आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
परवाच त्रिपुरा येथे झालेल्या निवडणुकांचा निकाल लागला. या विधानसभा निवडणुकीत त्रिपुरा राज्यात आधीपासून सत्तेत असलेल्या डाव्या सरकारला शह देत प्रथमच या राज्यात भाजपने बहुमताने विजय मिळवला. डाव्यांचा बालेकिल्ला साफ झाला, आणि दुसर्याच दिवशी बातमी आली की त्रिपुरा मधल्या बेलोनिया चौकात उभा असलेला रेशियान कम्युनिस्ट नेत्याचा पुतळा भगवे झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत बुलडोझरने जमीनदोस्त केला.
या घटनेचे सामाजमाध्यमांत तीव्र पडसाद उमटले. डाव्या विचारसरणीच्या म्हणवणाऱ्या अनेकांनी तिखट प्रतिक्रिया देताना लेनिनच्या पुतळ्याची तुलना थेट अफगानात तालिबान्यांनी तोडलेल्या बामियान बुद्धाच्या मुर्त्यांशी केली.
या घटनेवर येणाऱ्या प्रक्षुब्ध प्रतिक्रिया अजून थांबलेल्या नाहीत. निवडणूक निकाल भाजपच्या बाजूने लागल्यानंतर अगदी दुसर्याच दिवशी घडलेले हे कृत्य आहे. त्यामुळे याला राजकीय संदर्भ आहेतच, पण देशात पूर्वीपासून चालत आलेल्या डाव्या किंवा कम्युनिस्ट प्रवाह विरुध्द परंपरावादी उजवा प्रवाह आशा वैचारिक संघर्षाची झालर आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्याने विश्लेषण करणे गरजेचे ठरते.
पुतळे, स्मारके, रस्त्यांना दिलेली महापुरुषांची नावे ही आपल्या अस्मितेची प्रतीके आहेत. आपल्या महापुरुषाच्या विचाराशी बांधिलकी सांगण्यासाठी आपल्याला त्याचा पुतळा हवा असतो. तो कुणी तोडायला नको असतो. तसेच आमचा महापुरुष तुमच्या महापुरुषापेक्षा जास्त महान आहे म्हणून, किंवा तुमचा महापुरुष हा महापुरुष नाहीच म्हणून विरुद्ध विचारांच्या अस्मितांची प्रतीके जमीनदोस्त करण्याच्या घटना वारंवार घडत असतात.
विचारांसाठी वाहून घेतलेल्या झुंडी हे काम चोखपणे करत असतात.
विशेष म्हणजे लेनिन चा पुतळा तोडल्यानंतर आम्हाला प्रश्न काय विचारावा वाटतो, “गोडसेचा पुतळा का तोडला नाही?!” म्हणजे लेनिनचा पुतळा तोडला म्हणून दुखः झालेले असते. पण गोडसेचा पुतळा कुणीतरी तोडावा अशी आमची मनोमन इच्छा असतेच की !
असे असताना आपण अजून समाज म्हणून अस्मितांच्या टोकेरी जानिवांतून बाहेत पडलेलो नाही हे वास्तव मान्य करून पुढे चर्चा करू…
या घटनेत ज्याचा पुतळा तोडला गेलाय तो लेनिन कोण होता? त्याचा पुतळा तोडला म्हणून भारतभरात त्याचे अनुयायी इतक्या मोठ्या संख्येने आक्रमक प्रतिक्रिया का देत आहेत? या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर कम्युनिस्ट चळवळीच्या इतिहासाची पाने चाळावी लागतील.
त्या काळात रशिया झारच्या अधिपत्याखाली होता. १८८७ मध्ये झार तिसरा अलेक्सांडर याच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अलेक्सांद्र नावाच्याच एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पोराला फासावर लटकावण्यात आले आणि त्याची मोठी बहीण ऍना हिला तुरूंगवासाची शिक्षा झाली. ही घटना शाळेत शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या लहान भावाच्या मनात पक्की बसली होती.
हा लहान मुलगा शालेय शिक्षण संपवून कायदा शिकण्यासाठी कझान विद्यापीठात दखल झाला. तिथे शिकणाऱ्या मुलांनी त्याच्या भावाच्या फाशीच्या आणि बहिणीला झालेल्या तुरुंगवासाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. या निदर्शनात सहभाग घेतल्याने ४५ विद्यार्थ्यांसह त्या मुलाला कॉलेजातून बाहेर काढण्यात आले. आता लोक त्याच्याकडे क्रांतिकारकाचा भाऊ म्हणून पाहू लागले.
१८ वर्ष वय असताना हा मुलगा तिथून स्थलांतर करून सामोर येथे आला. शिक्षण बंद असल्याने त्याने पुस्तके मिळवून वाचायला सुरुवात केली. या काळात मार्क्स त्याच्या वाचनात आला. रशियाच्या समस्यांवर मार्क्सवाद हा एकमेव उपाय आहे असे त्याला वाटू लागले. भांडवलशाही पद्धत उलथून पाडणे त्याचे ध्येय बनले. त्यांने समाजवादाचा प्रसार करण्यास सुरूवात केली.
