Site icon InMarathi

भन्साळीच्या विकृत “लीला”

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

मी संजय लीला भन्साळी चा एकमेव “हम दिल दे चुके सनम” हा थिएटर मध्ये जावून पाहिला होता. क्रिकेट क्राईम आणि सिनेमा या तीन गोष्टी ज्या देशात लाईफ लाईन असतात त्या देशात माझ्या सारखी माणसे वाट चुकलेले कोकरं असतात. असो. संजय प्रतिभाशाली दिग्दर्शक आहे. वाद नाही, तो आउट ऑफ द बॉक्स जावून रिस्क घेतो वाद नाही.

त्याच्या कथेमध्ये स्त्री व्यक्तीरेखा कचकड्या च्या बाहुली सारख्या नाचवायला आणलेल्या नसतात. त्यांना नायकाच्या बरोबरीचा किंबहुना जास्तीचा स्पेस तो देतो अजिबात संशय नाही.

“खामोशी द म्युझिकल” मध्ये त्याने पडद्यावर क्रांतीवीर च्या काळात जो धमाका नाना पाटेकर ने घातला होता त्याला दाद न देता थेट नानाला मुका बनवून पहिला सिनेमा कमर्शिअल हिट करून दाखवला. विशेष म्हणजे हा त्याचा दिग्दर्शक म्हणून होता. संक्रांतीच्या वाणात लुटून आलेल्या ताटली वाटीच्या परीघापेक्षाही संकुचित असलेल्या बॉलीवूडने ठरवलेल्या झाडे फुले, फळे, नाच, गाणी या चौकटबद्ध परंपरेला छेदून त्याने कलात्मकता आणि व्यावसायिक यश याचं गणित जमवल होत.

 

hindustantimes.com

 

मग आला हम दिल दे चुके सनम. विश्वसुंदरी बनून राहिलेल्या फ्लॉप बार्बी डॉल ऐश्वर्या रायचे करीअर हम दिल दे चुके सनम पासून १८० च्या कोनात उलट फिरलं होतं. अजय देवगण च्या हाणा, मारा, तोडा छाप इमेज ला त्याने याच चित्रपटात एक सुंदर भावनिक वळण दिल होत. सलमान साठी सुद्धा हा सिनेमा मैलाचा दगड ठरला होता. जो पर्यंत त्याच्या चित्रपटाच्या कथा काल्पनिक होत्या तोपर्यंत संजय कुठल्याही थराला जावून त्याच्या कल्पनाशक्तीचा अविष्कार करण्यास मोकळा होता.

ही गोष्ट आत्ता आत्ता निघालेल्या ‘ब्लॅक’ चित्रपटापर्यंत खरी होती. गुझारीश आला. पुन्हा एकदा नाना वाला प्रयोग त्याने ह्रितिकला संपूर्ण सिनेमा व्हील चेअर वर बसवून केला.

पण यावेळी नशीबाचे फासे त्याच्या मनासारखे पडले नाहीत. चित्रपटाची कलात्मक उंची जरी खूप जास्त होती तरी तो सिनेमा बारीवर सडकून आपटला. नंतर ‘गोलीयो की रासलीला–रामलीला’ हा शेक्सपिअर च्या अजरामर रोमिओ ज्युलीयट या नाटकाच adaption होतं (निदान असं त्याच तरी म्हणण होतं. रोमिओ ज्युलीयटला मानणाऱ्या साहित्यिक प्रेमीनी जेव्हा तो थिएटर मध्ये जावून पहिला तेव्हा काय अधिक पांढर दिसतंय दीपिकाचा घागरा का आपले डोळे अशी लोकांची अवस्था होती ही गोष्ट वेगळी).

पण रामलीला च्या वेळी बराच वादंग माजला. राम लीला हे नाव देणे अपमान आहे यावरून तमाशे झाले आणि याचा फायदा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे चित्रपटाला झाला हे पाहून संजय लीला भन्साळी मधला लबाड बॉलीवूड दिग्दर्शक हरखला. तेव्हापासूनच, बहुदा तेव्हापासून त्याला आपलं वय झाल्याचा,आपले सिनेमे किंवा आपला दृष्टीकोन बदलण्याचा, कथा, कलात्मकता यापेक्षा भडकाऊ विषय घेवून तिकीट बारीवर कसाही करून सिनेमा घुसळून काढण्याचे साक्षात्कार होण सुरु झालं. अर्थात ही सुरुवात रामलीला च्या आधीपासूनच देवदास च्या वेळेसच झाली होती.

