Site icon InMarathi

अमोल यादवांचं “पुष्पक विमान” : ३५ हजार कोटींचा ‘स्वदेशी’ आशावाद

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आज महाराष्ट्रात ज्याच्या त्याच्या ओठांवर एकच नाव आहे ‘अमोल यादव’. भारतीय बनावटीचे व्यावसायिक प्रवासी विमान आता महाराष्ट्रात तयार होणार आहे. कॅप्टन अमोल यादव यांच्याशी राज्य सरकारने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रात’ करार केला आहे. ३५ हजार कोटींचा हा करार असून यात अमोल यादव यांना पालघर जिल्ह्यात १५७ एकरची जागा दिली जाणार आहे.

विमान बांधणीच्या या उद्योगातून तब्बल १० हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

मूळचे साताऱ्याचे आणि सध्या मुंबईकर असलेले कॅप्टन अमोल यादव यांनी १९९८ मध्ये ‘थर्स्ट एअरक्राप्ट कंपनीच्या माध्यमातून देशातील पहिल्यावहिल्या विमाननिर्मितीचा प्रयत्न सुरू केला. त्यांचा पहिला प्रयत्न फसला. मात्र, त्यामुळे नाउमेद न होता यादव यांनी २००३ मध्ये दुसऱ्या विमानाची निर्मिती सुरू केली. तो प्रकल्पही पूर्णत्वास गेला नाही. अखेर तिसऱ्या प्रयत्नात २००९ मध्ये सहा आसनी विमाननिर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरला.

यादव यांनी आता स्वतःच्या घराच्या गच्चीवर १९ आसनी विमानाची निर्मिती सुरू केली आहे. माध्यमांमध्ये अमोल यादव यांनी केलेल्या संघर्षाच्या कहाण्या छापून येत आहेत, सर्वत्र त्यांचे कौतुक सुरु आहे, पण या घटनेची दुसरी धक्कादायक बाजू समोर आणणे अत्यंत गरजेचे आहे.

एडिसन, न्यूटन, कार्व्हर वगैरे शास्त्रज्ञांनी घराचीच प्रयोगशाळा बनवून शोध लावले किंवा राईट बंधूंनी विमानाचा शोध सायकलच्या दुकानात लावला या कहाण्या ऐकून आपणही शास्त्रज्ञ होऊ अशी स्वप्ने पाहणारे अनेक तरुण या देशात आहेत. घरातच मोटार बनवून पुढे जगातील सगळ्यात मोठा मोटार निर्मितीचा कारखाना उभारणारा हेनरी फोर्ड आपल्याला माहिती आहे.

 

media.boingboing.net

त्यामुळे गच्चीवर बनवलेल्या विमानाचं आणि त्यातून विमान निर्मितीचा कारखाना उभारण्यापर्यंत मजल गेलेल्या अमोल यादव यांचे कौतुक वाटणे स्वाभाविक आहे. त्यात अमोल यादव धर्माने बौद्ध असल्याने यावर टीका करणे अत्यंत संवेदनशील असू शकते म्हणून कदाचित जाणकारांनी यावर बोलणे टाळले असावे. पण याची बुद्धिप्रामाण्यवादी, निरपेक्ष आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक अशी चिकित्सा व्हायलाच हवी.

पुराणात उल्लेखलेल्या पुष्पक विमानांच्या कथांमधून आमचा देश आजही बाहेर पडलाच नाही आणि सध्याचे दिनानाथ बात्रा सारखे लोक अभ्यासक्रम मंडळात नेमण्याचे सरकारी शैक्षणिक धोरण पाहता तो नजीकच्या काळात सहजासहजी यातून बाहेर पडेल याची आशा नाही.

अधूनमधून राईट बंधूंच्याआधी मुंबईच्या चौपाटीवर शिवराम बापुजी तळपदे यांनी प्राचीन भारतीय ग्रंथांचा अभ्यास करून ‘मरुतसखा’ नावाचे विमान उडवले होते असा दावा केला जातो. या विमानात पारा इंधन म्हणून वापरल्याचे सांगितले जाते. नासाने देखील आपल्या अंतराळ यानात पारा वापरण्याचे ठरविल्याचा साक्षात्कार संध्यानंद, सनातन प्रभात व तत्सम वृत्तपत्रे वाचून अधूनमधून आम्हांला होतच असतो.