१८९३ पासुन त्यांने लेख लिखाणास आरंभ केला. हळूहळू त्यांचे लेख जहाल होऊ लागले. १८९५ मध्ये रशियात परतल्यावर एक वृत्तपत्र काढण्याचे व त्याचे गुप्तपणे वाटप करण्याचे त्यांने ठरविले. जेमतेम पहिला अंक निघाला आणि गुप्तहेरांनी त्याला अटक केली. राजद्रोहाच्या आरोपाखाली त्याला कैद कडून सैबेरियात पाठवण्यात आले. तिथून पुन्हा रशियात आल्यानंतर रशियातील सोशल डेमोक्रेटिक पक्षाचे अधिवेशन लंडन येथे आयोजित करण्यात आले होते.
त्यात त्याचे पक्षातील ज्येष्ठ व्यक्तींशी तीव्र मतभे झाले, आणि तो पक्षातून आपल्या अनुयायांसह बाहेर पडला. आणि १८९८ साली त्याने बोल्शेव्हिक पार्टीची स्थापना केली. त्याला पाठींबा देणारे बहुमत वाले बोल्शेव्हिक तर उरलेले मेंशेव्हिक म्हणून ओळखले जाऊ लागले.
यानंतरच्या महत्वाचा टप्पा म्हणजे १९०५ साल. जानेवारी महिन्यात सेंट पिटसबर्ग येथे नागरी अशांतत निर्माण झाली. फादर गॅपोनच्या नेतृत्वाखाली शहरातल्या कामगारांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी झारच्या राजवाड्याच्या दिशेने मार्च सुरु केला. या हजारोच्या जमावावर झारच्या सैनिकांनी थेट गोळीबार केला. शेकडो कामगारांना कंठस्नान घातले. ‘ब्लड संडे’ म्हणून ओळखल्या गेलेल्या या हत्याकांडात त्याने आपल्या अनुयायांना म्हणजेच ब्लोक्षेव्हिक पक्षाच्या लोकांना हिंसात्मक क्रांतीसाठी प्रोत्साहन दिले.
झारच्या सत्तेच्या विरोशात सशस्त्र बंड उभारण्याचे आणि मोठ्या प्रमाणावर दहशत बसवण्याचे तंत्र अवलंबले. पण या वेळी झारची सत्ता उलथून टाकण्याचे ध्येय ठेवलेल्या त्याला ते शक्य झाले नाही. पुढे १९१७ साली त्याने रशियाच्या पुनर्निर्माणाची योजना बनवली आणि ती सफल झाली.
नेमक्या याच क्रांतीत लेनिनच्या नेतृत्वाने क्रूरतेचा कळस गाठला. १९०५ साली झालेल्या झारप्रणीत हिंसाचाराला सामोरे जात असताना त्याने “मास टेरर” ची पद्धत विकसित करायला सुरुवात केली होती. याच विचाराने प्रभावित होऊन ऑक्टोबर १९१७ मध्ये बोल्शेव्हिकांनी सत्ता हस्तगत केल्यानंतर रशियात मोठ्या प्रमाणात दहशतवादी तयार झाले.
या काळात रशियात अल्पसंख्य असलेल्या बोल्शेविकांनी सर्व प्रकारच्या सशस्त्र लढ्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. केवळ सामाजिक हिंसाचाराच्या चळवळींव्यतिरिक्त, “सामूहिक दहशतवाद” हा मार्ग संपूर्ण सामाजिक रचनेच्या बदलासाठी वापरला गेला, तोही कोणत्याही निषेधाशिवाय, निर्धारीत सिद्धांत व निर्विवादित धोरण म्हणून!
“सामूहिक दहशतवाद” आणि त्यात भाग घेणे या काळात बोल्शेविक लोकांसाठी सामाजिक बांधिलकीचे प्रमाण बनले. ज्याचा उद्देश्य नवीन समाजाची उभारणी करताना अंतर्गत शत्रू ठरवलेल्या गटांना दूर करण्याचा होता. या रक्तरंजित क्रांतीनंतर हुकुमशहा म्हणून लेनिनने मान्यता मिळवली. त्याने रशियाचा कारभार आपल्या हातात घेतला.
नव्या समाजरचनेची उभारणी करताना लोकसंख्येत थेट मित्र आणि शत्रू अशी वर्गवारी केली.
मित्र म्हणून पहिल्या स्थानावर होता कामगार सर्वहारा गट. त्यानंतर शेतमजूर आणि गरीब शेतकरी. आणि शत्रू म्हणून होता बुर्ज्वा वर्ग, जमीनदार, पोप आणि मार्क्सवादी विचारात मजुरांचे शोषण करणारे शेतकरी म्हणून ज्यांचे वर्णन होते तो वर्ग.
