आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
लेखक: तेजस पवार
===
पवार साहेबांना प्रदीर्घ असा सामाजिक आणि राजकीय अनुभव आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचा वसा आणि वारशावर व यशवंतरावांनी घालून दिलेल्या मार्गावर आपण वाटचाल करत असल्याचा दावा साहेब नेहमी करत असतात. वैयक्तिक आयुष्यात सत्यनारायण नाकारण्यापासून ते कुटुंबनियोजनापर्यंत तसेच सार्वजनिक-राजकीय कारकीर्दीमध्येही नामांतराच्या मुद्द्यापासून महिला आरक्षणापर्यंत असे अनेक धाडसी निर्णय त्यांनी प्रतिगामी शक्तींच्या तीव्र विरोधावर मात करून आजवर घेतले आहेत.
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कित्येक व्यक्तिमत्वांमधील सुप्तगुण ओळखून त्यांच्या उत्कर्षासाठी योग्य ती दारे खुली करण्यामध्ये साहेबांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
असे असूनही साहेबांच्या पुरोगामित्वावर शंका यावी अशी काही वक्तवे त्यांनी केली आहेत. मग ते खासदार राजू शेट्टी यांच्याबाबतीतले विधान असो किंवा देवेंद्र फडणवीस-संभाजीराजे यांच्यावरील टिप्पणी असो. गेल्या २-३ वर्षांमध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशामधील सामाजिक वातावरण वेगवेगळया कारणांनी ढवळून निघालं आहे.
पुरोगामी वर्गावर टीका करताना उपहासात्मकपणे ‘फुरोगामी’ शब्द वापरला जात आहे.
अनेकांनी पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांची Pseudo Secularism ची भूमिका संदर्भासहित मांडलीदेखील आहे. याच मांडणीला बळ देणारी भूमिका शरद पवारसाहेबांनी औरंगाबादमध्ये त्यांच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोप सभेत घेतली आणि पुन्हा एकदा नवा वाद सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली.
“ट्रिपल तलाकबाबत माझं स्वच्छ मत असंय की, भगिनींना संरक्षण द्यायचा विचार असेल, तर मुस्लिम समाजातील प्रमुख लोकांना विश्वासात घेऊन, धर्मगुरुंना विश्वासात घेऊन, काय पाऊल टाकायचे ते टाकता येईल. पण तलाक हा इस्लामच्या माध्यमातून एक दिलेला मार्ग आहे, संदेश आहे.
–
आणि त्या संदेशामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुठल्याही राज्यकर्त्याला नाहीय. तुम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप करता याचा अर्थ एका धर्माच्या लोकांना समाजामध्ये एका वेगळ्या स्थितीला नेऊन पोहोचवण्याचं काम तुम्ही करत आहात. याला आम्ही कदापि पाठिंबा देणार नाही.”
हीच ती भूमिका.
साहेबांनी घेतलेल्या या भूमिकेतून स्पष्ट होत आहे की, केद्रातील सरकारने घेतलेल्या निर्णयास त्यांचा पाठिंबा नाही. ‘धर्मग्रंथांनी दिलेल्या संदेशात हस्तक्षेप करण्याचा राज्यकर्त्यांना अधिकार नाही.’ हाच न्याय जर आपण इतिहासात हिंदू धर्माला लावला असता तर हिंदू धर्मातील अनेक अनिष्ट रूढी-परंपरा आजही तशाच सुरू राहिल्या असत्या. सती-जोहर परंपरा तत्कालीन राज्यकर्त्यांनी म्हणजे ब्रिटिशांनी कायदे करून तेव्हाच्या सनातन्यांचा तीव्र विरोध न जुमानता बंद केल्या.
