इंग्रजांनी १३ वेळा आक्रमण करूनही अजिंक्य राहिलेला “मातीचा” किल्ला!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
राजस्थान हे राज्य तिथल्या किल्ले आणि महालांसाठी जगविख्यात आहे. येथील किल्लेच राजस्थानची शान आहेत. राजस्थानात असे अनेक किल्ले आहेत जे त्यांच्या सुंदर रचने करिता तसेच त्याच्याशी संबंधित वीरगाथांकरिता इतिहासात अमर आहेत.
येथील राजा-महाराजा हे आपल्या राज्याचा सुरक्षेच्या बाबतीत अतिशय गंभीर होते. त्यामुळे येथील राजांनी अनेक असे किल्ले आणि महाल बनविले आहेत, जे अभेद्य आहेत.
याच अभेद्य किल्ल्यांपैकी एक म्हणजे भरतपूर जिल्ह्यातील ‘लोहगडचा किल्ला’. हा भारताचा एकमेव असा किल्ला आहे ज्याला ‘अजेय दुर्ग’ म्हणून ओळखले जाते. कारण आजवर ह्या किल्ल्याला कोणीही जिंकू शकलेले नाही.
एवढच नाही तर इंग्रजांनी १३ वेळा ह्या किल्ल्यावर तोफेने आक्रमण केले तरी देखील ते ह्या किल्ल्यावर विजय मिळवू शकले नाही.
ह्या किल्ल्याची मजबुती ह्याच्या नावातूनच कळून येते. मातीपासून निर्माण करण्यात आलेल्या ह्या किल्ल्याला ‘आयर्न फोर्ट’ म्हणून महती मिळाली, ती काही अशीच नव्हे. ह्या किल्ल्यात जो कोणी शासक आला त्याला कधी कोणी हरवू शकलेलं नाही.
ह्या किल्ल्याचे बांधकाम १८ व्या शतकातील आहे. हे बांधकाम जाट राजा सुरजमल याने केले होते. महाराजा सुरजमल यांनीच भरतपूर वसवले होते. त्यांनी एका अश्या किल्ल्याची कल्पना केली होती, जो अतिशय मजबूत असेल आणि ज्याला बनवायला खर्च देखील कमी येईल.
त्याकाळी तोफ आणि विस्फोटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हायचा त्यामुळे हा किल्ला बनविताना एक अनोखी शक्कल लढविण्यात आली. ज्यामुळे कुठल्याही प्रकारच्या विस्फोटकांचा ह्या किल्ल्याच्या भिंतींवर काहीही परिणाम होणार नाही.
हा किल्ला भलेही राजस्थानच्या इतर किल्ल्यांप्रमाणे विशाल नसला तरी देखील ह्या किल्ल्याला अजेय मानले जाते. ह्या किल्ल्याची विशेषता म्हणजे ह्याच्या चारी बाजूंनी मातीच्या मोठ्या भिंती आहेत.
ह्या किल्ल्याच्या बांधकामावेळी पहिल्यांदा एक मजबूत दगडांची उंच भिंत बांधण्यात आली. ह्यावर तोफेच्या गोळ्यांचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांच्या भोवती शेकडो फुट रुंद अशी मातीची कच्ची भिंत बनविण्यात आली. त्याभोवती खोल खंदक बनवून त्यात पाणी भरण्यात आले.
अश्यात पाण्याला पार करून एका सपाट मातीच्या भिंतीवर चढणे म्हणजे अशक्यच. आणि कोणी पाण्यातून पोहून येऊ नये म्हणून ह्या पाण्यात मगरी देखील सोडण्यात आल्या होत्या.
ह्यावर एक पूल बांधण्यात आला होता आणि एक अष्टधातूचा दरवाजा होता. दिल्ली येथून आणलेल्या ह्या अष्ट धातूच्या दरवाज्याची एक वेगळी कहाणी आहे. हा तोच दरवाजा आहे जो अल्लाउद्दिन खिलजीने राणी पद्मिनीच्या चीतौडच्या किल्ल्यावरून हिसकावून आणला होता.
