रात्र नीट जावी असं वाटत असेल, तर ह्या १५ गोष्टी करणे टाळा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
चांगली झोप तर सर्वांनाच हवी असते. कारण ती आपल्या मानसिक आणि शारीरक आरोग्यासाठी अतिशय महत्वाची असते. डॉक्टर देखील रात्री ८ तासांची झोप घेण्याचा सल्ला देतात.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपली दिनचर्या एवढी अस्ताव्यस्त झालेली आहे, की आपल्याला ही चांगली झोप मिळणेच कठीण झाले आहे.
आपल्याला हे तर माहित आहे की चांगली झोप आपल्यासाठी आवश्यक आहे पण त्यासाठी काय करावे आणि काय करू नये हे आपल्याला ठाऊक नसते.
असे अनेक जण आहेत, जे रोज वेळेवर झोपतात. ‘केवळ वेळेवर झोपल्याने चांगली आरोग्यदायी झोप मिळते का?’, ‘वेळेवर झोपायला गेलात तरी त्याच वेळी झोप लागते का?’ याचं उत्तर नाही असं आहे.
याचे कारण म्हणजे तुमच्या चुकीच्या सवयी! ज्यामुळे तुमची झोप डिस्टर्ब होते. तुम्ही झोपण्याआधी काय काय करता यावर तुमची झोप कशा प्रकारची असेल हे अवलंबून असते.
जर तुम्हाला चांगली आणि शांत झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वीच्या तुमच्या काही वाईट सवयी तुम्हाला सोडाव्या लागतील. आज आम्ही तुम्हाला तुमच्या त्याच चुकीच्या सवयींविषयी सांगणार आहोत.
१. फोन किंवा लॅपटॉपचा वापर :
रात्री झोप येत नाही म्हणून अनेकजण फोन किंवा लॅपटॉप घेऊन बसतात. पण खरे सांगायचे तर तुम्हाला झोप न येण्याचे कारण हेच ठरत. स्मार्टफोन्स आणि लॅपटॉप म्हणजेच तुमचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स झोपेत अडथळा ठरतात.
ही गॅजेट्स तुमच्या डोक्याला स्टिम्युलेट करतात आणि तुम्हाला जागे ठेवतात. त्यामुळे झोपण्याआधी तुमचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरण्याची सवय बंद करा.
२. रात्री ऑफिसचे ईमेल्स चेक करणे :
दुसऱ्या दिवशी आपण जे काम करणार आहोत त्याचा ताण रात्री घेऊ नका. रात्री इमेल्स वाचल्याने हा ताण वाढतो. काम कमी होणार नाही हे माहित असूनही आपण इमेल्स वाचतो. ही सवय सोडायला हवी.
इमेल्स वाचणे अत्यावश्यक असेल तर झोपण्याच्या तासभर आधी ते वाचा. जेणेकरून तुम्हाला आलेला तणाव कमी करायला तुम्हाला वेळ मिळेल आणि त्यामुळे तुमची झोप खराब होणार नाही.
३. झोपण्याआधी भांडण करू नये :
कुठलेही भांडण हे सहजासहजी थांबणारे नसते. रात्री तुम्ही एखाद्या व्यक्तीशी भांडलात आणि मग झोपलात तर तुमची रात्रीची झोप खराब झालीच म्हणून समजा.
अनेकदा असे होते की आपण दुखावलेले असतो. कधी कधी रडत असतो. भांडणाचा खूप विचार करत असतो. यामुळे चांगली झोप लागणे अशक्यच! त्यानंतर याचा परिणाम तुम्हाला दुसऱ्या दिवशीही जाणवेल. त्यामुळे शक्यतोवर झोपण्याआधी भांडणे टाळा.
४. झोपण्याआधी अंघोळ करणे :
अनेकांना झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याची सवय असते. अंघोळ केल्याने रात्री चांगली झोप लागते असा समज असतो. पण हा निव्वळ एक गैरसमज आहे.
रात्री अंघोळ केल्याने आपल्या शरीराचे तापमान कमी होते. तुम्ही गरम पाण्याने अंघोळ केली तर तुमच्या शरीराचे तापमान वाढण्याची शक्यता असते. या दोन्ही गोष्टी तुमच्या शरीरासाठी चुकीच्या आहेत. यामुळे झोपेवर परिणाम होतो.
रात्री अंघोळ करू नका. किंवा झोपण्याच्या आधी अंघोळीची वेळ ठरवा. म्हणजे तुमच्या शरीराला त्याच्या नॉर्मल तापमानात येण्यासाठी वेळ मिळेल.
५. झोपण्यापूर्वी काहीही खाणे :
हल्ली लोकांची दिनचर्या एवढी वाईट झाली आहे की, कितीही प्रयत्न केले तरी आपण त्यामध्ये समतोल राखण्यात अयशस्वीच होतात. दिवसभराचे काम, संध्याकाळी घरातील कामं आणि त्यानंतर जेवण!
झोपायच्या अगदी आधी जेवायची सवय अनेकांना असते. पण ही सवय आपल्या झोपेकरिता आणि आरोग्याकरिता देखील हानिकारक आहे. यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो. तसेच तुम्हाला अॅसीडीटीची समस्याही उद्भवू शकते.
