आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
लेखिका : अमिता आपटे
===
मेरिडिटेरिनिअन समुद्राजवळ वसलेला ‘इस्राइल’ हा जगातला एकमेव ज्युईश देश आहे; हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. आणि पॅलेस्टिनिअन्स म्हणजे त्याच भूमीमधले अरब लोक ज्यांची जमीन आता इस्राइलच्या ताब्यात आहे. त्यांना याच भूमीवर आपला पॅलेस्टाईन नावाचा देश बसवायचा आहे.
आणि दोघांपैकी कोणाला कुठली आणि किती जमीन मिळायला हवी या विषयावर गेली १०० वर्षे हा वाद चालू आहे.
तसे पाहायला गेले तर या वादाचे मूळ कर्ते अत्यंत धूर्त असे इंग्रज आहेत. कसे ते पुढे घटनाक्रम वाचलात की तुमच्या लक्षात येईलच.
आता सर्वप्रथम या सगळ्या भानगडीत महत्वाच्या अश्या भुभागांची आपण ओळख करून घेऊ.
इस्राइलच्या उत्तरेला गोलन डोंगर रांगा आहेत. त्याखाली जॉर्डन नदीच्या पश्चिमेचा नदी किनारा म्हणून ओळखला जाणारा प्रदेश म्हणजेच वेस्ट बँक. त्याच्या पलीकडे जॉर्डन देश. या दोन्ही देशांच्या मध्ये तीव्र क्षार क्षमता असणारा डेड सी, म्हणजे मृत समुद्र. यात पोहणारी माणसे बुडू शकत नाहीत. या समुद्राच्याच पश्चिमेला इस्राइलचे नेगेव्ह वाळवंट आहे.
खाली इजिप्तच्या उत्तरेला समुद्राला लागून एक छोटीशी किनारपट्टी ‘गाझा स्ट्रीप’ म्हणून ओळखली जाते. त्याच्या वरच्या बाजूला आहे तेल अवीव म्हणजे इस्राइलची राजधानी. तर मध्यभागी जेरुसलेम आहे.
हे शहर अतिशय संवेदनशील आहे. कारण इथे तीन अब्राहमीक धर्मांची प्रमुख प्रार्थनागृहे आहेत.
याच शहरात येशू ख्रिस्तांना क्रुसिफाय केले गेले. मोहम्मद पैगंबर इथेच पैगंबरवासी झाले. त्यामुळे अरब लोकांसाठी सौदीतील मक्का मदिनेनंतरचे हे तिसरे प्रमुख स्थान आहे. तर ज्युईश धर्माची सुरुवातही याच भूमीत झाली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्त्राइलची राजधानी म्हणून मान्यता देणे म्हणजे काय हे आता आपल्या चांगलेच लक्षात येईल. आणि भारत सरकारने त्याबाबत किती संयत आणि योग्य भूमिका घेतली हेही लक्षात येते.
एकोणविसाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये राष्ट्रवादी विचारांची एक मोठी लाट आली. त्याच्यातुनच सध्याची इटली, जर्मनी इत्यादी पिल्ले जन्माला आली. तसाच काहीसा प्रकार ज्यू डीयास्पोराच्या बाबतही होऊ लागला.
जवळजवळ ३००० वर्षांपूर्वीपासून या पवित्र धर्तीवर ज्यु राज्य होते. तसेच जगभर हिटलरच्या आधीपासूनच ज्यू लोकांवरती बरेच अत्याचार केले जात होते.
भारत हा असा एकमेव देश आहे जिथे ज्यू लोकांना सुरक्षित वाटते.
असो… तर झिओनिस्ट मुव्हमेन्ट च्या अंतर्गत या पॅलेस्टाईनच्या पवित्र जमिनीवर ज्यू लोक स्थलांतरित होऊन येऊ लागले व वसाहती स्थापन करू लागले. थिओडर हर्लझ यांनी ज्यू राष्ट्राची संकल्पना १८९६ मध्ये प्रथम मांडली.
