Site icon InMarathi

आलमगीर औरंगजेब वि. छत्रपती शिवाजी महाराज : भारतीय इतिहासातील दोन प्रवाह

aurangzeb 3 InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक: शैलेंद्र कवाडे

आजचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश या चार देशांची लोकसंख्या, जागतिक लोकसंख्येच्या साधारण 28% आहे. अवघ्या 300 वर्षांपूर्वी हे चारही देश एकाच विशाल साम्राज्याचा भाग होते. या साम्राज्याचा महसूल, जागतिक महसुलाच्या 1/4 होता. अशा या जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्याचा सम्राट होता,

“हजरत सलामत किब्ला ई दिनों दुनिया अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहंमद औरंगजेब आलमगीर बादशहा ई गाझी शहेनशहा ए सल्तनत ए हिंद” ..

ज्याला जग आज फक्त औरंगझेब म्हणून ओळखते. त्याच्या नावाच्या पुढच्या आणि मागच्या पदव्या, त्याच्या साम्राज्यसह गळून पडल्यात आणि उरलाय फक्त एक माणूस, त्याच्या समाधीइतकाच साधा, रुक्ष आणि जुनाट.. २० फेब्रुवारी १७०७ साली नगरजवळच्या भिंगार येथे औरंगझेब ने देह ठेवला.

 

कसा होता औरंगजेब?

अत्यंत कर्तृत्ववान, खंदा लढवैय्या, उत्कृष्ट प्रशासक, उत्कृष्ट सैन्य संचालक, व्यक्तिगत नैतिकतेचा वस्तुपाठ, चिवट, स्वतःच्या तत्वांशी आणि हाती घेतलेल्या कार्याशी अत्यंत प्रामाणिक, दिर्घद्योगी, माणसांची प्रचंड पारख असलेला, न्यायनिष्ठुर, प्रचंड धार्मिक, काटकसरी .

एखाद्या प्रचंड वटवृक्षासारखा अवाढव्य माणूस होता औरंगझेब आलमगीर..

पण तरी या औरंगझेबाच्या कपाळी इतिहासाने काही मोठी पापं गोंदवून ठेवलीत. त्यातलं सगळ्यात मोठं पाप आहे, त्याच्या दक्खन स्वारीच्या काळात घडून आलेल्या मनुष्यहत्येचे. साधारण अंदाजानुसार औरंगझेब आणि त्याचे विरोधक दोघांचे मिळून, बारा ते पंधरा लाख सैनिक या काळात मृत्युमुखी पडले. यात जितके लढून मेले त्याहूनही अधिक विविध रोगांच्या साथीत, कधी उपासमारीने मेले.

 

 

बहुदा जितके सैनिक मेले त्याच्या काही पट, नागरिक मेले असावे. दुष्काळाने, उपासमारीने, लुटालुटीने मुलुख वैराण झाला. साम्राज्य पोखरून निघालं.

औरंगझेबाने सामर्थ्यशाली मुघल साम्राज्याच्या गंडस्थळी स्वतःच्या टोकदार हट्टाचा एक पाशवी खिळा ठोकून ठेवला.

औरंगझेबाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दशकांत, मुघल साम्राज्याच्या सीमा फक्त दिल्ली शहरापूरत्या मर्यादित झाल्या. आपल्या आयुष्यातील शेवटची सत्तावीस वर्ष औरंगझेबाने, ज्या मराठी वादळाचा पाठलाग करण्यात घालवली, त्या वादळाने संपूर्ण भारत व्यापला. औरंगझेबाच्या मृत्यूनंतराचा इतिहास वाचल्यास, औरंगझेब हा प्रचंड हताश, दयनीय आणि हरलेला सम्राट वाटतो.

या दयनीय पराभवाचे मूळ औरंगझेबाच्या स्वभावातच आहे. औरंगझेब कसा होता हे जितकं महत्वाचं आहे तितकंच, औरंगझेब कसा नव्हता हेही महत्वाचं आहे.

 

 

एका शब्दात सांगायचं तर औरंगझेब हा राजा नव्हता, एका प्रचंड मोठ्या साम्राज्याच्या सम्राटाकडे हवा असणारा दिलदारपणा, क्षमाशीलता, औदार्य, मोकळेपणा, दया, विवेक यापैकी कोणताही गुण औरंगझेबाच्या ठायी नव्हता.