या क्रांतीने सर्वहारा समाजाचे राज्य आणणे सध्या झाले असले तरी त्यासाठी लोकांच्या अमर्याद कत्तली झाल्या होत्या. सर्वहारा राज्य येणे गरजेचे होते ही अपेक्षा विधायक होते. पण ते आणण्याचा लेनिनचा मार्ग अत्यंत क्रूर, अमानवी आणि पाशवी होता. त्यातून नागरिकांचे रक्त वाहिले होते. आणि बोल्शेविक क्रांतीच्या या सगळ्या दबावतंत्राचा प्रणेता होता लेनिन! मानवता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली मानवाचे रक्त वाहिले गेले. हा कुठला मानवतावाद?
१८ ओगस्ट १९१९ रोजी प्रकाशित झालेल्या एका लेखात आणि त्याच काळात प्रकाशित झालेल्या अनेक लेखात लेनिन म्हणतो –
“आम्ही जुन्या नैतिकतेला आणि ‘मानवतेला’ नाकारतो. ज्यायोगे निम्न वर्गांचा छळ केला गेला. तशा खोट्या नैतिकतेचा काही उपयोग नाही. आमचा विचार परिपूर्ण आहे कारण तो नवीन आदर्शावर अवलंबून आहे. कोणत्याही प्रकारच्या दडपणाचा नाश करण्यासाठी आणि त्यासाठी हिंसा हा मार्ग अवलंबण्याची आम्हाला परवानगी आहे.
–
कारण आम्ही आमच्या तलवारींना दडपण्यासाठी आणि गुलाम बनण्यासाठी नव्हे तर गुलामीच्या जोखडातून मुकी करण्यासाठी प्रथम आहोत…रक्त? रक्त जाऊ द्या! फक्त रक्त ब्लॅक ध्वज रंगवू शकते. समुद्री डाकू बुर्ज्वाइझी एकदा आणि कायमसाठी लाल रंगाच्या बॅनरमध्ये, क्रांतीचा झेंडा फिरवून, केवळ जुन्या जगाचा शेवटचा मृत्यू म्हणून त्यांच्या रक्ताचा शेवटचा थेंब सांडेल तेव्हा आपल्याला कायमची मुक्ती मिळेल.”
रक्तरंजित क्रांती हा जगभरातील कम्युनिस्ट हुकुमशहाच्या सामाजिक क्रांतिचा अधिकृत मार्ग होता हे यातून उघड आहे. हा मार्ग तत्कालीन परिस्थिती विचारात घेता योग्यच होता असे म्हणून या हिंसाचाराचे समर्थन करणारेही कमी नाहीत. या परिस्थिती तो योग्य आहे काय? नसेल तर लेनिन हा संवैधानिक चौकटीत राहताना एखाद्या सामाजिक चळवळीचा आदर्श कसा असू शकतो? आणि एरवी प्रतीकांना विरोध करत फिरणारे त्याचा पुतळा पडला म्हणून शोक का करतात?
लेनिनचा पुतळा पडल्याने इतके दुखः हॉट असेल तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपणही आपल्या प्रस्थापित प्रतीकांच्या बाबतीत प्रचंड भावनिक आहोत आणि अर्थातच कमालीचे व्याक्तीपुजक आहोत हे मान्य करायला काय हरकत आहे?
आता शेवटचा प्रश्न ज्यांनी पुतळा पाडला त्यांच्या मानसिकतेचा!
तर लोकशाही मार्गाने डाव्या विचारांना शह देण्याचे सगळे पर्याय उपलब्ध असताना पुतळा पाडून इतके दिवस कोंबून ठेवलेला क्षोभ व्यक्त करणे हे अत्यंत अमानवी कृत्य आहे. स्मारके पाडून दावा विचार संपेल हा भाबडा आशावाद जन्म घेतो तो अस्मितेच्या कुशीतच. आणि मग बुलडोझर घेऊन झुंड निघते, लेनिनचा पुतळा पाडून स्वतःच्या विजयाचा उन्माद साजरा करायला. डाव्यांच्या पाशवी सत्तेचे प्रतिक असलेल्या लेनिनचा पुतळा आम्ही पाडतोय असा त्यांचा दावा असतो. आणि दुर्दैव म्हणजे अशाच पाशवी सत्तेचे प्रतिक असलेल्या मनूच्या राजस्थान हायकोर्ट समोर असलेला पुतळा पडायला सोडा, त्याबद्दल चकार शब्द काढायला ही झुंड तयार नसते.
हा मुद्दा काही दिवसांनी महत्वाच्या बातम्यांतून गायब होईल. जनतेची स्मृती कमी असते म्हणतात. पुन्हा कुठलेतरी प्रकरण निघेल. लेनिनचा पुतळा पाडणारे आणि लेनिनच्या क्रांतीमार्गाचे समर्थन करणारे, हे दोन्ही अस्मितावादी गट विस्मरणात जातील. आम्ही पुन्हा प्रगत समाज म्हणून छाती पुढे काढून मिरवायला मोकळे होऊ.
लोकशाही समाज म्हणवून घेताना विचारांचा लढा विचाराने लढायचा असतो या मुलभूत मूल्याला पायदळी तुडवणारे दोन्ही गट या दिशाभूलीला जबाबदार असतील.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.