६. झोपण्याआधी अतिप्रमाणात पाणी पिणे :
फक्त रात्रीच नाही तर दिवसभर स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप गरजेचे असते. पण म्हणून रात्री झोपण्याआधी अति प्रमाणात पाणी पिणे चुकीचे आहे.
स्वस्थ राहण्यासाठी दिवसभरात ६-८ ग्लास पाणी पिणे गरजेचे असते. पण झोपण्याआधी जास्त पाणी पिऊ नका, त्यामुळे तुम्हाला वारंवार वॉशरूमला जावे लागू शकते. ज्याने तुमची झोप नक्कीच मोडेल.
७. झोपण्याआधी कॅफिनयुक्त पदार्थाचे सेवन करणे :
झोपण्याआधी कॅफिनयुक्त पदार्थाचे सेवन केल्याने तुमची झोप बिघडू शकते. कॅफिनयुक्त पदार्थ म्हणजे केवळ कॉफी नाही तर चहा आणि चॉकलेटचा सुद्धा यात समावेश होतो.
तुम्हाला भले चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर चांगली झोप लागते असं वाटत असलं तरी तुमच्या झोपेकरिता हे कधीही चांगले नाही.
८. झोपण्याआधी मद्यपान किंवा धुम्रपान करणे :
मद्यपान हे तर सहसा झोपण्यापुर्वीच केले जाते. पण हे देखील तुमच्या झोपेकरिता चांगले नाही. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागणार नाही.
मद्यपानासोबतच झोपण्याआधी धुम्रपान करणे हे देखील चांगली झोप न येण्याचं एक कारण आहे. त्यामुळे झोपण्याआधी धुम्रपान करणे शक्यतोवर टाळायला हवे.
९. खोलीचे तापमान जास्त ठेवून झोपणे :
अनेकांना त्यांच्या खोलीचे तापमान जास्त ठेवून झोपणे आवडत असेल. पण हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. रात्री खोलीचे तापमान थोडे कमी ठेवा आणि अंगावर चादर घेऊन झोप यामुळे तुम्ही चांगल्या आणि शांत झोपेचा अनुभव घेऊ शकाल.
१०. जास्त विचार करणे :
झोपण्याआधी अति विचार करणे किंवा विचार करत करत झोपणे हे देखील चुकीचे आहे. कारण चांगली झोप लागण्याकरिता तुमचे मन अगदी शांत असणे खूप गरजेचे असते.
तुमच्या डोक्यात अनेक प्रकारच्या चिंता घर करून बसल्या तर तुम्हाला नीट झोप येणार नाही. म्हणून झोपण्यापूर्वी मन शांत ठेवा आणि डोक्याला जरा विश्रांती द्या.
११. रात्री जीमिंग करणे :
कुठल्याही प्रकारचा व्यायाम करणे हे शरीरासाठी कधीही चांगलेच. पण तो व्यायाम कधी करावा हेदेखील तेवढेच महत्वाचे आहे. काही लोकांना रात्री जिमला जाणे आवडते तर काहींना वेळेअभावी तसे करावे लागते.
पण झोपण्यापूर्वी जीमिंग करणे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे तुमचा पल्स रेट वाढतो.
१२. दुपारी झोपणे :
या सवयीचा आपल्या झोपेवर खूप परिणाम होतो. दुपारी झोपल्याने तुमची रात्रीची झोप खराब होऊ शकते.
दुपारी झोपणे टाळा. किंवा झोपायचेच असेल तर तुम्ही एखादी पावर नॅप घ्या. पण ही पावर नॅप २० मिनिटांपेक्षा अधिक नसावी.
१३. सकाळी जास्त वेळ झोपणे :
सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने रात्री लवकर झोप लागत नाही. याचा परिणाम दैनंदिन जीवनावर सुद्धा होतो. त्यामुळे रात्री वेळेवर झोपा आणि सकाळी वेळेवर उठा…
१४. झोपण्याआधी टीव्ही पहाणे :
अनेकांना रात्री झोपण्याआधी टीव्ही बघण्याची सवय असते. दिवसभराचा थकवा विसरण्यासाठी, अंथरुणावर पडून आपण टीव्हीवर आपला आवडता कार्यक्रम बघत असतो.
पण ही सवय चुकीची आहे. यामुळे तुम्ही तुमचा आवडता कार्यक्रम बघण्यात व्यस्त होऊन जाता. झोप नाहीशी होते. त्यानंतर तुम्हाला लवकर झोप येणार नाही.
१५. पाळीव प्राण्यांना जवळ घेऊन झोपणे :
पाळीव प्राण्यांना जवळ घेऊन झोपणे बंद करा. ही सवय तुमच्या झोपेकरिता चांगली नाही. कुत्रा, मांजर असे प्राणी, रात्रभर हालचाल करत असतात. त्यामुळे त्यांना जवळ घेऊन झोपल्याने तुमची झोपमोड होत राहील. तुम्हाला हवी तेवढी आणि शांत झोप मिळणार नाही.
सुखाची आणि शांत झोप हे देखील आपल्याआरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे वरील गोष्टी टाळा आणि निवांत झोपेचा आनंद घ्या…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.