औरंगझेब कदाचित उत्कृष्ट वझीर, निजाम होऊ शकला असता पण तो अत्यंत वाईट शहेनशहा होता.

औरंगझेबाच्या धार्मिक कट्टरतेने त्याच्या राज्याला, त्याच्या प्रजेपासून, ज्यात त्याचे सैनिकही होते, दूर नेले. औरंगझेबाच्या धार्मिक निष्ठा या त्याच्या राजकीय निष्ठांपेक्षा बलवत्तर ठरल्या आणि मोगल साम्राज्य ज्या आधारावर तोलले होते तो आधारच खचला.

 

 

दक्खन काबीज करण्याचा त्याचा हट्ट अविवेकी होता. वाऱ्यावर स्वार झालेल्या आणि स्वतःच्या मनातील स्वराज्याच्या निष्ठेशिवाय इतर कोणतेही नैतृत्व न जुमानणाऱ्या मराठ्यांशी, औरंगझेब एक न संपणारे युद्ध लढत राहिला. इतकं सगळं असूनही, औरंगझेब इतका कर्तृत्ववान होता की वयाच्या नव्वदीपर्यंत त्याच्या घरात त्याच्या विरुद्ध बंड होऊच शकले नाही.

१६८० च्या दरम्यान घडलेल्या अकबरच्या बंडानंतर कोणाही राजपुत्राने औरंगझेबाला हटवण्याचा प्रयत्न केला नाही, किंबहुना तसा प्रयत्न होणारच नाही याची काळजी बादशहाने घेतली.

औरंगझेबाने मृत्यूसमयी लिहिलेलं पत्र हा त्याच्या आयुष्याचा सारांश आहे. तो लिहितो,

“मी कोण आहे, कुठे जाणार हे मला माहित नाही. माझं सगळं आयुष्य व्यर्थ ठरलंय. देव माझ्या हृदयात होता पण माझ्या डोळ्यासमोर काळोख दाटला होता. मला आता काहीही आशा वाटत नाही. माझ्या हातून बरंच पाप घडलंय.”

 

 

इतिहास हा नेहमी, सामाजिक आणि राजकीय प्रवाहांच्या संदर्भात अभ्यासला पाहिजे. व्यक्तींपेक्षा असा प्रवाहांचा अभ्यास जास्त वास्तववादी आणि दिशादर्शक असतो. सतराव्या शतकात, भारतीय राजकारणात दोन मोठे प्रवाह आढळतात. एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि दुसरा आलमगीर औरंगझेबाचा.

छत्रपतींचे राजकारण एक विवेकवादी, समंजस पण तरीही खंबीर निष्ठांचे स्वरूप घेऊन समोर येते. या प्रवाहात व्यक्ती मोठी नाही तर त्या व्यक्तीने रुजवलेल्या श्रद्धा मोठ्या असतात.

 

याच श्रद्धा सामान्य मराठी प्रजेला सत्तावीस वर्ष जगातील सर्वशक्तिमान साम्राज्याशी लढण्याचे बळ देतात. नैतृत्वापेक्षाही समाजाची जीवनमूल्ये महत्वाची मानण्याची, तानाजी पडला तरी कोंढाणा न सोडण्याची सवय, याच श्रद्धा रुजवतात.

दुसरीकडे औरंगझेबाचा प्रवाह हा अतिरेकी धार्मिक निष्ठा, स्वकेंद्रित विचारसरणी, धर्मग्रंथावरील फाजील विश्वास, स्वतःच्या समजुतींभोवती फिरवत ठेवलेली मूल्यव्यवस्था या गुणांभोवती घुटमळत राहतो, स्वतःबरोबरच समाजाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरतो.

आजही हे दोन्ही प्रवाह समाजात वाहत आहेत. बऱ्याचदा ते एकमेकांत मिसळून जातात, तर कधी एकमेकांच्या साथीने, समांतर वाहतात. व्यक्ती महत्वाची नसतेच, प्रवाह महत्वाचा असतो. आपण कोणत्या प्रवाहाला बळ द्यावं हे आपल्याला ठरवावं लागेल, त्यावरच आपलं आणि आपल्या पिढ्यांच भवितव्य अवलंबून आहे.

माझा छत्रपतींच्या प्रवाहातच राहण्याचा निर्णय पक्का आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :



===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version