१८२९ मध्ये ब्रिटिशांनी जेव्हा सती प्रथा बंदीचा कायदा केला तेव्हादेखील अनेक कर्मठ-प्रतिगामी-सनातन्यांनी “हिंदू धर्मात हस्तक्षेप करण्याचा ब्रिटिशांना काहीएक अधिकार नाही.” अशी भूमिका घेतली होती. पवारसाहेबांची आजची भूमिका ही तत्कालीन सनातन्यांशी साधर्म्य राखणारी आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते.
हिंदू धर्मात सुधारणा करणारे अनेक समाजसुधारक होऊन गेले. त्यांना कठोर विरोधही झाला. पण तरीदेखील त्यांनी आपले कार्य तडीस नेऊन हिंदू धर्मामध्ये सुधारणा केल्या. दुर्दैवाने मुस्लीम धर्माबाबत तसा प्रयत्न खूप कमी सुधारकांनी केला.
हमीद दलवाईंनी मुस्लीम समाजाला २१व्या आधुनिक शतकात नेणारे अनेक धाडसी प्रयत्न केले. कट्टरपंथीय्यांनी त्यांच्यावर अनेकदा हल्लेदेखील केले. हेच हमीद दलवाई पवारसाहेबांचे वैयक्तिक आणि वैचारिक मित्रदेखील होते. हमीद दलवाईंनी १९६६ मध्ये तिहेरी तलाक व मुस्लीम धर्मातील अनिष्ट रूढींविरोधात ७ महिलांसमवेत पहिला मोर्चा काढला होता. आज ५० वर्षांनंतरही पुरोगामी म्हणवून घेणारे साहेब ‘तिहेरी तलाक बंदी’ ला विरोध दर्शवत आहेत.
‘तलाक हा कुराणने दिलेला संदेश’ असेलही. पण प्रत्यक्षात किती क्रूर आणि रानटी पद्धतीने तलाक दिले जातात व तलाकनंतर मुस्लीम महिलेचे संपूर्ण आयुष्य किती खडतर बनतं, याची साहेबांना निश्चितच जाणीव आहे. तरीदेखील साहेबांनी अशी भूमिका घेणं निषेधार्ह आहे.
खरं तर पवारसाहेबांसारख्या इतका मोठा जनाधार असलेल्या अनुभवी नेत्याने ‘तिहेरी तलाक’ला विरोध उचलून धरायला हवा होता. मतांचं राजकारण न करता मुस्लीम महिलांचा सामाजिक स्तर उंचावण्याची, कट्टरपंथीयांना लगाम घालण्याची मोठी संधी या जाणत्या नेत्याकडे होती.
पण ती संधी न साधता मुस्लीम महिलांना गुलामीत रेटणारी, मुस्लीम समाजाला काळाच्या मागे घेऊन जाणारी भूमिका साहेबांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे २०१९ च्या निवडणूकीत मुस्लीम समाजातील कट्टर वर्गाची मते त्यांच्या पक्षाला जरूर मिळतील. पण भारतातील विचारी आणि विवेकी लोकांच्यातील साहेबांबद्दलचा आदर या भूमिकेमुळे निश्चितच कमी झाला आहे.
महिला आरक्षणासंबंधी महत्वाचे योगदान देणारी भूमिका एकीकडे आणि ‘तिहेरी तलाक बंदीला कदापीही पाठिंबा देणार नाही असे म्हणून मुस्लीम महिलांबाबत असंवेदनशील मांडणी’ दुसरीकडे.
हमीद दलवाईंना वैैचारिक मित्र मानून त्यांना पाठिंबा देणारी भूमिका एकीकडे आणि काही वर्षांनंतर ‘तलाक हा कुराणने दिलेला संदेश आहे व राज्यकर्त्यांना त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही’ अशी भूमिका दुसरीकडे.
त्यामुळे भविष्यात इतिहास लिहिताना शरद पवारांचा ‘पुरोगामी किंवा सेक्यूलर’ असा उल्लेख करताना इतिहासकारांमध्ये शंका-कुशंका, अनेक मतभेद होतील, हे मात्र नक्की.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.