Site icon InMarathi

प्रिय रतन टाटांना एक “सहिष्णू” पत्र

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

====

प्रिय, आदरणीय रतन टाटा जी,

सादर नमस्कार.

आपले वक्तव्य वाचले. सहमत आहे. देशात असहिष्णुता वाढलीये खरी.

खरंच वाढलीये. आपण उगाच बोलायचं म्हणून बोलला नाहीत.

मोदींचे अतिउत्साही भक्त शिविगाळ करतात खरी. अर्वाच्य शिवीगाळ करतात. काही “अखंड भारतवाले” मुसलमानांना पाण्यात पाहतात. मोदींना काही बोललं कि त्यांना सहन नाही होत. “Constructive criticism” देखील सकारात्मक घेतला जात नाही. अखलाक मेला…2014 नंतर मेला हे विशेष. Anti-nationalचे शिक्के बसतात. गायीचं मांस खाऊ नका म्हणून जबरदस्ती केली जाते.

Ratan Tata (Photo: Reuters)

पण सोबतच –

केरळमध्ये दर 15 दिवसाला संघाचा भाजपचा माणूस भर रस्त्यात कम्युनिस्ट लोकांकडून चेचला जातो. बंगळुरूमध्ये डोक्यात घाव घालून मारला जातो.

पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेवर मोहरममुळे बंधने येतात.

तामिळनाडूमध्ये “विश्वरुपम” वरून कमल हसन निराश होऊन देश सोडायचा म्हणतो.

Kamal Haasan (Source: Indiatvnews)

ममता दीदी “झुल्फिकार” सिनेमावर हजारो कात्र्या फिरवतात.

बुऱ्हाण वाणी सारख्या आतंकवादी माणसाला सैन्याने मारलेलं लोकांना आवडत नाही. लोकांना आताशा “भारत माता कि जय” आणि “वंदे मातरम” सहन होत नाहीये.

उज्जैन मध्यप्रदेशमध्ये मदरश्यामधून मुलांसाठी केवळ हिंदू संघटनांनी बनवले म्हणून मध्यान्ह भोजन अस्वीकार करण्यात आले.

लोकांना अमीर खान, शाहरुख खान ह्यांनी “असहिष्णुता आहे” म्हणलेलं सहन होत नाही.

तसंच –

लोकांना अनुपम खेरचं “असहिष्णुता नाही” म्हणलेलं देखील सहन होत नाही.

पहिली कॅटेगरी द्वेषपूर्ण तर दुसरी चाटू म्हणून हिणवली जाते.

JNU मध्ये कम्युनिस्ट “नीम का पत्ता कडवा है, नरेंद्र मोदी xxx है” चे सुरेख नारे देतात. उत्तर प्रदेशचा आमदार राहुल गांधींवर टीका केली म्हणून पक्षातून हाकलून दिला जातो. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण व इतर अनेक केजरीवालवर टीका केली म्हणून पक्षातून अक्षरशः मारामारी करून भिरकावून दिले जातात.

अजित पवार लोकनिर्वाचीत सरकारला जातीच्या घाणेरड्या गटारीतून “शेठजी-भटजी” सरकार म्हणतात. शरद पवार पेशवाई म्हणून तेल टाकतात. राहुल गांधी लोकांनी निवडून दिलेल्या देशाच्या प्रधानमंत्र्याला “खून के दलाल’ म्हणतात तर सोनिया गांधी “मौत का सौदागर” म्हणतात. केजरीवाल “कॉवर्ड & सायकोपॅथ” बोलतात.

 

आपल्याच देशाच्या गुजरातसारख्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला “व्हिसा देऊ नका” म्हणून अमेरिकी सरकारला आपलेच काँग्रेसी नेते पत्रे पाठवतात. पाकिस्तानवर केलेली सर्जिकल स्ट्राईक लोकांना सहन होत नाही. कोणी झालीच नाही म्हणतो, कोणी आम्हीपण केल्या म्हणतो, कोणी करूच नका म्हणतो. मोदींचे परदेशी झालेले कौतुक एकतर मनमोहन सिंहांशी बरोबरी करून नाकारले जाते किंवा निरर्थक म्हणून हिणवले जाते.

मोदींचं समर्थन लोकांना सहन होत नाही. एकतर सुज्ञ विरोधक बना नाहीतर अंधभक्त, चाटू, हिंदुत्ववादी म्हणवून घ्या…हे दोनच पर्याय समोर ठेवले जात आहेत.

 

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदू सणांची टर उडवली जाते. हिंदू परंपरांची हेटाळणी होते. पण कमलेश तिवारीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणालाच सहन झाले नाही.

करवाचौथ प्रतिगामी असते म्हणणाऱ्यांना ‘बुरखा’ किंवा तीन तलाक देखील प्रतिगामी असतो म्हणलेले सहन होत नाही.

ममता बॅनर्जीचे पुतणे भर सभेत तृणमूल काँग्रेसला अव्हान देऊ पाहणाऱ्याचे डोळे फोडायची आणि हात कापून टाकायची भाषा करतात.

अलाहाबाद,उत्तर प्रदेशमध्ये एका शाळेत राष्ट्रगीत म्हणायला मनाई होती. काही मूलतत्त्ववादी मुस्लिमांना आजही राष्ट्रगीत आणि वंदे मातरम सहन होत नाही.

हिंदुत्वाला फॅसिजम म्हणणारे संपादक मदर टेरीसावर लिहितात तेंव्हा अग्रलेख मागे घेण्याची वेळ येते.

 

सर्व धर्मांवर आणि खास करून हिंदू धर्मांवर टीकात्मक विनोद करणाऱ्या एका प्रसिद्ध युट्युब समूहाला एका ख्रिश्चन पादरीची जाहीर माफी मागावी लागते…!

अशी अनेक अनेक उदाहरणे आहेत. मोदी सरकार असहिष्णू आहे म्हणणारे मोदींबद्दल किती सहिष्णुता बाळगतात?!

खरंय रतन जी,असहिष्णुता आहेच. पण ती दोन्हीकडून आहे.

मोदी समर्थकांना मोदी विरोध सहन होत नाही तर मोदी विरोधकांना मोदीच सहन होत नाहीत.

सांगायचा मुद्दा इतकाच आहे, रतन जी, की –

असहिष्णुता आहेच. जितकी ती मोदी समर्थकांकडून आहे, त्यापेक्षा कित्येक कित्येक पटीत ती मोदी विरोधकांकडून आणि समाजाच्या अनेक घटकांकडून आहे. नेहमीच होती. भौगोलीक, राजकीय, जातीय, पक्षीय, धार्मिक, भाषिक, पारंपरिक विविधतेत विभागलेल्या सव्वाशे कोटी लोकांमध्ये  ताण तणाव हा असणारच. केवळ सरकार बदलले म्हणून असहिष्णुता बोकाळली आणि ती एकतर्फी असून सद्य सरकारच त्याकरता जबाबदार आहे हा तर्क बालिश तर आहेच शिवाय भरकटवणारा आहे.

आशा आहे, ह्या पत्रात ‘सहिष्णूतेची’ सीमा ओलांडल्या गेली नाहीये!

धन्यवाद!

ता.क. :- टाटा समूहाने “फेकिंग न्यूज”ला ‘tata nano’ गाडीवर बनवलेले विनोद मागे घ्यायला लावले होते. ती असहिष्णुता नव्हती असं समजून आम्ही खुश रहात आहोत.

===

 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Exit mobile version