Site icon InMarathi

अमेरिकन राष्ट्रपतींची निवड नेमकी कशी होते? सोप्या उदाहरणाने समजून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अनुप कुंभारीकर

संपादन : टीम इनमराठी

===

सध्या सगळ्या जगाचे लक्ष अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे. डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार बायडन आणि सध्याचे अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप यांच्यात चुरशीची लढत चालू आहे!

ट्रंप आणि मोदी म्हणजेच अमेरिका आणि भारत यांच्यातले संबंध आपल्याला ठाऊक आहेतच! भारताचा आपल्याला चांगलाच सपोर्ट आहे असं ट्रंपच्या काही व्यक्तव्यामधून दिसून आलेलं आहे!

म्हणजेच जगातील “Super Power” असणारा देश ठरवणार “Most Powerful Man on the Earth” ! जशी ह्या निवडणुकीची तारीख ठरवण्याची एक पद्धत आहे, (नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या सोमवार नंतर चा मंगळवार), तशीच निवडणुकीतील मत मोजणीची सुद्धा एक विशिष्ठ पद्धत आहे.

आपण ती समजावून घेणार आहोत एका सोप्या उदाहरणाने. ‘राष्ट्राध्यक्ष’ ठरवण्याची ही निवडणूक आपल्या भारतात होत आहे – असं गृहीत धरून आपण अमेरिकन निवडणुकीची सिस्टीम समजून घेणार आहोत.

 

 

कल्पना करूया की भारताचे पंतप्रधान अमेरिकन निवडणुकीच्या पद्धतीने निवडायचे आहेत. सुरुवात आपल्या महाराष्ट्रातून.

असं समजा की महाराष्ट्रात फक्त ४ च पक्ष आहेत भाजप (BJP) , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP).

महाराष्ट्र पंतप्रधानांच्या म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी ४८ खासदार (MP) निवडतो. निवडणूक ह्या ४८ मतदारसंघांमध्ये होते. ज्या उमेदवाराला त्याच्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मते मिळतात तो जिंकतो. ह्याला म्हणतात First Past the Post System. समजा भाजप २५, शिवसेना १५, काँग्रेस ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ३ मतदारसंघामध्ये जिंकले. हा आकडा मग प्रत्येक पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या आकड्यामध्ये मिळवला जातो आणि ज्या पक्षाच्या किंवा गठबंधनाचा आकडा हा “कमीतकमी २७३” असतो त्यांचा पंतप्रधान आणि सरकार बनते. हे तुम्हाला माहीतच आहे. पण ही भारतीय निवडणुक पद्धत झाली.

 

 

समजा आपल्याकडे अमेरिकेसारखी निवडणूक पद्धत आहे. त्या परिस्थितीतही महाराष्ट्र पंतप्रधानांच्या निवडणुकीसाठी ४८ च खासदार पाठवेल. फक्त – निवडणूक ४८ मतदारसंघांमध्ये होण्याऐवजी ती महाराष्ट्रभर “एकच” निवडणूक होईल. म्हणजेच अक्खा महाराष्ट्र हा एका मतदारसंघ असेल…!

 

 

 

समजा महाराष्ट्रात ५ कोटी लोकांनी मतदान केले, त्या पैकी २ कोटी भाजपाला, १.५ कोटी शिवसेने ला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी ७५ लाख. भाजपाला सर्वात जास्त मते मिळाल्या कारणाने First Past the Post System नुसार भाजप महाराष्ट्र जिंकेल आणि सर्वच्या सर्व ४८ खासदार हे भाजपचेच असतील…!

वाटपाच्या ह्या पद्धतीला म्हणतात ‘जिंकणारा सर्व नेईल’ (Winner Takes All).

वरवर पाहता अमेरिकन आणि भारतीय निवडणूक पद्धतीत एकच फरक दिसतो. भारतात खासदारांचे (MP) आणि अमेरिकेत निर्वाचकांचे (Electors) वाटप निवडणुकीत कसे होते – हा. भारतात तुम्ही मतदारसंघ जिंकता आणि अमेरिकेत तुम्ही एक अक्ख राज्य जिंकता. ‘जिंकणारा सर्व नेईल’ (Winner Takes All) हा सर्वात मोठा फरक.

आता थोडं खोलात शिरूया

निर्वाचक मंडळ (Electoral College)

जसे भारतात एका मतदारसंघात निवडणूक होते, तसे अमेरिकेत राज्यांमध्ये निवडणूक होते. म्हणजे – एक संपूर्ण राज्य हाच एक मतदारसंघ आहे. अमेरिकेच्या प्रत्येक राज्याला पूर्वनिर्धारित निर्वाचक ठरवून दिलेले असतात. निर्वाचकांची संख्या ही राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असते. प्रत्येक राज्यात निवडणूक होते आणि राज्ये आपले सर्व निर्वाचक (Electors) त्यांच्या त्यांच्या राज्यात जिंकणाऱ्या पक्षाला देतात.

