Site icon InMarathi

“तू कधी प्रेम केलं आहेस का?” : वडिलांचा अनपेक्षित प्रश्न आणि गीतकाराचा असामान्य प्रवास

sameer anjaan im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक:  राज जाधव

===

जन्म त्या वेळेसच्या बनारसमधला. बँकेत चांगल्या पगाराचा जॉब, पण मन रमत नसल्यामुळे ८० च्या दशकात तो मुंबईत दाखल झाला. बाप नावाजलेला गीतकार असल्यामुळे, त्याला या क्षेत्रात करियर करायला अडचण आली नसेल, असं बऱ्याच लोकांना वाटत असलं, तरी ते इतकं सोप्पं नव्हतं. त्याचे नाव शितला पांडे उर्फ राजन, पण त्याने गीत लिहिण्यासाठी निवडलं, ‘समीर’.

पिता अंजान यांनी समीरना कधीही काम मिळवण्यासाठी शिफारस केली नाही वा ती करावी अशी समीर यांची अपेक्षाही नव्हती.

स्ट्रगलिंगच्या काळातले जे चटके अंजान यांनी सोसले त्याची जाणीव असल्यामुळे, आपल्या मुलाने या क्षेत्रात येणे त्यांना प्रथमदर्शी पटले नव्हते. परवानगी देण्याआधी त्यांनी त्याला असा एक प्रश्न विचारला की त्याने तोही जरासा चक्रावला, ‘तू कधी कुणावर प्रेम केलं आहे का? आणि का?’ भांबावलेल्या समीरने ‘हो केलंय आणि प्रेम काही ठरवून होत नाही’ असं उत्तर दिलं. यावर ते त्याला म्हणाले,

“असंच निरपेक्ष प्रेम या इंडस्ट्रीवरही कर, बदल्यात प्रेम मिळो अथवा ना मिळो, करत रहा.”

चित्रपटातील गीतलेखनाच्या बाबतीत पण एक मजेशीर कहाणी आहे. स्वतःच्या स्ट्रगलिंगच्या काळातील एक आठवण समीर सांगतात. ज्यावेळी समीर स्वप्नांची पोटली घेऊन मुंबईत वडिलांकडे दाखल झाले होते, त्या वेळी गीतलेखनामध्ये अंजान हे एक नावाजलेलं नाव होतं आणि त्यांच्याकडे बऱ्याच सुप्रसिद्ध संगीतकारांचे येणे जाणे असायचे.

त्यावेळी अंजान यांनी, “हा माझा मुलगा आहे, तुमची हरकत नसेल तर यालाही आपल्या सोबत बसू द्या”, म्हणत प्रत्येक बैठकीला समीर यांनाही बसवलं. पण खरंतर अंजान यांनी समीरला दिलेली ही एक कामगिरी होती, हे फक्त त्या दोघांनाच माहित होतं.

 

 

ते असं की, संगीतकारांसोबत जी चर्चा होते, ती त्याने लक्षपूर्वक ऐकायची, त्यांना कोणत्या प्रकारचं गीत हवं आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्या पद्धतीने जे योग्य वाटेल तसे गीत लिहून काढायचं.

अंजान स्वतः ही वेगळे गीत लिहिणार होते, मात्र संगीतकारांना देताना दोन्ही त्यांचीच गीते आहेत म्हणून सोपवणार होते. अंजान यांना आपल्या मुलावर विश्वास तर होताच पण त्याने सर्व स्वतः कमवावं अशी एका बापाची प्रामाणिक अपेक्षा होती.

ते पुढे समीर यांना म्हणाले की, ज्या दिवशी एखादा संगीतकार माझ्या ऐवजी तुझं गीत पसंत करेल, त्या दिवशी तू माझ्यासाठी गीतकार होशील आणि साधारण २ ते ३ वर्षांनी एक दिवस तो सुवर्ण क्षण आला आणि समीर ऑफिशियली गीतकार झाले.

पण नावाजलेला गीतकार होण्यासाठी त्यांना बरीच वर्षे वाट पहावी लागली, तत्पूर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या. रातोरात काही होत नसतं, झालं ही नाही आणि झालंच तर ते क्षणभंगूर असतं.

स्ट्रगलिंगच्या काळातच समीर यांची आनंद मिलिंद या जोडगोळीशी मैत्री झाली. अंजान यांचे संगीतकार मित्र चित्रगुप्त यांची ती दोन मुलं. समीर प्रमाणे, हे दोघंही या क्षेत्रात येण्यासाठी धडपडत होते. चित्रपटात येण्यापूर्वीपासून हे तिघे मिळून गाणी कंपोज करत, म्हणूनच पुढे जाऊन त्यांची ट्युनिंग जमली, त्यांनी एकत्र बरीच कामे केली.

