आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : आशिष शिंदे
===
मी नेहमी म्हणतो स्त्रीनं मानवी संस्कृतीची सुरुवात केली.
संस्कृती म्हणजे काय तर जीवनपद्धती. आपण स्थिरस्थावर राहावं असं वाटणं हेच संस्कृतीचं मूळ लक्षण आहे. मग त्यातून पुढे स्थिरतेसाठी अन्न मिळवणं, निवारा तयार करणं आणि सामाजिक नीती-नियमांचा पाया रचून एक व्यवस्था तयार करणं या गोष्टी येतात. त्याहीपुढे जाऊन मग आपल्या समूहासाठी विचार करणं आणि समान, सुशील, न्याय्यपूर्ण वर्तणुकीचे नियम मान्य करणं हे मात्र प्रगत समाजाचं लक्षण म्हणता येईल.
पुरुष हा भटका, स्वैर आणि हिंसक प्रवृत्तीचा असतो. कारण ही प्रवृत्ती त्याच्या गुणसूत्रांतील आहे.
अन्न मिळवण्यासाठी मनुष्यजमात सुरुवातीला भटकी (nomadic) होती. रोजच्या आयुष्यातल्या गरजा पूर्ण करणे हाच त्याचा प्रमुख उद्देश असावा. मग त्याच्या बौद्धिक क्षमतेत झालेल्या वाढीमुळे तो भविष्यलक्षी झाला. “मुंगीपेक्षा भविष्यलक्षी विचार करतो तो माणूस” अशी साधी व्याख्या मान्य करता येईल (~ तीन त्रिक दहा, लेखक उत्पल विमल बाबुराव). या भविष्यलक्षी असण्यालाही आयाम आहेत.
मनुष्य फक्त आपल्या दिवसाचा किंवा सद्यवर्षाचा विचार बाजूला सारून जेंव्हा पुढच्या पिढीचा विचार करू लागला तेंव्हा जमात प्रवृत्तीचं किंवा प्रकृतीचं पहिलं बीज रोवल गेलं असावं.
मानवजातीला किंवा पुरुषाला भविष्यलक्षी विचार करायला कुणी भाग पाडलं असेल? या प्रश्नाचं उत्तर हे सरळ, साधं, सोपं आहे. स्त्रीनं.
स्त्री जन्मदात्री असल्याने अपत्याची काळजी तिला जास्त असणं हे स्वाभाविक आहे. इतर बऱ्याच स्तनधारी प्राण्यांमध्ये प्रजननानंतर नराचे मादीला सोडून जाणे आणि होणाऱ्या अपत्याची काळजी मादीने घेणे ही प्रक्रिया नैसर्गिक आहे. मनुष्याची बौद्धिक वाढ होत असताना उत्क्रांतीच्या एका टप्प्यात त्याच्या डोक्याचा आकारसुद्धा वाढत गेला. एका टप्प्यानंतर हा आकार वाढणं मात्र शारीरिक दृष्ट्या अशक्य झालं. त्यामुळे डोक्याचा आकार वाढण्याची प्रक्रिया थांबली.
त्याऐवजी निसर्गाने मनुष्याच्या शारीरिक व बौद्धिक विकासाचे दोन टप्पे केले. एक गर्भाच्या आत आणि दुसरा गर्भातून जन्म झाल्यानंतरचा काळ.
त्यामुळे माणूस त्याच्या जन्माच्या वेळी इतर प्राण्यांच्या तुलनेनं अधिक दुर्बल असतो. या त्याच्या दुर्बलतेमुळे सतत त्याला संरक्षणाची गरज असते. हि संरक्षणाची जबाबदारी नरावर येणे साहजिकच आहे. त्याचवेळी मनुष्यामध्ये जमातीत राहण्याची प्रवृत्ती असल्याने स्वतःच्या अपत्याची जबाबदारी घेणं हेसुद्धा पुरुषाला भाग पडलं असावं. इथं पुरुष अपत्याकडे जबाबदारी म्हणून पाहू लागला.
