शिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग -२ )
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : बापू शिंदे
===
शिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग – १)
===
शिवपूर्वकालीन भारताचे सम्यक स्वरूप न्याहाळल्यानंतर शिवपुर्वकालीन महाराष्टाचे स्वरूप विशेषत्वाने जाणून घेणे आवश्यक आहे, कारण महाराष्ट्र हि शिवछत्रपतींची जन्मभूमी व कर्म भूमी होती.
पहिल्या भागात पाहिल्याप्रमाणे मुहम्मद घोरीने १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात आपले पाय हिंदुस्तानात रोवायला सुरवात केली, नेमक्या याच वेळी इ. स. ११८७ मध्ये देवगिरीवर यादवांचे राज्य सुरु झाले.
इ.स. १३१७ मध्ये मुबारकशहा हा अल्लाउद्दीनचा तिसरा मुलगा सुलतान झाला. मुबारकशहा गादीवर येताच त्याने १३१८ मध्ये देवगिरीवर आक्रमण केले. या युद्धात देवगिरीकारांचा पाडाव झाला.
हरपालदेव मुबारकच्या हाती जिवंत सापडला. मुबारकशहाने सर्वाना दहशत बसावी या हेतूने त्याच्या अंगाची कातडी सोलून त्याला भयानकरीत्या ठार केले.
या अवधीत त्याने यादवसत्तेची पाळेमुळे खणून काढली. यादव सत्तेचा अस्त झाल्यानंतर महाराष्ट्रावर इस्लामी राजवटीचा वरवंटा सतत तीनशे वर्ष फिरत होता.
या प्रदीर्घ काळात इथे खलजी तुहुलूक, बहमनी, निजामशाही, आदिलशाही, बारीदशाही, इमादशाही फारुकी व मोगल एवढ्या इस्लामी राजवटीनी थैमान घातले.
शिवपूर्व काळात या सर्व शाह्यातील सुमारे ७२ सुलतानांनी सतत तीन शतके महाराष्ट्र आपल्या जुलुमानी भरडून काढला.
बहमनी काळापासुनचे महाराष्ट्राचे स्वरूप अभ्यासले असता उत्तरे प्रमाणेच इथल्या सत्तेचे स्वरूपही – वारेमाप कत्तली व जाळपोळ, मंदिरे व हिंदू देवतांच्या मूर्ती यांचा विध्वस, स्त्रियांचे अपहरण, धर्माधता व बळजबरीने धर्मातरांचा जुलूम, अन्याय, विश्वासघात, अकारण रक्तपात, पाशवी अत्याचार व निघृण छळ – याच शब्दात वर्णन करता येईल.
मुहम्मदशाह बह्मनीच्या काळात कित्येक लाख हिंदू लोक मुसलमानाच्या तलवारीला बळी पडले.
हा सुलतान जिथे जिथे गेला तिथे तेथे दयामाया न दाखविता त्याने पुरुष, स्त्रिया व कडेवरची मुले यांची वारेमाप कत्तल केली. जेथे कत्तलीची संख्या २० हजार होई तिथे तीन मुक्काम करून उत्सव साजरा केला जाई.
निजाम शाहीतील मिरन हुसेन दारूच्या धुंधीत घोड्यावर बसून निघायचा सोबत समानशील साथीदार असत. त्याचा छंद म्हणजे रस्त्यात भेटतील त्यांना अपराधावाचूनच ठार मारीत सुटायचे.
कुली कुत्ब सुलतान यांने तर संकल्प सोडला होता की, हिंदूचा धुव्वा उडविण्याच्या कामी कितीही खर्च येवो किंवा कितीही सैन्य कामास येवो तिकडे लक्षच द्यायचे नाही.
लष्कर चालू लागले म्हणजे मार्गात लागतील त्या प्रत्येक गावाला आग लावूनच पुढे जावे असा त्याचा सैन्याला आदेश होता.
मंदिराचा व मूर्तीचा भयानक विध्वंस केला जाई.
