शूर्पणखा ते बियर: स्त्रीमुक्तिवादाची शोकांतिका
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
मागच्या आठवड्यात मा. राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणावरील धन्यावादाच्या भाषणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत बोलत असताना कॉंग्रेसने या भाषणात प्रचंड व्यत्यय आणत गेल्या सत्तर वर्षांच्या लोकशाही परंपरेला गालबोट लावले. या प्रकाराबाबत सोशल मीडियावर लगेच कॉंग्रेसविरोधी प्रतिक्रिया येणे सुरु झाले आणि कदाचित आपला डाव आपल्यावरच उलटेल की काय अशा भीतीने कॉंग्रेसने राज्यसभेत मात्र हे भाषण तुलनेत शांतपणे ऐकून घेण्याचा निर्णय घेतला.
या भाषणात मोदींनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत विरोधकांवर तुफान हल्लाबोल केला. इतका की; हे धन्यवादाचे भाषण सुरु आहे की पुढील निवडणुकांची प्रचारसभा? असा प्रश्न कित्येकांना पडला!!
भाषण ऐकताना सभागृहात एकंदर वातावरण शांत असले तरी एक विकट हास्य लक्ष वेधून घेत होते. हे हास्य होते कॉग्रेसच्या नेत्या आणि माजी महिला व बालकल्याण मंत्री रेणुका चौधरी यांचे. खरेतर ज्येष्ठ नेत्या असलेल्या चौधरी यांनी भर सभागृहात इतके बालिश वर्तन करावे हे न शोभणारेच होते.
अगदी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी फटकारूनदेखील त्या उसने अवसान आणून खिदळतच राहिल्या.
या प्रसंगी मोदींनी आपल्या हजरजबाबी शैलीत ‘रामायण मालिकेच्या नंतर इतक्या वर्षांनी असे हास्य ऐकायला मिळाले.’ असा टोला लगावला आणि चौधरी यांचा आवाज या अनपेक्षित टोल्यानंतर बंद झाला. अपेक्षेप्रमाणेच या शब्दप्रहारावरून सभागृहाबाहेर मानापमान नाट्य सुरु झाले. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना रेणुका चौधरी यांनी ‘पंतप्रधानांनी एका महिलेचा अपमान केला’ असा साळसूदपणाचा आव आणला.
त्याहीपुढे जावून कॉंग्रेसच्याच काही नेत्यांनी मोदींनी रेणुका यांची तुलना शूर्पणखेशी केली असे जाहीर केले.
वास्तविक पाहता; मोदींनी रामायणातील कोणत्याही पात्राचे नाव घेतले नसताना शूर्पणखेचेच नाव कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मनात का यावे हा प्रश्न आहेच.
मात्र त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे इथे चौधरी यांचे लिंग हा चर्चेचा विषयच नव्हता. त्यांच्या ‘महिला असण्यावरून’ पंतप्रधानांनी कोणतीही शेरेबाजी केली नव्हती.
स्वतः रेणुका चौधरी यांनाही हे माहिती असेल की; त्यांच्या गैरवर्तनावरून मोदींनी केलेली टिप्पणी ही अत्यंत संयत भाषेत होती. किंबहुना त्यांच्या टिप्पणीपेक्षा अधिक झोंबणारा शेरा स्वतः सभापतींनी मारला होता. ‘तुमची तब्येत बरी नसेल, तर डॉक्टरांचे उपचार घ्या’ या नायडू यांच्या शब्दांतली बोच लपून राहणारी आहे काय?
मात्र तरीही ‘महिलेचा अपमान’ हे भांडवल चौधरी यांनी जाणीवपूर्वक केले. अर्थात; देशातल्या माता भगिनी या नौटंकीला भुलून जाणाऱ्या नव्हेत. कित्येक महिलांनीच रेणुका चौधरी यांना याबाबत खडे बोल सुनावत स्त्रीत्वाची आड घेवून तुमचा असभ्यपणा लपणार नाही अशा कानपिचक्या दिल्या.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या एका विधानावरूनही तथाकथित स्त्रीवाद्यांनी गेल्या आठवड्यात बराच धुडगूस घातला. गोव्यात प्रथमच ‘student parliament’ चे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने तरुणांशी संबंधित विविध चर्चासत्रांद्वारे सामाजिक, राजकीय क्षेत्रांत तरुणांचे स्थान, त्यांचे आरोग्य अशा कित्येक विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींनी आपली मते मांडली.
