Site icon InMarathi

विचित्र आणि कठीण प्रसंगातील मानवी भावनांचा गुंता दर्शवणाऱ्या ३ अप्रतिम कलाकृती!

movie inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – केदार मराठे

२०१६ सालच्या एका आठवड्यात मी ‘पिंजरा’ आणि ‘आय इन द स्काय’ असे दोन सिनेमे पाहिले. दोन्ही थिएटरमध्येच. तेव्हा ‘पिंजरा’ची डिजिटल प्रिंट आलेली होती. मी त्या आधी पिंजरा पाहिलेला नव्हता.

सिनेमाचा विषय ऐकून माहीत होता, गाणी हजारदा ऐकलेली होती, टीव्हीवर लागायचा तेव्हा अधून-मधून अर्धा-मुर्धा पाहिलेलाही होता, पण असं सुरुवातीपासून शेवटपर्यंत सलग एका ठिकाणी बसून पिंजरा पाहण्याची ही पहिलीच वेळ.

स्टोरी तशी माहीतच असल्याने आणि शेवटही आधी खूपदा पाहिलेला असल्याने सिनेमा फार अंगावर आला नाही. काही सिनेमे पाहिल्यानंतर १-२ दिवस आपण त्यांच्यावर विचार करत बसतो. इथे तसंही काही झालं नाही. मात्र त्यानंतर तिसऱ्या दिवशी ‘आय इन द स्काय’ पाहताना मात्र पिंजरा आठवला.

नैरोबीमधल्या एका सेफहाऊसमध्ये लपलेल्या अतिरेक्याला पकडण्यासाठी ब्रिटिश मिलिटरीने आखलेलं एक ड्रोन मिशन असा ‘आय इन द स्काय’ चा विषय आहे.

 

 

टेहळणी सुरू झाल्यावर काही वेळातच त्या अतिरेक्याला पकडण्याऐवजी ड्रोन हल्ला करून तिथेच मारून टाकण्याचा निर्णय होतो. ड्रोनचा पायलट त्या घरावर मिसाईल रोखतो पण इतक्यात त्या घराच्या थोडंसंच बाहेर एक नऊ वर्षांची ब्रेड विकणारी मुलगी स्वतःचं टेबल अंथरते आणि तिथेच ब्रेड विकायला बसते.

घरावर मिसाईल मारली तर ही मुलगीही मरणार आणि नाही मारली तर अतिरेकी पळून जाणार. शिवाय प्रत्यक्ष तिथे जाऊन त्या मुलीला हुसकाविण्याचीही सोय नाही, कारण तो संपूर्ण टापू सोमालियन बंडखोरांच्या अधिपत्याखाली आहे. मग करायचं काय अशा पेचात ब्रिटिश मिलिटरी अडकते.

पिंजरा प्रेक्षकाला, ‘नैतिकता कधी टेस्टच केली नाही तर त्या नैतिकतेला काही अर्थ असतो का?’ किंवा ‘एखादा माणूस फक्त योग्य संधी मिळाली नाही म्हणून नैतिक असतो का?’ असे प्रश्न विचारतो.

‘आय इन द स्काय’चं तसं नाही. ब्रेडवाल्या मुलीसारखी काही परिस्थिती उद्भवली तर काय करायचं याची नियमावली अधिकाऱ्यांकडे आहे.

अगदी या अशा स्पेसिफिक सिच्युएशनसाठी नसली तरी जनरल नियमावली नक्कीच आहे. आता ही नियमावली मुद्दामच थोडी व्हेग आहे किंवा कसं असा राजकीय अँगल इथे आहेच. पण ‘नैतिकतेला नियमात बांधणं शक्य आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात ‘आय इन द स्काय’ला जास्त रस आहे.

 

 

त्या मुलीला असं मरू देणं योग्य की अयोग्य यावर रंगलेल्या अधिकाऱ्यांच्या चर्चा कधी कधी अत्यंत रेलेव्हंट आणि कधी कधी भयंकर ऍब्सर्ड वाटतात.

अतिरेक्यांबद्दल, मुलीबद्दल, किंवा त्या टापूबद्दल कोणतीही नवीन माहिती मिळाली की त्या माहितीची नियमांशी सांगड घालण्याचा आटोकाट प्रयत्न कधी अंतर्मुख करतो तर कधी हास्यास्पद वाटतो.

