आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
It is not difficult to meet taxes, they are everywhere.
असं एक इंग्रजी वन लायनर आहे. बहुतांशी ते खरंही आहे. या ना त्या रूपाने आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारचे कर सरकारला भरत असतो. सरकारला लोकोपयोगी कारणांसाठी म्हणून खर्च करायला पैशांची गरज असते. या पैशांची गरज भागवण्यासाठी देशाच्या नागरिकांकडून सरकार वेगवेगळ्या प्रकारचे कर गोळा करत असते. काही वेळा आपण अमुक एक पैसे सरकारला कर म्हणून भरत आहोत हे आपल्याला माहीत असतं तर अनेकदा आपण एखादा व्यवहार करताना यातला काही वाटा सरकारला कर म्हणून जाणार आहे हे आपल्याला कळतही नाही.
अगदी एखाद्या अब्जाधीश उद्योगपतीपासून फूटपाथवर राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर ‘टॅक्स’ या गोष्टीचा परिणाम होत असतो त्यामुळे हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की नक्की आपल्या देशातली करप्रणाली कशी काम करते याबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती असते. किंवा अगदी स्पष्टच सांगायचं तर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक निरक्षरता आहे.
पैसे मिळवणं, ते खर्च करणं आणि राहिलेल्या पैशाचं सेव्हिंग करणं या पलीकडे अनेकांना अर्थव्यवस्था कशी चालते याबद्दल काहीही माहिती नसते, किंवा असली तरी ती फार थोड्या प्रमाणात असते किंवा चुकीची माहिती असते.
दुसरी एक गोष्ट अशी आहे की टॅक्सशी संबंधित असलेले कायदे आणि नियम इतके गुंतागुंतीचे आहेत की त्याबद्दल माहिती करून घ्यायची म्हटली तरी अनेकांना ते सहजासहजी शक्य होत नाही. आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये येणाऱ्या अडथळ्यामधला हा एक महत्वाचा अडथळा आहे. त्यामुळे टॅक्स या विषयाबद्दल अनेकांच्या मनात नाहक भीती असते.
हा सगळा विषय अचानक समोर आला कुठून – तर GST ह्या आजकालच्या ‘हॉट टॉपिक’ वरून!
हे GST म्हणजे नक्की काय आहे, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असेल. या सगळ्या प्रकरणावर सविस्तर लिहायचं म्हणजे कमीत कमी ५-६ भागांची सिरीज लिहावी लागेल. एकेक विषय समोर येत गेले की कदाचित एखाद-दोन जास्त भाग सुद्धा होतील. पण हा विषय सगळ्यांना समजणं खूप गरजेचं आहे; कारण एकच – या सगळ्याचा आपल्या रोजच्या जीवनावर जाणवण्याइतका परिणाम होणार आहे.
“GST हा आपल्या देशातला स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा सगळ्यात मोठा ‘indirect tax reform’ आहे”, असा गाजावाजा सगळीकडे केला जात आहे. ही बाब खरी आहेच. ‘One Nation One Tax’ असा GST चा गाभा आहे. संपूर्ण देशात कुठल्याही राज्यात तुम्ही धंदा करा, सगळीकडच्या indirect tax च्या पद्धती, सगळीकडचे कंम्प्लायन्सेस एकसारखेच असावेत आणि त्यायोगे धंदा करणं अधिकाधिक सोपं जावं आणि संपूर्ण भारताची एकसंध बाजारपेठ निर्माण व्हावी हा GST मागचा मुख्य उद्देश आहे.
GST आल्यानंतर आतापर्यंत लोकं वापरत असलेल्या सगळ्या पद्धती, आतापर्यंतचे बसवलेले cost estimates, मालाची किंमत ठरवायचे फोर्म्युले, कुणाकडून माल घ्यायचा, कुठून माल घ्यायचा, कुठे विकायचा, उत्पादन कुठे करायचं या सगळ्यांचीच गणितं मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. अगदी थोडक्यात सांगायचं तर आतापर्यंत वापरात असलेली ‘business models’ बहुतांशी बदलणार आहेत. या सगळ्या गोष्टींचा लोकांना नव्याने विचार करावा लागणार आहे. त्यामुळे GST म्हणजे नक्की काय, ते आल्यावर काय होईल, GST मुळे फायदा होईल की तोटा होईल अश्या अनेक प्रश्नांचा उहापोह करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
हे सगळं समजून घेताना आपल्या देशातली टॅक्स सिस्टीम नक्की चालते कशी, त्या सबंधित राज्यघटनेतल्या तरतुदी काय आहेत याची ओळख असणं गरजेचं आहे. त्याचसोबत आत्ताची टॅक्स सिस्टीम चालते कशी आणि त्यातल्या समस्या काय आहेत याबद्दलही तोंडओळख असणं आवश्यक आहे. त्यामुळे या GST बद्दलच्या सिरीज मधे पहिले दोन-तीन भाग आपल्याला राज्यघटनेतल्या तरतुदी आणि आत्ता अस्तित्वात असलेली टॅक्स सिस्टीम यांची तोंडओळख करून घेण्यात खर्ची पाडावे लागणार आहेत.
GST बद्दल म्हणाल तर अजून तरी GST कायदा हा ‘ड्राफ्ट’ अवस्थेत आहे. त्यात प्रथमदर्शनी दिसून येणाऱ्या अशा काही त्रुटी आहेत. याबाबत अनेक सरकारी संस्था आणि या संबंधातली तज्ज्ञ मंडळी आपले अभिप्राय आणि सूचना देत आहेत. या सगळ्यांवर चर्चा होऊन आवश्यक त्या ठिकाणी बदल होऊ शकतील आणि आत्ता आपल्यासमोर असलेला ड्राफ्ट बदलू शकेल. त्यामुळे नक्की GST कसा असेल या बद्दलची चर्चा आपण आत्ता समोर असलेल्या ड्राफ्टवरून करणार आहोत.
हे सगळं लिहिताना शक्य तितक्या सोप्या भाषेत लिहायचा प्रयत्न करणार आहे कारण हे लिहिताना अर्थव्यवस्थेबद्दल फार काही माहिती नसलेल्या किंवा कमी माहिती असलेल्या लोकांना काही गोष्टी कळाव्यात असा हेतू समोर आहे. यात गम्मत अशी आहे की GST बद्दल लिहिताना अनेक ठिकाणी कायदेशीर बाबींशी आपला संबंध येणार आहे. अशा ठिकाणी उगीच गुंतागुंत वाढू नये म्हणून शक्य तितक्या जागी कायदेशीर बाबी सोप्या करून लिहिण्याचा प्रयत्न करूच, पण यामुळे लिखाण काही ठिकाणी मोघम वाटण्याची शक्यता आहे. पण आवश्यक त्या सगळ्या गोष्टी लिखाणात सामावून घेण्याचा प्रयत्न असेल. काही गोष्टी समजून घेण्यासाठी सोप्या जाव्यात म्हणून आवश्यक तिथे काही उदाहरणं देऊन लिहायचा प्रयत्न आहे.
उद्यापासून आपण एकेका मुद्द्यावर सविस्तर चर्चा करू.
पुढील भाग: “अप्रत्यक्ष कर आणि त्या संबंधीच्या सध्य परिस्थितील राज्यघटनेतल्या तरतुदी.”
—
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.