राज्याचे प्रमुख या नात्याने पर्रीकर या कार्यक्रमात उपस्थित होते. याप्रसंगी ‘विद्यार्थ्यांशी बोलताना गंभीरपणे न बोलता मी हसत- खेळत बोलणे पसंत करेन’ असे सांगताना त्यांनी गोवा शासनाच्या तरुणांसाठी असलेल्या विविध योजना, तरतुदी आदींची मांडणी केली.
विद्यार्थी आणि व्यसनाधीनता याबाबत बोलताना ‘पूर्वी मुलंच व्यसनं करत होती. आजकाल तर मुलीदेखील बियर पिताना दिसायला लागल्याने एकंदर काय स्थिती होणार याची भीतीच वाटायला लागली आहे.’ असे पर्रीकर सहज बोलले.
यावर उपस्थितांनीही हसून प्रतिसाद दिला. प्रसंग आणि त्यांचा सुर लक्षात घेता त्यात खटकण्यासारखे असे काहीच नव्हते. कार्यक्रम संपताना त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना असे आवाहनही केले की,
‘मी इथे अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने माझ्या राज्यातल्या तरुणांशी संवाद साधला आहे. कृपा करून यातील कोणतीही गोष्ट संदर्भाशिवाय वापरून काही वादंग निर्माण करू नका.’
मात्र ‘एखादी गोष्ट करू नकोस’ असे सांगितल्यावर ज्याप्रमाणे लहान मुले तीच गोष्ट करतात त्याप्रमाणे इंग्रजी प्रसारमाध्यमांनी पर्रीकरांच्या बियरसंबंधित विधानाचा विपर्यास करत त्यालाही लिंगभेदाचा रंग चढवला आणि चर्चेचे गुऱ्हाळ उघडले. हे होण्याचा अवकाश की लगेच आमच्याकडील काही तथाकथित स्त्रीमुक्तीवादी महिलांनी #GirlWhoDrinksBeer हा हॅशटॅग वापरत आपले दारू पितानाचे फोटो सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली.
मुळात हे दोन्ही प्रसंग नीट निःपक्षपातीपणे समजून घेतले तर आपल्या लक्षात येईल की महिला सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता वगैरेंबद्दल आवर्जून भरभरून लिहिणाऱ्या वा बोलणाऱ्या व्यक्तींची विचारसरणी ही आत्यंतिक उथळ आणि राजकीय हेतूंनी प्रेरित झाली आहे.
याशिवाय भारत म्हणजे स्त्रियांना कमी लेखणारा देश आणि हिंदू म्हणजे स्त्रियांचे दमन करणारा समाज ही धादांत खोटी गृहीतके सातत्याने मांडण्यावर यांचा भर असतो.
काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘परदेशी फिल्म फेस्टिव्हल्समध्ये उपस्थित राहणाऱ्या भारतीय नायिकांनी कधीतरी डिझायनर साडी नेसून रेड कार्पेटवर जावं’ अशा आशयाचे ट्विट केले आणि तथाकथित (हा शब्द मी सातत्याने वापरत असल्याचे कारण म्हणजे सगळ्याच स्त्रीवादींचा यात मुळीच समावेश होत नाही) स्त्रीवादींनी लगेच ‘तुम्हीच का साडी नेसत नाही?’ असा प्रतिप्रश्न विचारण्यास सुरुवात केली!
एखाद्या जपानी महिलेला त्यांचा पारंपारिक पोशाख असलेला किमोनो घालण्यास कमीपणा वाटल्याचे कधी वाचण्यात वा पाहण्यात आहे का? त्यांना त्यात काहीच वावगे वाटत नाही मग आमच्या माता भगिनींना तरी साडी नेसण्यात काय वावगे वाटेल? किंबहुना त्यांना त्यात वावगे वाटत नाहीच; मात्र स्त्रीमुक्तिवादी लेबले आपल्या कपाळी चिकटवून फिरणाऱ्यांना मात्र त्यात फार कमीपणा वाटतो.
संसदेच्या वरिष्ठ सभागृहात असभ्य वर्तन करणे वा व्यसनाचे उदात्तीकरण करणे ही महिला सबलीकरणाची फलश्रुती आहे का?
स्त्रीशक्तीची आजच्या काळातील उदाहरणे पहायची झाल्यास सायना ते सिंधू किंवा किरण बेदी ते संजुक्ता पराशर यांना विसरून कसे चालेल? इस्रोतील महिला वैज्ञानिक असोत वा लष्करातील सीमा भवानी पथके; याच आमच्या खऱ्या नायिका आहेत.
शूर्पणखा असो वा बियर; दोन्ही प्रसंगांना काही स्वार्थी लोकांकडून महिलांच्या अवमानाचा मुखवटा चढवण्यात येणे ही स्त्रीमुक्तिवादाची शोकांतिका आहे.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.