ह्या दरवाज्याला भरतपूरचे महाराज जवाहर सिंह यांनी दिल्ली येथून आणले होते. ह्याच दरवाज्याला ह्या किल्ल्याच्या मुख्य द्वारावर बसविण्यात आले होते.
ह्या किल्ल्याची सर्वात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे ह्याचा निर्माणाकरिता लोखंडाचा एक अंश देखील वापरण्यात आलेला नाही. तरी देखील हा किल्ला अतिशय मजबूत होता.
यामुळे ह्या किल्ल्यावर आक्रमण करणे सोपे नव्हते. कारण तोफेतून निघालेले गोळे ह्या मातीच्या भिंतीत फसून जायचे आणि त्यातील आग विझून जायची. असे असंख्य गोळे टाकूनही ह्या किल्ल्याची दगडांची भिंत इंचभर देखील हलली नाही. त्यामुळे कुठलाही शत्रू ह्या किल्ल्याच्या आत कधीही प्रवेश करू शकला नाही.
–
हे ही वाचा – राजकुमारी रत्नावती, जादुगार सिंधू सेवडा आणि असंख्य प्रेतात्म्यांनी नटलेला ‘भानगड किल्ला’!
–
ह्या किल्ल्याला राजस्थानचे सिंहद्वार देखील म्हटले जाते. येथे त्याकाळी जाट राजांचे शासन होते. ते त्यांच्या शासन पद्धतीकरिता ओळखले जायचे. त्यांनी ह्या किल्ल्याला सुरक्षित बनविण्यात कुठलीही कसर सोडली नाही.
ह्या किल्ल्यावर विजय मिळविण्याचा अनेक राजांनी प्रयत्न केला. पण सर्वांच्या हाती नेहमी निराशाच लागली. एवढचं नाही तर इंग्रजांनी देखील ह्याला काबीज करण्याचा प्रयत्न केला.
इंग्रज सेनेशी लढता लढता होळकर नरेश जसवंतराव हे भरतपूर येथे येऊन पोहोचले. जाट राजा रणजीत सिंह यांनी त्यांना वचन दिले की त्यांच्या सुरक्षेकरिता ते आपले प्राण देखील देतील.
तेव्हा इंग्रज सेनेच्या कमांडर इन चीफ लार्ड लेक ह्याने रणजितसिंह ला संदेश पाठवला. ज्यात लिहिले होते की,
त्यांनी जसवंतराव होळकर यांना इंग्रजांच्या हवाले करावे अन्यथा स्वतःच्या मृत्युकरिता तयार राहावे.
पण राजा रणजितसिंग ह्या धमक्यांना घाबरणारे नव्हते. त्यांनी देखील लार्ड यांना एक संदेश पाठवला की,
“तुमच्यात जेव्हढी ताकद असेल तेवढा प्रयत्न करा, आम्ही लढायचं शिकलो आहे, माघार घायचं नाही”
लार्ड यांना हे वाचून खूप राग आला आणि त्यांनी तत्काळ आपल्या सेनेसोबत भरतपूरवर आक्रमण केले. दुसरीकडून जाट सेना देखील युद्धाकरिता तयार होती.
इंग्रज तोफेद्वारे आगीचे गोळे फेकत होते आणि ते गोळे किल्ल्याच्या त्या अभेद्य मातीच्या भिंतीत जाऊन फसून जात असत. आगीच्या सर्व गोळ्यांना आपल्या पोटात घेत लोहगडची ती भिंत जशीच्या तशी उभी होती.
