीत तर रिझर्व बँकेच्या कोणत्याही शाखेला भेट देऊन तेथे आवश्यक कागदपत्रे सादर करून तुम्ही या नोटा बदलू शकता. (सदर कागदपत्रे कोणती असावीत हे लवकरच जाहीर करण्यात येईल.)
१५) मी सध्या भारतात नाही, तर मी काय करावे?
तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखाद्या सुजाण व्यक्तीला एक परवानगी पत्र लिहून पाठवावे, ज्यामध्ये तुम्ही त्या व्यक्तीला तुमचे पैसे डीपोजीट करण्याची परवानगी देत आहात असे नमूद केलेले असावे. त्यानंतर सदर व्यक्तीने ओळखीचा कोणताही एक पुरावा (आयडेंटीटी प्रूफ) आणि बँक खात्याचा तपशील सोबत घेऊन बँकेत जावे आणि तुम्ही दिलेले परवानगी पत्र सादर केल्यानंतर बँकेत नोटा डीपोजीट करता येतील.
आशा आहे आता तुमच्या मनातील प्रश्नाचं वादळ थंड झालं असेल!
—
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.