Site icon InMarathi

अर्णबच्या रिपब्लिकची टीआरपी: भाऊ तोरसेकर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

===

झुंडीतली माणसं (लेखांक सातवा)

लेखांक सहावा: मोदी अजिंक्य नाहीत: भाऊ तोरसेकर

===

पुण्य़ाच्या चितळे मिठाईवाले यांच्या दुकानात जाऊन कोणी कबाब मागितले तर काय होईल? लोक त्याला हसतील. पण असा अतिशहाणा जर कबाब बनवत किंवा विकायला ठेवत नाही म्हणून चितळ्यांशी वाद घालू लागला तर काय? तिथे काय होईल सांगता येत नाही, पण अशा व्यक्तीला आपल्या समाजात बुद्धीमंत म्हणून लगेच गौरव सुरू होईल. तीच गोष्ट मुघल दरबार नावाच्या हॉटेलात जाऊन कोणी बाकरवडी वा पुरणपोळी मागितल्यास होईल.

साधी गोष्ट आहे. अशी दुकाने वा हॉटेले ही ठराविक खाद्यपदार्थासाठी नामांकित झालेली असतात आणि तेच पदार्थ खाण्यासाठी तिथे झुंबड उडत असते.

जो पदार्थ वा वस्तु त्या दुकानाला लोकप्रिय बनवत असतात, त्याचाच पुरवठा तिथे करण्यावर त्या मालकाचा व्यवसाय अवलंबून असतो. तिथे जाऊन भलत्याच गोष्टीची मागणी करणेच मुर्खपणा असतो. पण हे शहाण्या माणसाला कोणी शिकवायचे? सामान्य ग्राहकांना ते उमजते आणि असे लोक तिथे गर्दी करतात आणि आपली हौस भागवून घेत असतात. पण स्वत:ला शहाणे समजून बसलेल्यांना हे कधीच लक्षात येत नाही. ते चितळे किंवा मुघल दरबारच्या नावाने शंख करीत रहातात. कधी त्यांच्या दारात जाऊन गळाही काढतात.

नेमकी अशीच गोष्ट इतरत्रही दिसत असते. आठनऊ महिन्यात लोकप्रियतेच्य शिखरावर पोहोचलेल्या अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक या वाहिनीच्या लोकप्रियतेचे रहस्य तिथेच दडलेले आहे.

गेल्या आठवड्यात माझ्या एका समकालीन पत्रकार मित्राने त्या लोकप्रियतेचे रहस्य मला विचारले. तिथे अखंड नुसता गोंगाट चालतो. चर्चा म्हणजे काही ऐकू येत नाही. नुसता गदारोळ चालतो. कुठला वक्ता प्रवक्ता काय बोलतो तेही ऐकू येत नाही. मग या वाहिनी वा कार्यक्रमाला इतकी टीआरपी कशाला मिळते आहे? प्रश्न योग्य आहे शंकाही योग्य आहे. पण तो त्या स्तरावर जाऊन समजून घेतला पाहिजे.

 

ms.exchange4media.com

अर्णबची लोकप्रियता वा त्याच्या वाहिनीला मिळणारा प्रेक्षक, हा चितळे वा तत्सम दुकानांसारखा आहे. चितळ्यांच्या दुकानात कधी अस्सल मांसाहारी जाणार नाही किंवा तिथून कबाब बिर्यानीची अपेक्षाही करणार नाही. पण देशाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यातून पुण्यात आलेला मराठी माणूस, अगत्याने माघारी जाताना चितळ्यांचे दुकान गाठतो व बाकरवडी नक्की घेऊन जातो.

अशाच ग्राहकासाठी चितळे दुकान थाटून बसले आहेत. मग त्यांच्या दुकानातल्या गर्दीविषयी कोणाला शंका येत नसेल वा कुठला प्रश्न पडत नसेल, तर अर्णबची कथा त्यांना कशाला उलगडत नाही? ते फ़क्त अर्णबसाठी जमणार्‍या गर्दी वा टीआरपीकडे बघतात. त्याच्या कार्यक्रमाची वा वाहिनीची शैली अजिबात लक्षात घेत नाहीत.

