आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
भारताच्याच नव्हे तर जगाच्या क्रिकेटच्या इतिहासावर सचिन तेंडूलकर या अनभिषिक्त सम्राटाने सुमारे अडीच दशके निर्विवाद अधिराज्य गाजवले. सुरुवातीला चाचपडत असणाऱ्या या मुंबईच्या फलंदाजाने पुढे विक्रमांची नुसती रास लावून ठेवली.
प्रतिकूल परिस्थितीत खेळताना संघाला सावरले. या इतक्या मोठ्या कालावधीत कितीतरी विक्रम कळत नकळत त्याच्या नावावर जमा झाले.
त्यातले कित्येक विक्रम येत्या काळात तोडले जातील की नाहीत याबद्दल क्रिकेट अभ्यासकही साशंक आहेत. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे.
पण सचिनच्या नावावर असा एक विक्रम आहे जो कुणीच मोडू शकणार नाही. हा विक्रम एका सामन्यात बनलेला नाही. इतरांच्या तुलनेत सचिनने किती जास्त काळ क्रिकेट खेळले आहे याची या विक्रमातून प्रचीती येते. कोणता आहे हा विक्रम? जाणून घेऊया…
खालील चित्रात डाव्या बाजूला असलेला तक्ता पहा. हे स्कोरकार्ड आहे १९९० साली भारताचा संघ न्यूझीलंड दौर्यावर असताना खेळल्या गेलेल्या सामन्याचे. आणि उजव्या बाजूचे स्कोरकार्ड आहे न्यूझीलंड चा संघ २०१२ साली भारत दौर्यावर असताना खेळल्या गेलेल्या सामन्याचे.
काय साम्य आढळते? लक्ष देऊन पाहिलं तर कळेल, की दोन्ही सामन्यात सचिन ‘ब्रास्वेल’ आडनाव असलेल्या न्यूझीलंडच्याच गोलंदाजाकडून बाद झाला आहे. आणि दोन सामन्यांच्या मधील हे अंतर आहे तब्बल २२ वर्षांचे!
१९९० साली न्युझीलंडच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात सचिन २४ धावा काढून जॉन ब्रास्वेल या गोलंदाजाच्या बॉलवर त्रिफळाचीत झाला होता. ब्रास्वेलने आंतरराष्ट्रीय सामन्यातली त्याची ८४ वी विकेट घेताना सचिनच्या दांड्या उडवल्या होत्या. आणि २०१२ साली बेंगलोर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात १७ धावांवर सचिनला आउट केले होते डॉग ब्रास्वेल याने. ती त्याची २४ वी विकेट होती.
जॉन ब्रास्वेल याचा मोठा भाऊ ब्रांडन ब्रास्वेल म्हणजे डॉग ब्रास्वेल चे वडील. ब्रांडन ब्रास्वेल यांचे करिअर फार काळ चालले नाही. पण जॉन याने ४१ कसोटी सामने खेळले. त्यात त्याने १०२ गाडी बाद केले. डॉग ब्रास्वेल हा त्याचाच चुलत भाऊ.
अशा रीतीने एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींकडून आउट होण्याचा हा विक्रम सचिनच्या नावावर नोंदवण्यात आला. आणि या दोन विकेट्स मध्ये तब्बल २२ वर्ष ७ महिन्याचा काळ गेला.
अभ्यासकांच्या मते, जास्त काळ क्रिकेट खेळणाऱ्या कोणत्याही फलंदाजाकडून हा रेकोर्ड होणे जवळजवळ अशक्य आहे. इतक्या जास्त काळ क्रिकेट खेळल्या नंतर हा रेकोर्ड सचिनच्या नावावर झाला आहे. आणि त्यात असा रेकोर्ड होणे हा दुर्मिळ योगायोग असल्याने हा रेकोर्ड बनवणारा सचिन हा एकमेव फलंदाज आहे असे मानले जाते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.