ड्रग्ज, बंदुका आणि “आझादी” : धगधगत्या काश्मीरचे अज्ञात वास्तव
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम
===
“अगर फ़िरदूस बार रुह-ए-झमीं अस्तो,
हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्तो”
-मुघल सम्राट जहाँगिर
If there is a paradise on Earth, It is this, it is this, it is this!!
जर कुठे पृथ्वीवर स्वर्ग अस्तित्वात असेल तर तो इथेच आहे! काश्मीर!
आपल्यापैकी प्रत्येकाने हे वाक्य किती सहज ऐकलं असेल, पाहिलं ही असेल.. जणू सगळंच कसं ओतप्रोत भरून वाहणार सौंदर्य दिलंय निसर्गाने! आपण हे सौंदर्य डोळ्याने पाहतो, अगदी मनापासून डोळयांत साठवून घेतो.
पण काश्मीरचा दुसरा चेहरा बहुतेक जणांनी पाहिलेला नसतो, कारण पाहायला धैर्य आणि वेळही लागतो. स्वर्गात देवदूत असतात म्हणे ना! बऱ्याचदा आम्ही हे विसरतो की पिशाचांचा राजा हाही देवदूतच होता! हाकलून लावलेला!
साधारण तीनेक दशकापेक्षा जास्त काळ भौगोलिक, सामाजिक, नैतिक वाद आणि प्रचंड गुंतागुंती मध्ये पार अडकलेला काश्मिरी हा साक्षीदार बनला विदारक सत्याला, डोळ्यांदेखत स्वतःच अस्तित्व आणि नियतीला बदलताना अनुभवताना!
फक्त भीती.. क्षणाक्षणागणिक फैलावत चाललेला थरार.. वाटेवर कधी कोणाची थडगी पाहायला मिळणार माहीत नाही. हे भय खूप आधी पेरलं गेलंय, खूप आत, खोल मनात.. दुर्दैवाने आपण नाकारत आलेला सहज दुर्लक्षलेला हा काश्मीरचा चेहरा खूप काही मांडून जातो. तरुण पिढीच्या मागे हात धुवून लागलेलं हे भूत! स्वतःला क्रांतिकारी म्हणवून घेतंय, येथील तरुणांना, त्यांच्या भविष्याला गुडूप अंधारात हात धरून घेऊन जात आहे…
“नॉर्मल तो हमने जिया ही नंही साहब, हमारे लिये तो यही रुटीन बन गया हैं, जबसे होश सँभाला तबसे आँखोने यही देखा हैं, कानोंने सिर्फ गोलियौकी और उसके साथ जुडे दर्दसे भरी चिखोंकी आवाज सुनी हैं.”
प्रत्येक कुटुंबाकडे एक कहाणी आहे जी तडफडतेय जीव तोडून ओरडण्यासाठी. नेहमी प्रदीर्घकाळ चालणाऱ्या कर्फ्यूमुळे जनजीवन विस्कळीत होणे हा त्यांच्या जीवनाचा भागच बनलाय, कधी आई वडिलांकडून,
कधी नातेवाईकांकडून कधी रस्त्यावर चालणाऱ्या मुसाफिराकडून, कधी नुक्कड च्या चाय टपरीवर, गोष्टी कानावर आदळत राहतात त्या, खुनाच्या, आतंकाच्या, हल्ल्यांचा आणि मुडदयांच्या!
“बडे बुजुर्ग कहते है, जब ये आसमान लाल रंग से भर जायेगा, तब समझलेंना, आज किसींका जनाजा निकला हैं”
विखुरलेल्या उद्धवस्त झालेल्या घरांची कवाडे, बंदुकीच्या छऱ्यांनी डागाळलेल्या काळ्या भिंती.. पण या सगळ्यात भयाण म्हणजे प्रत्येक निरागस, मासुम मनावर आणि त्याच्या ‘बचपन’ वर ओरबडल्या गेलेल्या असंख्य जखमा! चार वर्षांचा पोरगा सकाळी उठतो आणि ओरडतो, “हम क्या चाहते, आझादी”.
खोऱ्यातील प्रत्येक तरुण जेंव्हा अश्या घोषणा देत रस्त्यावर उतरतो तेंव्हा त्यांना नक्की कसली आझादी हवीय, कोणता प्रतिवाद करायचा आहे हे नीटसं ठाऊक नसतं, त्यांची प्रत्येक स्वप्न फक्त आकांताने एवढंच सांगतात,
“आमच्या काश्मीर मध्ये आम्हालाही शांतता आणि सामान्यता अनुभवायची आहे जिवंत असेपर्यंत”
दहशतवादाची निर्मिती-
“एखाद्या राज्यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर तेथील पिढीचा विध्वंस करावा आणि ऐन संकटकाळात त्यांचा रक्षणकर्ता बनावं”.
दहशतवाद म्हणजे, राजकीय हेतूंचा पाठपुरावा करण्यासाठी अनधिकृतरित्या हिंसाचाराचा उपयोग करणे. ह्या पद्धतीचा वापर करणारा, स्वतःच्या स्वार्थासाठी काही राजकीय हेतू साध्य करत असेल तर त्याला दहशतवादी म्हणता येईल.
काश्मीरमध्ये सध्या सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या दहशतवादी संघटना दक्षिण आणि उत्तर काश्मीर या भागात विभागल्या गेल्या आहेत.
दक्षिण काश्मीर मध्ये म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर नजीक असलेल्या भागात ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ ही आतंकवादी संघटना तर उत्तरेत जम्मूजवळ ‘लष्कर-ए-तय्यबा’, ‘जैश-ए-मोहोम्मद’ सारख्या संघटना सक्रिय आहेत.