अर्णब कुठलीही उच्चदर्जाची वा परखड नि:पक्षपाती पत्रकारिता करत नाही. त्याने आपला ग्राहक निश्चीत केलेला आहे आणि त्याच ग्राहकाला आवडणारे कार्यक्रम तो सादर करत असतो.

त्या प्रेक्षकाच्या आवडीला धक्का लागेल अशी पत्रकारिता वा कार्यक्रम तो अजिबात करत नाही. पण जी कहाणी अर्णब वा रिपब्लिक वाहिनीची आहे, तीच इतरांचीही आहे ना? मोदी कसे महान आहेत किंवा इशरत जहान कशी देशद्रोही घातपाती होती, असले विषय आपल्याला कधी एनडीटीव्ही या वाहिनीवर बघायला मिळतील काय? अफ़जल गुरू वा कन्हैयाकुमार दिवाळखोर असल्याची चर्चा बरखा दत्त, राजदीप सरदेसाई यांनी योजल्याचे कोणाला आठवते काय?

 

qph.ec.quoracdn.net

त्यांनी आपला ग्राहक निश्चीत केलेला आहे. त्याला संघाला शिव्याशाप दिलेले आवडतात आणि तोही अगत्याने रविशकुमार वा एनडीटीव्हीचेच कार्यक्रम बघत असतो. माध्यमे व बुद्धीवादही ग्राहकावलंबी झाल्याचा तो परिणाम आहे.

अशा दुकानात आपल्याला हवा तो माल मिळत नसेल, तर तक्रार करण्यात काही अर्थ नसतो. पण समोरच्या प्रतिस्पर्धी दुकानातला ग्राहक आपल्याकडे खेचायचा असेल, तर त्याच्या आवडीनिवडीचा अभ्यास करणे भाग आहे.

काही वर्षापुर्वी म्हणजे नेमके सांगायचे तर दहा वर्षापुर्वी विधानसभेच्या निवडणूका झाल्या आणि त्यात राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने लक्षणिय यश मिळवलेले होते. त्यानंतर आपणच मराठी अस्मितेचे एकमेव तारणहार असल्याचा पवित्रा राजनी घेतला होता. म्हणूनच त्यांनी विधानसभेत आमदारांना आपल्या पदाची शपथ घ्यावी लागते, त्याच्या सोहळ्याविषयी एक भूमिका जाहिर केली.

विधानसभा मराठी महाराष्ट्र प्रांताची असल्याने तिथे प्रत्येकाने मराठीतच आपल्या पदाची शपथ घ्यावी, असे पत्र लिहून राजनी सर्वांना विनंती केली होती. त्यावरून काहूर माजले होते.

प्रत्यक्ष तो शपथविधी सुरू झाला, तेव्हा समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी हिंदी भाषेत शपथ घ्यायला आरंभ केला आणि मनसेचे चार आमदार त्यांच्यावर धावून गेले. आझमी व हे आमदार यांच्यात वादावादी व बाचाबाची झाली. त्यात राम कदम या मनसे आमदाराने आझमी यांच्या कानशिलात आवाज काढला. तिथेच मग एक प्रस्ताव आणून मनसेच्या त्या चार आमदारांना दिर्घकाळासाठी निलंबित केलेले होते.

पण त्या एका घटनेने राम कदम या नवख्या आमदाराला देशव्यापी प्रसिद्धी मिळवून दिली. ती कृती मराठी अस्मिता वा अभिमान म्हणून कोट्यवधी लोकांना आवडलेली नव्हती, की महाराष्ट्रा बाहेरच्या लोकांना मराठी भाषेचे कुठले कौतुक नव्हते. मग कदम यांना कशाला प्रसिद्धी मिळाली? लोक त्यांच्यावर कशाला खुश होते?