सहज सहवासानं वाढलेलं आपल्या अपत्यांवरचं प्रेम आणि वंशाची रक्षण करण्याची भावना, त्यातून आलेला आक्रमक स्वभाव हे पुरुषाचे पहिले काही नैसर्गिक गुणधर्म इथे स्पष्ट होतात. आणि त्याचवेळी स्त्रीचं संरक्षणासाठी पुरुषावर अवलंबून राहणं सुद्धा इथेच चालू झालं असावं. संरक्षणाची ही अपेक्षा फक्त मानवजातीतच आहे असं मात्र नाही. सिंहाच्या कळपात जेंव्हा सिंहाचा बछडा तरुण होतो किंवा दुसरा सिंह या कळपाच्या जवळ येतो तेंव्हा सिंह आपल्या माद्यांच्या आणि स्वतःच्या पिलांच्या संरक्षणासाठी लढाईला तयार असतो.
अर्थात फक्त दुसऱ्या नराकडून संरक्षण लागतं असं नाही. मानव हा एकूण नैसर्गिक संकटांना तोंड द्यायला शारीरिकदृष्ट्या इतर प्राण्यांपेक्षा कमकुवत आहे. त्यामुळे मनुष्यजातीला नैसर्गिक आणि मानवीय संकटापासून संरक्षण करण्यासाठी पुरेसा आणि सुरक्षित निवारा बनवणं गरजेचं झालेलं असावं. पुरुष शिकारीला गेल्यावर या निवाऱ्याचा स्त्री संरक्षण म्हणून (फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या अपत्यांसाठी) करत असावी.
यातुन स्थावर निवाऱ्याची पहिली जडण घडण चालू झाली. पुढे गुहांमधून बांधलेल्या झोपड्या, कुट्या आणि मग आधुनिक काळात आलेली दगड-माती-विटा-सिमेंट वापरून बांधलेली घरं.
स्त्रीने स्वसंरक्षणाच्या हेतूने वापरलेली आपली बुद्धिमत्ता इथे अधोरेखित होते. पुरुषाचं काम फक्त शिकार आणि अन्न जमा करणं इतकंच असल्याने त्याची बुद्धिमत्ता त्या दिशेने विकसित झाली. अर्थात त्याउलट पुरुषाची मानसिकता लढाईच्या डावपेचात आणि वेगानं होणाऱ्या घडामोडीत अविलंब शारीरिक हालचाल करण्यात झालेली दिसते.
स्थावरतेचा पुढचा टप्पा म्हणजे समाजनिर्मिती. जमात एकत्र आल्यामुळे संघटनेला एक आकार देणं, त्यातून नायक किंवा म्होरक्या निवडणं ही गरज तयार झाली. इथे वर्चस्व-वादाचा मुद्दा आला. अगदी प्रागैतिहासिक काळातून स्त्रीवर अन्याय करणं हा एक गुन्हा मानला गेला आहे.
जमातीमध्ये अनायासे तयार झालेल्या राजकारणाचा फायदा इथे स्त्रीने उचलला असावा तो पुरुषाला स्त्रीचं संरक्षण हाच मूळ कायदा व्हावा हे पटवून देण्यात. अर्थात इथे पुरुषाचा अहंकारी स्वभाव, त्याचं नर असणं याची राजकारणात स्त्रीला मदत झाली.
यातून इतरही बरेच फायदे झाले असतील. सीमारेषा आखणे, मालमत्ता हक्क आणि कौटुंबिक हक्क ही या प्राथमिक कायद्याचे काही गुणधर्म असावेत. हे फायदे आधुनिक कायदेविकासाच्या प्रक्रियेत शक्य तितके अबाधित ठेवण्याचा प्रयत्न अजूनही दिसतो. हे त्या होणाऱ्या बदलांचं मानवीय जनुकांमध्ये पडणाऱ्या प्रतिबिंबाचं लक्षण आहे.
आता अगदी स्थिरस्थावरतेच्या टप्प्यात आलेली मानवी संस्कृती. या संस्कृतीतला एक दिवस आपण आपल्या नजरेसमोर आणूया.
“पुरुष नेहमीप्रमाणे शिकारी साठी किंवा खानाबदोशीसाठी गेले असतील. स्त्रिया त्यांच्या छोटाश्या वस्तीवर. एका स्त्रीने सहज नजर फिरवली असेल. साधारण कमरेएवढ्या उंचीच्या गवताच्या कणीस लागलेलं असेल. पक्षी आणि काही प्राणी, उंदीर वगैरे, या कणसातले दाणे खात असतील. हे गवत दरवर्षी नवीन उगवून येतं. पावसाच्या सरीनंतर त्याला पालवी फुटते आणि साधारण थंडीच्या सुरुवातीला त्याला हिरवी कोवळी कणसं येतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हि कणसं साधारण पिवळी-करडी होतात आणि मग त्यावर पक्ष्यांचे थवे बसू लागतात. हे कणसातले धान्य अन्न म्हणून ते खातात.”