वास्तविक पाहता पाऱ्याचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी आवश्यक असा एकही गुणधर्म सिद्ध झालेला नाही किंवा कोणतीही यंत्रणा पाऱ्यापासून विमान चालवण्यासाठी उर्जा मिळवू शकेल असे तंत्रज्ञान विकसित होणे शास्त्रीयदृष्ट्या निव्वळ अशक्य आहे.

(अपवाद आण्विक तंत्राचाच कि जे त्यावेळी अस्तित्वात असणे अशक्य) त्यामुळे पाऱ्यावर उडणारी विमाने हि आजही दंतकथाच आहेत. असो! अमोल यादव यांनी अथक प्रयत्नांनी घराच्या गच्चीवर एक विमान बनवलं. वांद्रे- कुर्ला संकुलात भरलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात परवानगी नसतानाही महत्प्रयासाने आपले विमान प्रदर्शनात मांडलं.

 

asianage.com

त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि या विमानाला मान्यता मिळण्याठी वर्षभ सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. यानंतर विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) यादव यांच्या विमानावर मान्यतेची मोहोर उमटवली. या विमानाला त्यांनी VT- NMD म्हणजे ‘व्हिक्टर टॅन्गो नरेंद्र मोदी देवेंद्र’ असे नामकरण करून कृतज्ञता व्यक्त केली.

इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण जेव्हा राज्य सरकारने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रमात त्यांच्याशी जो करार केला आहे, तो ३५ हजार कोटींचा असून यात अमोल यादव यांना पालघर जिल्ह्यात १५७ एकरची जागा दिली जाणार आहे, तेव्हा याची गांभीर्याने चिकित्सा करायला हवीच.

इस्रो, डीआरडीओ सारख्या प्रगत तंत्रसंस्थांनी वर्षानुवर्षे केलेल्या संशोधनांनंतर आजही भारताला दैनंदिन वापरातल्या बहुतांश तंत्रज्ञानासाठी परकीय सहकार्यावरच अवलंबून राहावे लागते आहे. आजही स्वदेशी बनावटीचे कार्यक्षम विमानासाठीचे इंजिन आपण बनवू शकलो नाही. लालफितींचा कारभार आणि संशोधनाबाबत असलेली उदासीनता असली तरीही समांतर तंत्रज्ञान विकासासाठी आपल्याकडे प्रयत्न झाले नाहीत हेच प्रमुख कारण याला जबाबदार आहे.

या पार्श्वभूमीवर देशी बनावटीचे विमान म्हणजे खासी अभिमानाची बाब. पण ज्या पद्धतीने अमोल यादव यांनी अवघ्या सहा महिन्यांत व्यावसायिक प्रवासी विमान बनवण्याचे अचाट दावे केले आहेत किंवा सरकार व माध्यमांनी यामुळे कमी अंतरावरची ठिकाणे जोडणारी विमानसेवा स्वस्तात उपलब्ध होईल अशी जी लोकांची दिशाभूल चालवली आहे त्याकडे पाहून हे सगळं प्रकरण एखाद्या नव्या घोटाळ्याकडे तर जात नाही ना? अशी शंका उगाचंच मनाला चाटून जाते.

मुळात विमान निर्मितीसाठी अनेक सुट्ट्या भागांची गरज असते आणि ते बनवण्यासाठी औद्योगिकदृष्ट्या प्रगत तंत्रज्ञानाने युक्त अनेक कारखाने लागतात. बहुतांश विमान निर्मिती कंपन्या फक्त सुट्टे भाग एकत्र करून विमान बांधणीचे काम करतात.

 

vestnikkavkaza.net

इंजिन व इतर काही महत्वाचे भाग वगळता बाकीचे सर्व भाग बनवण्याची कंत्राटे इतर कंपन्यांना दिली जातात. अश्या कंपन्यांची भारतात वानवा आहे. अगदी अमोल यादव यांनी बनवलेल्या विमानाचे बहुतांश भाग हे परदेशी कंपन्यानीच बनवलेले आहेत. NAL, HAL, ADE, ADA सारख्या अनेक संस्था वर्षानुवर्षे स्वदेशी तंत्रज्ञानासाठी संशोधन करत आहेत.

