प्रत्येक भातीयाने अंगीकारावीत अशी मूलभूत कर्तव्ये – त्यासाठी ‘स्वयंप्रेरणा’ अत्यावश्यक!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : चेतन जोशी
===
भारतात अनेक कायदे आहेत आणि ते कायदे प्रत्येक भारतीय जाणतो हे गृहीतक न्यायव्यवस्था मानते.
त्यामुळे न्याय करताना आरोपी नागरिकाला किंवा गुन्हा करणाऱ्याला कायदा हा माहित होता की नव्हता याचा विचार न्यायालय करीत नाही.
अर्थात प्रत्येक कायदा हा प्रत्येकाला माहित असावा असे गृहीत धरणे अतर्क्य आहे पण शेवटी न्यायालयाला देखील काही मर्यादा आहेत.
भारतात कायदे सोडा पण बहुतांश नागरिकांना त्यांची मुलभूत कर्तव्येच माहित नाहीत. त्याचे ज्ञान जरी त्यांना मिळाले तरी देखील देश हा शिस्तबद्ध समाज निर्मितीकडे यशस्वीपणे वाटचाल करू शकतो.
ही मुलभूत कर्तव्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षणामध्ये समाविष्ट करून न्यायालयाच्या त्यासंबंधीच्या विविध निकालांच्या पार्श्वभूमीवर शिकवली जाणे ही काळाची गरज आहे.
भारताला महासत्ता बनविण्यासाठीचे ते एक महत्वाचे आणि पाया रचणारे पाऊल ठरेल.
प्रजासत्ताकदिन हा लाऊडस्पीकर लावून, सत्यनारायणाची महापूजा ठेवून, फक्त ध्वजारोहण करून साजरा करण्यापेक्षा या नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांचा जागर करून साजरा करणे हा केव्हाही उत्तम पर्याय असेल.
भारतीय संविधानात ५१क ते ५१ट ही कलमे भारतीय नागरिकांची मुलभूत कर्तव्ये काय आहेत हे सांगतात.
खरतर प्रत्येक भारतीयासाठी संविधानाची सुरुवात ही या कलमांपासून होते असे मानायला हरकत नसावी.
भारतीय नागरिक कसा असावा, त्याची कृती कशी असावी, त्याचे विचार कसे असावेत हे या कलमांद्वारे स्पष्ट केले गेले आहे. या कलमातील तरतुदी पुढील प्रमाणे आहेत.
१. संविधानाचे पालन करावे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे;
संविधानाचे पालन करून, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर हा स्वतः करावयाचा आहे ही बाब सर्वप्रथम ध्यानात घ्यावी.
जर कुणी राष्ट्रध्वज किंवा राष्ट्रगीताचा अपमान करीत असेल तर संविधानाच्या कक्षेत राहूनच त्याचा विरोध करायचा आहे.
तोडफोड किंवा मारहाण करून नाही. तसेच हा आदर दुसऱ्याकडून बळे करून घ्यायचा नसून तो प्रथम स्वतः करावयाचा आहे.
स्वतःमध्ये जोपर्यंत देशभावना निर्माण होत नाही तो पर्यंत ती दुसऱ्यापर्यंत पोहोचणार तरी कशी?
उलट स्वतः न अंगीकारता, दुसऱ्याला देशभावना शिकवण्याच्या नादात स्वतःमध्ये जन्मतःच असलेली देशभावना नष्ट होण्याचाच संभव अधिक. नाही का?
२. ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे;
खरतर या कलमामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समिती ‘…. उदात्त आदर्शांची जोपासना करून …’ हे वाक्य ‘…. उदात्त “अहिंसक” आदर्शांची जोपासना करून …’
अश्या पद्धतीने लिहू शकली असती परंतु त्यांनाही उदात्त आदर्श हे एकाच प्रवृत्तीचे नसतात आणि स्वातंत्र्यपूर्व काळात ते नव्हते याची खात्री असल्यामुळेच त्यांनी उदात्त आदर्श इतकच म्हटलं आहे.
ज्यांनी ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी बलिदान दिलं आहे, स्वातंत्र्यलढ्याला ज्यांच्या प्रगल्भ विचारांमधून स्फूर्ती आणि वेळोवेळी नवचेतना मिळालेली आहे त्या सर्वांचा आदर करून त्यांच्या आदर्शांना अंगी बाणवून आपल्या देशाचे स्वातंत्र्य चिरायू ठेवायचे आहे.
राज्यघटनेला इथे या कलमासाठी ‘राष्ट्र’ अभिप्रेत आहे हे विसरून चालणार नाही.
देशांतर्गत अहिंसा पाळूनच हे ध्येय प्रत्येकाला साध्य करायचे आहे आणि वेळ पडली तर सैन्यात सामील होऊन देशासाठी लढायचे आहे.
३. भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे;
सार्वभौमिकता म्हणजे आधिपत्य, किंवा याठिकाणी आपण त्याला स्वातंत्र्य म्हणू, तर हे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता अबाधित ठेवणे आणि त्यास सकारात्मक वैचारिक संरक्षण देऊन अधिक मजबूत करणे हे भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.
४. देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे;
विध्वंसक वृत्ती आणि विचार यापासून देशाचे संरक्षण करणे हे नागरिकाचे कर्तव्य आहे.
परंतु हे करताना संविधानाने घालून दिलेले बंधन देखील पाळायचे आहे आणि कायद्याच्या कक्षेत राहून, कायद्याला मदत करून नागरिकांनी हे कर्तव्य बजावायचे आहे.
