“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो….मातांनो”- वक्तृत्वावर खिळवणारं व्यक्तिमत्व
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : डॉ. परीक्षित शेवडे
===
“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो….”“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो….” केवळ हे शब्द कानावर पडण्याचा अवकाश मात्र की; सारे वातावरण
“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा… विजय असो!!!”, “अरे आवाज कुणाचा…शिवसेनेचा!!!”
अशा गर्जनांनी दणाणत असे आणि क्षणार्धातच हा सगळा जल्लोष पुढे सुरु होणारे भाषण ऐकण्यासाठी शांतदेखील होत असे.
ही केवळ शब्दांची किमया नसते; याकरता केवळ फर्डा वक्ता असून चालत नाही तर त्यासाठी; जनमानसाची नस अचूकपणे ओळखणे गरजेचे असते.

साऱ्यांनाच ती ओळखणे जमतेच असे नाही. परंतु ज्यांना ती साधते अश्या व्यक्ती इतिहास घडवतात.
अशाच प्रकारे; गेल्या ४० वर्षांत ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राचा इतिहास घडवला असे व्यक्तिमत्व म्हणजेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे!!
महाराष्ट्राला वक्तृत्वाची गौरवशाली परंपरा लाभली आहे. अनेक कसलेले वक्ते या मातीने देशाला दिले. राजकारणात वक्तृत्व हा अत्यंत महत्वाचा असा गुण.
महाराष्ट्रातील ‘राजकीय वक्ते’ विचारात घेता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे यादीतले आघाडीवर असलेले नाव.
एक पक्ष, एक मैदान, एक नेता अशी शिवसेना या पक्षाची ओळख. बाळासाहेबांची मुलुखमैदानी ठाकरी तोफ शिवतीर्थावरून कडाडणे ही खरे तर शिवसैनिकांसाठी पर्वणीच.
बाळासाहेबांची भाषणाची शैली संपूर्णतः निराळी होती. कारण जे त्यांच्या पोटात असे तेच ओठात येत असल्याने त्यास खरेपणाची किनार होती.
साधारणतः राजकीय पुढाऱ्यांची भाषणे काही तज्ञांनी लिहून दिलेली असतात. बाळासाहेबांची भाषणे मात्र तशी नव्हती. ती थेट ‘दिल से’ असायची.
याबद्दल एकदा एका मुलाखतीमध्ये विचारल्यावर त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिले की;
“अरे भाषणं जर इतरांच्या डोक्यानं लिहून घ्यायची असतील तर भाषण लिहिणाऱ्या व्यक्तीलाच मी शिवसेनाप्रमुख का करू नये??”

मुळात व्यंगचित्रकार असल्याने त्यांच्या भाषणातून मिश्कीलपणा पदोपदी डोकावत असे.
मग; कुठल्यातरी राजकीय नेत्याचा उल्लेख ‘मैद्याचं पोतं’ तर आणि कोणाचा ‘चार्ली चाप्लीन’ असा होत असे आणि समोरील जनसमुदायातून हास्याची कारंजी उडत असत.
बाळासाहेबांची सभा ही खमंग मेजवानीच असे. कोणाहीवर टीका करताना त्यांनी कसलीच भीडभाड बाळगली नाही.
अगदी शब्दांचीदेखील नाही. त्यामुळेच बाळासाहेबांचे भाषण म्हणजे ‘म’कार आणि ‘भ’कारांची सढळ हस्ते केलेली पखरण असायची.
कोणतीही अलंकारिक भाषा न वापरता जनसामान्यांच्या मनातील विचार; त्यांच्याच शब्दांमध्ये मांडण्याचे कसब त्यांच्याकडे होते. त्यामुळेच ‘वक्ता’ म्हणूनदेखील बाळासाहेब तुफान लोकप्रिय ठरले.
बाळासाहेबांनी केलेल्या नकलींचे अनेक व्हिडीओ युट्युबवर उपलब्ध आहेत आणि आवडीने पाहिले जातात.
चांगल्या वक्त्यास कुठल्याही प्रकारच्या लकबी असू नये असे म्हणतात. कारण त्यामुळे लोकांचे लक्ष भाषणापेक्षा अधिक लकबिंकडेच राहते व अनेकदा या लकबी थट्टेचा विषय होवू शकतात.
बाळासाहेबांच्या बाबतीत मात्र हे अगदी उलट होते.
बोलता-बोलता डाव्या हाताने नाकावरचा जाड फ्रेमचा चष्मा सारखा करणे असो वा हातातली रुद्राक्षांची माळ असो.
सहज डावा हात कमरेवर ठेऊन बोलणे असो वा अंगावरील भगवी शाल खांद्यावर मागे ओढून घेणे असो.
त्यांच्या प्रत्येक हालचालीमध्ये एक नजाकत होती. आणि लोकांना भुरळ घालण्याची क्षमता त्यामध्ये होती. सामान्य माणसांची मने पेटविण्याचे सामर्थ्य त्यांच्या जळजळीत शब्दांमध्ये होते.
त्यामुळेच सभेकरता त्यांना कधीही माणसं भाड्याने आणावी लागली नाहीत; ती स्वतःहून आली…. तीदेखील हजारो-लाखोंच्या संख्येने…
आपल्या हातातील कामे टाकून; एखाद्या व्यक्तीचे भाषण ऐकायला इतक्या प्रमाणात माणसे जमणे ही काही मस्करी नव्हे!!
शिवसेनाप्रमुख हे आमचे लहानपणापासूनचे आकर्षण. माझ्या व्याख्यानांच्या विषयांत ‘हिंदुहृदयसम्राट’ या बाळासाहेबांवर आधारित विषयाचा आवर्जून समावेश केला.
व्याख्यान संपल्यावर अनेक स्थानिक शिवसैनिक भेटायला येतात आणि साहेबांबद्दलच्या त्यांच्या काही आठवणी सांगतात.

