आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
काही वर्षपूर्वी CBI ने FIR फाईल केल्याच्या तब्ब्ल ९ महिन्यानंतर पी चिदंबरम ह्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम ह्याला अटक झाली. त्यावेळी कार्तीचे ग्रह इतके फिरले की केवळ FIR वर भागलं नाही. नाहीतर आपल्याकडे FIR दाखल होऊन काही मिनिटांत जामिनावर मोकळीक होते. कार्तीला थेट कस्टडीत ठेवलं. पुढे कस्टडी वाढवली सुद्धा!
आता तर पिताश्री पी चिदंबरम पर्यंत सीबीआय पोहोचली आहे.
थोडक्यात, सरकार एकूणच ह्या प्रकरणाबद्दल अत्यंत गंभीर आहे हे सर्व घटनाक्रमांतून दिसून येत आहे.
एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी. दाखल झालेली तक्रार कोणत्या ताज्या प्रकरणाबद्दल नाही. २००७ मध्ये घडवून आणलेल्या जबरदस्त किचकट अफरातफरीबद्दल आहे. ह्या धांदलीच्या मुळापर्यंत गेल्यावर दिसून येतो – भारतीय व्यवस्थेतील सिस्टिमॅटिक करप्शनचा भव्य खेळ.
===
तुम्ही एका कंपनीचे दीड लाख शेअर्स १०० रूपयांना विकत घेता. म्हणजे एकूण खरेदी झाली १.५ कोटी रुपयांची.
ह्या दीड लाख शेअर्स पैकी, साठ हजार शेअर्स तुम्ही एका दुसऱ्या इन्व्हेस्टमेंट कंपनीला विकता. किती रूपयांत? तब्ब्ल २२.५ कोटी रूपयांत.
म्हणजे, ६० लाख रूपयांत विकत घेतलेली वस्तू चक्क २२.५ कोटी रूपयांत विकली गेली…!
हा व्यवहार अर्थातच कागदोपत्री झालाय. टोटली ऑथेंटिक. पांढऱ्या पैश्यांतून. पण, कॉमन सेन्स हेच सांगतो की ह्यात गडबड आहे. ह्या व्यवहारात सामील असणाऱ्या लोकांनी एकमेकांना मदत करण्यापोटी केलेल्या पैश्यांच्या व्यवहाराला “अधिकृत” रूप देण्याचा हा मार्ग आहे.
ह्याला म्हणतात – व्हाईट मनी करप्शन.
वेलकम टू कार्ती चिदम्बरम केस…!
===
प्रकरण मुळातून समजून घेण्यासाठी स्टेप बाय स्टेप जाऊ या :
INX प्रकरण :
INX Media PVT LTD ह्या कंपनीने १५ मार्च २००७ रोजी परदेशी गुंतवणूक उभी करण्याची परवानगी, Foreign Investment Promotion Board (FIPB) ला मागितली. तीनच दिवसांत – १८ मार्च रोजी FIPB ची मिटिंग झाली आणि परवानगी देण्यात आली. (INX Media ला हे पैसे देशभरातील हिंदी आणि इतर भाषिक वाहिन्या चालवण्यासाठी उभे करायचे होते.)
CBI चे आरोप २ आहेत –
१) INX ला FDI द्वारे ४.६२ कोटी रूपये उभे करण्याची परवानगी देण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र तब्बल ३०५ कोटींहून अधिक रूपये उभे करण्यात आले – FIPB च्या परवानगी शिवाय.
२) INX ला हे पैसे उभे करण्याची परवानगी दिली होती, परंतु ते पैसे INX News ह्या सबडिव्हिजनमध्ये वापरण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. प्रत्यक्षात ही रक्कम प्रचंड प्रमाणात (२६%!) INX News कडे वळवण्यात आली.
प्रकरण उघडकीस कसं आलं?