तरीही भारतामध्ये विमान निर्मितीसाठी लागणाऱ्या मुलभूत गोष्टींचेदेखील उत्पादन होत नाही. भारतात जोडणी केल्या जाणाऱ्या सर्वच विमानांचे काही मोजके भाग वगळता सर्व महत्वाचे भाग आयात करावे लागतात.

दुसरी गोष्ट हि कि कोणत्याही प्रकल्पाची अभिनवता पाहताना व्यावहारिकतासुद्धा तपासावी लागते. व्यावसायिक विमान सेवेत उतरण्याचे अनेक आंतरराष्ट्रीय नियम आहेत, त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्याशिवाय आणि शेकडो चाचण्यांमधून उत्तीर्ण झाल्याशिवाय नागरी हवाई वाहतुकीला परवानगी दिली जात नाही.

अमोल यादव यांनी केलेल्या विमानाची आजवर कोणतीही हवाई चाचणी झालेली नाही कारण त्यांना तशी परवानगीच अजूनही विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) दिलेली नाही.

या चाचण्यांमधून पार पडण्याचे दिव्य करण्यात किमान चार पाच वर्षे लागू शकतात, बोईंग-गल्फस्ट्रीम सारख्या नावाजलेल्या कंपन्यांना देखील यासाठी किमान १०-१२ वर्षे लागतील. मग अमोल यादव विमानांचे उत्पादन अवघ्या सहा महिन्यांत सुरु करण्याचा दावा कशाच्या जोरावर करत आहेत हे कळण्यास कोणताही मार्ग नाही.

 

i.ndtvimg.com

तसेच व्यावसायिक हवाई प्रवाशी वाहतुकीमध्ये प्रवाश्यांची संख्या आणि अंतर जितके जास्त तितका विमान चालवण्याचा खर्च कमी हे साधे गणित आहे. त्यामुळे जिल्ह्यांना जोडणारी १९ आसनी विमानसेवा हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. त्यामुळे यातून भारतीय विमान उद्योगाला फार मोठी चालना वगैरे मिळेल अशी अपेक्षा बाळगणे फोल आहे.

कोणत्याही तांत्रिक शिक्षणाची पार्श्वभूमी नसलेल्या एका व्यक्तीने बनवलेले देशी बनावटीचे प्रायोगिक विमान म्हणून प्रदर्शनीय वस्तू म्हणून असलेले मूल्य वगळता या विमानाचे व्यावहारिक मूल्यमापन केले असता हे धक्कादायक सत्य समोर येते. यातून अमोल यादव आणि सरकारला काही दिवसांसाठी प्रसिद्धी मिळेल पण प्रत्यक्षात हाती काही ठोस लागण्याची सुतराम शक्यता नाही.

काहीतरी नवे करू पाहणाऱ्या तंत्रज्ञांना आणि उद्योजकांना सरकारने वेळोवेळी पाठींबा द्यायलाच हवा, यात बिलकुल शंका नाही. पण लोकभावनेच्या आहारी जाऊन अल्पकालीन फायद्यांसाठी दौलतजादा उधळणे देखील चुकीचेच म्हणावे लागेल.

अमोल यादव यांच्यासारख्या नव उद्योजकांना स्वतंत्र कारखाना उभारण्याऐवजी परदेशातून आधुनिक तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करून सामयिक उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन देणे जास्त व्यवहारिक ठरले असते. जनतेचा पैसा या प्रकल्पात गुंतलेला असल्याने सरकारला त्याची जाणीव असावी हीच आशा.

सध्याच्या अतिरेकी देशीवादाच्या जमान्यात हा विवेकाचा क्षीण आवाज कोणी ऐकेल कि नाही? हि चिंता आहेच पण मेंदू जिवंत असणाऱ्यांनी परखड सत्य मांडणे आवश्यक आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version