अब्जावधी रुपयांचा महाघोटाळा केलाय सहारणपूरच्या “तीन भावांनी”!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
भारतात निरव मोदी ह्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याने केलेला घोटाळा चांगलाच चर्चिला जातो आहे. जो बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा ठरू शकतो. ह्या सर्वातून आपण बाहेर पडायच्या आधीच आणखी एका घोटाळ्याची बातमी कानावर येते आहे.
ह्यावेळी हा घोटाळा भारतातील नसून दक्षिण आफ्रिकेतील आहे. हा घोटाळा करणारे तीन भावंड भारतीय वंशाचे आहेत.
दक्षिण आफ्रिकेत जॅकब जुमा ह्याला भ्रष्ट्राचाराच्या आरोपानंतर राष्ट्रपती पदावरून राजीनामा द्यावा लागला आहे. पण ह्या प्रकरणात एका भारतीय व्यावसयिक कुटुंबाचा समावेश असल्याचंही सांगण्यात येत आहे. हे कुटुंब दक्षिण आफ्रिकेत गुप्ता ब्रदर्स म्हणून ओळखलं जातं.
गुप्ता ब्रदर्स हे जवळपास २४ वर्षांआधी सहारनपुर येथून व्यवसायाच्या शोधात दक्षित आफ्रिकेला येऊन पोहोचले.
तिथे त्यांचा व्यवसाय एवढ्या मोठ्या स्तरावर पसरला की आता दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या १० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचं नाव आहे. पण त्यांच्यावर नेहेमीच जुमा ह्यांचे निकटवर्तीय असल्याचा तसेच सरकारच्या मदतीने आपला व्यवसाय वाढविला असल्याचा आरोप होत आला आहे.
गुप्ता ब्रदर्स म्हणजे अजय (वय ५०), अतुल, (वय ४७) आणि राकेश (वय ४४) ह्या तीन भावांचे त्रिकुट. ह्या सर्वांचाच जन्म उत्तर प्रदेशच्या सहारनपुर येथे झाला.
तिघांनीही तिथल्या जेवी जैन कॉलेजातून पदवी घेतली. तिघांचं संपूर्ण शिक्षण हे सहारनपुर येथेच झालं. सुरवातीला त्यांनी त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हाती घेतला. आणि मग ते दक्षिण आफ्रिकेला निघून आले.
त्यांचे वडील म्हणजेच शिवकुमार गुप्ता, यांचे सहारनपुर येथे किराण्याचे दुकान होते.
त्यासोबतच ते त्यांच्या दिल्ली येथील एसकेजी मार्केटिंग द्वारे मेडागास्कर आणि जंजीबार येथे मसाल्यांची निर्यात करायचे. एवढचं नाही तर त्यांची आणखी एक कंपनी होती, ‘गुप्ता अॅण्ड कंपनी’.
टॅलकम पावडर मध्ये वापरण्यात येणारे सोपस्टोर पावडरचे वितरण करायची. त्यांच्याकडे सहारनपुरच्या राणी बाजार येथे एक मोठं घर होतं.
जेव्हा दक्षिण आफ्रिकेने परदेशी कंपन्यांना इन्वेस्टमेंट करिता आपले दरवाजे उघडे केले तेव्हा शिवकुमार यांनी मधला मुलगा अतुल गुप्ता ह्याला तिकडे पाठविले. व्यावसायिक दृष्टीने त्यांना दक्षिण आफ्रिका ही एक चांगली संधी वाटली. अतुलने कॉम्पुटरचा कोर्स केला होता.
त्याने दक्षिण आफ्रिकेत एक कंपनी उघडली, आणि त्याद्वारे कॉम्पुटरची असेम्बलिंग आणि मार्केटिंग, डिसट्रीब्युशन आणि कंपनीची ब्रॅन्डींग करण्यास सुरवात केली.
