Site icon InMarathi

सॅनिटरी नॅपकिन्सचा “कचरा” : एक दुर्लक्षित परंतु अत्यंत महत्वाचा प्रश्न

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखिका : चंद्रकला बोर्डे

===

नुकताच ‘पॅडमॅन’ हा अक्षय कुमारचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सॅनिटरी नॅपकिन्स विषयी बरीच चर्चा व जनजागृती झाली. मासिक पाळी हा आपल्याकडे अनेक समज गैरसमजांनी भरलेला विषय आहे. त्यात या विषयावर जाहीरपणे बोलायचे म्हणजे अनेकांसाठी आश्चर्यच. समाजाला दिशा देणाऱ्या स्त्रीचे आयुष्य हे तीच्या मासिक पाळीवर अवलंबून असते. फक्त शरीरातच नव्हे तर स्त्रियांच्या जडणघडणीतही याच काळात अमुलाग्र बदल होतात पण, स्त्रियांच्या आयुष्यातील या महत्वाच्या वळणाकडे खूप उपेक्षेने पहिले जाते.

 

indianexpress.com

भारतात मासिक पाळी हा विषय इतका उपेक्षित आहेत की अगदी आई आपल्या मुलींशी देखील या विषयावर बोलत नाही. मासिक पाळी साधारणत: वयाच्या १० ते १२ व्या वर्षापासून सुरु होते. मासिक पाळीत शरीरात होणारे शारीरिक बदल आणि समाजातील गैरसमजुती यामुळे महिलांना या काळातील व्यवस्थापन सोपं राहत नाही. ग्रामीण तसेच शहरी भागात आजही मासिक पाळीविषयी अनेक गैरसमजुती आहेत.

 

newstrack.com

मासिक पाळीत वापरला जाणारा कपडा स्वच्छ न धुतल्या मुळे व तो कुठेतरी गडद अंधार असलेल्या कोपऱ्यात वाळवला जातो. याच काळात अस्वच्छ, असुरक्षित कपड्याचा वापर केल्यामुळे अनेक जंतूसंसर्ग होणे, अशा समस्या येतात. या सर्व प्रकारातून महिलांची सुटका व्हावी व त्यांची मासिक पाळी अधिक सुखकर व आनंददायी व्हावी यासाठी सॅनिटरी नॅपकिन, मेन्सट्रल कप यासारख्या साधनांचा वापर वाढू लागला आहे.

भारतात मोठ्या प्रमाणावर सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर वाढावा यासाठी प्रसार माध्यमांच्या सहाय्याने याचा प्रचार होत आहे. अगदी सेलिब्रिटी मंडळीही याबाबत जाहीरपणे बोलू लागले आहेत. यातून सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर हा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्यास सोपे आहे व वापरून झाल्यावर ते फेकून देता येते. ह्या अशा (use and throw) सॅनिटरी नॅपकिन्सचा आज मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. पण सॅनिटरी नॅपकिन्सचा कचरा हा अविघटनशील आहे. अशा कचऱ्यामुळे पर्यावरणाचे तसेच मानवी आरोग्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

 

hindustantimes.com

आपल्या देशातील कचरा व्यवस्थापनाच्या समस्याविषयी आपण सगळेच जाणतो. जलद गतीने वाढणारे शहरीकरण व त्यातून निर्माण होणाऱ्या अविघटनशील कचऱ्याच्या समस्या. ज्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स, लहान मुलांचे डायपर, मोठ्या व्यक्तींचे डायपर ह्या कचऱ्याचाही समावेश आहे.

