Site icon InMarathi

धर्म : भारतीय, जात : मराठी – एका पालकाचा उत्कृष्ट आदर्श!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

यावर्षी “काय  मग, कशी झाली वर्षाची सुरुवात?” असं कुणीतरी कुणालातरी क्वचितच विचारलं असेल नाही का?

कारण? उभ्या जगाने आपल्या अस्मितांचा बाजार भरलेला नुकताच पाहिला आहे. तोही वर्षाच्या सुरुवातीला. वास्तविक जातीय आणि धार्मिक अस्मितांच्या पावसात न्हाऊन निघणे ही गोष्ट काही भारताला नवीन नाही. आपल्याला त्याची सवयच झालीय म्हणा न!

असं एक गृहीतक आहे की माणूस जसा अधिकाधिक समृध्द आणि सुशिक्षित होत जातो तसा तो अस्मिताशुन्य परिपक्वतेकडे वाटचाल करू लागतो. जात धर्माची, भाषा प्रांताची, सगळी आवरणं गळून पडतात.

 

स्रोत- sachbharat.org

आपल्याकडे नेमकं याच्या उलट चित्र आहे. म्हणजे असं पहा, की आपला समाज हळूहळू आर्थिक उन्नतीकडे जाऊ लागला, शिक्षण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू लागले, तसे तसे आपण आपल्या जातीय अभिनिवेशाच्या बाबतीत जागरूक होऊ लागलो.

आधी गावागावात जाती वेगळ्या असल्या तरी त्या एकमेकांच्यात मिसळून राहत. कारण ती त्यांची व्यवहार्य गरज होती. शहरीकरण झपाट्याने होत गेलं तशी जातीय संघटनांची संख्या वाढत गेली. आणि आता आपल्या जातीशिवाय आणि जातीच्या संघटनेशिवाय आपली ओळख अर्धवट आहे. स्वतःची दखल घ्यायला लावण्याचा तोच एक मार्ग आहे असे मानून चालणारी जनता घराघरात  तयार झाली.

इथल्या राजकीय व्यवस्थेला हेच हवे होते. अस्मिता कुरवाळून स्वार्थ साधता येतो हे त्यांनी बरोबर ओळखले. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली रस्त्यावर उतरून हातात दगड घेणाऱ्या झुंडी!

खोले प्रकरण, कर्णी सेना, तीन तलाकला विरोध, भीमा कोरेगाव हा आपल्या अस्मितांच्या टोकेरीकरणाचा प्पारीनाम आहे. यावर बोलणार कोण? मार्ग कोण दाखवणार? तूर्तास तरी असे चेहरे खूप कमी. पण तोच आपला सध्याचा आशावाद आहे.

ही अशी सगळी सद्यस्थिती असताना एखाद्या जाणत्या पालकाने त्याच्या पुढच्या पिढीत हे विष पेरले जाऊ नये म्हणून काय करावे? त्याचा उत्तम नमुना म्हणजे प्रसाद क्षीरसागर यांनी केलेली कृती!

 

livelaw.in

 

त्यांचा पर्यंत त्यांनी स्वतःच्या शब्दांत सांगितला आहे तो असा..

===

आपण आपल्या पाल्याला जेव्हा प्रथम शाळेत घालतो तेव्हा आपल्याला वैयक्तिक माहिती अर्ज भरून द्यावा लागतो…त्यात नाव, पत्ता, शिक्षण, उत्पन्न आणि आपला धर्म व आपली जात यासंबंधी विचारलेले असते….!

बहुतेक आपल्या सर्वांना हा अनुभव असेल. माझ्या मुलीला जेव्हा प्रथम शाळेत प्रवेश घेतला तेव्हा मलाही असा फॉर्म भरून द्यावा लागला होता. बाकी सर्व माहिती भरून दिली…

“धर्म जात” हा रकाना रिकामाच ठेवला…!

बाई म्हणाल्या : “हे का नाही लिहिले…?” म्हणलं… “आवश्यकता काय ?”

तर म्हणाल्या.”शैक्षणिक अनुदान मिळण्यासाठी ही माहिती आवश्यक असते”

मी म्हणलं…”मी आत्ता लिहून देतो कधीही शैक्षणिक अनुदान मागणार नाही…”

तर म्हणाल्या. “ते ठीक आहे… पण तरी, तुम्हाला ही माहिती भरून द्यावी लागेल…”

माहिती भरली.

धर्म — भारतीय

जात — मराठी

प्रसाद राजन् क्षीरसागर

===

श्री क्षीरसागर ह्यांनी त्यांच्या मुलीच्या फॉर्मचा फोटो सुद्धा टाकला आहे –

 

 

धर्म भारतीय आणि जात मराठी! हा आपल्या सध्याच्या परिस्थितीवरचा जालीम उपाय आहे. “वसुधैव कुटूम्बकम” हे तत्वज्ञान जगाला शिकवणारा आपला भारत देश. येत्या काळात त्याने जगाचे नेतृत्व करावे अशी आपली अपेक्षा आहे.

पण हे होताना आपला भारत तुटलेला, विखुरलेला आणि स्वत्व विसरलेला असले तर नेतृत्व करण्याची हा आशावाद म्हणजे पोकळ ढोंगबाजी असेल. पण हे होऊ द्यायचे नसेल तर ते गतवैभव परत मिळवावे लागेल, अस्मितांच्या कचाट्यातून बाहेर येऊन मूळ प्रश्नांना हात घालावा लागेल.

आधुनिकतेच्या प्रवाहासाठी जात धर्म यासारख्या अस्मितांना मूठमाती द्यावी लागेल. आणि हे करण्याचे पहिले पाऊल म्हणजे आपला धर्म भारतीय आहे असे सांगणे आणि त्याप्रमाणे वागणे. प्रसाद क्षीरसागर यांचे हे पाऊल याच दृष्टीने महत्वपूर्ण आणि अनुकरणीय आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version