घोडे येथील इ.स १५८६ चा एक पारशी शिलालेख उपलब्ध आहे, त्यात जनाब मीर मोहम्मद इमान याने ३३ देवळे फोडून घोडे उर्फ खाराबाबाद येथे मशिदीचा पाया घातल्याचा उल्लेख आहे.
पाशवी भोग भोगण्यासाठी हे सुलतान स्त्रियाचे अपहरण प्रचंड प्रमाणावर करीत. अल्लाउद्दिन हुमायुनशहा बहमनी याला लोक जालीम म्हणत. तो लग्नातील वधूस पळवून नेत व बलात्कार करून पतीकडे परत पाठवी.
हे सारे सुलतान विलक्षण धर्मांध होते. इस्लामच्या नावाखाली त्यांनी धर्मसंबंधात जे अत्याचार केले ते अंगावर शहारे आणणारे वाटतील.
बिदरच्या बादशाहने किल्ले पुरंदरास शेंदरी बुरुजाचे काम लावले ते शेवटास जाईना त्यावेळी बादशहास दृष्टांत झाला की जेष्ठ पुत्र व जेष्ठ सून बळी दिल्यास बुरुजाचे काम शेवटीस जाईल.
त्यावरून नाथानाक व देवकाई या दोन दुर्दैवी जीवांना एका आश्विन वद्य अष्टमीत शेंदरी बुरुजात गाडले असल्याचा उल्लेख एका ताम्रपटात आढळतो .
इस्लामी कायद्यानुसार गैरइस्लामी प्रजेवर सरसहा अन्याय केला जाई. महम्मद आदिलशाहीची राजनीती सांगणार जी फार्सी बखर उपलब्ध आहे तीत ८२ नियम दिलेले असून त्यामध्ये हिंदुना कसे वागवावे हे सांगितले आहे.
नियम क्र. ७ – आपल्या मुलखातील एकंदर कारखान्यात मुसलमान जातीचे मामलेदार वगैरे अंमलदार व हिंदू जातीचे कारकून ठेवावेत हिंदुना हुकमी काम देऊ नये, कारण की त्यामुळे पृथ्वीची व धर्माची खराबी होते.
नियम क्र. २१ – मुसलमान लोक व मुसलमान कायद्यास अशा प्रकारे मजबूत ठेवावे, कि कोणताही अधर्मी पुरुष म्हणजे हिंदू प्रबळ असला तरी त्यास गरीब मुसलमानाची बरोबरी करण्याचे सामर्थ्य राहू नये हिंदूचा पक्ष धरून मुसलमानास उपद्रव देऊ नये हिंदुना दिवाळी दसरा सण उघडपणे साजरे करून देऊ नयेत.
न्यायव्यवस्था :
तत्कालीन न्याय व्यवस्थेबद्दल लिहायचे तर न्याय ही क्रूर थट्टा झाली होती. बहुसंख्य प्रजा हिंदू असली तरी राज्य इस्लामचे होते. त्यामुळे इस्लामी कायद्यानुसार न्याय दान केले जाई त्यानुसार काझी न्यायाधीशाचे कार्य करीत.
त्यावर अपील करता येत नसे. हे काझी बव्हंशी भ्रष्टाचाराने बरबटलेले असत तेवढेच ते काफिर व्देषानेही ओतप्रोत भरलेले असत.
शिवाय लिखित कायदेशास्त्र नसल्यामुळे मनाप्रमाणे न्याय देण्यास ते मोकळे असत. तोंडी तक्रारीवर पुष्कळदा विनाचौकशी भीषण शिक्षा दिली जाई.
एखादी स्त्री जर काही तक्रार घेऊन आली तर तिला तीन दिवस आपल्या घरी ठेऊन घेण्याचा विचित्र अधिकार काझीला असे.
इस्लामी राजवटीत स्त्रियांची अवस्था इतकी केविलवाणी होती की एक भोगवस्तू या पलीकडे त्यांना स्थान नव्हते. सुलतानांच्या जनानखान्यात हजारो कुलवान स्त्रिया जबरीने दाखल केल्या जात.
याशिवाय काफीर, मौलवी, फकीर,अमलदार यांनाही कामचेष्टेसाठी नित्य नवीन स्त्रिया पाहिजे असत. हे अधिकारी त्यासाठी टपून बसलेले असायचे.