पिंजरा प्रेक्षकाला डिस्टर्ब करत असला तरी त्यात थ्रिल नाही. ‘आय इन द स्काय’ मात्र प्रेक्षकाला खुर्चीच्या टोकावर ओढून आणून डिस्टर्ब करतो. शेवटी काय होतं ते इथे सांगणं योग्य ठरणार नाही पण सिनेमा मात्र चुकवू नये असाच!

२०१६ साली पाहिलेले हे दोन सिनेमे आज आठवण्याचं कारण म्हणजे ‘ब्लॅक मिरर’ ही सिरीज. परवाच तिचा पहिला सीजन पाहून संपवला.

तीन एपिसोड्सचा एक सीजन आणि प्रत्येक एपिसोडमध्ये वेगळी गोष्ट (म्हणजे पात्र तीच ठेवून गोष्ट वेगळी असं नव्हे तर संपूर्ण सेटअपच वेगळा. पात्रांसकट). हा पहिला सीजन प्रेक्षकाला ३ उत्तम शॉर्ट फिल्म्स पाहण्याचा आनंद देतो. पहिल्या एपिसोडमध्ये आजच्या काळातील गोष्ट तर उरलेले दोन एपिसोड भविष्यकाळातील प्रगत मानवीजीवनावर बेतलेले आहेत.

टेक्नॉलॉजीचं मानवी जीवनातलं पेनिट्रेशन प्रमाणाबाहेर वाढलं तर (खरं तर ‘तर’ ऐवजी ‘की’ म्हणलेलं जास्त योग्य ठरेल) काय होईल याची एक अस्वस्थ करणारी झलक हे दोन एपिसोड्स दाखवतात.

 

 

‘द एंटायर हिस्टरी ऑफ यू’ नामक तिसरा एपिसोड विशेष लक्षात राहणारा. या गोष्टीतल्या जगात जवळजवळ प्रत्येक माणसाने स्वतःच्या डोक्यात एक उपकरण फिट केलेलं आहे. हे उपकरण सतत त्या माणसाच्या समोर जे चाललंय ते रेकॉर्ड करत राहतं.

हे रेकॉर्डिंग हवं तेव्हा स्वतःच्या डोळ्यासमोर किंवा एखादया स्क्रीनवर प्रोजेक्ट करून इतर लोकांबरोबर पाहताही येतं. त्यामुळे या जगात कोणीच काहीच कायमचं विसरून जात नाही.

लोक भांडण करतानाही पूर्वीचा एखादा मुद्दा पुराव्यानिशी समोर मांडू शकतात. ‘मी असं म्हणालोच नव्हतो’ असं म्हणायची सोयच नाही.

अशा जगातल्या एक तरुण वकीलाचा आपल्या बायकोवर तिचे एका परपुरुषाशी संबंध असल्याचा संशय आहे आणि त्या उपकरणासारखी सोय असताना हा संशय खरा आहे की नाही हे पाहणं फारसं अवघड नाही.

===

एपिसोडचं लिखाण उत्तमच आहे. फक्त ४४ मिनिटात हा एपिसोड प्रेक्षकाला जो अनुभव देतो तो काही सिनेमे ३ तासातही देऊ शकत नाहीत.

 

 

ह्या असल्या टेक्नॉलॉजीचं अस्तित्व हेच मुळात एथिकल आहे का असा प्रश्न आपल्याला पडतोच, शिवाय सध्याचं सोशल मीडिया पाहता हा प्रश्न किती थेरॉटीकल आहे हे जाणवून आपण हादरून जातो.

एखाद्यावर आपण ठेवलेला विश्वास हा फक्त पूर्ण सत्य जाणून घेण्याच्या आपल्या असमर्थतेतर आधारलेला असतो का? पूर्ण सत्य जाणून घेण्याची इच्छा ही कितपत नैतिक आहे?

मुळात नैतिकतेचा पर्पज काय? आनंदी जीवन की सत्याचा शोध? हे आणि असे कित्येक प्रश्न एपीसोड संपल्यावरही कितीतरी वेळ आपला पिच्छा सोडत नाहीत.

‘ब्लॅक मिरर’ मी इतके दिवस का पाहिली नव्हती हे मलाही माहित नाही. हार्डडिस्कमध्ये कित्येक महिने पडून होती हे मात्र खरं.

‘द एंटायर हिस्टरी ऑफ यू’ पाहून मला जवळजवळ दोन वर्षांपूर्वी पाहिलेले दोन सिनेमे आठवावे आणि त्याबद्दल लिहावसं वाटावं हे त्याचं सगळ्यात मोठं यश! आता उरलेले ३ सीजन रविवारी बिंज वॉच करण्याचा मनसुबा आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version