एके ठिकाणी व्याख्यान झाल्यावर; तेथील शिवसैनिकाने लोकांची मने प्रज्वलित करण्याच्या साहेबांच्या कसबाबद्दलचा एक किस्सा सांगितला.
२००४ सालची गोष्ट. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर थोड्याच दिवसांत झालेल्या या सभेत शिवसेनाप्रमुख बोलत असताना जमलेल्या शिवसैनिकांना उद्देशून म्हणाले;
“तुम्ही खचलात का??” आणि तमाम शिवसैनिकांकडून “नाही…नाही” चा गजर झाला…तेव्हा पुढे ते म्हणाले,
“पराभवाने खचून जाणारा हा वाघ नाही. हा ढाण्या वाघ आहे. तो मेला नाही. त्याला जखमी करण्यात आले आहे. हा जखमी झालेला वाघ एक ना एक दिवस पुन्हा त्वेषाने झेप घेतल्याशिवाय राहणार नाही.
ढाण्या वाघ पिंजऱ्यात अडकलेला दिसतो; म्हणून त्याला वाकुल्या दाखवून चिडवू नका. बिबळ्या बाहेर पडला की काय होते ; हे तुम्हा मुंबईकरांना माहितीच आहे.
शिवसेनेच्या बिबळ्याने पंजा मारून पिंजरा तोडला आणि बाहेर आला तर त्याच्या अंगावर जेवढे ठिपके असतात; त्यापेक्षा जास्त ठिपके तुमच्या कपड्यांवर पडलेले दिसतील!!”
आपल्या नेत्याचे असे ओजस्वी भाषण ऐकल्यानंतर; शिवसैनिकांमध्ये जोश न संचारल्यासच नवल!!
भाषण केवळ जोरकस करूनही उपयोग नाही. त्याला भक्कम पायादेखील असणे आवश्यक असते. हा पाया भक्कम होतो तो वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास असल्याने.
राजकारणात असूनही विविध विषयांत माहिती वा त्यांत रस असणे हा एक दुर्मिळ गुण. सहसा हा गुण ज्यांच्याकडे असतो ते नेते आपल्या भाषणांत या गुणाचा पुरेपूर उपयोग करून घेतात.
स्व. प्रमोद महाजन यांचं नाव याबाबत आवर्जून नमूद करावेसे वाटते.

बाळासाहेबांनाही हा गुण अवगत होता. त्यामुळेच विषय राजकीय नसला तरी त्यांनी बोलायला सुरुवात केल्यावर त्यात ‘ऐकण्यासारखे’ बरेच काही असे.
त्यांच्या भाषणांचा आस्वाद आजही युट्युबमुळे आमच्या पिढीला घेता येत आहे….येणाऱ्या पिढ्यांना घेता येणार आहे.
त्यांची राजकीय मते मान्य नसली तरी भाषणे आवडत असल्याने त्यांना आवर्जून उपस्थिती लावणारे श्रोते हमखास आढळतात हे त्यांच्या वक्तृत्वाचे निर्विवाद यश होय.
श्रोत्याच्या थेट काळजाला हात घालण्याचे कसब शिवसेनाप्रमुखांना पूर्णतः अवगत होते; हेच त्यांच्या यशस्वी वक्तृत्वाचे गमक आहे असे म्हणावे लागेल.

बाळासाहेब जाऊन आता ६ वर्षे झाली.
त्यांच्या पश्चात राजकीय समीकरणे काय आहेत हा स्वतंत्र विषय असू शकतो मात्र त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय वक्तृत्वात निर्माण झालेली पोकळी सतत जाणवत राहते.
या बेफाट राजकीय वक्त्याला मानाचा मुजरा!!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.