त्याचे उत्तर मराठी भाषा वा मनसे नसून अबु आझमी असे आहे. दिर्घकाळ विविध निमीत्ताने वाहिन्यांवर बकवास करताना दिसणारा हा माणूस बहुतांश लोकांना डिवचल्यासारखा बोलत असतो आणि संधी मिळाली तर त्याच्या कानाखाली आवाज काढावा म्हणून कोट्यवधी लोकांचे हात शिवशिवत होते. इतक्या लोकांच्या मनातील ती अतृप्त व सुप्त इच्छा, राम कदम यांच्या एका कृतीने सिद्ध झालेली होती.

 

www.telegraphindia.com

सभ्य समाजाचे निकष कोणते आणि संसदीय कामकाजाचे नियम कोणते, हा बुद्धीजिवी वर्गाचा विषय असतो. त्याचे ममत्व सामान्य जीवन जगणार्‍या लोकांना नसते. त्यांचे जगणे भावनांनी भरलेले असते. रागलोभ प्रेम तिटकारा हे सामान्य समाजाच्या जगण्याचे आधार असतात. पण आपल्या मनातील भावनांना अविष्कृत करण्याची हिंमत वा कुवत त्यांच्यापाशी नसते. सहाजिकच तसे कोणी केले वा करण्य़ाविषयी बोलले, तरी त्या अतॄप्त लोकांना आपणच काही पराक्रम गाजवल्याचे समाधान मिळू शकत असते.

राम कदम यांची ती कृती तशीच होती आणि त्यामुळे लोक या नवख्या आमदारावर कमालीचे खुश झालेले होते. सहाजिकच अशा सामान्य कोट्यवधी लोकांना बुद्धीजिवी विकृत वा असंस्कृत ठरवून मोकळे होतात. पण तशीच उलट बाजूही असते. असेच बेताल रेणूका चौधरी वागल्या असताना, त्यांच्या स्त्री प्रतिष्ठेची तळी उचलून धरणारे कोण आहेत?

आपल्या मोदी विरोध व द्वेषाला अविष्कृत करणार्‍या रेणूका चौधरींच्या हास्य गडगडाटाला कोणी संसदीय सभ्यता म्हणू शकणार नाही. पण त्याचे बोचकारे मोदींना त्रास देत असल्याने पुरोगामी वर्ग त्यात खुश असतो.

म्हणूनच त्या बोचकार्‍यांना तितकाच तिखट प्रतिसाद मोदींनी दिल्यावर हाच पुरोगामी बुद्धीजिवीवर्ग रेणूकांचे असंस्कृत वर्तन विसरून त्यांच्यातल्या महिलेच्या प्रतिष्ठेला मुद्दा बनवू लागतो. त्यातून दोन्ही बाजूंची समान मानसिकता उघडकीस येऊ शकत असते. रेणूका असोत की शुर्पणखेची क्लिप टाकणारा राज्यमंत्री रिजीजु असो, दोघांचे वर्तन सारखेच निंदनीय आहे.

पण त्यांचे समर्थन व विरोध करणार्‍या लोकांची कळपवृत्ती यातून समोर येत असते. आपण ज्या कळपाचे प्रतिनिधीत्व करतो. त्यातल्या असभ्य वर्तनाचेही समर्थन करायचे असते आणि सभ्य वर्तनातही असंस्कृतपणा शोधणे भाग असते. अर्णबची टीआरपी अशाच कळपवृत्तीतून आलेली आहे.

 

resize.khabarindiatv.com

रिपब्लिक वाहिनी वा अर्णबच्या कार्यक्रमात थेट कुठेही भाजपाचे समर्थन वा मोदींची वकिली तुम्हाला आढळणार नाही. पण मोदी विरोधक वा पुरोगामी टोळीबाजीच्या विरोधातला आवेश त्यात पुर्णपणे भरलेला दिसेल. नेमकी हीच गोष्ट मोदीपुर्व बहुतांश मुख्यप्रवाहातील माध्यमातील पत्रकारांची सांगता येईल. त्यात कुठलाही तथाकथित पुरोगामी पत्रकार उघड कॉग्रेसची वकिली करीत नव्हता. पण त्यांचा कायम भाजपाविरोधी रोख असायचा आणि कॉग्रेसच्या अनेक पापांवर पांघरूण घालण्याचा उत्साह लपून राहिलेला नव्हता.

