कोरेगाव भीमा दंगल आणि समाजाचे खरे अदृश्य शत्रू
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
लेखक: दत्ता शिर्के
===
३१ डिसेंबर २०१७ रोजी पुणे शहरात शनिवारवाड्यावर ‘एल्गार परिषदेत’ एक पुस्तिका मोठ्या प्रमाणात विकल गेली. कोरेगाव भीमा युद्धाला २०० वर्ष पूर्ण झाल्या निमित्त काही गटांनी एकत्र येऊन ‘भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान’ राबविले व त्याचा भाग म्हणून ‘भीमा कोरेगावने दिलाय धडा नवी पेशवाई मसनात गाडा …’ अशी पुस्तिका प्रकाशित केली.
यामध्ये पान क्र. २३ वर मूठभर श्रीमंत मराठा समाज गेली ६०-६२ वर्ष राजकीय सत्ता सुविधा उपभोगतोय असे मांडून पुढील मजकूर लिहिला आहे तो असा
“..तरीही ते (मराठे) ऍट्रॉसिटी आणि आरक्षणाच्या मागणीआड कोपर्डीची झूल पांघरून मराठा क्रांती मूक मोर्चाच्या नावाने रस्त्यावर आले. कोपर्डीमधील झालेले हत्याकांड निषेधार्ह आहे. त्यासाठी निषेध, मोर्चे, निदर्शने झाली पाहिजे. पण कोपर्डीच्या नावावर श्रीमंत मराठ्यांनी त्यांची गेलेली सत्ता पुन्हा परत मिळविण्यासाठी मराठा मूक मोर्चाचा डाव खेळला.
–
त्यात आरएसएस वाल्यानी मेंदू आणि शक्ती लावली होती. आत्महत्येच्या खाईत लोटलेल्या कष्टकरी मराठ्यांच्या असंतोषाला असे चुकीचे वळण देण्यात आले. केवळ जातीच्या नावाखाली कष्टकरी – गरीब मराठ्यांची दिशाभूल करण्यात आली…”
(पुढील काही ओळी जाती द्वेषपूर्ण असल्याने येथे लिहीणे टाळतोय)
एखाद्या कृतीबाबत वाद प्रतिवाद असू शकतात. परंतु संबंध जगाने पहिले कि मराठा मोर्चा मध्ये गरीब, मध्यमवर्ग, श्रीमंत असे सर्व स्तरातून व विविध विचारधारेचे मराठे व त्यांना साथ देणारा अन्य समाज लाखोंच्या संख्येने आपल्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन संविधानिक मार्गाने रस्त्यावर आला.
मग, या मध्ये कष्टकरी मराठ्यांच्या असंतोषाला असे चुकीचे वळण देण्यात आले?? कष्टकरी – गरीब मराठ्यांची दिशाभूल करण्यात आली?? असे म्हणणे म्हणजे तमाम मराठा बांधवांची बदनामी व दलित बांधवांच्या मनात मराठा समाजाबाबत द्वेष निर्माण करण्याच्या छुपा प्रयत्न आहे.
आणि, त्यात आरएसएस वाल्यानी मेंदू आणि शक्ती लावली होती?? असे म्हणणे म्हणजे ज्या मराठ्यांनी भव्य मोर्चे अत्यंत शिस्तबद्ध, शांततापूर्ण व्हावे म्हणून मेंदू व शक्ती लावली, मेहनत घेतली, त्यांचा अपमान होय.
अरे, कायम आरएसएसचा विरोध करणारी संभाजी ब्रिगेड व त्यांच्या समविचारी संघटनाचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी मराठा क्रांती मूक मोर्चात विविध कामाचे नियोजन करताना दिसले. त्यांनी सांगावे कि ते आरएसएस वाल्यांच्या आदेशावर काम करीत होते काय?