 

indiatimes.in

 

देवदास च्या वेळी त्याने अभिजात कलाकृतीला हात घातला. अभिजात कादंबरी ची कथा भव्य दिव्य अशा सेटच्या चिऱ्या चिऱ्यात खोचुन खाचुन बसवली. नव्या पिढीला देवदास भावला. शाहरुखच्या चमच्यानी वारेमाप उचलुन धरला. माधुरी ऐश्वर्याचा डांस बघुन थेटरात शिट्ट्यांचा पाउस पडला. काही जुन्या लोकांच्या मस्तकात गोष्ट गेली खरी पण त्यांचा जमाना तसा जुना अडगळीचाच. त्यांच म्हणण काय लय मोठ मनावर घेण्यासारख. म्हणून दुर्लक्ष झालं.

अभिनय, अदा, कहाणी, कलेशी जपलेला प्रामाणिकपणा, मुळ संहिते प्रमाणे बनवलेली ७० मिमि पडद्यावरची कलाकृती या गोष्ट जेव्हा बोलल्या गेल्या तेव्हा अस बोलणाऱ्यांना नवतरुणांनी येड्यात काढलं.

कमी बजेट मधले पण कलेशी इमान राखुन काढलेले जुन्या काळचे साधेसुधे सिनेमे आणि अंदाधुंद फुगलेल्या बजेट चे पण सुमार रुपाचे आत्ताचे सिनेमे या दोहोतला फरक सांगणाऱ्याना सांगता येइना आणि ऐकणाऱ्याना तर डोस्क आपटून पण समजुन घेता येइना! मग आला बाजीराव मस्तानी. माझी एक अशी पिढी आहे जिला स्वत:च्या मातीतल्या पुर्वजांचा इतिहास ना शिकायला मिळाला ना ऐकायला मिळाला. इतिहास घडूनही गेला आणि माझा जन्म होइस्तोवर आणि मी इतिहास शिकेस्तोवर तो धर्म जात पोटजात याच्यामध्ये विभागला पण गेला.

एखादा प्रचंड मोठा आरसा खळकन फुटुन त्याचे हजारो तुकडे पडावे आणि त्याच्या हर एक तुकड्यात पाहुन त्याच्या खऱ्या रुपाची फक्त कल्पना करावी तसाच माझ्या मातीचा इतिहास पण गद्दारानी तोडलेल्या आणि फोडलेल्या तुकड्यातच शिकावा लागतो आणि समजुन घ्यावा लागतो.

तर बाजीराव! जो एक इतिहासाचा फुटका तुकडा हातात आला त्यावरुन तो मस्तानीचा बाजीराव असं नाव तर ऐकल होतं. चित्रपट आला अणि यावेळी भंसाळीवरची टिका वाढली. महाराष्ट्रातील लोकानी विरोध केला. पण जिथे इतिहास आणि इतिहास घडवणारे महापुरुष आपापल्या जातवाल्यानी स्व:ताच्या जातीची अस्मिता जपण्याकरिता वाटुन घेतले तिथे एखाद्या जातीच्या महापुरुषावरची कथा थोडी रंगवुन दाखवली तर नक्की काय बिघडणार आहे असा एकंदर सुर लागला.

 

indianexpress.com

 

लोकांनाही त्यात काही गैर वाटले नाही. पिक्चर आला. त्यात मस्तानी काशीबाई बरोबर नाचली-बिचली. बाजीराव प्रामुख्याने इश्कबाजी करणारा रंगवला गेला. दिमतीला भंसाळी स्पेशल सेट, खोटे आरसे महाल, खोट्या आरसा महालातली काल्पनिक गाणी, तो मुख्य हिरोइन आणि तिच्या बरोबरच्या बायकानी गोल गोल फिरुन पसरवलेल्या घागऱ्यांचा झुम करुन वरच्या दिशेतुन घेतलेला सिग्नेचर शॉट. जो त्याच्या हर सिनेम्यात असतो. सगळ कस जमुन आलं. पिक्चर हिट झाला. लोकानी एन्जॉय केला.

मागच्या वर्षी फेसबुक लिस्ट मधल्या दक्षिण भारतीय मित्राबरोबर या सिनेमा बद्दल चर्चा करण्याचा योग आला. त्याला तो सिनेमा फार आवडला होता आणि त्याच म्हणण होत की त्याच्या आणि त्या सिनेमातल्या बाजीरावच्या क्वालिटीज खुप जुळतात . तो पुण्यात राहुन गेला होता आणि त्याने मस्तानी महाल पाहिला होता . मी सुद्धा लग्न करून लग्नाच्या बायको बरोबर अजून एक बिन लग्नाची बाई ठेवू शकतो असा त्याच्या बोलण्याचा एकंदरीत रोख पाहुन मी चमकले .

