आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाच्या anniversary च्या दिनी, काश्मिरात जो काही नंगा नाच सुरू आहे, त्यामुळे सुजाण नागरिकाला काळजी वाटेलच. खरं सांगायचं तर काश्मीरला हा हिंसाचार काही नवा नाही. २००८ साली जोपर्यंत काश्मीरमधील मुसलमान जिवंत आहे तोपर्यंत अमरनाथ यात्रेला काहीच होणार नाही याची ग्वाही देण्याची वेळ लोकसभा खासदार ओमर अब्दुल्ला यांच्यावर आली होती. अमरनाथ यात्रेला काही झालं तर हज यात्रा होऊ देणार नाही असं बाळासाहेबांनी ठणकावलं होतं. अगदी तीन वर्षांपूर्वी अशीच वेळ आली होती. त्यामुळे जून जुलै महिन्यात सीमेपलीकडून अतिरेकी कारवाया वाढणं आणि वातावरण कलुषित होणं यात काहीच वेगळं नाही. फक्त यंदाचा प्रभाव शंभर दिवस उलटून गेले तरीही तसाच आहे त्यामुळे याचा मागोवा घेणं गरजेचं ठरतं. काश्मीर-भारत विलीनीकरणच्या दिवशी हा मागोवा औचित्यपूर्ण ठरतो.
एकतर समग्र जम्मू आणि काश्मीर कायमच अशांत आहे ही निराधार भीती आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पाकिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरला लागून असलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये समस्या आहेत. त्यात जुलै ते सप्टेंबर महिन्यात महिन्यात श्रीनगरचं तापमान मुंबई ठाण्यासारखं असतं. त्यामुळे सगळ्या चळवळ्यांना तिकडे काहीतरी करायला मुभा मिळते. शिवाय अश्या मानवी तापमानामुळे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी असते. अमरनाथ यात्रा असते ती वेगळीच. त्यामुळे काहीतरी करून लक्ष वेधून घ्यायला अतिरेकी तयारच असतात. यंदा निमित्त मिळालं ते बुऱ्हाण वाणी नावाच्या एक अतिरेक्याचा सुरक्षादलांनी खातमा केल्यामुळे. अगदी पार त्याच्या प्रेयसीला गाठून तिच्या करवी त्याला फोन वगैरे लावून त्याला एक ठिकाणी बोलावून सापाला रचून ठार मारायची कामगिरी सुरक्षा दलांनी फत्ते केली. या बुऱ्हाणच खोऱ्यात अतिरेकी मेला की हजारोंच्या मिरवणुका काढायची टूम सुरू केली होती. त्यासाठी समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर करून त्याने स्वत:ला तरुणाईचा आदर्श वगैरे बनवलं होतं. सुरक्षा दलांना वैध मार्गाने मोठं यश चिंतण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाही.
पण तरीही, आपलं काम आहे काही गोष्टींना उजाळा देणं. सर्वप्रथम आपण शाळेत शिकवला जाणारा इतिहास समजून घेऊ.
भारत स्वतंत्र झाला, संस्थानिक भारतात विलीन झाले आणि काश्मीर प्रश्न उद्भवला. या घटना काहीच अंतराने घडल्या तरी त्यांचे पदर या समस्येला असून तिथूनच ही गुंतागुंत सुरू झाली आहे. स्वतंत्र भारताची फाळणी ही जेंव्हा काळ्या दगडावरची रेघ मानली लॉर्ड माउंटबॅटन यांनी संस्थानिकांना ‘राहायचं असेल तर पर्याय भारत किंवा पाकिस्तान, स्वतंत्र राहायचं विसरा’ असा सज्जड दम दिला. पाठोपाठ बहुतेक संस्थानिकांनी वल्लभभाई पटेलांकडे आपला भारतात यायचा मानस जाहीर केला.
वल्लभभाई पटेलांच्या प्रयत्नांना परमेश्वर मानून सुद्धा एक गोष्ट मान्य करावी लागेल की आत्ताच्या भारताचा जो भाग इकडे होता त्यात बहुसंख्य जनता हिंदू होती. त्यामुळे जनमताचा रेटा सक्षम असल्यामुळेही संस्थानिकांना हा निर्णय घेणे भाग पडले होते. ज्यांनी वेगळा विचार करायचा प्रयत्न केला त्यांच्यात निजाम, पोर्तुगीज, जुनागडचा नवाब आणि होता महाराज हरिसिंग.
पैकी आधीच्या तिघांचं काय झालं हे सर्वांना माहीत आहे. हरिसिंगाची कथा थोडी वेगळी होती. मुस्लिम बहुल प्रांताचा हा हिंदू राजा होता. त्याच्या जनमताचा रेटा एकतर पाकिस्तान किंवा स्वतंत्र राहायच्या बाजूने होता. लोकसंख्येच्या बळावर पाकिस्तानात हा भाग जाणे हे तिथल्या हिंदूंच्या ३०% हितासाठी नक्कीच वाईट होते. शिवाय हरिसिंग स्वतः हिंदू असल्यामुळे त्यालाही हे परवडणारे नव्हतेच. तो हिंदूही राहिला नसता आणि राजाही. त्याची अवस्थाच इकडे आड तिकडे विहीर अशी होती. त्याने वेळ काढण्याचं धोरण पत्करलं. लॉर्ड माउंटबॅटन ज्यावेळेस हरिसिंगला भेटायला गेले त्यावेळी हरिसिंग त्यांना प्रकृती अस्वास्थ्याचं कारण सांगत भेटायला आलाच नाही. काश्मीर प्रश्न चिघळणार हे तेंव्हाच सिद्ध झालं.
