आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – इंद्रनील पोळे
===
“फक्त ५०० रुपयात आधार डेटाबेस उपलब्ध!!” या आणि अश्या प्रकारच्या मथळ्याच्या बातम्या आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी, कधी ना कधी वाचल्या असतील.
त्या निमित्ताने आधारच्या सुरक्षाप्रणालीवर आणि मुळातच आधारच्या तंत्रज्ञानावर समाज माध्यमांनी उचललेले प्रश्न देखील आपल्या नजरेखालून गेले असतील.
एकूणच आधार कार्ड ह्या योजनेच्या सुरक्षेत आणि तंत्रज्ञानात मुलभूत त्रुटी आहेत अशी साधारण एक समाज धारणा झालेली आहे.
भारतात निर्वासित म्हणून आलेल्या लोकांकडे आधार कार्ड असणे, आधार कार्डचा डेटाबेस चोरीला जाण्याच्या बातम्या येणे, रिलायंस जिओच्या कर्मचाऱ्यांकडे तुमचा आधारसाठी घेतलेला बायोमेट्रिक डेटा सापडण्याच्या घटना सोशल मिडीयावर येणे.
या आणि या सारख्या बातम्यांमुळे आधार कार्ड आणि त्याची सुरक्षा प्रणाली संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली वाटते.
पण खरंच आधार कार्ड किंवा नेमकं सांगायचं झाल्यास युआयडीएआय (Unique IDentification Authority of India) च्या सुरुक्षा प्रणालीत मूलभूत त्रुटी आहेत? खरंच आधारचे तंत्रज्ञान हलक्या दर्जाचे आहे?
मुळात तंत्रज्ञानाधारित ओळख प्रणालीची आपल्याला गरज आहे का आणि आहे तर ती नेमकी काय? आधारचे तंत्रज्ञान प्रशासनातले नेमके कुठले प्रश्न सोडवू पाहते आहे? आधारचे तोटे नेमके काय आहेत?
या आणि अश्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानावरच्या या सदरातली पुढची लेखमाला आधार कार्ड भोवती असलेल्या कित्येक समज, गैरसमजांची चिकित्सा करणारी असणार आहे.
आधार कार्डच्या निमित्ताने जगाच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर बायोमेट्रिक ओळखपत्र प्रणालीची अंमलबजावणी करणारी यंत्रणा उभी राहिली आहे.
एवढ्या मोठ्या स्केल वर उभारल्या गेलेल्या प्रणालीत नैसर्गिकपणे काही लूपहोल्स राहणारच. प्रश्न हा आहे की हे लूपहोल्स किती मोठे आहेत आणि त्याचा तुमच्या माझ्या आयुष्यावर नेमका काय फरक पडतो.
त्याच बरोबर हे लूपहोल्स कसे बुजवले जाऊ शकतात आणि सरकार त्याबद्दल नेमकं काय करत आहे.
एखाद्या ओळखप्रणालीला तात्विक आधारावर विरोध होऊ शकतो. तात्विक दृष्ट्या असं म्हणता येऊ शकतं की “आधार कार्ड” सारखी ओळख प्रणाली माझ्या मूलभूत गोपनीयतेच्या हक्कावर गदा आहे.
या आधारावर “आधार” ला विरोध सुद्धा झाला आहे.
आजच्या घटकेला आधार कार्ड नसणे हे सामान्य माणसासाठी रोजच्या जगण्यात नरकयातना भोगण्यासारखे आहे. आणि त्यामुळे अगदी सामान्य माणूस ज्याला आधारला असू शकणारा तात्विक विरोध कळत नाही त्यांच्या साठी “आधार” ओळख प्रणालीत दाखल होण्याशिवाय पर्याय नाहीये.
या लेखमालेचा विषय गोपनीयतेचा मूलभूत हक्क (Right to Privacy) याच्या असण्या नसण्यावर वाद विवाद करणे हा नाहीये. तसेच केंद्रीय ओळख प्रणाली चांगली का वाईट ह्यावर भाष्य करणे हा पण नाहीये.
–
या लेखमालेचा विषय या अश्या केंद्रीय ओळख प्रणालीचे गुण दोष शोधून, ही प्रणाली ज्या तंत्रज्ञानावर उभी आहे त्या तंत्रज्ञानाची चिकित्सा करणे हा आहे.
अर्थात त्या अनुषंगाने काही जागी “आधार” प्रणालीच्या उपयुक्ततेवर भाष्य अपरिहार्य असेल पण ते भाष्य या लेखमालेचा केंद्रबिंदू नसेल.
तंत्रज्ञानाच्या उत्क्रांती नंतर गेल्या २० वर्षात माणसाच्या अनेक सामाजिक सहसंबंध आणि हक्कांमध्ये तंत्रज्ञानाने ढवळाढवळ सुरु केलेली आहे. विशेषतः सोशल मिडियाच्या उगमानंतर गोपनीयतेसारख्या हक्कांच्या सीमा धूसर होऊ लागल्या आहेत.
मुळात भारतीयांना प्रायव्हसी आणि सिक्रेसी अर्थात गोपनीयता आणि गुप्तता यातला फरक कळत नाही असे सर्वसामान्य निरीक्षण आहे. त्यामुळे यातले काय वाचवावे हे सामान्य जनतेला कळेल का ही चिंता आहे.
दुसरा मुद्दा फायदा कोणाचा आणि कोणाच्या भरवश्यावर असा आहे. म्हणजे “आधार” प्रणाली मुळे सरकार आणि प्रशासनाला फायदा होतो आहे पण तो लोकांच्या माहितीला पणाला लावून.
तंत्रज्ञानाचा वापर करून ह्या माहितीचा वापर किती चुकीच्या प्रकारे होऊ शकतो हा नक्कीच चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे. पण त्याच बरोबर दुसरीकडे केंद्रीय ओळख प्रणालीमुळे सरळ जनतेपर्यंत सरकारी मदत पोहोचवणारी उदाहरणं देखील आहेत.
यातलं नेमकं काय खरं आणि काय खोटं? कशावर विश्वास ठेवायचा आणि कशाला शंकेच्या नजरेने बघायचं? सरकारने नेमक्या कुठल्या सुधारणा करणं गरजेचं आहे. ह्या आणि अश्या बऱ्याच प्रश्नांच्या खोलपर्यंत जाणे आपल्याला भाग आहे आणि ते आपण या लेखमालेमार्फत करूच.
कारण शेवटी दावावर आपल्या पैकी प्रत्येका भारतीयाची माहिती आहे आणि त्याचा वापर कसा होतोय ह्यावर नजर ठेवायची जबाबदारी एक सुजाण नागरिक म्हणून आपलीच आहे.
पुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा;
===
काय आहे आधार मागचे तंत्र? : आधार कार्ड – समूळ चिकित्सा – भाग २
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.