म्हणजेच, वरील महाराष्ट्रातील निवडणुकीचे उदाहरण घेतले तर, भाजपाला सर्वात जास्त मते मिळाल्यामुळे महाराष्ट्र आपले सर्व ४८ निर्वाचक (Electors) भाजपाला देईल.

हे निर्वाचाकांचं गणित अमेरिकेत पुढील प्रमाणे आहे –

कॅलिफोर्निया (California) – अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या (३.९ कोटी) असलेल्या राज्याकडे ५५ निर्वाचक आहेत तर वायोमिंग (Wyoming) – सर्वात कमी लोकसंख्या (अंदाजे ६ लाख) असलेल राज्याकडे ३ निर्वाचक आहेत.

 

 

जो पक्ष कॅलिफोर्निया जिंकेल त्याला ५५ निर्वाचक मिळतील. संपूर्ण अमेरिकेत ५० राज्यांचे मिळून असे ५३८ निर्वाचक आहेत आणि ज्या पक्षाला कमीतकमी २७० निर्वाचक मिळतील तो पक्ष जिंकेल आणि त्यांचा उमेदवार अमेरिकेचा राष्ट्रपती बनेल.

फरक : खासदार (लोकसभा) आणि निर्वाचक (Elector)

भारतातील संसदीय पद्धतीत खासदार पंतप्रधान निवडतात आणि संसदेमध्ये कायदे सुद्धा बनवतात. खासदार हे ५ वर्षांसाठी निवडलेले असतात. ह्याच्या उलट अमेरिकेत निर्वाचकांचा उपयोग हा फक्त अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीच होतो. निर्वाचक कायदा बनवू शकत नाहीत.

अमेरिकेत कायदा बनवणाऱ्या मंडळाला काँग्रेस म्हणतात – जसे भारतात त्याला संसद म्हणतात.

अमेरिकेच्या काँग्रेस मध्ये House of Representative (आपली लोकसभा) आणि Senate (आपली राज्यसभा) अश्या सभा असतात ज्या कायदे बनवतात. House of Representative (लोकसभा) आणि Senate (राज्यसभा) ह्यांच्या स्वतंत्र निवडणूक होतात ज्यांचा अमेरिकन राष्ट्रपतींच्या निवडणुकीशी कुठलाही संबंध नसतो.

अमेरिकेत राज्याचे एवढे महत्व का?

भारतात पंतप्रधानांची निवड होताना मतदारसंघ हा मूलभूत घटक आहे, तर अमेरिकेत राष्ट्रपतींच्या निवडणुकीत राज्य हा मूलभूत घटक आहे. हा सर्वात महत्वाचा फरक आहे भारत आणि अमेरिकेत. अमेरिकेत प्रत्येक राज्याला स्वतःची राज्यघटना आहे. भारतात काश्मीर वगळता सगळ्या राज्यांना एकच राज्यघटना लागू होते.

अमेरिकेतील राज्य – छोटे असोत वा मोठे – त्याला महत्व आहे. कारण अमेरिकेत राज्ये (States) आधीपासूनच अस्तित्वात होती, ती फक्त एकत्र आली आणि त्यांनी अमेरिका बनवला. म्हणूनच त्याला “United States” of America म्हणतात.

मात्र भारताच्या स्वातंत्र्याच्यावेळी वेग वेगळी ५५० पेक्ष्या जास्त “शाही राज्ये”, संस्थाने विलीन करून नवीन भारत बनला आणि मग नवीन राज्ये बनवली गेली.

टीप:

१. समजायला सोपे म्हणून अमेरिकेत ५० राज्ये असं लिहिलंय. पण वास्तवात ५० राज्ये आणि District of Columbia आहे.
२. ५३८ निर्वाचक हा आकडा ४३५ House of Representative (लोकसभा), १०० Senate (राज्यसभा) आणि ३ District of Columbia ह्यांची बेरीज आहे
३. मैने (Maine) आणि नेब्रास्का (Nebraska) ही २ राज्ये वगळता बाकी सगळी राज्ये ‘जिंकणारा सर्व नेईल’ (Winner Takes All) ह्या पद्धतीने निर्वाचक (Electors) वाटतात. मैने (Maine) आणि नेब्रास्का (Nebraska) मध्ये उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या प्रमाणात निर्वाचक वाटतात.
४. ‘जिंकणारा सर्व नेईल’ (Winner Takes All) ह्या पद्धतीमुळेच अमेरिकेत दोनच पक्ष बळावलेत आणि तिसऱ्या पक्षाला निर्वाचक (Electors) मिळवण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ‘जिंकणारा सर्व नेईल’ (Winner Takes All) आणि निर्वाचक मंडळ (Electoral College) मुळे अमेरिकेत आपोआपच द्विपक्षीय राज्यव्यवस्था निर्माण झाली आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version