त्याला मी मस्तानी ही मस्तानी नसून मस्तानी सरकार होती आणि ती बाजीरावांची पत्नी होती हे एक आणि बाजीराव हा इष्कबाजी करणारा दलाल नव्हता तो आमच्या छत्रपती शिवाजी राजे भोसल्यांच्या स्वराज्याचा भारतात होवून गेलेला एकमेव सर्वोत्तम असा सरसेनापती होता ही दोन वाक्ये सुनावून आणि पुढ बरच काय काय झापून संभाषण बंद केल.

आधी तो सिनेमा voot वर पाहिला. आणि त्यानंतर कोण हा थोरला बाजीराव म्हणून शोध घ्यायला सुरुवात केली. भरपुर शोध घेतल्यावर जे काही माहीतीचे तुकडे हाती लागले ते मन सुन्न करणारे होते. इतिहासामध्ये मनोरंजनाचा मच्छी बाजार घुसडून पैसे कमावणाऱ्या बाजारु बॉलीवूडच्या अकलेची किव आली.

त्याही पेक्षा जास्त वाईट वाटल की ज्या लोकांची स्मारके त्यांच्या पुतळ्यांपेक्षा या पिढीच्या मनामध्ये हवीत ती लोक आज अशी कुठल्या विस्मृतीच्या अडगळीत पडली आहेत. आणि समोर आले तर येतात त्यांचं विकृतीकरण केलेले सिनेमे. सिनेमा हे व्हिज्युअल इफेक्टचं सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. एकाच वेळी लाखो लोकांच्या मनावर गारुड घालण्याची ताकद त्याच्यात आहे. मग याचा वापर जेव्हा इतिहास चित्रित करताना होतो तेव्हा आपली घरं, स्टुडीओ पैशाने फुगले पाहिजेत पण तो खरा इतिहास दाखवून.

या मातीत होवून गेलेल्या आणि या मातीसाठी ज्यांनी आयुष्य मातीमोल करून टाकलं त्या वीर पुरुषांच्या बलिदानाचा त्यांच्या कुटुंब कबिल्याचा लिलाव न करता सुद्धा तो चित्रपट बनवता येवू शकतो हा सारासार विचार भन्साळी सारखा दिग्दर्शक का करू शकला नाही?

बाजीराव ते होते ज्याना १९ व्या वर्षी पेशवा म्हणून छत्रपती शाहु महाराज यानी नियुक्त केलं होतं. बाजीराव ते होते ज्याच्या असामान्य शौर्य, धाडस, वीरता, पराक्रम याचे लोक पोवाडे गात होते. त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, अजोड रणनीती, नेतृत्व शक्ती याला तोड नव्हती, याच कारणासाठी समकालीन लोक त्यांना कौतुकाने शिवाजी महाराजांचा अवतार असंही म्हणायचे.

 

4.bp.blogspot.com

 

शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचा डंका ज्याने भारतभर नेला तो हाच बाजीराव! स्वत:च्या आयुष्यात जो एकही लढाई हरला नाही असा भारताचा मराठी मातीचा एकमेवाद्वितीय सेनापती. सिनेमात त्यांच्या युद्धकौशल्याची, वीरतेची, मराठ्यांनी जपलेल्या अस्मितेची, मराठ्यांच्या लढाईची, परकीय आक्रमणा विरोधात मराठ्यांनी झुंज दिलेल्या आणि जिंकलेल्या विजयपताकेची कुठलीच कथा दाखवली नव्हती. बरं ती खरोखरीच्या बाजीराव मस्तानीची पण कथा नव्हती.

मस्तानी बाजीराव दोघांचा मृत्यू झाल्यानंतर मस्तानी सरकारच्या समशेर बहाद्दूर ह्या मुलाला काशी बाई नी सांभाळले त्याला त्याच्या जहागिरीचा हिस्सा दिला. पेशव्यांच्या सैन्यात तो मोठा सेनापती झाला.

पानिपतमध्ये तो आणि मस्तानीचा भाऊ हे दोघेही मारले गेले हा खरा इतिहास आहे. त्यामुळे चित्रपटात ओढून ताणून दाखवलेला कमालीचा तिरस्कार हे तद्दन फिल्मी प्रकरण होते. ज्याप्रमाणे वैशाली मध्ये भरपुर कॉफी मोजकेच दुध किंवा दुधासारखे दिसणारे पाणी आणि विना साखरेची बनवलेली फेमस फिल्टर कॉफी मिळते त्याप्रमाणे फक्त मस्तानीचा केलेला छळ, द्वेष, दुस्वास आणि हताश गलितगात्र अवस्थेत मरण पावलेला बाजीराव असल्या कडवट चवीची कहाणी “हा घ्या तुमचा इतिहास मी माझ्या सिनेमाच्या माध्यमातून जगभरात पोहोचवला घ्या” असं म्हणुन फेकुन मारण्याचा जो प्रकार भंसाळी ने केला तो युगाच्या अंतापर्यंत अस्थायी स्वरुपाचा अपराध म्हणून गणला जावा!

