' तरुणांनो सावधान! राजकीय पक्ष/संघटना तुम्हाला वापरून घेताहेत! – InMarathi

तरुणांनो सावधान! राजकीय पक्ष/संघटना तुम्हाला वापरून घेताहेत!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

सोशल मिडीया, हे कमालीचे उथळ माध्यम होत चालले आहे. इथे घडणाऱ्या, घडवून आणल्या जाणाऱ्या बहुतांश सामाजिक, राजकीय किंवा समाजाला प्रभावित करणाऱ्या अनेक  विषयावरील चर्चा अनेकदा उथळच असतात. विशेषतः राजकीय चर्चा. त्यात खोली, अभ्यास तर नसतोच पण व्यासंगांचाही आभाव दिसतो. यामुळे ज्यांचे वाचन हे फक्त वर्तमानपत्रातील दररोजचे संपादकीय वा फेसबूकवरील posts आहे, ते लोक या माध्यामामुळे चुकीच्या बाजूस जाण्याचा धोका निर्माण होत आहे.

आपल्या मर्यादित वाचनामुळे हा तरूण वर्ग बऱ्याचदा भारताच्या विशिष्ट राजकीय व सामाजिक परिस्थिती पासून अनभिज्ञच असतो. त्यामुळे त्यांना इथे अलंकारीत व मुद्देसूदपणे लिहलेलेही खरेच वाटण्याची शक्यता जास्त असते. याचमुळे अशा उथळ विचारांच्या तरूणांना आपल्याकडे खेचण्यासाठी भारतातील सर्वच राजकीय पक्ष, संघटना खोटेपणाचा, धर्मभावना भडकावण्याचा, त्यांना कुरवाळण्याचा, देशभक्ती, देशद्रोह राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, आरक्षण, जात, धर्माचा अभिमान…ह्या भावनांचा सर्रास वापर करत आहेत. कारण  यांना वर उल्लेखित भावनांच्या आधारे तरुणांना आपल्या गोटात आणणे तुलनेने फारच  सोपे असते.

 

social-media-war-marathipizza

स्रोत

“आम्ही म्हणू तीच धर्मनिरपेक्षता/देशभक्ती/संवैधानिक भुमिका/इतिहास/संस्कृती” अशा प्रकारच्या भुमिका मग ही तरूण मंडळी घेताना दिसतात.

विविध पक्ष,संघटनांसाठी हा तरूणवर्ग एकप्रकारे ‘soft targets’ आहे. यांना भुलविणेही फारसे कठीण व वेळखाऊ नसल्यामुळे, तसेच वयाच्या विशिष्ट टप्प्यावर उसळणाऱ्या रक्तामुळे व गरम डोक्यामुळे हे आणखीनच सोपे होऊन जाते.

हे सर्व घडवून आणण्यासाठी राजकीय पक्ष, संघटना ज्या ठिकाणाहून लोकांच्या मतांची निश्चिती केली जात असते अशा मोक्याच्या ठिकाणी आपल्या लोकांना नेमतात किंवा त्यातीलच काही लोक हेरून आपल्या फायद्यासाठी त्यांना वापरतात. मागील काही वर्षात भारतात बोकाळलेला हा बौद्धिक भ्रष्टाचार पैशाच्या भ्रष्टाचारापेक्षाही जास्त धोकादायक आहे. यातून क्षुद्र तात्कालिक राजकीय फायद्यांसाठी आपल्या भविष्यकालीन पिढ्या नासविल्या जात आहेत. वाहिन्यांवरील पत्रकार, विश्लेषक सतत एका ठराविक पक्षाची व संघटनांची बाजू घेऊनच बोलताना दिसत आहेत.

“काही विरोधकांचे” तर “काही सरकारचे” अशी वाटणी झाली आहे. आपले व परके कोण – हे या काळात ठरवून, विरोधी गटातील पत्रकार, विश्लेषकांवर नियोजनबद्ध चिखलफेक होऊ लागली आहे. काही न्युज चँनेल सतत सरकारविरोधी तर काही सरकारच्या बाजूनेच भूमिका घेऊ लागल्यामुळे पत्रकारीतेची विश्वासार्हता पार धोक्यात आलेली आहे. हा बौद्धिक भ्रष्टाचार जर वेळीच थांबला नाही तर याचे वाईट परिणाम आपल्याला नक्कीच भोगावे लागतील.

television-influence-marathipizza

स्रोत

यातूनही तरूणांची भारताच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक बाबींविषयीची विशिष्ट मते तयार होत असतात. या विषयांसंबधी सतत एकच प्रकारच्या, एकाच बाजूच्या माहितीचा त्याच्यावर सतत मारा केल्यामुळेच हे घडत असते. राजकीय पक्ष, संघटनांना ही जाणीव असल्यामुळेच ते तरुणांच्या कानावर आपल्याला हवे तेच कसे पडेल याची अगत्याने काळजी घेत असतात. अश्या प्रकारच्या सततच्या प्रचारामुळेच एखाद्या प्रश्नाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त बाजू असतात आणि त्यासुद्धा बरोबर असू शकतात हेच ते विसरून जातात. बरं, ‘आपलंच मत बरोबर आहे’ हा दृष्टिकोन कुणाचाही असतोच, पण आपल्या दृष्टिकोनाविरोधात त्याच विषयावरील विरोधी मतही आपण सहिष्णुपणे ऐकून घेतले पाहिजेत – हे विसले जाऊन वाटचाल वैचारिक कट्टरतेकडे होत असते.