१९१७ मध्ये इंग्रजांनी सहाशे वर्षे जुन्या ऑट्टोमन राज्यकर्त्यांकडून मिळवलेली आणि आत्ता विवादात असणारी ही भूमी ज्युजना स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्यासाठी म्हणून देण्याचे मान्य केले.
त्या बदल्यात त्यांना पहिल्या महायुद्धात ज्यूंचे सहकार्य मिळवायचं होतं.
‘बॅलफोर डिक्लरेशन’ अश्या नावाने इथे ज्यू लोकांना वचने दिली तर त्याचवेळी दुसरीकडे ते गुप्त असा साईक्स पिको करार फ्रान्स आणि रशिया सोबत करत होते ज्याद्वारे पॅलेस्टाईन ब्रिटनच्याच ताब्यात राहील.
बरं इतकं करून ते थांबले नाहीत त्यांनी अरबांना पण पॅलेस्टाईनचा प्रदेश देण्याचे वचन दिले. त्याबदल्यात त्यांनी ऑट्टोमन राज्यकारभारा विरोधात उठाव करावा अशी त्यांची अपेक्षा होती. सगळ्या जगावर राज्य केलं.
पण चाचेगिरीची मूळ प्रव्रुत्ती काही सुटत नाही. जावुदेत.
१९१९ साली तिथल्या स्थानिक पॅलेस्टाईन अरब मुस्लिमांनी बॅलफोर डिक्लरेशनला सर्वप्रथम विरोध नोंदवला.
तर, पहिल्या जागतिक युद्धानंतर या भागात मोठ्या प्रमाणात ज्यूजनी जमिनी खरेदी करायला वसाहती निर्माण करायला सुरुवात केली. त्यामुळे साहजिकच ज्यू लोकसंख्या या ३० वर्षांच्या काळात ३ टक्यावरून ३०% वर पोचली.
या सर्व गोष्टींमुळे अरबी लोकांनी ब्रिटिश मॅण्डेटच्या विरुद्द बंड पुकारले. पण हा उठाव ज्यू लोकांच्या मदतीने १९३६ ते १९३९ च्या दरम्यान ब्रिटेनने मोडून काढला.या सर्व काळात फोडा व राज्य करा अशीच इंग्रजांची नीती होती.
मग आलं दुसरे जागतिक महायुद्ध. यात ४२ लाखांहुनही अधिक ज्यू लोकांच्या निघृण हत्या हिटलरने करवल्या. या काळात इस्राइलकडे पलायन करणाऱ्यांची संख्या प्रचंड होती. ते महायुद्ध संपले.
आता पॅलेस्टाईन हा विषय फारच किचकट झाला होता. त्यामुळे १९४७ मध्ये इंग्रजांनी हे प्रकरण युएन कडे सोपवले व शेवटी इस्राएल निर्मितीच्या बाजूने मतदान झाले.
इकडे ही घोषणा होताच आजूबाजूच्या चारही देशांनी इस्राइवर हल्ला केला. परंतु इस्राइने हे युद्ध जिंकले. पण आता या भानगडीत पॅलेस्टाईन म्हणून जो भूभाग स्वतंत्र देश म्हणून ओळखला जात होता तो जॉर्डन आणि इजिप्तने ताब्यात घेतला.
आणि पॅलेस्टाईनचे अस्तित्वच संपून गेले.
या पुढची मोठी लढाई १९६७ मध्ये झाली. ज्यात इस्राएलने वेस्ट बँक, गाझा स्ट्रीप आणि इजिप्तच्या सुवेझ कालव्यापर्यंत आत जाऊन सिनाई पेनिन्सुला नावाच्या प्रचंड भूभागावर कब्जा केला.
नंतर ७८ साली ही जमीन इजिप्तला परत केली गेली. तर त्या बदल्यात इजिप्तचे त्यावेळचे राष्ट्रपती अन्वर सदात यांनी इस्त्राइलला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. एका मुस्लिम राष्ट्राकडून मिळालेली ही पहिली मान्यता होती.
