छत्रपती शंभूराजेंच्या धारदार लेखणीतून…स्वराज्य आणि स्वधर्म निष्ठेची घवघवीत साक्ष!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – डॉ. परीक्षित शेवडे
—
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज हे एक तेजस्वी पण आजही कित्येक प्रमाणात दुर्लक्षित वा विपर्यस्त करण्यात आलेले व्यक्तिमत्व होय. अवघ्या नऊ वर्षांची कारकीर्द लाभलेले हे झुंजार योद्धे म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातले एक सोनेरी पानच.
रणांगणावर आपल्या समशेरीने भल्या भल्यांना नमवणाऱ्या शंभूराजांची लेखणीदेखील तितकीच तेजस्वी आणि धारधार होती हे आम्हाला फारसे परिचित नसते.
–
हे ही वाचा – छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्यांना ‘हे’ सत्य दिसत नाही की मान्य नाही?
आग्र्याहून सुटका झाल्यावर परतताना शिवरायांनी शंभूबाळाला मथुरेला त्रिमल बंधूंकडे ठेवले होते. याच कालावधीत शंभूराजांना सभोवतालच्या वातावरणामुळे संस्कृत भाषेत विशेष रुची उत्पन्न झाली. खरे तर संस्कृताध्यायानाची रुची ही भोसले घराण्यात वंशपरंपरागतच होती असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
शहाजीराजे यांच्या दरबारी असलेले कवी जयराम पिंड्ये यांनी लिहलेला ‘राधामाधवविलासचम्पू’ हा ग्रंथ म्हणजे शाहजी महाराजांचे चरित्रच म्हणावे लागेल.
या ग्रंथात कवीने महाराजसाहेबांच्या संस्कृतप्रेमाचे वर्णन केलेले आहे.
शंभूराजे शृंगारपुरात असताना केशवभट्ट पुरोहित यांनी त्यांना प्रयोगरूप रामायण ऐकवले होते. हे केशवभट्ट आपल्या ‘राजरामचरितम्’ या ग्रंथात संभाजी महाराजांचा उल्लेख ‘सकलशास्त्रविचारशील’ आणि ‘धर्मज्ञ शास्त्रकोविद’ अशा शब्दांत गौरवाने करतात.
बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ, तर नायिकाभेद, नखशिख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ ही शंभूराजांची साहित्यसंपदा. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या पत्रांतूनही त्यांच्या लेखणीच्या सामर्थ्याचा प्रत्यय आपल्याला येतो.
छत्रपती संभाजी महाराज हे स्वधर्माबद्दल अभिमान बाळगणारे राजे होते. याची साक्ष म्हणजे मिर्झाराजे जयसिंग यांचे पुत्र रामसिंग यांना लिहिलेल्या पत्रात ते स्पष्टपणे लिहितात;
“आम्ही हिंदू सांप्रत काय तत्वहीन झालो आहोत? आमच्या देवालयांची मोड़-तोड़ झाली तरी स्वधर्म रक्षण करण्यास असमर्थ आहोत, श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्माचरणशून्य आहोत अशी त्या यवन बादशाहची समजूत झाली आहे. आम्ही क्षत्रियांस योग्य असेच वर्तन करणे अपेक्षित आहे. अश्या परिस्थितीत आपण सारे एक होऊन त्या यवनाधमाला तुरुंगात डांबले पाहिजे.” (मूळ संस्कृत पत्राचा मायना डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या ‘छत्रपती संभाजी महाराज स्मारक ग्रंथात उपलब्ध.)
औरंगझेबविरुद्ध बंड पुकारलेला त्याचा मुलगा शाहजादा अकबर हा या काळात शंभूराजांच्या आश्रयाला आला होता. याच संधीचा सुयोग्य वापर करून मराठे आणि राजपुतांनी दिल्लीच्या तख्तावर एकत्र येवून हल्ला करावा असा अफाट बेत महाराजांनी आखला.
–
हे ही वाचा – “वडिलांपेक्षाही दस पटीने अधिक पराक्रमी”: गनिमांच्या नजरेतून छत्रपती संभाजी महाराज!
मात्र हिंदूंना दुहीचा शाप असल्याने कदाचित; पण रामसिंग यांच्याकडून या पत्राला काहीच उत्तर आले नाही. याच प्रसंगाचा उल्लेख करत पुढे थोरले बाजीराव पेशवे यांनी रामसिंग यांचे पुत्र सवाई जयसिंग यांना मराठ्यांना सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यावेळेस मात्र सवाई जयसिंग आणि पर्यायाने जयपूर हे सातारा गादीच्या बाजूने ठाम उभे राहिले.
‘बुधभूषणम्’ या आपल्या ग्रंथात शंभूराजांनी केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे हे वर्णन पहा;
“ज्यांनी वैर करणार्या अनेक राजांची गर्वोन्मत मस्तके (मुंडमाला) विश्वंभरास अर्पण केली, अशा वसुंधरेस गवसणी घालणार्यांमध्ये उत्तुंग व श्रेष्ठ असणार्या; पुत्र ‘शिव’ म्हणून पुराणांतरींचा साक्षात प्रभु जन्मास आला. त्या शहाजीराजांना; महाशूर मुलखाचे धनी असलेले, लोकांना हिमालयासारखे उत्तुंग वाटणारे, पुराणातील पुरूषश्रेष्ठ, स्वतः शिवासारखे राजे शिवाजी हे श्रेष्ठ पुत्र झाले.” शिवप्रभूंबद्दल साक्षात त्यांच्या सुपुत्राने लिहिलेली ही गौरवपर रचना मनाचा ठाव घेणारी आहे.