आता आला पद्मावत! (by god नाव वाचून पद्मावती ची आठवण लोकांना येणार नाही अस हे नाव ठेवणाऱ्याना का वाटलं असावं ?!) त्यात पद्मावती आणि खिलजी यांच्यात एक स्वप्न दृश्य असलेलं गाणं टाकलं गेलय हा प्रवाद उठला होता आणि सूत्रांची माहिती खरी असेल तर भन्साळी टीम तो प्रवाद एन्जॉय करत होती.

त्यांना राम लीला, बाजीराव मस्तानी च्या वेळी झालेला तमाशा आठवून उकळ्या फुटत होत्या पण कल्पना आणि इतिहास याच्यात मुलभूत भेद असतो. कल्पना खोटी असते त्यामुळे तीचे लोकभावनेशी काही देणे घेणे नसते पण इतिहास हा गतकाळात घडून गेलेल्या घटनांच लोकांशी आजच्या काळात असलेल भावनिक नाते आणि होवून गेलेल्या नायकांची प्रतिके धरून कवटाळून बसलेल्या समाज मनाचा प्रखर अभिमान दाखवतो.

जे राजस्थानी लोक आत्ता पेटुन उठलेत ते बाजीरावच्या वेळी गप्प होते. कारण हेच. तुझ्या जातीतला तुझ्या प्रांतातला इतिहास तो तुझा इतिहास. माझ्या मातीतला माझ्या प्रांतातला इतिहास तो माझा इतिहास! शिवाय राजस्थानी लोक मराठी लोकांसारखा सहिष्णूपणा दाखवू शकले नाहीत हे भन्साळीचे दुर्दैव. वाद चिघळत गेला. आणि इतिहास या विषयातलं बॉलीवूडला काही कळत नाही हे सिद्ध करून गेला.

जाज्वल्य राष्ट्राभिमान, इतिहासातल्या चिरंतन लढाया, विजयोत्सव, स्वत:च्या राष्ट्राबद्दलचे प्रेम ७० एम एम च्या पडद्यावर भव्य स्वरूपात दाखवून ही पैसा कमावता येतो हे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीने सिद्ध करून दाखवलंय जिची स्ट्रेंग्थ बॉलीवूडपेक्षा निम्मी देखील नाही आणि हे दिवटे ज्यांना आम्ही उरपोटावर घेवून उर बडवत नाचतो. यांच्यासाठी रक्त आटवतो. फर्स्ट डे फर्स्ट शो तीन तीन दिवस उपाशी राहून पैसे वाचवून बघायला जातो ती आमची ख्यातनाम bollywood film fraternity!

 

 

नवटाक रिचवून लिहलेले स्क्रीप्ट, जात, वंश, धर्म भेद यांच्यातला नसलेला विद्वेष प्रखर करून सांगणारा उत्तुंग कल्पनाविष्कार, मध्ये मध्ये टाकलेले गाळीव इतिहासाचे तुकडे, स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपट प्रदर्शित करून दर थियेटर च्या प्रत्येक शो मागचा गल्ला किती झाला याच गणित करत छद्मी पणे स्वत:च्या सुमार कलाकृतीच वस्त्रहीन प्रदर्शन इतिहास म्हणून जगाला दाखवत बसते.

पण तरी आम्ही त्यांच्या झोळीत दान टाकणे सोडणार नाही भले त्यासाठी आमची घरे दारे का रिकामी होईनात.

तर मित्रहो! जरी भविष्य अस दिसतय की फर्स्ट डे फर्स्ट शो फुल्ल होइल. पिक्चर कदाचित धो धो चालेल . omg दीपिका ~~्~~~्~~~ omg wow lovely , सी हर घागरा , omg she looks gorgeous अस म्हणत चेकाळलेली हाफ चड्डी आणि बर्मुडा मधली बारकी पोरं पोरी तुफान गर्दी करतील. त्यांना साथ द्यायला त्यांचे mom dad असतील. social media वर धुर निघेल, मारामाऱ्या होतील. एकमेकांना block केलं जाईल.

आणि हे सगळ तटस्थ पणे पाहणारा भारताचा इतिहास हळुच आपल्या छाताडावर खोलवर घुसलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाच्या सुऱ्याचा अजुन एक नवीन वार कुरवाळेल. त्यातुन वाहत असलेल्या रक्तातुन एक नाव हळुच कोरेल. पद्मावती !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version