अशी कट्टर विचारधारा मानणारे तरूण हे कुठल्याही राजकीय पक्ष, संघटनांचे खरे अँसेट्स असतात. त्यांना जपण्यासाठी, त्यांची संख्या वाढविण्यासाठीच मग विविध प्रकारच्या conspiracy थेअरीज मांडल्या जातात, त्यांचा सतत प्रचार व प्रसार केला जातो. त्यांनाच सत्य म्हणून समाजात प्रस्थापित करून आपला राजकीय उद्देश साध्य करण्यात येतो.

Social-Media-discussions-marathipizza

स्रोत

नावात “शिव” असल्यामुळे मागे काही कट्टर शिवभक्त मावळ्यांनी मला त्यांच्या गँगमध्ये सामील केले होते – यावरून या तरूणांच्या मांईडसेट्सची कल्पना यावी. सध्याच्या काळात खरं तर धर्म हा हळूहळू निष्प्रभ होत जायला हवा होता पण भारतात मात्र याच्या उलट घडून तो अधिकाधिक प्रभावी होताना दिसतंय. हे जास्त चिंताजनक आहे. बरं या जातीय/धार्मिक अस्मिता सकारात्मक असल्या असत्या तर काही हरकतही नव्हती पण नकारात्मक अस्मिता मात्र आपल्या समाजासाठी भविष्यकाळात धोकादायकच ठरतील ज्यामुळे आपल्या राज्याचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आपल्या देशाच्या संस्थापकांपैकी एक असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांनी मांडलेले मत आजही तितकेच प्रासंगिक आहे.

उद्योगपती बिर्लांनी “मुसलमानांना पाकिस्तान मिळालाय, त्यामुळे आता उरलेल्या भागात बहुसंख्य हिंदूच राहत असल्यामुळे – आपल्या देशाला “हिंदुस्थान” असे नाव द्यावे”, अशी मागणी केली होती.

त्यांना उत्तर देताना सरदार म्हणतात:

सेक्युलॅरिझम किंवा धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था ही भूमिका आपण केवळ मूल्य म्हणूनच स्वीकारली नाही. आपल्यासाठी ती राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची आहे. तिचे मूल्याधिष्ठित महत्त्व हे – की कोणतेही लोकशाही राष्ट्र धर्मनिष्ठ असू शकत नाही. राज्यातील सर्वांना न्याय द्यायचा, त्यांना स्वातंत्र्य व समता बहाल करायची तर राजकारणाचा धर्माशी येणारा संबंध तोडावाच लागतो. जगात आज जी प्रगत राष्ट्रे आहेत त्यातील अनेकांत एका वा दोन धर्माचे लोक मोठ्या संख्येने राहणारे आहेत. मात्र त्या देशांनी स्वत:ला कोणत्याही धर्माशी बांधून घेतले नाही.

sardar-vallabhbhai-patel-with-b-d-birla

स्रोत

भारतात काश्मीर हाच केवळ अल्पसंख्यकबहुल प्रदेश नाही, पंजाबही तसाच आहे. नेफा (अरुणाचल), नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा हे प्रदेशही अल्पसंख्यकांनीच अधिक व्यापले आहेत. याखेरीज आसाम, बंगाल, केरळ, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रांत या प्रांतांतही अल्पसंख्यक म्हणविणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. एकूण भारतातील अल्पसंख्यकांची संख्या वीस टक्क्यांएवढी तेव्हा होती (व आजही आहे). एवढ्या मोठ्या संख्येला धाक दाखवून नमविणे वा अन्य कोणत्याही मार्गाने त्यांच्या धर्मश्रद्धांचा विसर पाडायला लावणे ही अशक्य कोटीतील बाब आहे. एवढ्या मोठ्या संख्येने देशात राहणाऱ्या अल्पसंख्यकांना आपले म्हणून जवळ करणे आणि राष्ट्रीय प्रवाहात आपल्यासोबत घेणे एवढेच आपल्याला जमणारे आहे.

सध्याची ही एकंदरीत परिस्थिती बघून कुणीही शहाणा व विचारी मनुष्य निराशच होईल. असाच सूर अनेक जण लावतही असतात. पण एक समाज म्हणून असेच तर क्षण हे खरे कसोटीचे असतात…! यांनाच तर निभावून न्यायचे असते…! या अशा कसोट्यांमधून, एक समाज म्हणून आपण भुतकाळात उत्तीर्ण झालो आहोत. भविष्यकाळा आपल्याला त्यांना सामोरे जावेच लागेल. आज पाश्चिमात्य लोक सगळ्यात जास्त सुसंस्कृत समजले जातात पण शेकडो वर्ष शेकडो लढाया, भीषण हिंसा करून तो समाज तसा झालाय हे आपण लक्षात घेतल्यास आपली परिस्थिती फारशी वाईट नसल्याचे आपल्या लक्षात येईल. त्यामुळेच – सावध होण्याची, सज्ज होण्याची गरज असली – तरी निराश व्हायची खरंच गरज नाही.

या परिस्थितीवर फैज अहमद फैज साहेबांनी फारच सुरेख लिहलंय, फैज साहेब म्हणतात –
“दिल मायुस तो नही

नाकाम ही तो है…

लंबी है गम की शाम

मगर शाम ही तो है…”

विशेषतः तरुण मित्रांनी यावर जरूर विचार करावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Shivraj Dattagonde

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

shivraj has 25 posts and counting.See all posts by shivraj

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?