अनेकांच्या लक्षात असेल की INX Media चे इंद्राणी आणि पिटर मुखर्जी हे शीना बोरा हत्येत चर्चेत आले होते. (आता लक्षात आलं असेल! कारण आजपर्यंत मोठ्या चलाखीने सर्व माध्यमांनी आपलं लक्ष मुख्य प्रकरणावरून उडवलं होतं!) इंद्राणी आता अटकेत असायला अडीच वर्ष होऊन गेली. ह्या अडीच वर्षात अनेक गोष्टी उघड झाल्या, ज्या तपास यंत्रणेने व्यवस्थितपणे गोपनीय ठेवल्या आणि संपूर्ण प्रकरणात सिद्ध करता येण्याजोगे धागेदोरे हाती लागल्यावरच कार्ती कडे थेट मोर्चा वळवला.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मुखर्जी दुकलीने घातलेला घोळ शीना बोरा हत्येमुळे उघडकीस आला. कारण हत्येच्या आरोपात अटक झालेल्या इंद्राणीने हत्येची कबुली तर उशिरा दिलीच (तपास यंत्रणेचे प्रमुख राकेश मारिया बदलल्या नंतर!) –
पण ही कबुली काढून घेत असताना यंत्रणेच्या हाती मोठीच स्फोटक माहिती लागली…
माध्यमसमूह आणि चिदंबरम पिता-पुत्रांच्या साटेलोटेची माहिती!
कार्ती चिदम्बरमची भूमिका :
आता झालं असं, की मे २००८ मध्ये FIPB ने INX ला वरील दोन्ही गोष्टींबद्दल स्पष्टीकरण मागितलं. इथेच कार्ती कम्स इनटू पिक्चर. CBI चा आरोप आहे की FIPB ने स्पष्टीकरण मागताच, INX च्या इंद्राणी आणि पीटर मुखर्जीने चिदम्बरम पिता-पुत्रांबरोबर संधान साधलं. हे संधान साधण्यात कार्ती इंटरमिजिएट होता – ज्याच्या Advantage Strategic Consulting Pvt Limited (ASCPL) ह्या कंपनीला INX ने “सेवा पुरवण्याबद्दल” १० लाख रूपये अदा केले. बदल्यात, पी चिदंबरमच्या “पावर” पोटी FIPB अधिकाऱ्यांनी INX च्या अफरातफरीकडे केवळ दुर्लक्षच केलं नाही, तर आणखी FDI साठी नवा अर्ज करण्याची सूचना केली…!
–
हे ही वाचा – मुकेश अंबानी किती भ्रष्ट आहे बरं? वाचा ‘अंबानी भ्रष्टाचारा’चा महाअध्याय
–
Advance Consulting नावाचं पैश्यांच्या अफरातफरीचं महाकाय रॅकेट :
वरील प्रकरणात कार्ती च्या कंपनीला “फक्त” १० लाख रूपये दिल्याचं दिसतंय. हा आकडा फारसा मोठा वाटत नाही…पण मेख त्या पुढे आहे.
ही कंपनी अश्या “डील्स” करून देऊनच पैसे कमावते. कमावलेल्या पैश्यांच्या जोरावर Advance Consulting ने जगभरात हजारो करोडच्या प्रॉपर्टीज विकत घेतलेल्या आहेत. ह्या प्रॉपर्टीजची लिस्ट अनेक वृत्तपत्रांनी उघड केली आहे. मग अश्या दहा-दहा लाख रुपयांवर हे शक्य आहे का? अर्थातच नाही. इथेच आपण लेखाच्या सुरूवातीला बघितलेलं – शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराचं गणित पुढे येतं.
Advance Consulting ह्या कंपनीने वासन आय केअर चे दीड लाख शेअर्स १०० रुपये भावात विकत घेऊन, त्यातील ६०,००० शेअर्स “सिकोया कॅपिटल” ह्या परदेशी कंपनीला तब्ब्ल साडे बावीस कोटींना विकलेत. हीच माहिती समोर आणून – S Gurumurthi ह्यांनी सदर प्रकरण समोर आणलं आणि चिदम्बरम पिता पुत्रांवर संशयाची नजर तिखट झाली.