एक महिला आपल्या आयुष्यात साडेतीन हजार (३५००) सॅनिटरी नॅपकिन्स वापरते. त्यातून १५० किलो अविघटनशील सॅनिटरी नॅपकिन्सचा कचरा तयार होतो. भारतात सॅनिटरी नॅपकिन्सच्या निर्मुलनाची कुठलीही स्वतंत्र व्यवस्था नाही सॅनिटरी नॅपकिन्स हा विषय जितका दुर्लक्षित तितकाच तो हानिकारक सुद्धा आहे. मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा सॅनिटरी नॅपकिन्सचा कचरा हा डम्पिंग ग्राउंडला जाऊन पडतो त्यामुळे तिथे अशा अविघटनशील कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

 

thehealthsite.com

सॅनिटरी नॅपकिन्स दुकानात सहज विकत मिळत असले तरी आजही ग्रामीण भागातल्या महिलांना हे पॅड विकत घेणे परवडत नाही. अनेकजणी खर्च टाळण्यासाठी एकच पॅड बराच काळ वापरतात. त्यातून जंतूसंसर्गही वाढतो व आरोग्याला हानी पोहचते. तसेच ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन्सच्या विल्हेवाटीची समस्याही मोठी गहन आहे. असे पॅड उघड्यावर जाळल्यामुळे त्यातून हानिकारक वायू बाहेर पडतो जो पर्यावरण व मानवी आरोग्यास घातक आहे.

यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे होणारे नुकसान रोखण्यासाठी शासन व सेवाभावी संस्थास्तरावर कार्य सुरु आहे. सध्या अनेक सेवाभावी संस्था या कचरा व्यवस्थापन विषयात कार्य करतात. या सेवाभावी या संस्थेमार्फत कचरावेचकांच्या आरोग्यासाठी व अविघटनशील सॅनिटरी नॅपकिन्सच्या निर्मुलनासाठी सतत प्रयत्न चालू आहेत. या संस्थेमार्फत निरनिराळ्या शहरीघटकांमधून कचरा संकलन करणे, कचरा वर्गीकरण करणे व त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे इ. कामे केली जातात.

 

huffingtonpost.in

महानगरपालिका स्तरावरील भारतातील पहिलाच सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल प्रकल्प जनआधार सेवाभावी संस्थेद्वारे राबविण्यात आला. ज्यात लोकांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजल करण्याविषयीची जनजागृती कार्यक्रम घेणे, वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स गोळा करणे, वर्गीकरण करणे, इन्सिनरेटर मशीनमध्ये त्याची विल्हेवाट लावणे त्याचबरोबर सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजल मशीन उभारणी देखभाल व दुरुस्ती यासारख्या कामाचाही समावेश आहे.

सॅनिटरी नॅपकिन्स च्या निर्मुलनाचा वैज्ञानिक मार्ग म्हणजे इन्सिनरेशन. जनआधार सेवाभावी संस्थेद्वारे पुणे शहरातील पाच प्रभागात सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजल मशीन बसविले गेले आहेत. ज्याद्वारे दररोज २८०० ते ३००० पर्यंत सॅनिटरी नॅपकिन्सची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.

ही यंत्रणा आज फक्त काही मोजक्या शहरांमध्येच उपलब्ध आहे. काही शाळा, कॉलेज पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र अशी इन्सिनरेटर मशीन आपल्या संस्थांमध्ये बसवून घेत आहेत.

अनेक संस्थांनी जैविक सॅनिटरी नॅपकिन्स बनविण्याचे काम हाती घेतले आहे. हे जैविक सॅनिटरी नॅपकिन्स पर्यावरणात फेकून दिले असता त्यांचे सहजपणे विघटन होते. अशा सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर जर ग्रामीण व शहरी भागात वाढला तर अशा कचऱ्याचे व्यवस्थापन करणे सहज शक्य होईल.

 

 

अविघटनशील वस्तूंचा वापर करून बनविण्यात येणारे सॅनिटरी नॅपकिनस हे पर्यावरणासाठी अतिशय धोकादायक आहेत. भारतात दरवर्षी चाळीस हजार कोटी सॅनिटरी नॅपकिन्सचा कचरा तयार होतो. तो पर्यावरण आणि कचरा वेचक कामगारांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. या कचऱ्याचे शास्त्रीय आणि कायदेशीर दृष्टिकोनातून व्यवस्थापन झाले तरच पर्यावरणावरील मोठा आघात थांबेल.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version