“बाबा…थांब ना रे तू…” मनाला भिडणारी प्रियांका चोप्राची हळवी साद
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
==
तुम्ही रोजच्यासारखं ट्रेनमधून/बसमधून प्रवास करत असता. रोजच्यासारखं मोबाईल फोनवर टिवल्याबावल्या करत असता. फेसबुक, व्हॉट्सअप वरचे मेसेजेस वाचून, त्याला साजेसा रिप्लाय करत गालातल्या गालात हसतही असता. तेवढ्यात युट्युबवरील एक लिंक कुणीतरी तुम्हाला पाठवतं. क्लिक करताच प्रियांका चोप्रा येते, कोणाकडून तरी मराठीतले उच्चार समजावून घेत असते. उत्सुकता थोडी वाढते. रेकॉर्डिंग रूम मध्ये येऊन ती गायला सुरुवात करते.
“बाबा मला कळलेच नाही,
तुझ्या मनी वेदना”
ती पुढे गात राहते आणि तुम्ही ऐकत राहता. वडिलांसाठी एका मुलीने गायलेलं हे गाणं आहे – व्हेंटिलेटर ह्या मराठी चित्रपटातलं.
आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, सुकन्या कुलकर्णी, बोमन इराणी अश्या दिग्गज कलाकारांचा, राजेश मापुस्करांनी दिग्दर्शित केलेला आणि प्रियांका चोप्रा/मधू चोप्रा यांनी प्रोड्युस केलेला हा चित्रपट. घरातील एका वडीलधाऱ्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं आणि त्यामुळे घरातल्या इतरांची चाललेली घालमेल – असा हा प्लॉट.
गाण्याबद्दल म्हणाल तर, शब्द आणि चाल तर श्रवणीय आहेतच, पण प्रियांकाने आपल्या आवाजाने त्यांना पुरेपूर न्यायही दिला आहे. काही शब्दांच्या उच्चारात (जाऊ, कळत, अर्थ ई.) थोड्या चुका आहेत आणि त्या मराठी कानाला जाणवतातही. परंतु ज्या आर्ततेने तिने ते म्हटलंय, त्यामुळे त्या चुका मनाला जाणवत नाहीत. तिने हे गाणं आपल्या दिवंगत वडिलांना अर्पण केलंय म्हणूनही असेल कदाचित, गाणं खूप भावतं. हळूहळू अंतर्मुख करतं.
देव-देवतांची ओळख आपण जसजसे मोठे होतो तसतशी इतरांकडून होत जाते. पण प्रत्येक लहान मुलासाठी त्याचे आईवडीलच दैवत असतात, सर्वस्व असतात. त्यांच्यावर ते अवलंबून असतं. जसजसं ते मोठं होतं, त्याच्या पंखात बळ येतं, ते स्वावलंबी होत जातं आणि एके दिवशी घरट्याबाहेर उडून जातं. पण आईवडिलांकरिता मात्र त्यांचं विश्व कायम आपल्या मुलाच्या अवतीभवतीच राहतं. शरीराने नसलं तरी मनाने नक्कीच. आपण मोठे होतो आणि त्याचबरोबर आपले आईबाबा वृद्ध होत जातात. अश्या वेळी कोणावरही व्हेंटिलेटर चित्रपटातल्या सारखा प्रसंग ओढवू शकतो, मनात असा विचार गाणं ऐकताना आल्यावाचून राहत नाही. वडिलांनी आपल्यासाठी आयुष्यभर इतकं केलेलं असतं की ते पांग कसे फेडू असा प्रश्न विचारत गाणं खूप हळवं करून जातं आणि ते संपता संपता खाऱ्या पाण्याचा ओघळ गालावरून वाहू लागतो.
ह्या गाण्यामुळे आणि चित्रपटातील कलाकारांमुळे तो पाहण्याची इच्छा नक्कीच होते.
गाण्याचं टायटल आहे बाबा. संपूर्ण लिरिक्स आणि YouTube ची लिंक पुढे देत आहोत:
बाबा मला कळलेच नाही,
तुझ्या मनी वेदना
कशी मी राहू, बोल कुठे जाऊ
मला काही समजेना
साद हि घालते, लाडकी तुला
जगण्या तू दिला
माझ्या जीवा अर्थ खरा
बाबा..
थांब ना रे तू
बाबा..
जाऊ नको दूर
बाबा..
दैव होता तू, देव होता तू
खेळण्यातला माझा खेळ होता तू
शहाणी होती मी, वेडा होता तू
माझ्यासाठी का रे सारा खर्च केला तू
आज तू फेडू दे, सारे पांग मला
जगण्या रे मला अजुनही तूच हवा
बाबा..
थांब ना रे तू
बाबा..
जाऊ नको दूर
बाबा..
पाय हे भाजले, अश्रूंच्या उन्हात
हाक दे, हात दे, श्वास दे पुन्हा..
बाबा.. बोलना बोलना बोलना…
बाबा..
थांब ना रे तू
बाबा..
जाऊ नको दूर
बाबा..
—
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.