त्याही काळात भाजपा व संघप्रणित अनेक वर्तमानपत्रे व नियतकालिके चालू होती. पण प्रेक्षक वाचक त्यांना भरभरून प्रतिसाद देताना दिसला नव्हता. अशा सामान्य माणसाला वकिली आवडत नसते. पण एकतर्फ़ी पक्षपातही आवडत नसतो.

रिपब्लिक वाहिनी सुरू झाल्यावर अर्णब व त्याच्या टिमने आजवर दडपल्या गेलेल्या अनेक कॉग्रेसी व पुरोगामी पापांची लक्तरे उघडयावर आणण्यात पुढाकार घेतला आणि त्यांना अफ़ाट प्रतिसाद मिळत गेला.

आज ती वाहिनी पहिला क्रमांक असल्याचा दावा करते, तेव्हा तिच्या प्रेक्षकाला भाजपाचे समर्थन आवडते असा अजिबात होत नाही. त्यांना पुरोगामी थोतांडावरचा हल्ला आवडत असतो. ज्याला मागल्या दोन दशकात बुद्धीवाद म्हणून प्राधान्य मिळालेले होते. त्याला कंटाळलेला मोठा वर्ग होता आणि त्याला असल्या पाखंडी पुरोगामीत्वावर ताशेरे झाडलेले ऐकण्याची आस लागलेली होती. अर्णबने त्याच ग्राहकासाठी आपले दुकान थाटले आणि बाकीच्यांची दुकाने ओस पडू लागली.

तरीही ज्यांना जुन्याच मोदीविरोधाचा माल हवा आहे, ते आजही अगत्याने एनडीटीव्ही वा तत्सम माध्यमात रमलेले दिसतील. पण जिथे अशा पत्रकारांचा वरचष्मा होता, त्या वाहिन्या वर्तमानपत्रांना तशाच रटाळ गोष्टीत फ़सलेल्या संपादक पत्रकारांना नारळ द्यावा लागला आहे.

अर्णबच्या कार्यक्रमाचे एक खास वैशिष्ट्य बारकाईने बघितल्यास लक्षात येऊ शकेल. त्यात अगत्याने पाकिस्तानी, पाकप्रेमी वा पुरोगामी खवचट बोलणार्‍यांना आमंत्रण दिले जाते. पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणार्‍यांना त्या मंचावर मुद्दाम बोलावले जाते आणि त्यांची यथेच्छ धुलाई केली जाते.

 

youtube.com

किंबहूना खरे सांगायचे तर अशा शहाण्यांना आमंत्रित करून अर्णब त्यांची नित्यनेमानी अवहेलना करीत असतो. पाकिस्तानी संघाला पराभूत होताना बघायला आसुसलेला मोठा वर्ग भारतातला क्रिकेटप्रेमी आहे, तसाच पाकची मानहानी बघायला उतावळा झालेला प्रेक्षकवर्गही इथे भरपूर आहे. अर्णबचे दुकान त्यांच्यासाठी थाटलेले आहे.

माजी सेनाधिकारी, पत्रकार, संरक्षण विशारद अशा पाकिस्तानी लोकांचे वाभडे अन्य कुठल्या वाहिनीवर इतके ठळकपणे बघायला मिळतात?

ती टिव्ही पडद्यावरची चितळ्यांची बाकरवडी आहे. पदोपदी कुठल्याही विषयावर पाक वा पुरोगाम्यांची धुलाई, हा एका मोठ्या लोकसंख्येसाठी आवडता पदार्थ आहे. त्याला संघ वा भाजपाशी कर्तव्य नाही. पण राष्ट्रप्रेम राष्ट्रवाद ही त्याची भुक आहे आणि तिला परोसणारे दुकान रिपब्लिक वाहिनी आहे. अर्णब गोस्वामी त्यातला हेडकुक आहे.

