गांधी प्रेम ते गांधी द्वेष – ते – गांधी प्रेम : दुटप्पी प्रचारकांचं पाप
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
गांधीजींचं माहात्म्य ठसवण्यासाठी गेल्या ६०-७० वर्षात तो आततायी प्रचार झालाय, त्याने भारतीय तरुणाईच्या वैचारिक प्रवासाची अतोनात वाताहत घडून येतीये.
“आझादी बिना खड्ग बिना ढाल” ह्या प्रचारामुळे स्वातंत्र्य संग्राम नं अनुभवलेल्या लोकांचं अतोनात नुकसान झालंय. हा प्रचार अतिरंजितच नव्हे तर खोटाच आहे.
आणि त्याने झालेलं नुकसान “गांधीजींना खोटं श्रेय मिळालं” हे नसून, गांधीजींना खरं श्रेय मिळालं नाही आणि एकूणच टीम गांधीने केलेल्या कामाचं महत्व नं कळणे हे झालंय.
त्यामुळेच गांधीजींनी नेमकं कोणतं यशस्वी आंदोलन केलं, त्यांनी इंग्रजांवर नेमका कधी विजय मिळवला असे प्रश्न निर्माण होतात.
दुसरं महायुद्ध, आझाद हिंद सेनेचा दणका, त्या दणक्यामुळे देशात सर्वत्र हिंसक उठाव होऊ शकेल अशी परिस्थिती – ह्या कारणांमुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, म्हणून गांधीजी युजलेस ठरतात – असा समज घट्ट होतो.
गांधी आणि टीम ने मिळवलेलं यश आंदोलनांचं नाही. भारताला भारतीयत्वात बांधण्यात ३० वर्षात मिळवलेलं यश सततच्या संघटन बांधणी आणि लोकांना जोडणं ह्यात आहे. गांधींच्या काळापूर्वी स्वातंत्र्य चळवळ मोजक्याच लोकांपर्यंत होती.
असहकार, दांडी, चले जाव हे स्वातंत्र्यासाठी नव्हे – लोकांना एका ध्येयाने एकत्र आणण्यासाठी होते.
टीम गांधीचं यश, स्वातंत्र्यातही नाही. “स्वातंत्र्य का मिळवायचं?” आणि “स्वातंत्र्य मिळवून काय करायचं?” ह्या प्रश्नांच्या शोधलेल्या आणि सर्वांना पटवलेल्या उत्तरात आहे.
एक लक्षात घ्यायला हवं, इंग्रज भारत सोडून जाणार हे १९२०-२५ च्या सुमारासच स्पष्ट झालं होतं.
प्रश्न होता, इंग्रज गेल्यावर काय? हा देश विभक्त होईल का? लोक एकमेकांना मारायला उठतील का?
विविध प्रांत-भाषा-संस्थान एकत्र ठेवणे मजाक नाही. भविष्यातील भारताचं व्हिजन ठेवणं ही त्यावेळची गरज होती. त्या काळात, ह्याच धर्तीवर इतर नेते वागले हे दिसून येईल – प्रत्येकजण भविष्यातील भारताचं आपापलं व्हर्जन मांडत होता. पण लोकांमध्ये “आम्ही सर्व एक आहोत” ही भावना निर्माण करणे आणि लोकशाहीवादी व्यवस्थेचा पाया रचणे, हे गांधी आणि टीमचं यश आहे.
सर्वांना एकत्र बांधण्याची किमया साधली साबरमतीच्या संताने.
गांधी बाबा किती ग्रेट होता हे पटण्यासाठी वरील गोष्टी कळणं आवश्यक नाही. “देश बांधणं” किती आणि कसं आवश्यक होतं, असतं, आहे – हे आमच्या मेंदूत शिरावं – म्हणून वरील गोष्टी कळणं, लक्षात येणं आवश्यक आहे.
तुम्हाला गांधी बाबा नं आवडणं ठीक आहे. आवडायलाच हवा असा हट्ट मूर्खपणाचा ठरेल. पण देश बांधण्याची, एकमुठ घडवून आणण्याची आणि ती टिकवून ठेवण्याची प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेचं महत्व नं कळणं परवडण्यासारखं नाही. अजिबातच नाही.
पण हे कळत नाही आपल्याला…कारण –
एकीकडे शाळेतून “आझादी बिना खडग बिना ढाल” चे गुणगान असतात दुसरीकडे बाहेर मात्र सावरकर, भगतसिंग ते थेट नेताजी पर्यंत सर्वांचा अंगावर काटा आणणारा त्याग दिसतो.