काहीच दिवसात पाकिस्तानी सैन्य काश्मीरवर चाल करून आलं. याचाच अर्थ जो भाग आपला झाला नव्हता त्या काश्मीरवर पाकिस्तानी सैन्य चाल करून आलं. आपली न झालेली वस्तू दुसऱ्याने घेतली तर त्यावर आपण काही बोलू शकतो का? पण अश्या अवस्थेमध्ये महाराज हरिसिंगासमोर आपली गाडी आणि प्राण दोन्ही वाचवायला पर्याय नव्हता. अपेक्षेप्रमाणे तो भारताकडे आला. “आम्ही आपलं रक्त, श्रम, वेळ, पैसा आणि सैनिक तुमच्यासाठी खर्चायचे आणि बदल्यात आम्हाला काय?” असाच प्रश्न एक प्रकारे हरिसिंगला विचारला गेला. तेंव्हा हरिसिंगाने सामीलनाम्यावर वर सही केली. हा झाला आपल्याला परिचित असलेला इतिहास.
आता थोडं “अपिरिचित” विश्लेषण करू.
भारतीय सैन्य तयारीला लागलं. जम्मू आणि काश्मीरचा काही भाग भारताने घेतला. उर्वरित भाग घेता आला नाही. कारण घेतलेल्या भागात जम्मू होता जिकडे हिंदू जनता अधिक होती. आजच्या पाकव्याप्त काश्मीरच्या भागाला पंजाब काश्मीर म्हणतात. पंजाबी भाषेला जवळची ‘गोजिरी’ नावाची स्थानिक भाषा तिकडे प्रचलित आहे. या पंजाब काश्मीरच्या टोळीवाल्यांनी भारतीय सैन्याला अजिबात दाद दिली नाही. सुमारे दीड वर्ष लढाई झाली. शक्य तितका भाग जिंकत बाकी भाग जिंकणं अशक्यप्राय झालं तेंव्हा भारताने हा प्रश्न युनोमध्ये नेला. त्यातही पुढे अजून वर्षभर युद्ध झाल्यावर युनोने ‘जो जिकडे आहे तिकडेच बसेल’ असा निवाडा करत नियंत्रण रेषा आखली. (‘नियंत्रण रेषा’ भारत पाकिस्तानमधली आणि ‘प्रत्यक्ष निरंत्रण रेषा’ भारत आणि अक्साई चीन मधली.)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनाविरुद्ध जी काही कलमं संविधानात आली त्यातलं एक महत्वाचं म्हणजे कलम ३७०.
काही गोष्टी मुळापासून स्पष्ट व्हाव्यात. जम्मू आणि काश्मीर हा मुद्दा जबरदस्त अंतर्गत गुंतागुंतीचा आहे. “नेहरूंनी काश्मीरचा मामला लटकावला” हा नेहरूद्वेष्ट्यांचा आरोप निव्वळ बालिश आहे. सत्तर वर्ष ज्या मुद्द्यावर तोडगा निघत नसतो त्याला एका माणसामुळे जटील स्वरूप येत नसतं. त्यामुळे नेहरूंनी “कोणाच्यातरी नादी लागून” काश्मीर प्रश्नी भारताच्या हिताशी तडजोड केली वगैरे आरोप अजागळ आहेत.
पण या सगळ्यामध्ये एक मोठा वजीर काश्मीरच्या भविष्यावर भुजंग बनून राहिला होता.
शेख अब्दुल्ला त्याचं नाव.
आपल्याला शेख अब्दुल्लांबद्दल अत्यंत कमी माहिती असते. “काश्मीरच्या भारतातल्या विलीनीकरण प्रकरणी नॅशनल कॉन्फरेन्सच्या शेख अब्दुल्ला यांनी खूप मदत केली”, एवढ्या त्रोटक आणि मोघम माहितीशिवाय आपल्याला काहीच माहित नसतं.
कोण होते हे शेख अब्दुल्ला? काश्मीर प्रश्नाशी त्यांचा संबंध काय? काश्मीरवर काही कृती करण्याचा त्यांचा अधिकार किती? आणि त्यांच्या कृतींचे किती दूरगामी परिणाम काश्मीरवर झाले?
या सगळ्याचा सेंद्रिय परिणाम जर समग्र लक्षात घेतला तर काश्मिरी प्रश्नांची ही पश्मिना शाल आपल्याला हाताळता येईल.
या शेख अब्दुल्लाची कुंडली पुढच्या लेखात.
पुढील लेख :- काश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग २
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.