मोदीजी, नेहरूंचा द्वेष पुरे करा, आमच्या समस्यांवर बोला
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
नरेंद मोदींना, एका लोकशाही देशाचे नागरिक म्हणून नेहरू नं आवडण्याचा, त्यांच्यावर किंवा काँगेसवर टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण एक पंतप्रधान म्हणून जेव्हा सदनात भाषण करता, तेव्हा तुम्ही काही भान बाळगण्याची गरज असते.
एका राजकीय पक्षाने पक्षांतर्गत लोकशाही पाळली की नाही, ह्याचा आमच्या प्रधानसेवकांना विषाद का वाटावा? ५० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या पंतप्रधानांवर दुगण्या झाडायची गरज का वाटावी?
“सांगा सरदारांना डावलून नेहरूंनाच पीएम का केला?”
हा प्रश्न २०१८ मध्ये का बरं महत्वाचा ठरतो? “सवा सौ करोड” देशवासीयांचं कोणतं भलं होतं ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवून?!!!
काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत पक्षांतर्गत राजकारण काही का केलेलं असेना – पण देशाची लोकशाही खिळखिळी केली हे निर्विवाद सत्य आहे. आजची काँग्रेस तर देशाच्या लोकशाहीशी कुठलीही बांधिलकी असलेली नाही, हे ही सत्य आहे. आणि म्हणूनच मतदारांनी भाजपला नजीकच्या इतिहासातील सर्वात मोठं बहुमत देऊन सत्तासोपानावर बसवलं आहे.
तिथे बसून इतिहासाचे धडे ऐकणे आणि भावविभोर अश्रू बघणे हेच आमचं प्राक्तन आहे काय? काँग्रेसने उभ्या केलेल्या समस्या सोडवण्याची जबाबदारी असताना तेचतेच रटाळ रडगाणं का ऐकवतात?
तुम्हाला नेहरू समजत नाहीत, झेपत नाहीत, पटत नाहीत ठिके. राजकीय पटलावर पचत नाहीत हे ही ठीक आहे. गांधी-नेहरू-पटेल संबंध किती उच्च पातळीचे होते हे तुम्हाला उलगडत नाही – ते ही ठीक आहे. पण नेहरू आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आहेत – ही आता देशाच्या ललाटावर ओढली गेलेली कायमस्वरूपी रेषा आहे.
त्यांच्यावर चिखलफेक करण्याची गरज, आज पंतप्रधान असणाऱ्या आणि करोडो “देशभक्तां”च्या हृदयावर राज्य करणाऱ्या मोदींना का भासावी?
विरोधक नेहरू नेहरू बोंबलत असतात, विरोधकांनी लोकशाहीचा दांभिक जागर चालवला आहे – अन म्हणून मोदींना “उत्तर” द्यावं लागतं – हे कारण खरं नाही. विरोधकांच्या कित्येक प्रश्नांकडे मोदी शहा जोडी ढुंकूनही बघत नाही. हेच प्रश्न बरे महत्वाचे वाटतात?!
मोदी समर्थकांना मोदींच्या “हेतू” वर कधी संशय नसतो. पण केवळ राजकीय पॉईंट्स मिळवण्यासाठी हे असं राजकारण सतत करत रहाण्यामागे कोणताही शुद्ध हेतू नसतो.
अन हे साधं सरळ सत्य कळू नये इतके भोळे मोदी समर्थकही नाहीत.
विरोधकांवर फुटकळ विषयांचे तुकडे फेकणे — हेच खरं कारण. विरोधकांना absolutely useless मुद्द्यांवर गुंतवून ठेवणे हाच मूळ हेतू. ह्या अश्या चाणक्यनीतीने विरोधक फसतात, महत्वाचे प्रश्न टळतात, “राजकारण” नक्कीच यशस्वी होतं – पण देशाचं नुकसान होतं. होत रहातं.
फालतू विषय उभे करणारे सत्ताधीश अन त्या फालतू विषयांच्या मागेमागे धावाधाव करणारे विरोधक…असं आमच्या इतिहासात अडकलेल्या देशाचं हे दळभद्री वर्तमान आहे.
हीच काय ती आमच्या सर्वकालीन “अच्छे दिन” ची व्याख्या!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.