एकीकडे गांधीजींना बघून जज साहेब उभे रहातात, त्यांच्या शिष्योत्तमाला उत्तम सोयींनी युक्त तुरुंगवास होतो – तर दुसरीकडे भगत-सुखदेव-राजगुरू-सावरकरांचा छळ, नेताजींचा मोहून टाकणारा “प्रवास” डोळ्यासमोर उभा रहातो.
भारतीय तरुण हे सगळं पहात, अनुभवत लहानाचा मोठा होत असतो.
ह्या सगळ्याच्या शेवटी, खासकरून कुमार-किशोर ब्राह्मणांसमोर, एक मोठा मानसिक कूट प्रश्न असतो. “गांधीजींचा खून एका ब्राह्मणाने केला आणि म्हणून अहिंसावादी महात्म्याच्या अनुयायांनी ब्राह्मणांची घरं जाळली” – हे ऐकत ऐकत प्रत्येक ब्राह्मण पोर मोठं होतं.
“तुम्ही गांधींना मारला” असे आरोप आणि त्या पाठोपाठ येणारी अर्वाच्य शिवीगाळ भोगत जगावं लागतं. मी स्वतः यातून गेलोय, अनुभवलंय. जोडीला ५५ कोटींचे बळी आणि न्यायालयात दिलेलं लास्ट स्टेटमेंट आहेच.
शाळेत कृत्रिमरीत्या “घडवला गेलेला” गांधी “भक्त” आपोआप गांधी द्वेष्टा होतो. अश्या गोंगाटात गरम रक्ताचा तरुण गांधी द्वेष्टा होणं स्वाभाविकच असतं.
पण वय वाढत जातं तसं काळं-पांढरं जग हळूहळू करड्या रंगाचं होऊ लागतं. पुस्तकातला आणि प्रचारकी पुरोगाम्यांचा लार्जर दॅन लाईफ बापू शेवटी हाडामासाचा माणूस होता हे उमगायला लागतं.
त्याच्या अनुयायांनी तेव्हा पेटवलेल्या ज्वाला आणि त्यांचे भक्त आता देत असलेल्या शिव्या शापांचा दोष त्या महात्म्याचा नाही – हे कळायला लागतं.
इंग्रजांकरवी लाला लजपतरायांवर लाठीचार्ज होतो पण त्यांना बापूंवर तसं करता येत नाही – ह्या मागे गांधींनी इंग्रजांची ओळखलेली नस होती, हुशारीने केलेले “सविनय” कायदेभंग होते – हे दिसायला लागतं…
अठरापगड जातीत विभागलेल्या, भाषा-प्रांत-धर्म चे फुत्कार धुमसत असणाऱ्या देशाला एका ध्येयामागे धावण्याची चेतना निर्माण करणारा, एका वस्त्रानिशी दांडी यात्रा करणारा, “वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीर पराई जाणे रे” म्हणत अध्यात्म आणि राष्ट्र कार्य चलाखीने पण सचोटीने गुंफणारा बापू हळूहळू उलगडायला लागतो…
आणि…गरम डोक्याच्या तरूणातून घडलेला, पूर्ण परिपक्व झालेला माणूस पुन्हा मोहनदास करमचंद गांधीच्या प्रेमात पडतो.
थँकफुली, ह्या प्रेमात पडताना सावरकर द्वेष करायची गरज नसते. नेताजींना तुच्छ लेखायची गरज नसते. भगतसिंगांचा अतुलनीय त्याग झिडकारायची गरज नसते. ह्या सर्वांसकट आणि ह्या सर्वांबरोबर गांधीजी आवडू शकतात – ही अक्कल येते.
ही अक्कल, दुर्दैवाने, प्रत्येकाला येत नाही आणि ज्याला येते – त्याचे जीवनातले २५-३० वर्ष जावे लागतात – हे ना गांधींचं पाप आहे ना सावरकरांचं. हे पाप प्रचारकी भाटांचं. दोन्ही बाजूच्या.
बापू, तात्याराव, बाबासाहेब, नेताजी, आझाद…ह्या सर्वांच्या पुण्याईच्या समष्टीतून स्वातंत्र्य साध्य आणि सिद्ध होत असतं, हा साधा सरळ इतिहास आहे. त्यात नसलेले कंगोरे शोधून आपण आपल्याच भविष्याची माती करून घेऊ नये.
“राष्ट्रपिता” माना अथवा मानू नका – हे साधं सरळ लॉजिक समजून घ्या…आणि फॉर गॉड्स सेक – पुढे जा. मूव्ह ऑन. बस्स. तेवढं केलंत तरी पुरे.
बापूंना काय किंवा तात्यारावांना काय, ह्याशिवाय आणखी काय हवं असणार?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.