हे बघून इंग्रजी सेना चक्रावली. लार्ड लेक स्वतः हे सर्व अचंबित होऊन बघत होते. जेव्हा ह्या किल्ल्यावर कुठलाही परिणाम झाला नाही तेव्हा, इंग्रजांनी एकदा पुन्हा तह करण्याचा प्रस्ताव पाठवला. पण राजा रणजीत सिंह यांनी तो पुन्हा एकदा फेटाळून लावला. ज्यानंतर इंग्रजांनी निरंतर आपले आक्रमण सुरु ठेवले.
इतिहासकारांच्या मते लार्ड लेक यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी १३ वेळा ह्या किल्ल्यावर आक्रमण केले. पण तरीदेखील ते ह्या किल्ल्याचे काहीही बिघडवू शकले नाही.
इंग्रज आक्रमण करत राहिले आणि जाट सेना त्यांच्या ह्या मूर्खपणावर हसत राहिली. अखेर इंग्रजांनी माघार पत्करली.
ह्या किल्ल्याच्या एका बाजूला जवाहर बुर्ज आहे. हा बुरुज जाट राजाने दिल्लीवर केलेला हल्ला आणि त्यातून मिळालेला विजय ह्याच्या स्मरणार्थ बनवला होता. हे स्मारक १७६५ साली बनविण्यात आले होते. त्याच्याच दुसऱ्या कोपऱ्यावर फतेह बुर्ज आहे, जो १८०५ साली बनविण्यात आला. हा बुर्ज इंग्रजांना पराजित केल्याच्या स्मरणार्थ बनविण्यात आला होता.
भरतपूरच्या ह्या ऐतिहासिक किल्ल्याचे रक्षण करणारे ८ भाग आहेत आणि अनेक बुर्ज आहेत. किल्ल्याच्या आत किशोरी महाल, महाल खास, मोती महाल आणि कोठी खास आहे.
येथे अनेक मंदिर देखील आहेत. येथे गंगा मंदिर, लक्ष्मण मंदिर तसेच बिहारीजी मंदिर हे अतिशय लोकप्रिय आहे. ह्याच्या मधोमध एक मोठी जामा मशीद देखील आहे. हे मंदिर आणि मशीद पूर्णपणे लाल दगडांपासून बनलेले आहे.
येथील लोकांच्या मते भरतपूरचे महाराजा जेव्हा केव्हा कोणाला कामावर ठेवायचे तेव्हा त्या व्यक्तीला त्यांची एक अट मान्य करावी लागायची, ती अट अशी की दर महिन्याला त्याचं पगारातून १ पैसा धर्माच्या नावे कापला जाईल. येथे काम करणाऱ्यांना ही अट मान्य होती.
म्हणून राजा त्या प्रत्येक व्यक्तीच्या पगारातून १ पैश्याची कपात करायचे जी त्यांच्याकडे काम करते.
आणि ते पैसे त्या व्यक्तीच्या धर्माच्या खात्यात जमा केल्या जायचे. म्हणजे जर हिंदू असेल तर हिंदू धर्माच्या खात्यात आणि जर मुस्लीम असेल तर मुस्लीम धर्माच्या खात्यात.
ह्यातून जी काही रक्कम गोळा व्हायची त्याचा उपयोग मंदिर आणि मशिदी बनविण्यासाठी केला जायचा. ह्यातूनच ही मंदिरं आणि मशिदी बनविल्या गेल्या.
या किल्ल्याबद्दल अशा अनेक आख्यायिका राजस्थानात प्रसिध्द आहेत. पण वेश बाब ही की त्या काळात पूर्णतः आधुनिक असलेली आयुधे आणि तोफा वापरून इंग्रजांनी या किल्ल्यावर तब्बल तेरा वेळा आक्रमण केले. तरीही हा किल्ला अजिंक्य राहिला. राजस्थानातील राजांच्या उत्कृष्ठ स्थापत्यकलेची साक्ष देत हा किल्ला अजूनही उभा आहे.
===
हे ही वाचा – मराठ्यांनी एकेकाळी भगवा फडकवलेला हा किल्ला आज पाकिस्तानात आहे..
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.