त्यामुळे यात्रेत सामील होणे वा घराबाहेर पडणेही स्त्रियांना मुष्कील होई. शाही सरदार त्यांची शिकार करण्यासाठी सदैव पाळतीवर असत.
खानदेशातील फारुकी सल्तनीचा शेवटचा सुलतान बहादुरशहा याने जिझिया खात्याच्या अधिकाऱ्यांना व कारकुनांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे.
या बहादुर शहाच्या कारकिर्दीत जिझिया वसूल करण्याचे एक वेगळेच खाते होते असे या फर्मानाहून दिसून येते. याशिवाय “हिंदुवानी” नावाच्या कराचा उल्लेख आहे. तो कर केवळ हिंदुकडून वसूल केला जात होता.
काही भागात बुतफरोशी म्हणजे मूर्तीपूजा नावाचा एक कर होता, तो करही केवळ हिंदुकडून वसूल केला जात होता. जर कर भरायच्या खंडात तुट आली आणि ती त्यांच्या (हिंदू) मालमत्तेतून भागण्याजोगी नसेल तर त्यांना देह दंड सोसावा लागतो.
जर ते (हिंदू) फरारी झाले तर कर्जाचा बोजा त्यांच्या बायकामुलांच्या बापभावांच्या व भाऊ बंदाच्या डोक्यावर बसतो आणि त्यांना कर्ज चुकवावे लागते किवां हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात.
कधी कधी ते (हिंदू) माराने मरण पावतात.
मुसलमान एखादा प्रदेश जिकून घेई तेव्हा त्यांच्या धर्मवेडाला ऊत येई. मग ते हिंदूंची कत्तल उडवीत त्यांना गुलाम म्हणून विकून टाकीत किवां जबरदस्तीने मुसलमान करीत.
हिंदू स्त्रियांना स्वताच्या जणान खाण्यात कोबीत आणि हिंदूंची देवळे पाडून तिथे मशिदी उभारत.
जिथे युध्द संपून मुसलमानी सत्ता स्थिर स्थावर झाली आहे अशा प्रदेशातदेखील हिंदुना अनेक प्रकारच्या अपमानाना तोंड त्यावे लागे.
निष्कर्ष :
शिवपूर्वकालात भारतातील मुसलमानी राज्यकर्त्यांच्या धर्म, संस्कृती, भाषा व राज्यपद्धती इत्यादींच्या कल्पना व त्यांना आधारभूत तत्वे ही येथील हिंदू तत्वाहून अगदी निराळी होती.
येथील बहुजन समाज सामन्यात: ईश्वरवादी असला तरी त्यांच्या ईश्वर विषयक तत्वज्ञानात पुष्कळ पंथ होते. एवढेच नव्हे तर नास्तिक लोकही त्या समाजात विशेष त्रास न होता राहू शकत.
येथे नव्याने आलेले मुसलमान राज्यकर्ते हेही ईश्वरवादी होते, पण त्यांच्या ईश्वर व धर्म विषयक कल्पनांच्या विरुद्ध जे असेल ती सर्व नास्तिकता व तिचा आचार करणारे ते सर्व काफीर, एवढेच नव्हे, तर अशा नास्तिकांना सर्व तऱ्हेने चोपून काढून त्यांचा नाश करणे किवां त्यांना आपल्या धर्मात आणणे, हे त्यास पुण्य कर्म वाटे.
ते पुण्य आपणास मिळावे म्हणून हे राज्यकर्ते बहुजन सामाजावर नाना प्रकारचे निर्बंध घालून त्यांना मेटाकुटीस आणण्याचा किवां नष्ट करण्याचा प्रयत्न करीत.
शिवपूर्वकालात इस्लामिक राजवटीत महाराष्ट्राला स्वधर्म, स्वभाषा व संस्कृतीचा विसर पडला व उत्तरेप्रमानेच इथेही अधपतीत जीवनातून उत्पन्न झालेली लाचारी व गुलामगिरी हाच युगधर्म होऊ लागला.