१९८३ पासून गीतकार म्हणवून घेणारे समीर ९० नंतर खऱ्या अर्थाने नावारूपाला आले, ते ‘दिल’ आणि ‘आशिकी’ मुळे. आजही अजरामर असलेल्या ‘आशिकी’ला कोण विसरू शकेल? मग त्याच्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. साजन, दिवाना, बेटा, रंग, हम हैं राही प्यार के, दिलवाले, राजा हिंदुस्तानी, संघर्ष, सिर्फ तुम हे त्यांनी गाजवलेले ९० च्या दशकातील काही प्रमुख चित्रपट.

 

 

त्यातल्या साजन, दिवाना आणि हम हैं राही प्यार के साठी त्यांना फिल्मफेयर देखील मिळाले, नामांकनांचा हिशोब न ठेवलेलाच बरा. ९० च्या दशकातील जवळपास ९०% हून ही जास्त चित्रपटात Lyrics Sameer हे वाचायची इतकी सवय झाली होती की, त्या काळात अजून कुणी गाणी लिहीत होतं की नाही, इथवर शंका यावी.

समीर यांनी १०० हून अधिक संगीतकारांसोबत काम केले असले तरी, त्यांच्या सुरुवाती च्या यशात आनंद मिलिंद आणि नदीम श्रवण (सोबत कुमार सानू) तर नव्वदी चे दशक संपताना आणि २००० च्या दशकामध्ये जतीन ललित, अनु मलिक आणि हिमेश यांचा महत्वाचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही.

पण बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि इंडस्ट्री कालांतराने प्रत्येकाला बाहेर फेकून देते ही इथली शोकांतिका आहे.

आनंद -मिलिंद, अनुमलिक (दम लगाके हैशा आणि बेगमजान हा सॉलिड कमबॅक असला तरी), नदीम श्रवण (वेगळ्या कारणामुळे असेलही, तरी) आणि जतीन ललित हे इंडस्ट्रीतून हद्दप्पार होत होते.

शिवाय, हळूहळू बरेच नवीन गीतकार आणि संगीतकार मंडळी इंडस्ट्रीमध्ये दाखल होत असताना, बदललेला ट्रेंड लक्षात घेऊन समीरने स्वतःचा फॉर्म्युला बदलून नवीन जनरेशनला सूट होतील अशी गाणी लिहायला सुरुवात केली.

१९९८ नंतर चा प्रवास म्हणजे बऱ्याच अर्थाने त्यांची सेकंड इनिंग म्हणता येईल. कारण, जुने मित्र आनंद मिलिंदना चित्रपट मिळत नव्हते, गुलशन कुमार केसमुळे नदीमही भारताबाहेर गेला असल्याने नदीम श्रवणही थंडावले होते, शिवाय पिता अंजानही त्यांना सोडून अनंतात विलीन झाले होते.

 

 

ते काहीशा निराशेच्या गर्तेत जाण्याच्या मार्गावर असताना यश चोप्रांनी त्यांना बोलावून नवोदित करण जोहरच्या चित्रपटासाठी विचारलं. जावेद अख्तर यांना ‘कुछ कुछ होता हैं’ हे नाव न आवडल्यामुळे करणला नकार दिला आणि ही संधी समीरकडे चालून आली, इथून त्यांची दुसरी इंनिंग सुरु झाली होती.

त्यानंतर धडकन, राज, रेस, वेलकम, नोएंट्री, धूम, तेरे नाम,ऐतराज, RHTDM, सावरीया, कभी खुशी कभी गम, बागबान, आशिक बनाया आपने या नेहमीच्या चित्रपट गीतांसोबतच त्यांनी त्यांच्या लेखन शैलीपेक्षा वेगळी गाणी लिहायला सुरुवात केली.

‘फालतू’ मधलं चार बज गये किंवा राउडी राठोड आणि खिलाडी 786 मधील उडत्या चालीची गाणी, ही काही उदाहरणे. सनम तेरी कसम मध्ये सुद्धा त्यांनी त्यांचा जॉनर बदलला. ही सर्वच गाणी उत्कृष्ट होती, असं नाही पण काळानुरूप होती, चालली आणि समीर यांना एक्सटेन्शन मिळत गेले.

पिता अंजान हे त्यांचे आदर्श तर होतेच, पण त्यांना खरी भुरळ पाडली ती आनंद बक्षी आणि मजरूह सुल्तानपुरी यांच्या शब्दांनी. या दोघांना ते गुरुस्थानी मानत. आपल्या प्रत्येक चांगल्या कामानंतर समीर बक्षी साहेबांना विचारत, आणि ते एवढेच म्हणत, ‘अच्छा कर रहे हो बेटा, और मेहनत करो’, आणि दरवेळी निराश होऊन समीर स्वतःलाच म्हणत, ‘अजून काय करायला हवंय?’

