टीव्हीद्वारे होणारी ‘पायरसी’ रोखण्यासाठी केली जाणारी ही युक्ति नेमकी आहे तरी काय?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
टीव्ही तर आजकाल आपल्या सर्वांच्याच घरी आहे. जेव्हा टीव्ही आला तेव्हा त्याला इडियट बॉक्स म्हणून बऱ्याच जणांनी हिणवल, पण आज याच टीव्हीने लोकांच्या आयुष्यात वेगळीच क्रांति घडवली आहे!
एक काळ असा होता जेव्हा वस्तीतील एखाद्या धनाढ्य व्यक्तीच्याच घरी टीव्ही हा असायचा. धनाढ्य ह्याकरिता कारण त्याच्या घरी टीव्ही होता.
आणि रामायण-महाभारत यांसारख्या मालिका लागल्या किंवा विक एंडला दूरदर्शनवर एखादा चित्रपट लागलेला असला की वस्तीतील सर्वजन त्या व्यक्तीच्या टीव्हीला सार्वजनिक टीव्ही मानून त्याच्या घरी ठाण मांडून बसायचे.
आता तर हा टीव्ही २४ तास झाला आणि नंतर एलइडी टीव्ही, फ्लॅट टीव्ही पासून स्मार्ट टीव्ही पर्यंत वेगवेगळे प्रकार आले आहेत!
शिवाय त्यात केबल आणि डिजिटल सेट टॉप बॉक्स यांनी आणखीन भर घातली आहे!
आज आपल्या प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहे आणि नसला तरी मोबाईल/लॅपटॉप तर आहेच त्यामुळे ते त्या काळचं टीव्हीच क्रेझ आता राहिलेलं नाही.
असो… तर मुद्दा हा की आपण सर्वांनीच कधी ना कधी टीव्हीवर येणारे कार्यक्रम बघितले असतील.
तेव्हा कार्यक्रमाच्या मध्येच आपल्या टीव्ही स्क्रीनवर एका पट्टीत काही अंक येतात आणि काही वेळानी निघून जातात. हे कधी तुम्ही नोटीस केले आहे का?
कधी विचार केला आहे का की हे अंक असे अचानक मध्येच का येत असावे आणि त्या अंकांचं अश्या प्रकारे टीव्ही स्क्रीनवर येण्याचं कारण काय असेल ते?
आणखी एक गोष्ट सांगा, तुम्हाला असं वाटत का? की ते अंक त्या चॅनेलच्या कंट्रोल रूम द्वारे किंवा सॅटेलाईट द्वारे दाखवले जात आहेत?
आणि तुमच्या टीव्हीवर जे अंक दिसतात तेच जगातील सर्व टीव्हीवर दिसत असतील? जर तुम्हालाही असा गैरसमज असेल तर ही माहिती तुम्ही नक्की वाचायला हवी…
कधी टीव्ही स्क्रीनच्या कोपऱ्यात तर कधी अगदी आपल्या अभिनेत्याच्या चेहऱ्यावर दिसणारे हे अंक पूर्णपणे युनिक असतात.
म्हणजेच जे अंक तुमच्या टीव्हीस्क्रीनवर दिसतात ते ह्या जगातील आणखी कुठल्याही टीव्हीवर दिसत नाही.
तुम्हाला दिसलं असेल की हे अंक नेहेमी ८ डीजीटचे असतात. ह्यामध्ये केवळ अंकच नाही तर इंग्रजी अक्षर आणि १-० पर्यंतचे आकडे असतात.
यांची संरचना रॅण्डम पद्धतीची असते. काही सेकेंदांकरिता दिसणारे हे अंक अचानक गायब देखील होतात.
आता नेमके हे अंक का दिसतात आणि त्याचा उपयोग काय हे जाणून घेऊया…
तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या ह्या अंकांच्या माध्यमातून डिजिटल टीव्ही प्रदाता किंवा चॅनेल हे माहित करू शकते की संबंधित अंक असलेला सेटटॉप बॉक्स कुठल्या उपभोक्त्याच्या घरी लावण्यात आला आहे.
तुमच्या टीव्ही स्क्रीनवर अनेक चॅनल्सवर वेगवेगळ्या कार्यक्रमात दिसणारे हे अंक काही विनाकारण दिसत नसतात, तर त्यांचा उपयोग हा पायरेसी रोखण्याकरिता केला जातो.
यामागील कारण म्हणजे, जर कधी कुणी आपल्या घरच्या टीव्हीवर येणारा कार्यक्रम किंवा चित्रपट कॅमेऱ्याच्या माध्यमातून रेकॉर्ड केला.
तर तो पायरेटेड व्हिडिओ पुन्हा कुठे दाखवला गेला तर त्याच्या रेकॉर्डिंगमध्ये हे अंक दिसतील,
आणि त्याद्वारे तो व्हिडीओ कुठल्या घरातील टीव्हीवरून रेकॉर्ड करण्यात आला आहे हे टीव्ही कंपनी किंवा चॅनलला माहित होईल.
कधी कधी महागडा शो, चित्रपट प्रीमियर, अवॉर्ड शो किंवा एखादा महत्वपूर्ण इवेन्ट इत्यादींचे प्रसारण टीव्हीवर एकदाच केले जाते.
पण काही लोक त्या कार्यक्रमांचे टीव्हीवरून रेकॉर्डिंग करून म्हणजेच पायरेटेड व्हिडीओ बनवतात.
त्यानंतर त्या व्हिडीओला कुठल्याही प्रायव्हेट चॅनलला थोड्या-बहुत किमतीत विकले जाते. किंवा इंटरनेट नाहीतर टोरेंट सारख्या साईटवर ते व्हिडीओज टाकले जातात.
ह्यामुळे त्या चॅनलचे आर्थिक नुकसान होते. याच पायरसी आणि त्यातून होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्याकरिता टीव्ही प्रसारण कंपनी प्रत्येक टीव्ही स्क्रीनवर एक असा युनिक आणि रॅण्डम कोड अधून-मधून डिस्प्ले करत असते.
जो की सोफ्टवेअर द्वारे पूर्णपणे ऑटोमेटेड असतो. तो अंक कधीही कुठेही दिसतो. ह्यामुळे पायरेसी वर आळा घातला जातो.
टीव्हीद्वारे होणारी पायरेसी थांबविण्याची ही अनोखी पद्धत खूप लाभदायक आहे…
पायरसीच्या अनधिकृत व्यवसायामुळे अनेक टीव्ही चॅनेल्स आणि निर्मिती संस्थांचे अतोनात नुकसान होते. एखादा चित्रपट चित्रपटगृहात चालू असताना त्याचा व्हिडीओ बनवून तो विकला जातो.
तसेच टीव्ही कार्यक्रमाच्या बाबतीतही होते. एकदा प्रसारित झालेला कंटेंट घेऊन तो पुन्हा इंटरनेट सारख्या सहज उपलब्ध असणाऱ्या माध्यमांवर टाकून पैसा कमावला जातो.
टीव्हीवर अधून मधून दिसणारे हे आकडे या अनधिकृत व्यवसायाला काही प्रमाणात आळा घालण्यात यशस्वी ठरले आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.