ज्यांना त्याऐवजी पाकप्रेमाची, भारतनिंदेची पुरोगामी बिर्यानी वा कबाब हवे असतील, त्यांनी रिपब्लिककडे फ़िरकू नये. त्यांच्यासाठी एनडीटिव्हीचा मुघल दरबार भरलेला असतोच ना? तिथे जाऊन कोणी राष्ट्रप्रेमाची बासुंदी मागणेही तितकेच मुर्खपणाचे असते. लोकसंख्या अशी टोळ्यांमध्ये व कळपांमध्ये विभागली गेलेली असते.

अशा रितीने समाजाची लहानमोठ्या गटात विभागणी होते, ती सुप्त झुंडच असते. त्यात कोणीही सुसंस्कृत नसतो की असंस्कृत नसतो. संधी मिळाली म्हणजे त्यातली झुंडशाही उफ़ाळून बाहेर येत असते इतकेच. ज्याला त्या झुंडीचे मानशास्त्र उमजलेले असते, त्याचे दुकान योग्य ग्राहक खेचू शकत असते.

 

theresurgentindia.com

अलिकडल्या काळात विविध माध्यमातील संपादकांना नाकर्ते ठरवुन बाजूला करण्यात आले. काही वाहिन्यांचे व वर्तमानपत्रांचे संपादक मालकांनी हाकलून लावले त्याचेही हेच कारण आहे. आपण बुद्धीवाद करायला अमूक पदावर येऊन बसलोय, अशा भ्रमात हे संपादक आपली अक्कल पाजळत होते. चितळ्यांनी दुकानात मॅनेजर नेमला आणि त्याने तिथे बिर्यानी विकायचा हट्ट केला तर प्रस्थापित झालेला धंदाच धुळीला मिळणार ना?

मुघल दरबारात कोणी बाकरवडी विकण्याचा अट्टाहास केला तरी तेच होणार. मग अशा मॅनेजरला हाकलून लावण्याला अविष्कार स्वातंत्र्याची गळपेची म्हणत नाहीत. तर ग्राहकरुपी झुंडीला आकर्षित करण्यास नाकर्ता ठरलेल्या नोकराची ती हाकालपट्टी असते. हे इथेच घडलेले नाही. अमेरिकेत ट्रंप निवडून आल्यावर अनेक तटस्थ माध्यम संस्थांना जाहिराती वाढल्या आणि जनतेकडून देणग्या सुद्धा अधिक मिळू लागल्या.

कारण मानव समाज टोळ्यांमध्ये विभागलेला असतो आणि त्याची प्रतिक्रीयाही झुंडीसारखीच येत असते. कधी ती हिंसक असते, तर कधी सुप्तवस्थेतील अविष्कार असतो.

अर्णबला मिळणारी मोठी टीआरपी अशा झुंडीला सुप्तावस्थेत ठेवायला मदत करीत असते. मुख्यप्रवाहातील माध्यमांनी प्रामाणिकपणे आपला तटस्थपणा जपला असता, तर माध्यमांची अशी झुंडीत विभागणी झाली नसती.

मागल्या आठवड्यात संसदेतील रेणूका प्रकरण असो वा इतर लहानमोठे विषय असोत, त्यातही झुंडीप्रमाणे प्रतिक्रीया आलेल्या दिसतील. वाहिन्या, वर्तमानपत्रे वा लेखक बुद्धीमंतांच्या समर्थन विरोधामध्ये त्याच झुंडवृत्तीचे प्रतिबिंब पडलेले दिसेल. आपल्या विवेकबुद्धीला कामाला जुंपून तटस्थपणे चांगले वाईट, योग्य अयोग्य करण्याला तिथे वाव कमी उरला आहे. आपल्या कळपातला आहे किंवा नाही, यानुसार लोक वागू लागले आहेत आणि झुंडीच्या जगात मोठ्या झुंडीचाच विजय अपरिहार्य असतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version