“संविधान बचाव!” पण कोणापासून? – संविधानाचे खरे शत्रू कोण?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
२६ जानेवारी २०१८ रोजी भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात पार पडला. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारताचा प्रजासत्ताक दिन हा अनन्यसाधारण महत्वाचा दिवस. या दिवशी तीन वैशिष्ट्यपूर्ण घटना घडल्या.
यातील पहिली घटना म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ‘आसियान’ मधील दहा राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांना राजपथावरील संचलनाचे विशेष निमंत्रण देण्यात आले होते. थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि ब्रुनेई या देशांचा समावेश ‘आसियान’ मध्ये होतो.
आशिया खंडातील राजकीय घडामोडीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची असलेली घटना होय. या देशांशी भारताचे असलेले मैत्रीसंबंध दृढ होण्यास या घटनेचा हातभार लागणार आहे.
दुसरी घटना म्हणजे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा असलेल्या चित्ररथाने राजपथावरील संचलनात आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व केले. याच चित्ररथाने सर्वोत्तम चित्ररथाचा पुरस्कारदेखील पटकावला.
राजधानी दिल्लीत या दोन अभिमानास्पद घटना घडत असतानाच देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मात्र वेगळेच नाट्य रंगले होते. हे नाट्य होते; संविधान बचाव रॅलीचे!!
२०१९ साली तिसरी आघाडी उघडण्याच्या दृष्टीने एक पाउल म्हणूनही या रॅलीकडे बघितले जात होते. याला कारणही तसेच होते. भाजपच्या विरोधातील सर्वच पक्षांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढला होता. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील बऱ्याच नेत्यांचा मोर्चात सहभाग होता. या मांदियाळीत प्रकाश आंबेडकर कुठेच दिसले नाहीत याबाबत काहीजण आश्चर्य व्यक्त करत होते.
तर कदाचित ते आपल्या राजकीय पुनरुज्जीवनाच्या नव्या मोहिमेत व्यस्त असल्यानेच येऊ शकले नसावेत असा कयास काहीजणांनी बांधला!
‘संविधान बचाव फासिसम हटाव’ अशा घोषणा या मोर्चात दिल्या गेल्या.
मात्र देशातील लोकशाहीचा आत्मा असलेले संविधान नेमके कोणापासून वाचवायचे? असा भाबडा प्रश्न आम्हाला पडला असल्याने संबंधितांची यादी तयार करण्याचे काम हाती घ्यावे असे आमच्या मनात आले. त्यानुसार एक यादी वाचकांसमोर मांडत आहोत. वाचकही त्यात आपापल्या परीने भर घालू शकतात.
आपल्या राजकीय स्वार्थापायी जातीपातींत तेढ निर्माण करून स्वतः नामानिराळे राहणाऱ्या ‘बिनचेहऱ्याच्या’ राजकीय नेत्यांपासूनच खरेतर संविधान वाचवायला नको का?
‘भारतमाता की जय’ या घोषणेला नावं ठेवणाऱ्या आणि ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’च्या घोषणा देणाऱ्यांपासून आणि तसे करणाऱ्यांना ‘विचारवंत’ वगैरे बिरुदे लावत मोठं करणाऱ्या प्रसारमाध्यमांकडून संविधान वाचवले जात आहे?
आपल्या देशाचा अर्थाअर्थी संबंध नसताना ‘सेव्ह गाझा’चे टीशर्ट घालून फिरणाऱ्या आणि ‘भारत सरकारला अतिरेक्यांशी लढायला अतिरेकी हवेत.’ असे मोठाले भडक फलक आपल्या मतदारसंघात लावून भारतीय लष्कराचा अपमान करणाऱ्या नेत्यांकडून संविधानाचा आदर राखला जातोय का?
‘कश्मीरीयत’ नामक शब्द सतत पुढे करून अतिरेक्यांचे समर्थन करणाऱ्या आणि ‘पाकव्याप्त कश्मीर काय तुमच्या बापाचा आहे काय?’ असा प्रश्न देशाच्या पंतप्रधानांना विचारणाऱ्या ज्येष्ठ पाकधार्जिण्या नेत्यांकडून संविधानाचे नेमके कसे संरक्षण होत आहे?
आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जातोय असा गळा काढणारा आमदार ज्यावेळेस आपल्याला गैरसोयीच्या वृत्तवाहिनीला पत्रकार परिषदेतूनच बाजूला काढा अशी गळ घालतो तेव्हा तो समोरच्या व्यक्तीच्या घटनेने बहाल केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अनादर करत नसतो?
