बॉस असावा तर असा; कर्मचा-यांना फ्री टुर, कार गिफ्ट देणा-या बॉसविषयी जाणून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
बॉस हा शब्द उच्चारताच नोकरदारांक़डून वेगवेगळ्या प्रतिमा ऐकायला मिळतात.
काहींच्या विनोदी, काहींच्या त्रासलेल्या तर काहींच्या घाबरलेल्या.
चाकरमान्यांच्या आयुष्यातील सर्वात नावडता मनुष्य कोण असा प्रश्न विचारल्यावर एकदिलाने सर्वांच्या मुखातून एकच उत्तर निघेल, ‘माझा बॉस’ असंही विनोदाने म्हटलं जातं.
तुम्ही कोणत्याही नोकरी करत असलात तरी बॉस अर्थात वरिष्ठ यांच्याशी तुम्हाला जुळवून घ्यावेच लागणार.
कितीही मेहनत घ्या पण या बॉसचं कधीच समाधान होत नाही. बरं काही चांगल्या कामाचं कौतुक करायचं झाल्यास पाठीवरच्या थापेशिवाय दुसर काही देणारच नाही हे अनेकांचं रडगाणं तुम्हीही ऐकलं असेलचं.
मात्र प्रत्येक नोकरीतील बॉस नावाची व्यक्ती त्रासदायक किंवा पसंत न पडणारीच असते, असं काही नाही.
नोकरी करणारे काही लोक इतके नशीबवान असतात त्यांना अगदीच प्रेमळ ‘बॉस’ मिळतो. जो आपल्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची कदर करतो आणि त्याबद्दल त्यांच्या यथोचित गौरव देखील करतो.
विश्वास बसत नाहीये? मग सावजी ढोलकिया यांच्याबद्दल तुम्हाला वाचलंच पाहिजे.
असाच एक प्रेमळ बॉस म्हणजे “सावजी ढोलकिया”
हिरे व्यापार जगतात “सावजी ढोलकिया” हे नाव तसं सुप्रसिद्ध !
सुरत आणि मुंबईमध्ये श्री रामकृष्ण एक्सपोर्ट या कंपनीच्या नावाने ते व्यापार करतात.
मात्र त्यांची खरी ओळख आहे, ती त्यांचे कर्मचा-यांशी असलेल्या नात्यामुळे.
त्यांचा आपल्या कर्मचाऱ्यांवर गाढ विश्वास! त्यांच्यामुळेच आपला व्यापार सुस्थितीत आहे असं ते मानतात. कर्मचाऱ्यांच्याप्रती असलेल्या याच प्रेमापोटी कंपनीतर्फे दरवर्षी सर्व कर्मचाऱ्यांना ते एका टूरवर पाठवतात.
२०१६ या वर्षी देखील तब्बल १५ दिवसांची सुट्टी जाहीर करत आपल्या परिवारासह त्यांनी जवळपास ३०० कर्मचाऱ्यांना उत्तराखंडची सफर घडवून आणली.
वाटलं ना नवल? ज्यावेळी त्यांनी ही घोषणा केली तेंव्हा देशभरात अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
अचंबित करून सोडणारी गोष्ट ही की या सर्व सुट्ट्या Paid होत्या.
अर्थात कर्मचाऱ्यांना या १५ दिवसांचा पगार भरून सुद्धा मिळाला. या टूरवर येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी सावजी ढोलकिया यांनी संपूर्ण ट्रेनमधील सर्व एसी तिकिटे बुक केली. यासाठी तब्बल ९० लाखांचा खर्च आला होता.
त्यांच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले कि,
सावजी ढोलकिया यांना आम्ही ‘काकाजी’ या नावाने हाक मारतो. ते एखाद्या कुटुंबातील सदस्यासारखे आमच्यावर प्रेम करतात. त्यांनी आम्हाला घडवलेली ही टूर म्हणजे त्यांचे आमच्यावर असणारे अपार प्रेम सिद्ध करते.
जेंव्हा त्यांनी कर्मचा-यांसाठी सहलीची घोषणा केली तेंव्हा अनेकांना हे स्वप्नचं वाटलं.
अनेकांना ही ऑफिसची सहल वाटली, मात्र जेंव्हा त्यांनी संपुर्ण कुटुंबासह या सहलीला जाता येणार असल्याचं कळलं तेंव्हा मात्र त्यांना धक्काचं बसला.
याशिवाय सावजी ढोलकिया यांनी आणखी एक सरप्राईज दिलं.
कामाचं कौतुक करताना वाढीव पगार किंवा गिफ्ट व्हाऊचर दिल्याचं तुम्ही ऐकलं असेल.
तुम्हालाही तुमच्या कंपनीतून अशा प्रकारचा वाढीव पगार मिळाला असेल, पण तुमच्या कामाचं कौतुक करताना तुम्हाला कंपनीकडून ब्रॅन्ड न्यु कार किंवा प्रशस्त घर दिलं तर?
असाच धक्का सावजी ढोलकीया यांच्या कंपनीतील कर्मचा-यांना मिळाला.
केवळ टूरच नाही तर मेहनती कर्मचाऱ्यांना अनेक फ्लॅट्स आणि चारचाकी गाड्यांची भेट देऊन देखील सावजी ढोलकिया यांनी यापूर्वी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
सावजी ढोलकिया यांचे हे उदाहरण एका आदर्श बॉसला शोभावे असेच आहे.
सावजी ढोलकीया यांनी अब्जावधी रुपयांची संपत्ती कमाविली, हि-यांच्या बाजारात प्रचंड नाव मिळविलं, मात्र या सगळ्याचं श्रेय केवळ एकट्याने न घेता, हा बिझनेस यशस्वी होण्यासाठी राबणा-या प्रत्येक हाताचं त्यांनी कौतुक केलं.
कदाचित याचमुळे त्यांच्या कंपनीतील प्रत्येक कर्मचा-याने शंभऱ टक्के प्रयत्न करत ही कंपनी यशस्वी केली.
इतर कोणत्याही कंपनीत असलेली भांडणं, वाद हे चित्र ढोलकीया यांच्या कंपनीत कधीही दिसलंच नाही.
तुम्हीही एखाद्या कंपनीचे बॉस असाल किंवा कोणत्याही कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत असाल, तर किमान तुमच्या सहका-यांशी प्रेमाने, आपुलकीने वागण्याचं गिफ्ट त्यांना देऊच शकता.
कर्मचाऱ्यांमुळे मी आहे ही भावना जेव्हा प्रत्येक बॉसच्या मनी निर्माण होईल तेव्हाच प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नशिबी प्रेमळ बॉस येईल. तोवर जे पदरी पडलंय त्यातच सुख मानण्याशिवाय गत्यंतर नाही!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.