मराठा क्रांती मोर्चा हा मराठ्यांचा शांततापूर्ण एल्गार होता. मात्र पुण्यातील एल्गार परिषदेतील पुस्तिका वेगळाच विचार मांडते. दुर्दैवाने संभाजी ब्रिगेड ही या एल्गार परिषदेच्या संयोजकांपैकी एक. मराठा क्रांती मोर्चा बद्दल हे आक्षेपार्ह लिखाण संभाजी ब्रिगेडने कसे काय मान्य केले??
दलित व मराठा समाजात तेढ निर्माण होईल अशी पुस्तिका ज्या एल्गार परिषदेत विकली गेली त्याचे कबीर कला मंच व रिपब्लिकन पॅन्थर हे संशयित नक्षलवादी गट मुख्य आयोजकांपैकी आहेत. या गटातील काहींवर बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेसोबत संबंधावरून संशयाने पोलीस कारवाई झाली आहे. त्यांच्या कृती तशा संशयास्पद आहेतच.
पेशवाई काळातील जातीवाद आजही जिथे दिसेल तिथे ठेचलाच पाहिजे. पण आजची ‘नवी पेशवाई’ मसनात गाडण्यासाठी आयोजित एल्गार परिषदेत दहशतवादी अफझल गुरु व बुरहान वाणीचे समर्थन करणारा उमर खालिद, तिहेरी तलाक प्रकरणात प्रतिगामी भूमिका घेणारे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल ला बोर्डाचे राष्ट्रीय सचिव मौलाना अजहरी यांना निमंत्रित करणे.. म्हणजे शिवशाही आहे काय?
दर वर्षी कबीर कला मंच वाले १ जानेवारीला दिवसभर कोरेगाव भीमा युद्ध जयस्तंजवळ दिवसभर कार्यक्रम घेतात. आता, कोरेगाव भीमा शौर्य दिवस २०० वर्ष पूर्ण होत असताना, १ जानेवारी २०१८ या दिवसाचे निमित्त करून कबीर कला मंच व त्यांच्या फुटीरतावादी गटांनी चळवळ उभी केली, ३१ डिसेंबर रोजी एल्गार परिषेदत घेतली.
मात्र नेमकं १ जानेवारीलाच हे लोक (उमर खालिद, मौलाना अजहरी, आमदार जिग्नेश मेवानी, बी जी कोळसे पाटील व अन्य मुख्य वक्ते तसेच कबीर कला मंच चे कार्यकर्ते) पैकी कोणीच जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेले नाहीत?
कारण, हे लोक सच्चे आंबेडकरी नसून जहाल डावे व फुटीरतावादी आहेत. लाखोंची कत्तल करणारा माओ हा काय शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरी विद्रोही परंपरेतील आहे काय?? पण, कबीर कला मंचने आपल्या गाण्यांची सीडी – ‘ही गाणी आमुची, आमुचा गुन्हा काय?’ मध्ये आरोळी ठोकताना शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांच्यासह हळूच बदमाशीने मार्क्स, लेनिन व माओ नावाचा उद्घोष केला आहे.
कारण शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरी विचारासोबत बदमाशीने माओ चे संविधान विरोधी विचार खपविण्याचा या जहाल डाव्या गटांचा धंदा आहे. हीच बदमाशी यांनी एल्गार परिषदेत केली.
जातीअंताची लढाई म्हणायचे मात्र आपल्या कामातून जाती जातीत वाद वाढविण्याचा या फुटीरतावादी गटांचा डाव आहे. व हाच विचार यांच्या पुस्तिकेत स्पष्ट दिसून येतो. दलित व मराठा समाजात वाद निर्माण करून, स्वतःचा बचाव करण्यासाठी आरएसएस किंवा हिंदुत्ववादी गटांचे नाव घ्यायचे यांचे षडयंत्र असू शकते. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात असेच झाले असल्याची दाट शंका आहे.
तेंव्हा, अखंड सावधान असावे…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.