कार्ती च्या Advance Consulting च्या मालकीचा घोळ :
इंडियन एक्स्प्रेसमध्ये S Gurumurthi ह्यांनी मोठाले लेख लिहून Advance Consulting च्या अफरातफरीचं प्रकरण लावून धरलं. जसजसं वातावरण गरम झालं, तसतसा पी चिदम्बरम ह्यांचा “नकार” अधिकाधिक तीव्र झाला. हा नकार देताना, चिदंबरम ह्यांनी एक वाक्य वारंवार म्हटलं होतं –
“आमच्या कुटुंबातील कुणाचाही सदर Advance Consulting ह्या कंपनीशी कोणताही संबंध नाही. माझ्या मुलाच्या (कार्तीच्या) मित्रांची ही कंपनी आहे. आणि केवळ राजकीय सूडबुद्धीने प्रेरित होऊन सरकार कार्तीच्या मित्रांना त्रास देत आहे.”
चिदंबरम ह्यांनी वरील विधान पहिल्यांदा २ डिसेम्बर २०१५ रोजी केलं. १६ डिसेम्बर रोजी इंन्कमटॅक्स ने धाड टाकून काही महत्वाचे दस्तावेज हस्तकगत केले – ज्यातून Advance Consulting च्या मालकीची गुंतागुंत समोर आली. ही लक्षात घेतली की हे किती मोठं रॅकेट आहे ह्याची कल्पना येते.
२००६ साली, एका “मोहन राजेश” नावाच्या माणसाच्या कम्पनीकडे, ह्या Advance Consulting चे ४०% शेअर्स होते. कार्ती ने २००६ मध्येच हे शेअर्स स्वतः विकत घेतले – आणि Advance Consulting चा १००% मालक झाला. ही मालकी २०११ पर्यंत व्यवस्थित होती. म्हणजे २००६ ते २०११, कार्ती चिदम्बरम हाच Advance Consulting चा पूर्ण मालक होता.
२०११ साली कार्तीला आपली अफरातफर उघड होऊ शकते, ह्याची कुणकुण लागली. तश्या बातम्या प्रसिद्ध देखील झाल्या. लगेच कार्ती ने ४०% शेअर्स पुन्हा मोहन राजेशला विकले. हा मोहन राजेश आपला “शेजारी” आहे हे कार्तीनेच उघडपणे म्हटलं आहे.
उरलेल्या ६०% शेअर्सचं काय झालं? तर – कार्तीच्या ४ “जवळच्या” मित्रांच्या नावे हे शेअर्स केले गेले. ह्या मित्रांची नावं आहेत – सीबीएन रेड्डी, रवी विश्वनाथन, पद्मा विश्वनाथन आणि भास्कर रामन. मात्र गंमत पुढे आहे.
ह्या चारीच्या चारी मित्रांनी आपलं मृत्युपत्र तयार केलंय. ह्या मृत्यू पत्रांचे २ भाग आहेत. पहिल्या भागात ह्या चौघांनी आपापली संपत्ती, मालमत्ता आपल्या मुलांच्या नावे केली आहे.
दुसऱ्या भागात – हे नीट वाचा – दुसऱ्या भागात, चौघाच्या चौघांनी, आपल्या मालकीचे Advance Consulting चे शेअर्स कार्तीच्या मुलीच्या नावे केले आहेत…!
आणि – ह्या मृत्यू पत्राचा “executioner” म्हणून कार्तीचं नाव नमूद केलं गेलं आहे.
हे चारही मृत्युपत्र एकाच दिवशी तयार केले गेलेत. चारींवर त्याच त्याच साक्षीदारांच्या सह्या आहेत…!
ह्यातून Advance Consulting ही कार्ती चिदम्बरम चीच कंपनी असल्याचं सिद्ध होतं. वेगवेगळ्या लोकांच्या नावाने शेअर्स फिरवणं हे फक्त वरवरचं फिरवाफिरवीचं काम आहे.
पी चिदम्बरमचा रोल काय?
