Site icon InMarathi

ज्यू कत्तलीचा बदला: इस्राईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग २

mossad-revenge

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पहिल्या भागाची लिंक: ज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग १

===

“सांग तुझं खरं नाव काय आहे?!”

“रिकार्डो क्लेमेन्ट…”

“तेच तेच बोलू नकोस…आता खरं नाव सांगितलं नाहीस तर तुला शॉक देण्यात येईल..”

“मी रिकार्डोच आहे..”

“नाही…तू रिकार्डो फिकार्डो नाहीस..आताच खरं सांग नाहीतर…”

“ठिकाय सांगतो! मीच ओटो एडॉल्फ आईशमान…मला एक ग्लास वाइन हवी आहे”
________________
1906 साली जन्मलेला आईशमान फारसा हुशार विद्यार्थी नसल्याने सुरुवातीला तो ऑस्ट्रियामध्ये वडिलांच्या खाणीत खोदकाम करणाऱ्या कंपनीत काम करत असे. 1927 साली त्याने हिटलरची ‘नाझी पार्टी’ जॉईन केली आणि पुढे 1932 साली नाझी पार्टीच्या “शुस्टाफेल”(Schutzstaffel) ह्या सशस्त्र संघटनेत सामील झाला.

 

आधी आधी ज्यूना स्वेच्छेने देश सोडा म्हणणारी नाझी पॉलिसी सप्टेंबर 1939 मध्ये जर्मनीने पोलंडवर विजय मिळवल्यानंतर बदलली होती. आता ज्यूना जबरदस्ती जर्मनीबाहेर हाकलून लावण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.

शुस्टाफेल सह गॅस्टापोसारख्या अनेक नाझी एजन्सी हे काम बजावत होत्या. महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात पॉलिसी पून्हा पुन्हा बदलत गेल्या. आता ज्यू लोकांच्या देशांतर करण्याने देखील त्यांना समाधान होणार नव्हतं तर ज्यूंच्या सर्वनाशाने होणार होतं.

महायुद्धात जर्मनीने हंगेरी काबीज केल्यानंतर तिथल्या ज्यूंना पकडून त्यांची रवानगी काँसंट्रेशन कॅम्प्समध्ये करण्याची जबाबदारी शुस्टाफेल संघटनेवर होती. शुस्टाफेलच्या तरुण तडफदार लेफ्टनंट कर्नलने ही जबाबदारी उचलली.

लाखो ज्यूना अशा कॅम्प्समध्ये एखाद्या चेंबरमध्ये कोंबून विषारी वायू सोडून क्रूर आणि निर्घृण रित्या मारण्यात येत असे.

ऑशविट्झ कॅम्प हा सर्वात मुख्य कॅम्प जिथे 75-80% ज्यूना प्रवेश केल्या केल्या मारून टाकण्यात येत असे.

 

अशा प्रकारे शुस्टाफेलचा हा लेफ्टनंट कर्नल लाखो ज्यूंचा मारेकरी ठरला…

हा दुसरा तिसरा कोणी नसून एडॉल्फ आईशमान होता.

1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपले. हिटलरने आत्महत्या केली. शुस्टाफेल आणि गॅस्टापोच्या अनेक अधिकाऱ्यांना मित्र देशांच्या फौजांनी कैद केलं. त्यात आईशमान सुद्धा होता.

ह्या सर्व युद्ध गुन्हेगारांची रवानगी वेगवेगळ्या कॅम्प्समध्ये केली गेली. आईशमानची रवानगी त्याच्या रुडॉल्फ जानिष नावाच्या सहकाऱ्यासह विडनच्या कॅम्पमध्ये करण्यात आली. विडनमध्ये त्याने आपली ओळख बदलली, अधिकाऱ्यांना आवश्यक मजुरीमधून सूट मिळत असल्याने तो तिथे शुस्टाफेलचा जनरल एकमान म्हणून वावरला.

पुढे आईशमानची रवानगी फ्रांकोनियाच्या कॅम्पमध्ये करण्यात आली. तिथल्या काही सिनिअर शुस्टाफेल अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याने खोटी कागपदत्रे बनवून ओटो हेंनिंगर नाव धारण केलं आणि प्रेनमध्ये पळ काढला.

 

 

तिथे त्याला शुस्टाफेलच्या एका माजी अधिकाऱ्याच्या विधवा पत्नीने, नेली क्राविट्झने आसरा दिला. नेली सोबत आईशमान हॅंबर्गमध्ये पळाला आणि एवरसन नावाच्या खेड्यात 2 वर्षे लाकूडतोड्या बनून राहिला.

आपल्याभोवती अमेरिकन सैन्याचा आणि एजन्सीजचा फास बसेल ह्या भीतीने आईशमान इतर अनेक शुस्टाफेल अधिकाऱ्यांप्रमाणे जर्मनीतून इटलीद्वारे अर्जेंटिनामध्ये पळाला.

1950च्या सुरुवातीला आईशमानने जुन्या शुस्टाफेल अधिकाऱ्यांच्या ODESSA नामक संघटनेशी संपर्क साधला. त्यांनी आईशमानला एका मॉनेस्ट्रीमार्फत इटलीत पळून जाण्यास मदत केली. त्याला इटलीमध्ये फादर एड्युदोर डोमोटेरतर्फे एक आयडी कार्ड आणि बनावट पासपोर्ट देण्यात आला ज्याच्या मदतीने तो इटलीच्या जीनेव्हा बंदरामधून अर्जेंटिनामध्ये पळाला. आयडी वर नाव होतं – रिकार्डो क्लेमेन्ट.

 

 

17 जून 1950 रोजी जीनेव्हामधून निघालेलं जहाज आईशमानला 14 जुलै 1950 रोजी ब्युनोस एरिजला घेऊन आलं. आईशमानने ऑगस्ट 1950मध्ये एका CAPRI नावाच्या कंपनीत नोकरी धरली. डिसेंबरमध्ये त्याने आपल्या बायकोला गुप्त भाषेत एक पत्र पाठवून अर्जेंटिनामध्ये बोलावून घेतले.

अर्जेंटिनामध्ये आईशमानने अनेक नौकऱ्या बदलल्या. 1958च्या सुमाराला त्याने ब्युनोस एरिजच्या बँकालरीमध्ये एक जमीन खरेदी केली आणि मुलांसोबत तिथे एक घर बांधले. घराचा पत्ता होता 14-गरिबालडी स्ट्रीट.

आता आईशमान निर्धास्त झाला होता. आपण इतिहासातल्या सर्व गोष्टी मागे टाकून आलोत असा त्याचा समज झाला होता. पण कर्माने आणि मोसादने त्याचा पिच्छा सोडला नव्हता.

क्रमशः

पुढील (अंतिम) भागाची लिंक: ज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग ३

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version