पण एके दिवशी स्वतः हून बक्षीसाहेबांचा फोन आला आणि त्यांनी समीरच्या ‘तेरे इश्क में नाचेंगे’ या गाण्याबद्दल त्याची तारीफ केली. त्यांना हे गाणं का आवडलं हे समीरना समजू शकले नाही, पण ते त्यांच्या गुरुंच्या उत्स्फूर्त अभिप्रायाने नक्कीच भारावले.

अशीच एक आठवण मजरूह साहेबांची पण ते आवर्जून सांगतात, १९९३ च्या फिल्मफेयर च्या वेळी समीर ‘दिवाना’ साठी आणि मजरूह सुल्तानपुरी ‘जो जिता वही सिकंदर’ साठी नामांकित होते.

हा पुरस्कार समीर यांच्या नावे पुकारला गेला, पण नामांकनाची घोषणा करताना मजरूह साहेबांचे नाव घेतले गेले आणि मजरूह साहेबांचा गैरसमज झाला की पुरस्कार त्यांनाच मिळाला आहे आणि ते जागेवरून उठून चालू लागले.

काय झालंय हे कळेपर्यंत ते स्टेजवर पोहोचले होते. अशा परिस्थितीत काय करावे हे कळत नव्हते, पण त्यांनाही स्टेजवर जाणं भाग होतं. प्रसंगावधान राखून ते स्टेजवर गेले आणि हा पुरस्कार मला माझ्या गुरुकडून मिळतोय याचा आनंद आहे, असे म्हणून तो पुरस्कार मजरूह साहेबांकडून स्विकारला.

 

 

समीर आणि आनंद बक्षी यांच्यामध्ये अजून एक समान धागा वाटतो. जसं आनंद बक्षी हे नाव ७०-८० च्या काळात प्रत्येक चित्रपटाच्या नामावलीत येत असतानाही त्यांना गीतलेखनाच्या बाबतीत तुलनेने एक दुय्यम स्थान मिळत आलं आहे, तसंच काहीसं समीर यांच्याबाबतीत ही नव्वद च्या दशकात झालं आहे.

मान्य की समीर यांची गाणी लिरीकली बेस्ट कॅटेगरीत मोडत नसतील, वेगळ्या, जड, उर्दूईश शब्दांचा वापर नसेलही, पण साध्या शब्दात त्याने बऱ्याच वेळा कमाल केली आहे. आजपर्यंत तिसेक वर्षांत चार ते पाच हजार (गिनीस रेकॉर्ड) हून जास्त गाणी लिहिली असताना, प्रत्येक गाण्यात कमाल करणं शक्य नाहीये हेदेखील स्विकारायला हवं.

===

===

शिवाय रिसोर्सेस न वाढता फक्त डिमांड वाढत गेली तर दर्जावरही परिणाम होतो हेही तितकंच खरं आहे. त्यांचं नाव होतं, त्यांना कामे मिळत गेली. सोपे शब्द असल्यामुळे लोकांच्या तोंडी सहजासहजी तरळत रहायची गाणी, याचा त्यांना फायदा झाला मान्य, पण येणारा प्रत्येक बॉल अटेंड करणंही गरजेचे होते, एकेरी दुहेरी काढत का होईना त्यांनी ते केलं.

त्यांचा स्कोअरबोर्ड हलता राहिला हे कमी महत्वाचे नव्हते, नाहीये. अधेमधे चौकार षटकार पण मारलेच, हेही विसरता कामा नये.

जिथे नावाजलेले गीतकार वर्षाकाठी एक-दोन सिनेमे करून कायम चे स्मरणात राहतात तिथे एका वर्षात पाच-सहा सिनेमात सातत्याने गाणी लिहिणारे तात्पुरते गुणगुणले जातात, ही शोकांतिका आहे.

‘समीर’, कुणाच्याच फेवरीट लिरिसिस्ट या कॅटेगिरीत कधीही नव्हते, नसतीलही कदाचित. त्यांचे विशिष्ट एखादे गाणे आवडते म्हणून असं एकदम ओठावर येणारही नाही, पण त्याने त्यांची उपलब्धी कमी होत नाही.

शिवाय आज साहिर, गुलजार, जावेद अख्तर यांना अग्रस्थानी मानणाऱ्यांनाही कोणे एकेकाळी त्यांची गाणी आवडलेली आहेत, पाठ केली गेली आहेत, मनापासून गायलीही आहेत. समीर यांचे नव्वद च्या दशकातील कुठलंही गाणं ऐकलं तर त्याकाळातील माणूस नॉस्टॅलजीक झाल्याशिवाय राहत नाही.

त्याच्या शब्दांच्या प्रति असलेल्या बांधिलकी, निष्ठा आणि सातत्याला मनापासून सलाम.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version