कोणताही पुरावा नसताना ‘हिंदू आतंकवाद’ ‘भगवा दहशतवाद’ अशा संज्ञा जाणीवपूर्वक रूढ करणाऱ्या व्यक्ती नेमकं कशा प्रकारे संविधानाचे पालन करत असतात?
नक्षलवादाला उघड उघड पाठींबा देणारे तथाकथिक विचारवंत त्यांना देशाच्या एकात्मतेची काळजी वा संविधानाबद्दल आदर असल्यामुळेच असे करत असतात काय?
निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था हे आपल्याला प्रतिकूल वागत आहेत असे दिसताच त्यांच्यावर बेछूट आरोप करणारी मंडळी लोकशाही तत्वांचा कशाप्रकारे सन्मान करत असतात?
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारताच्या दौऱ्यावर असताना त्यांना ‘पलीस्तिनी लोकांचा खुन करणारा कुत्रा’ अशी शेलकी विशेषणे वापरणारे बुद्धिवादी (?) लोक हे संविधानाचे रक्षक म्हणावेत?
एकीकडे मोहरमच्या ताजीयांना परवानगी देत दुसरीकडे दुर्गाविसर्जनाच्या यात्रेला परवानगी नाकारणाऱ्या एका राज्याच्या मुख्यमंत्री आणि या कृत्याला पाठींबा देणारा त्यांचा पक्ष हे संविधानाने दिलेल्या पंथनिरपेक्षता या उदात्त तत्वाचे मारेकरी नव्हेत काय?
सरतेशेवट सगळ्यात महत्वाचे म्हणजे;
अनंतकुमार हेगडे यांच्या संविधानबदलासंबंधित वादग्रस्त विधानावर उर बडवून गळे काढणाऱ्या व्यक्तींनी या प्रश्नाचेही उत्तर द्यावे की; ‘सेक्युलर’ आणि ‘सोशलिस्ट’ हे शब्द संविधानाच्या पूर्वपीठीकेत समाविष्ट करू नयेत याबाबत अत्यंत अभ्यासपूर्ण युक्तिवाद मांडणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मताला पुढे वाटाण्याच्या अक्षता लावत केवळ राजकीय स्वार्थातून या दोन्ही शब्दांचा समावेश ४२ व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून करणाऱ्यांनी संविधानाचा व संविधान शिल्पकारांच्या मताचा नेमका काय आदर राखला बरे?
खरेतर सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणे हे लोकशाही व्यवस्थेतील विरोधी पक्षांचे प्रमुख कार्य. याकरता सरकारची धोरणे, कारभारातील कमतरता यांकडे जनतेचे लक्ष आकर्षून घेणे महत्वाचे असते.
मात्र तशी टीका करण्यास बहुधा मुद्देच न सापडल्याने विरोधकांना अशा रॅलींचा आधार घ्यावा लागत असावा. खरेतर या रॅलीचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे ‘सेल्फी मोहीम’!!
हार्दिक पटेल आणि ‘मशरूम फेम’ अल्पेश ठाकोर यांच्यासह सेल्फी घेण्याचा मोह आमच्या राज्यातल्या बऱ्याच मोठमोठ्या नेत्यांना आवरला नाही. तसेही यातल्या काही नेत्यांचा राज्यातल्या खड्ड्यांसह सेल्फी काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा छंद आहेच!!
आग लावणारी व्यक्तीच बघ्यांच्या गर्दीत सगळ्यात पुढे उभी राहून ‘आग लागली’ अशी आरोळी ठोकत असते असे म्हणतात.
जेणेकरून आग नीट लागल्याची खात्रीही करता यावी आणि आपल्यावर कोणी शंकाही घेवू नये. या रॅलीबाबतही चोराच्या उलट्या बोंबा असाच प्रकार होता. आयोजकांच्या अपेक्षेचा फज्जा पाडत सामान्य लोकांनी या रॅलीकडे पाठच फिरवलेली दिसली. यानिमित्ताने मात्र ‘संविधान बचाव’ अशा घोषणा देणाऱ्यांना आवर्जून सांगावेसे वाटते;
अपने गिरेबान में भी झाँका करो कभी-कभी,
किसी दूजे पर गर्द झाड़ देना आसां बहुत होता है |
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.