Site icon InMarathi

हायस्कूल टीचर ते ड्रग माफिया : ब्रेकिंग बॅड इज ब्रेकिंग नॉर्म्स

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अमिताभ बच्चनचा मजबूर चित्रपट आठवतोय? त्यात अमिताभ (ऑब्व्हियसली) नायकाच्या भूमिकेत आहे. आपल्या विधवा आई, व्हाईलचेयरवरील बहीण आणि एक लहान भाऊ ह्यांच्या समवेत आनंदाने एक मध्यमवर्गीय आयुष्य जगणाऱ्या नायकाला एके दिवशी आपल्याला टर्मिनल ब्रेन ट्युमर आहे हे कळून चुकतं. आपण मरणार, म्हणजे आपलं कुटुंब एकुलता एक कमावता हात गमावणार, त्यावर तोडगा म्हणून तो  पैश्यासाठी एका खुनाचा आळ स्वतःवर ओढवून घेतो, अशी कथा होती मजबूरची.

हा चित्रपट “झिग झॅग” नामक एका अमेरिकन चित्रपटाचा रिमेक होता, पण तूर्तास वळूया आपल्या विषयाकडे.

ब्रेकिंग बॅड! भरपूर गाजलेली आणि विविध पुरस्कारांनी सन्मानित 5 सीझन्सची एक अमेरिकन सिरीज.

ब्रेकिंग बॅड ह्याचा अर्थ raise hell म्हणजे एक मोठा त्रास/डिस्टर्बन्स निर्माण करणे असा आहे.

ब्रेकिंग बॅडचा प्लॉट प्रामुख्याने मजबूर चित्रपटासारखाच आहे. हायस्कुलमध्ये शिकवणारा पन्नाशीला पोहोचलेला एक शिक्षक म्हणजे सिरीजचा नायक – वॉल्टर व्हाईट. घरात बायको आणि 17 वर्षाचा एक मुलगा. मुलाला जन्मतः सेरेब्रल पाल्सीचा विकार. त्यामुळे तो कुबड्यांशिवाय चालू शकत नाही आणि त्याचे बोलणेही स्पष्ट नसते. त्याचा आत्मविश्वासही त्यामुळे खालावलेलाच असतो. घरची आर्थिक परिस्थिती यथातथा. कुटुंबाचं भागवण्यासाठी वॉल्टर पार्ट टाइम एका कार वॉश मध्ये काम करत असतो.

त्यात त्याची बायको पुन्हा गरोदर (अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी) राहते. संसाराचं गाडं जेमतेम ओढत असणाऱ्या वॉल्टरला एके दिवशी कळतं की त्याला इन्क्युरेबल लंग कॅन्सर आहे. आणि तेव्हापासून पापभिरू, शांत स्वभावाचा वॉल्टर बदलतो. शाळेत शिकवणारा वॉल्टर त्याच्या पूर्वायुष्यात एक निष्णात केमिस्ट असतो. त्याने आपल्या मित्राबरोबर पार्टनरशिप करून एक कंपनीही काढलेली असते. पण नंतर अचानक त्याचे शेयर्स विकून तो न्यू मेक्सिको मध्ये एक हायस्कुल शिक्षकाची नोकरी करू लागतो. केमिस्ट नसला तरीही केमिस्ट्री काही रक्तातून जात नाही. परिस्थितीमुळे तो crystal methamphetamine (शॉर्टफॉर्म मेथ) नावाचं ड्रग बनवायला लागतो आणि आपल्या शाळेतल्या एका माजी विद्यार्थ्यांद्वारे ते मार्केट मध्ये विकतो. त्याने बनवलेलं मेथ हे मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या मेथपेक्षा कैक पटीने सरस असतं. त्यामुळे त्याची मागणी वाढते. असं करत करत वॉल्टर लोकल मग आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया, पोलीस, घरची परिस्थिती, स्वतःच आजारपण ह्या सगळ्यांमध्ये गुरफटून जातो. ही स्टोरी आहे ब्रेकिंग बॅडची.