आता ह्या सगळ्यात पी चिदम्बरमचं नाव का गोवण्यात यावं – हा प्रश्न उपस्थित होतोच.
खरंतर हा प्रश्न खुद्द चिदम्बरमनाच विचारायला हवा.
कार्ती वरील आरोपांची उत्तरं देण्यास चिदम्बरम का पुढे येत आहेत? अगदी सुरुवातीपासून कार्तीचा बचाव करण्यासाठी चिदम्बरम ह्यांनी वृत्तपत्रांना पत्र लिहिण्यापासून ते कोर्टात कार्तीची बाजू लढवेपर्यंत सर्वकाही केलं आहे. असं का बरं?
कार्ती हा चाळिशीतील, एका बिझनेसचा मालकी असणारा जबाबदार प्रौढ माणूस आहे. त्याचा बचाव करण्याची गरज स्वतः जबाबदार राजकारणी असणाऱ्या आणि देशाचे अर्थमंत्री होऊन गेलेल्या चिदम्बरम ह्यांना अजिबात नाही. पण तरी ते आक्रमकपणे लढाई लढत आहेत – ह्यावरूनच स्पष्ट कळतं की आपलं वजन वापरून सदर प्रकरण दाबण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
पडद्यामागची महाभ्रष्ट गुप्त यंत्रणा :
गुरुमूर्तींनी असा उघड उघड आरोप केला आहे की विविध यंत्रणांवर – न्याय पालिकेसकट सर्वांवर – आपला दबाव टाकण्याचा प्रयत्न चिदम्बरम करत आहेत. गुरुमूर्ती तर हे ही म्हणतात की ज्युडिशिअरीने हे प्रकरण शक्य तितकं दाबण्याचा, रद्द करण्याचा अफाट प्रयत्न केला आहे. हा अत्यंत गंभीर आरोप करताना, गुरुमूर्ती मद्रास हायकोर्टाने वेळोवेळी आणलेल्या “स्टे” चा, चौकशी रद्द करण्याच्या कृतीचा हवाला देतात.
ह्या सर्वामागे, गुरुमूर्तींच्या म्हणण्यानुसार – एक साधं लॉजिक आहे.
जगभरात हजारो कोटींची प्रॉपर्टी घेऊ शकण्याची क्षमता Advance Consulting मध्ये येण्यासाठी तेवढ्या मोठ्या डील्स फक्त स्वतःच्या बळावर घडवून आणणं कार्तीला अशक्य होतं. ह्या सगळ्यात पी चिदंबमरच्या अर्थमंत्री असण्याचीच मदत झाली आहे. चिदम्बरम हे ओळखून आहेत की कार्ती पर्यंत आलेली चौकशी-शिक्षा ही ब्याद शेवटी त्यांच्यावरच येणार आहे. आणि म्हणूनच ते इतक्या हिरीरीने सदर प्रकरणात ढाल बनून उभे आहेत.
हे प्रकरण पुढे किती तडीस जाईल हे येणारा काळच ठरवेल.
पण काँग्रेसप्रणित यंत्रणा किती पोखरलेल्या आहेत, अगदी FIPB च्या अधिकाऱ्यांपासून थेट न्यायाधीशांपर्यंत – हे साटंलोटं, भ्रष्ट nexus किती खोलवर रुजलंय ह्याची कल्पना येते.
गुरुमूर्ती म्हणतात, आपल्या ४०-५० वर्षांच्या राज्यात, काँग्रेसने “आपल्या” लोकांचीच विविध ठिकाणी नेमणूक केली आहे. अख्खी यंत्रणाच कह्यात घेतली आहे. ह्या यंत्रणेला गुरुमूर्ती “डीप स्टेट” म्हणतात.
हेच “डीप स्टेट” भारताच्या मुळावर उठलं आहे. ज्याला उद्धवस्त करणं देशासाठी अत्यंत महत्वाचं आहे.
===
हे ही वाचा – राफेल सौदा – जसा झाला तसा. वाचा आणि भ्रष्टाचार झालाय का हे तुम्हीच ठरवा!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.