या प्रक्रियेच्या ज्ञानानंतर स्त्रियांनी ही कणसं गोळा करून त्यातलं धान्य चाखून, त्यावर प्रक्रिया करून, वेगवेगळे पदार्थ तयार करून बघितलं असेल. यातून ऊर्जा मिळते, पोट भरतं हे लक्षात आल्यावर स्त्रियांनी यातली काही कणसं पुढच्या पावसाळ्यापर्यंत जपून ठेवली असतील. आणि हे बीज रोवून बघितलं असेल. निसर्गनियमाने त्यातून ते गवत आणि ती कणसं उगवून आली असतील आणि यातून शेतीची सुरुवात झाली असेल.
पुढेमागे मोठ्या प्रमाणावर शेती चालू झाली असेल तेंव्हा ती पुरुषाच्या अधिपत्याखाली आली असेल. पण शेतीचा शोध लावणारी “स्त्री”च हे मात्र नक्की.
पशुपालनाचंसुद्धा तसंच झालं असेल. कामाचे पशु सहज निरीक्षणातून स्त्रियांना दिसले असतील आणि हळू-हळू त्यातून पशुपालन चालू झालं असेल. कोंबड्या, शेळ्या, गाई वगैरे या पाळीव झालेल्या प्राणिजाती मनुष्याच्या सामाजिक विकासात मोठा हातभार लावताना इतिहासाच्या नोंदीत जाणवतात.
या प्रत्येक मुद्द्याचा तार्किक दृष्ट्या विचार केला तर हे सहज पटेल कि या प्रत्येक प्रक्रियेत स्त्रियांची महत्वाची भूमिका आहे. अर्थात यातले काही मुद्दे विवादास्पद होतील पण एकूण विचार करता हि भूमिका अधिक तार्किक आणि सहजमान्य होण्यासारखी आहे. पुढे जवळ-जवळ सर्वच कलांचा विकास सुद्धा स्त्रीच्या हातून झालाय. अर्थात याबद्दल लिहिल्यास लेखाचा आवाका हाताबाहेर जाईल म्हणून सध्या ते टाळणं उत्तम.
एकूण गोषवारा लिहायचा झाला तर मानव संस्कृतीचं मध्ययुगीन आणि त्यातून जन्मलेलं आधुनिक रूप याचं पूर्ण श्रेय स्त्रीजातीचं आहे. पुरुषाची भूमिका ही निव्वळ वाहवत जाणं ही आहे. खरतर नैसर्गिकपणे इथे स्त्रीसत्ताक व्यवस्था तयार होण्याची शक्यताच जास्त. आणि ती तशी तयार झालीसुद्धा.
आधुनिक समाज रचनेत यात बदल झाला त्यालाही काही अंशी स्त्री जबाबदार आहे. दुय्यम भूमिका घेण्याची स्त्रीची तयारी पुरुषकेंद्रीत समाजाच्या विकासासाठी पोषक ठरली.
त्यातूनही शेतीचा आणि इतर जीवनावश्यक कामांचा वाढलेला पसारा हा शारीरिक दृष्ट्या स्त्रीच्या विरोधात गेला. वाढलेली शेती, पाळीव प्राण्यांची संख्या, वर्चस्ववाद आणि त्यातून होणारी युद्ध ही स्त्रियांची पार्श्वभूमीला जाण्याची मुख्य कारणं. त्यानंतर वाढलेला रचनात्मक धर्माचा प्रभाव यामुळे स्त्रीला अजून दुय्यम स्थान दिल्या गेलं. एकूण मानवी समाजाचं हे असं ओझं स्त्रियांवर टाकणं याला मी गैर मानत नाही उलट त्यांना याचा अभिमान वाटावा असं माझं मत आहे.
पुरुषावर स्त्रीचे अनंत उपकार आहेत. स्थावरतेची ओळख स्त्रीने पुरुषाला करून दिली हे आधुनिक पुरुषांनी मोठ्या मनानं मान्य करायला पाहिजे. आणि संस्कृतीची आद्य जननी म्हणून स्त्रीचा गौरवसुद्धा केला पाहिजे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.