ह्या कथेतून वॉल्टरचे बदलत दिसणारे रूप विलक्षण आहे.

साधा, सरळ सज्जन वॉल्टर –

शिक्षकातून ड्रग-माफिया बनलेला वॉल्टर –

ज्या कुटुंबासाठी एवढा खटाटोप केला, त्याने तिरस्कार करून वाळीत टाकलेला, पोलिसांचा ससेमिरा लागलेला हताश वॉल्टर –

अर्थात हा एक डार्क कॉन्सेप्ट आहे. ह्या सिरीज मधून, “पैसे हवे आहेत ना – मग ड्रग्स विका” असा संदेश मिळत नाही.

साधारणपणे एखाद्या सिरीजमध्ये जो हिरो म्हणून कास्ट होतो तो सीरिजच्या अंतापर्यंत हिरोच राहतो. पण ह्या सिरीजमध्ये त्याउलट घडतं. सुरुवातीला सहानुभूती कमावणारा वॉल्टर हळूहळू चुकीच्या निर्णयांमुळे, इगोमुळे, वाढणाऱ्या हावेमुळे प्रोटॅगॉनिस्टकडून अँटॅगॉनिस्टच्या भूमिकेत शिरतो. आणि हे ह्या सिरीजचं एक वैशिष्ट्य आहे. त्याचं ट्रान्झिशन पाहण्यासारखं आहे.

“ब्रेकिंग बॅड इज ब्रेकिंग नॉर्म्स” म्हणूनच आहे टायटल. परंतु तो चुकीचं करत असतानाही केवळ कुटुंबासाठी करतोय म्हणून यातून बाहेर यावा असं शेवटपर्यंत वाटत राहतं.

बापाचं प्रेम, त्याची अगतिकता, त्याचं आजारपण, स्वतः अत्यंत बुद्धिमान असूनही आर्थिक रित्या दुर्बल असल्याची सल, ड्रग्ज विकतोय हे कळल्यावर बायकोच्या प्रेमाचं तिरस्कारात झालेलं रूपांतर, मुलाचा रोष आणि एवढं सगळं होऊनदेखील जीवनाशी काहीही करून दोन हात करायची त्याची झटपट बघण्यासारखी आहे.

जेस्सी पिंकमन नामक त्याच्या माजी विध्यार्थाचं, जो त्याचा पार्टनर इन क्राईम असतो त्याचं व्यक्तिमत्वही भावतं. आईवडिलांचं प्रेम नं मिळालेला, भटकलेला, चुकीच्या मार्गावर चालणारा जेस्सी, मनाने हळवा असतो आणि वाईट कर्म करत असतानादेखील स्वतःमधील भावनांचा ओलेपणा टिकवून ठेवतो.

प्लॉटचा आणखीन एक रंजक भाग म्हणजे वॉल्टरचा साडू. वॉल्टरच्या बायकोच्या बहिणीचा नवरा हँक हा DEA (Drug Enforcement Administration) मध्ये एका मोठ्या हुद्द्यावर असतो. म्हणजे चोर आणि पोलीस एकाच कुटुंबात…!

अश्या अनेक ट्विस्ट्सनी युक्त, माणसाच्या भावतरंगांचे विविध पैलू दाखवणाऱ्या, सगळ्याच पात्रांच्या सुंदर अभिनयाने नटलेली ब्रेकिंग बॅड सिरीज बघता बघता आपल्या मनोरंजनाचा डेली डोस बनून जाते. इतर सिरीजमध्ये ढोबळमानाने दाखवल्या जाणाऱ्या रॉम-कॉम किंवा हंकी-डोरी स्क्रिप्ट सोडून काहीतरी वेगळं पाहायचं असल्यास ब्रेकिंग बॅड जरूर पाहावी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Exit mobile version