हे संरक्षण करताना देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेला बट्टा लागणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यायची आहेच.
५. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे; स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे;
हे कर्तव्य कितीजण बजावतात ? हा एक गहन प्रश्न आहे. वरील कर्तव्य हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आहे. त्याला कोणीही अपवाद नाही.
पण भेदाभेद करणारे आणि संविधानाचा अभिमान सांगणारे बहुतांश नागरिकच या कर्तव्याला हरताळ फासतात.
या कर्तव्याची पायमल्ली ही लोकशाहीच्या पंचवार्षिक निवडणूक उत्सवात तर ठरलेलीच आहे. या कर्तव्याचे पालन जोपर्यंत काटेकोरपणे होत नाही तोपर्यंत भारतीय राज्यघटनेचे उद्दिष्ट साध्य होणार नाही.
स्त्रियांची प्रतिष्ठा म्हणजे काय? याबद्दलच प्रचंड अज्ञान आहे. स्त्रियांना स्वच्छ सार्वजनिक शौचालये या गरजेतून या प्रतिष्ठेची सुरुवात होते जी आजही स्त्रियांना मिळत नाही.
यावर पुढे जाऊन फार बोलता देखील येणार नाही कारण या देशात विचार कोणताही असो तो स्त्रियांना दुय्यमच समजतो. हे बदलावे लागेल. त्यासाठी स्वतःला बदलावे लागेल.
६. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे;
वारसा हा ऐतिहासिक, धार्मिक किंवा वैचारिक असू शकतो. भारताच्या संमिश्र संस्कृतीचे भान ठेवत त्या वारश्याचे मोल जाणून त्याचे जतन हे नागरिकांनी करायचे आहे.
आज त्या अस्तित्वात असलेल्या वारशाचे जतन हे होत नसून देश हा आर्थिक दृष्टीने तोट्यात असताना नवनवीन खर्चिक स्मारके उभारून केवळ देखावे निर्माण केले जात आहेत.
७. वने, सरोवरे, नद्या, व अन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे;
आज पर्यावरणविषयक कायदे सर्रास पायदळी तुडवले जातात, नैसर्गिक पर्यावरणाला आव्हान उभे राहील असे भौगोलिक बदल केले जातात.
जे सजग नागरिक त्याविरोधात उभे ठाकतात त्यांच्या मागे इतर नागरिक उभे रहात नाहीत. पर्यावरणाचा विचार करून बनविलेले कायदे विशिष्ट वर्गाचा फायदा बघून बदलले जातात.
प्राणीमात्रांविषयी दयाबुद्धी बाळगणाऱ्याला अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
८. विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे;
हे आपल्या राज्यघटने मध्ये आहे हेच मुळात बऱ्याच जणांच्या पचनी पडणार नाही. कारण हे अंगीकारायचे म्हणजे स्वतःचा धर्म, जात, पंथ यांच्याशी तडजोड करावी लागणार.
पुन्हा घटनेनेच धर्मांचा, भाषेचा, विविध परंपरांचा आदर करा असे वरील कलमात सांगितल्यामुळे हे कर्तव्य आणखी कश्यासाठी? असाही प्रश्न काहीजण विचारू शकतात.
परंतु विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन हा ‘तुम्हाला’ बाळगायचा आहे तसेच ‘तुम्हाला’ इतर धर्मांचा आदर देखील करायचा आहे. कर्तव्ये ही ‘स्वतः’ पाळायची आहेत हे इथे महत्वाचे आहे.
९. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे;
हे कर्तव्य प्रत्येक भारतीयाने अंगिकारले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा पूर्णपणे सुटेल. सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे ही भावना स्वतःमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे!
परंतु अशी भावना ज्या वयात निर्माण व्हायला हवी त्या वयात नागरिकांची मुलभूत कर्तव्ये शिकवली जात नाहीत हे दुर्दैव आहे.
१०. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे;
याचाच अर्थ नागरिक करीत असलेले स्वतःच्या अर्थाजनाचे काम किंवा सार्वजनिक आयुष्यातील सेवा या राष्ट्राच्या हिताच्या असाव्यात आणि राष्ट्राला सन्मान प्राप्त होईल अश्या असाव्यात.
११. माता-पित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा यथास्थिती पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे.
दिनांक १२ डिसेंबर, २००२ रोजी हे कर्तव्य घटनेत समाविष्ट करण्यात आले. करण्यात आले म्हणण्यापेक्षा करावे लागले. यावरून देशात शिक्षणाला दिले जाणारे महत्व लक्षात येते.
तर अशीही नागरिकांची मुलभूत कर्तव्ये. ही कर्तव्ये “आपण स्वतः किती पाळतो” हे प्रत्येकाने पडताळून पहावे.
दुसरा पाळतो कि नाही यापेक्षा स्वतः पाळतो कि नाही हे महत्वाचे. ही कर्तव्ये पाळली तर आपसूक या घटनेअंतर्गत असलेले कायदे हे पाळले जातील हे वेगळे सांगण्याची गरज आहे असे वाटत नाही.
कुठल्याही वंशपरंपरेने फुकटात मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवण्याची सवय बहुतांश नागरिकाना असते … स्वातंत्र्य ही देखील अशीच एक गोष्ट आहे.
हे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी या मुलभूत कर्तव्यांचे स्वयंप्रेरणेने काटेकोरपणे प्रत्येक नागरिकाने पालन करायलाच हवे. जय हिंद.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.