हा निर्णय इतका विस्फोटक होता की, याबद्दल त्यांची हत्या केली गेली. इतकं सगळं झाल्यानंतर मात्र अरब देशांनी पॅलेस्टिनी लोकांच्या या युद्धातून आपल अंग काढून घेतलं.
यापुढे सुरु झालं इस्राइलचं अंतर्गत युद्ध. पॅलेस्टिनीनी ज्युईश राजवटीविरुद्ध राजकीय तसेच आतंकवादी पद्धतीने उठाव सुरु केले.
यापैकी त्यातल्या त्यात मवाळ अशा पॅलेस्टाईन लिबरेशन ऑरगॅनायझेशनचे नेते ‘यास्सर अराफात’ हे नाव आपल्या ओळखीचे आहे.
दुसरा जहाल गट म्हणजे ‘हमास’. यांच्यातही मतांतर आहे.
मवाळ नेते इस्त्राइल आणि पॅलेस्टाईन दोनही देश कसे एकत्र नांदतील, यासाठी प्रयत्नशील असतात. तर जहाल गट इस्त्राइलला मान्यताच देत नाहीत व त्याला नेस्तनाबूत करण्याच्या मागे असतात. आज गाझा स्ट्रीपमध्ये हमासचं प्रचंड वर्चस्व आहे.
हमास आणि इस्राइल दोघेही बॉम्बहल्ले, रॉकेट्स यांच्या साहाय्याने एकमेकांच्या नागरिकांना मारत असतात. इस्राइलने जागोजागी चेकपोस्टस लावले आहेत. गेल्या १० वर्षांत गाझा मधली पॅलेस्टिनी जनता अगदी हवालदिल झाली आहे.
इस्त्राइल प्रश्नाचा अभ्यास करताना जागोजागी आठवत रहातो तो काश्मीर प्रश्न.
भारत-पाक आणि काश्मिरी पंडितांना हुसकावून लावणे, आतंकवाद, PDP Govt च्या चाली, आझादीची मागणी, रोहिंग्यांच्या वसाहती, इंतेफिदा, सततच्या कारवाया, सगळं सारखं. कस अगदीं तिथलं मशीन उचलून इथे आणून लावल्यासारखं.
भारत इस्त्राइलची ही नवी मैत्री दोघांच्याही दृष्टीनी म्हणूनच विविध पद्धतींनी फायदेशीर आहे.
जेरुसलेमवर कोणाचे नियंत्रण असणार? सिरिया, जॉर्डन, इजिप्त इत्यादी देशांत विखुरलेल्या ५० लाख विस्थापितांना इस्राइलमध्ये जागा मिळणार की नाही?
आतंकवाद, पाणीव्यवस्था, वेस्ट बँक म्हणजेच प्रपोज्ड पॅलेस्टाईनमध्ये पद्धतशीपणे झालेल्या ज्यूजच्या वसाहती असे अनेक प्रश्न अजूनही न सुटलेली, चिघळलेली कोडी आहेत.
आता अशा सर्व पार्श्वभूमीवर मोदीजींचे पॅलेस्टाईनला जाणे, त्यासाठी जाॅर्डनने विमान पुरवणे, इस्त्राइलने सुरक्षा पुरवणे, त्या भुमीवर त्यांचे जंगी स्वागत होणे या गोष्टींचे काय अर्थ असू शकतात यावर अभ्यास करू तितका कमी आहे.
इराणचे राष्ट्रपती रौहानी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. येत्या आठवड्यांत जाॅर्डनचे सुलतान अब्दुल्लाह व सौदीचा तरुण आणि पुरोगामी राजा मोहम्मद बिन सलमानही भारतभेटीवर येत आहेत. या भेटींमधून अजून काय काय भारताच्या हातात गवसणार आहे ते पहाणे खूपच रंजक असणार आहे.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.