या कॉम्पुटरला त्यांनी सहारा कॉम्पुटरच्या नावाने बाजारात आणले. आणि ही कंपनी यशस्वीपणे चालली. त्यानंतर सीएचा कोर्स पूर्ण करून मोठा भाऊ अजय गुप्ता हा देखील दक्षिण आफ्रिकेत आला.
जेव्हा अतुल हा दक्षिण आफ्रिकेत त्याचा व्यवसाय सेट करत होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या खात्यात १.२ मिलियन रेंड ट्रान्स्फर केले होते. त्यानंतरही त्यांनी अतुलला आर्थिक मदत केली.
गुप्ता ब्रदर्सच्या काही मुख्य कंपन्या
- ओकबे रिसोर्स अॅण्ड एनर्जी
- टिगेटा एक्सप्लोरेशन अॅण्ड रिसोर्सेस
- शिवा यूरेनियम माइन
- वेस्टडॉन इन्वेस्टमेंट्स प्राइवेट लिमिटेड
- जेआईसी माइनिंग सर्विसेज अॅण्ड ब्लॅक एज एक्सप्लोरेशन
- दि न्यूज एज न्यूजपेपर (टीएनए मीडिया प्राइवेट लिमिटेड)
- आफ्रीकन न्यूज नेटवर्क
१९९४ साली गुप्ता ब्रदर्सने १.४ मिलियन रेंड ने जी कंपनी सुरु केली होती तीच कंपनी तीन वर्षांत म्हणजेच १९९७ साली ९७ मिलियन रेंडची झाली. ज्याचे १० हजार कर्मचारी होते. ह्यानंतर त्यांचा व्यवसाय वाढतच गेला.
१९९४ साली वडील शिवकुमार यांच्या मृत्यू नंतर जवळपास त्याचं पूर्ण कुटुंब हे दक्षिण आफ्रिकेत येऊन स्थायिक झालं. आई अंगुरी हिच्या व्यतिरिक्त सर्वांनी दक्षिण आफ्रिकेची नागरिकता घेतली.
आता ह्या तिन्ही भावांचा दक्षित आफ्रीकेत खूप मोठा व्यवसाय आहे. अनेक कंपन्या आहेत. जोहान्सबर्ग आणि केपटाऊन येथे शेकडो एकरात पसरलेले एक अलिशान घर आहे. ते आता कॉम्प्युटिंग, माइनिन्ग, एयर ट्रॅव्हेल, एनर्जी, टेक्नोलॉजी आणि मिडिया ह्या सर्व व्यवसायात आहेत.
दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती जॅकब जुमा ह्यांची पत्नी, मुलगा आणि अनेक नातेवाईक गुप्ता ब्रदर्सच्या कंपनीमध्ये महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. एवढच नाही तर जुमा सरकारच्या अनेक मंत्र्यांचे नातेवाईक देखील ह्यांच्या कंपनीत काम करतात.
ह्या गुप्ता ब्रदर्स बद्दल मार्च मध्ये अचानक एक खुलासा झाला.
जेव्हा तेथील तीन वर्ष आधी उप वित्त मंत्री असलेले मसोबीसी जोनास ह्यांनी असा दावा केला की, गुप्ता भावडांनी त्यांना वित्त मंत्री नेने ह्यांच्या पदावरून काढून जोनास ह्यांना ते पद देण्याची ग्वाही दिली होती.
ह्यानंतर जुमा सरकार संकटात सापडली. अजय गुप्ता वर अनेक प्रकारचे आरोप आधी देखील केले गेले होते.
त्यांनी २०१० साली देखील एका संसदाला मंत्री बनविण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे गुप्ता ब्रदर्स ह्यांच्यावर दक्षिण आफ्रिकेत आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी शासन कारभारात ढवळाढवळ करणे तसेच स्वतःच्या फायद्यासाठी हव्या त्या पदावर हवा त्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचे आरोप लगावण्यात आले आहेत.