जीवन उध्वस्त करणाऱ्या इस्लामी दास्यशृंखला शेकडो वर्ष गळ्यात पडल्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर सारा भारतवर्ष अखेरचे आचके देत होता.
अशा परस्थितीत झालेला शिवजन्म ही घटना महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतवर्षाच्याच जीवनातील क्रांतिकारक अशी महत्वपूर्ण घटना आहे.
शिवपूर्वकाळातील इस्लामीक राजवट शिवकाळात ही होतीच. मुघल बादशाह औरंगजेब उर्फ आलमगीर चे उदाहरण पाहू. औरंगजेब ने विविध इस्लामिक कायद्यांचा संग्रह करून “फतवा ए अलामगिरी” निर्माण केले.
या कामासाठी त्याने दक्षिण आशियातून ५००, इराक़मधून १०० तर सौदी अरेबियातून १०० हून अधिक इस्लामिक पंडित बोलावले.
“फतवा ए अलामगिरी” निर्माण करण्यासाठी या इस्लामिक पंडितांनी विशेषतः सुन्नी हनाफी इस्लामच्या शरिया कायद्यांचा आधार घेतला.
औरंगजेबचा कारभार व न्यायव्यवस्था “फतवा ए अलामगिरी” प्रमाणे चालत असे. या व्यवस्थेत माणसाचा धर्म व सामाजिक आणि आर्थिक परीस्थित पाहून इस्लामिक न्याय पंडित आदेश देत असत. अशी ही भेदभावयुक्त न्यायपद्धती होती.
एखादा गुन्हा करणाऱ्या मुसलमानास सौम्य शिक्षा असेल तर तोच गुन्हा करणाऱ्या गैर मुसलमानास (ज्या मध्ये बहुसंख्य हिंदू) कठोर शिक्षा असे व गरीब आणि बहुजन समाजातील गैर मुसलमानास तर अधिकच कठोर शिक्षा दिली जात असे.
गैरमुसलमान समाजातील स्त्रियांना तर या न्यायव्यवस्थेप्रमाणे अत्यंत खालचा दर्जा दिला गेला.
“फतवा ए अलामगिरी” प्रमाणे निर्माण झालेल्या विविध विभाग व प्रशासनाचा उद्देश संपूर्ण दक्षिण आशियाचे इस्लामीकरण करणे हाच होता.
अशा परिस्थितीत, केवळ स्वतःचे राज्य निर्माण करणे एवढ्या स्वार्थी हेतूपोटी नव्हे तर सामान्य माणसाला जुलुमी राजवटीपासून मुक्त करण्यासाठी शिवछत्रपतींनी कार्य केले, युद्ध केले आणि भारतवर्षाला पुन्हा नवे संजीवन प्राप्त झाले.
जिथे जिथे शिवछत्रपतींचे राज्य निर्माण झाले तिथे तिथे तत्कालीन इस्लामी राजवटीत असणारे जुलमी कायदे नष्ट झाले आणि राज्य कारभाराचे, न्यायदानाचे, जनतेचे कल्याण करणारे नवे नियम निर्माण झाले.
वठू लागलेला हिंदवी जीवनवृक्ष पुन्हा एकदा महाराजांच्या कर्तुत्वाने पल्लवित होऊन डोलू लागला. यावरून शिवाजी महाराजांच्या कार्याचे महत्त्व लक्षात येते.
शिवाजी महाराज लढले ते मुसलमानाशी नव्हे तर शांततेचा भंग करणाऱ्या, आपले विचार दुसऱ्यावर जबरदस्तीने लादणाऱ्या अत्याचारी इस्लाम धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध…
भाग १ व भाग २ साठी वापरलेले संदर्भ:
१ शककर्ते शिवराय खंड पहिला (लेखक: विजय देशमुख )
२ औरंगजेब (लेखक: जदुनाथ सरकार )
३ राजा शिवछत्रपती खंड १ (लेखक: गजानन भास्कर मेहंदळे)
४ मराठ्यांचा इतिहास खंड १ (लेखक: अ.रा. कुलकर्णी आणि ग.ह. खरे)
५ विकेपिडीया – “फतवा ए अलामगिरी”
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.