याच ग्रंथात क्षत्रियांची कर्तव्ये नमूद करताना शंभूराजे सांगतात;
“वेदांचे अध्ययन करून, यज्ञ करून, प्रजेचे पालन, गो-ब्राह्मणपालन करून जो मारला गेला किंवा संग्रामात धारातीर्थी पडला तो क्षत्रिय स्वर्गास जातो” (संदर्भ : बुधभूषणम् – संपादक : कदम, अध्याय २रा, श्लोक ५५४) संभाजी महाराजांचा धर्मशास्त्र या विषयाचा अभ्यास किती तगडा होता याचे हे उदाहरणच म्हणावे लागेल.
तळकोकणातल्या नामदेवशास्त्री बाक्रे यांना छत्रपती संभाजी महाराजांचे १०,००० होनांचे अस्सल दानपत्र आजही उपलब्ध आहे. या दानपत्राच्या सुरुवातीला महाराजांचे स्वतःचे हस्ताक्षरदेखील आहे हे विशेष.
याच पत्रात संभाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना उद्देशून ‘म्लेंच्छक्षयदीक्षित’ म्हणजे म्लेच्छांच्या नाशाची दीक्षा घेतलेला; असे विशेषण वापरले आहे.या दानपत्राला ऐतिहासिक महत्वदेखील आहे.
अफझलखानाला ठार करताना शिवरायांनी बिचवा वापरला होता असे संभाजी मशंभूराजे या पत्रात नमूद करतात. खानाचा कोथळा काढताना वाघनखे नाही तर बिचवा वापरण्यात आला होता याचा संदर्भ तोही थेट शंभूराजांच्या लेखणीतून आपल्याला मिळतो!!
एकीकडे आपल्या विद्वत्ता आणि अभ्यासाची सतत साक्ष देणारी ही लेखणी सतत कर्तव्यदक्ष असल्याचेही त्यांच्या पत्रांतून आपल्याला पहायला मिळते.
श्री रामदास स्वामी यांनी देहत्याग केल्यावर संभाजी महाराजांनी काशी रंगनाथ देशाधिकारी यास पत्र लिहून कळवले –
“श्री रामदास स्वामी सज्जनगडी होते त्यांनी पूर्णावतार केला त्या स्थानी श्री हनुमंत देवालय करविले आणि चाफळ च्या रथोछायाकरिता कर्णाटकातुन मूर्ति आणिल्या….” याच पत्रात सज्जनगडाला दिलेली मोईन नियमितपणे चालू रहावी असाही आदेश महाराजांनी दिला आहे. (संभाजीकालीन पत्रसारसंग्रह पृ.१९ प.क्र.६७) अशाच प्रकारच्या मोईना आणि वर्षासने विविध देवस्थानांना लावून दिल्याचे उल्लेख छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्रांतून दिसतात. शंभूराजे हे अत्यंत धर्मशील होते याचा हा प्रत्यक्ष पुरावाच नव्हे काय?!
वेळप्रसंगी हीच लेखणी धारदार होते; इतकी की महाराजांच्या अधिकाराची धग त्यांच्या शब्दांतून जाणवावी! शाहजादा मोअज्जम स्वराज्यावर चाल करून येत होता त्यावेळेस जावळीच्या देशमुखांना पाठवलेल्या पत्रात महाराज म्हणतात –
“गनिमाचा काय गुमान लागला? बुडवलाच जातो….” (संभाजीकालीन पत्रसारसंग्रह पृ.३५ प.क्र.११३) स्वराज्यातील काहीजण मुघलांना जावून मिळाल्याचे कळताच एका पत्रात महाराज म्हणतात; “आधी तुम्हीच सरासरी हरामखोरी केली….स्वामींच्या पायासी दुर्बुद्धी करून दोन दिवसांचे मोगल त्यांच्याकडे खाऊनु राहिलास….ए क्षणी स्वामी आज्ञा करितात तो गनिमादेखत तुम्हासही कापवून काढत आहेत.” (संभाजीकालीन पत्रसारसंग्रह पृ.५३ प.क्र.१६२)
आपले पिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल छत्रपती संभाजी महाराजांना नितांत आदर होता. थोरल्या महाराजांनी नेमून दिलेली धार्मिक अनुष्ठाने तशीच सुरु रहावीत असा आदेश देताना शंभूराजे लिहितात;
“आबासाहेबांचे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य….” (संभाजीकालीन पत्रसारसंग्रह पृ.१५ प.क्र.५१)
एकीकडे प्रचंड पराक्रमी तर दुसरीकडे अत्यंत विद्वान असे दुर्लभ समीकरण एकाच ठायी असलेले असे शंभूराजे – जे अखेरच्या श्वासापर्यंत स्वराज्य आणि स्वधर्म यांच्याशी एकनिष्ठ राहिले…!
===
हे ही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल : काही माहित असलेलं, काही माहित नसलेलं
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.