गुप्ता ब्रदर्स ह्यांच्यावर आरोप आहेत की, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जुमा ह्यांच्याशी त्यांची जवळीक आहे. तसेच हे कुटुंब आपल्या व्यावसायिक फायद्यांसाठी जुमा सरकारला आपल्या बोटांवर नाचवतं.
त्यांचा ज्यामुळे फायदा होत असेल त्या योजना ते सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आखतात.
पण आत्ताचा वाद हा एका डेअरी प्रोजेक्ट बद्दल आहे. हा प्रोजेक्ट गरिबांच्या फायद्यासाठी होता पण ह्यातही भ्रष्टाचार करून निधीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आल्याचे उघडकीस झाले आहे.
जेव्हा गुप्ता भावंडांनी कॉम्पुटर कंपनीची सुरवात केली तेव्हा त्याचे माजी राष्ट्रपती जुमा यांच्याशी त्यांचे हितगुज झाले. पण हे संबंध तेव्हा वाढेल जेव्हा ते राष्ट्रपती नव्हते.
गुप्ता ब्रदर्सच्या कॉम्पुटर शो-रुमच्या उद्घाटनासाठी जुमा ह्यांना आमंत्रित करण्यात आले होते, त्यांच्या हस्ते तो उद्घाटन समारंभ पार पडला.
जुमा ह्यांची पत्नी बोगी नगमा जुमा ह्या गुप्ता कुटुंबाच्या मायनिंग कंपनीत डायरेक्टर आहेत, जुमा ह्यांची मुलगी दुडूजेल ही सहारा कॉम्पुटरमध्ये डायरेक्ट पदावर नियुक्त आहे तर मुलगा दुदुजेन हा ओकबे इन्व्हेस्टमेंट मध्ये डायरेक्टर आहे.
गुप्ता ब्रदर्स सोबत जुमा ह्यांचे अनेक भ्रष्टाचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता लोकांचा रोष वाढत चालला असून त्यांच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात येत आहेत.
त्यांच्यावर जे आरोप आहेत त्यांपैकी मुख्य आरोप म्हणजे ह्या त्रिकुटाची मदत करणे आणि आपल्या खाजगी घरासाठी सरकारी निधीतून खर्च करणे, हे आहेत.
संसदेत जेव्हा जुमा ह्यांच्या विरोधात महाभियोग अमलात आणला गेला तेव्हा तर ते वाचले पण आता त्यांची पार्टी राष्ट्रपतीपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यशस्वी ठरली आहे.
सध्या दक्षिण आफ्रिकेत ही चर्चा होत आहे की, कदाचित हे गुप्ता ब्रदर्स देश सोडून पळू शकतात. कारण जुमा ह्यांचे पद गेल्यावर आता अनेक घोटाळे उघडकीस येतील आणि त्यामुळे हे गुप्ता ब्रदर्स ह्यात फसू शकतात.
मागील वर्षी जेव्हा हे गुप्ता कुटुंब मोठ-मोठे बॅग घेऊन आपल्या प्रायव्हेट विमानाने निघाले होते, तेव्हा सर्वांना असेच वाटले होते की आता काही हे परत दक्षिण आफ्रिकेत येणार नाही. पण तेव्हा तर ते सर्व दुबईला गेले होते आणि तिथून तुर्की, जिथे अजय गुप्ताच्या मुलाचे लग्न झाले होते.
त्यांनी आपल्या एका भावाला राजेशला आणि आपली काही पुतण्यांना दुबई येथे शिफ्ट केले. जिथे ते एक मोठा बिसनेस करण्याच्या तयारीत आहेत.
गुप्ता ब्रदर्स ह्यांनी हे घोटाळे करून खूप संपत्ती गोळा केली आहे. त्यांच्याकडे दुबईच्या सर्वात महाग ठिकाणी एक भलेमोठे घर आहे. तर काही आणखी देशांत देखील त्यांची प्रॉपर्टी आहे.
तसेच त्यांनी मागील काही वर्षांत दुबई, ओस्ट्रेलिया, तुर्की सारख्या अनेक देशांत आपला व्यवसाय वाढवला आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.