काश्मीरमधील अतिरेक्यांच सरासरी वय हे 16 ते 28 वर्षे दरम्यान असते.
एकीकडे उर्वरित भारताचा युवक शिक्षण, विकास आणि नवनव्या उपक्रमांद्वारे सक्षम बनत आहे आणि दुसरीकडे आपल्याच देशातील युवकांचा एक भाग आभासी आणि चुकीच्या पद्धतीच्या सक्षमीकरणास बळी पडत आहे.
इस्लाम धर्मात जिहाद चा खरा अर्थ काही वेगळा आहे, जिहाद म्हणजे संघर्ष. परंतु हा संघर्ष नैतिकदृष्ट्या उत्तम मुस्लिम समाज उभारण्यासाठीचा आहे, नकी इस्लाम न मानणाऱ्यांच्या विरोधात प्रत्येक मुस्लिमाने लढायची लढाई!!
कुराणच्या आयतानुसार जिहाद हा प्रत्येक मुस्लिमाचा धर्म आहे. परंतु जिहादचा चुकीचा आणि स्वहेतुकरिता तोडून अर्थ सांगणे आणि अनेक तरुणांना भडकविणे हे कित्येक वर्षांपासून सुरू आहे.
धार्मिक कारणास्तव पाकिस्तानशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सामान्य जीवन जगण्याचा हक्क सांगून त्याच्यामागे असलेला राजकीय हेतू जाणीवपूर्वक लपविला जातो आहे.
किशोरवयीन मुले, कोवळ्या वयातील या मुलांना या सगळ्यात मुद्दाम गोवण्यात येते, ९० च्या दशकातील मुलांनी या अतिरेक्यांना शाळेच्या आवारात, मैदानात खेळताना आजूबाजूला बिनधास्त हिंडताना डोळ्यांनी पाहिले आहे.
मोठ मोठाले बंदुका घेऊन, अंगावर मिलिटरी सारखे कपडे घालून हिंडणारे हे स्वातंत्र्यसेनानीच आहेत असा समज हेतुपूर्वक रुजविला जातो
जेणेकरून ह्या अतिरेक्यांना पाहून ह्या मुलांनाही अप्रूप वाटावं आणि काश्मीरसाठी काहीही करगुजरण्याचा ध्यास खूप लहान वयात रुजवला जावा. अश्या रीतीने खोऱ्यातील मुले आणि युवक भरकटवली जातात, अश्या कोवळ्या वयात त्यांचे अश्याच गन-कल्चर मध्ये संगोपन होते.
बरीच मुले आणि युवक नंतर या संघटनांना जोडून घेण्यासाठी घरातून पळून जातात.
भरती झाल्यावर त्यांना पाकव्याप्त काश्मीरच्या प्रशिक्षण शिबिरात पाठवले जाते यासाठी बॉर्डर क्रॉस करविले जाते, मुखत्वेकरून जुना बारामुल्लालगत असलेल्या जंगलसदृश भागातून अथवा कुपवारा भागातून.
प्रशिक्षण शिबीरे पाकव्याप्त काश्मीर अथवा त्याही पुढे पाकिस्तानात, अफगाणिस्तान (इलाक-ए-गेहर), बलुचिस्तानच्या काही भागात स्थित आहेत.
प्रशिक्षण दरम्यान हत्यार चालविणे, हाताळणे, पिस्तूल, AK47(अवतोमत कलशनीकोव्ह) , LMG (light Machine Gun) सारख्या वेगवेगळ्या हत्यारांची जोडणी करणे आणि खोलणे, जमिनीत माईन रोवणे, हातबॉम्बचा वापर करणे, गाडी चालवणे, दुरुस्त करणे, बोट चालविणे अशी कित्येक कामे शिकवली जातात.
हातबॉम्ब हा साधारण 4 सेकंदात फुटतो, त्याच्या फुटण्याच्या आत निषाणावर अचूक टाकायचे प्रशिक्षण दिले जाते. किशोरवयीन मुलांच्या प्रशिक्षणकाळात बऱ्याच वेगवेगळ्या संघटनांच्या अतिरेक्यांसोबत ऊठबस होते,
खासकरून ‘जमात-ए-इस्लामी’. जे तरुण हे प्रशिक्षण पूर्ण करतात त्यांना खोऱ्यात परत पाठवले जाते, एक सक्रिय दहशतवादी म्हणून.
त्या भागातील वरिष्ठ दहशतवाद्याकडे त्यांचा तबादला होतो, तिथे त्यांना मिशन दिले जातात. ट्रेनिंग संपवून आलेल्या अतिरेक्यांचे पद जनरल ड्युटी असते. पुढे त्यांच्या मिशनच्या सक्सेसवर सेक्शन कमांडरची पोस्ट दिली जाते.
याच्या हाताखाली ५-६ लोक काम करतात. लौंचिंग कमांडर, डिस्ट्रिक्ट कमांडर, डिव्हिजनल कमांडर अशी काही पदे अनुभवांवर या अतिरेक्यांना दिली जातात. यांना ‘फिदायीन'(fedayeen) म्हणले जाते, म्हणजे ‘स्वातंत्र्यसेनानी’…
अतिरेकी दहशतवाद पसरवण्यासाठी नेहमी बंदुकीचा मार्ग अवलंबत नाहीत, यात वेगवेगळ्या मार्गाने समाजात असंतोष, गोंधळ आणि अस्थिरता प्रस्थापित केली जाते. मानसिकता बाटवीण्यासाठी इंतीफदा पद्धत वापरली जाते.
१) काश्मीर आणि भारत वेगळे देश आहेत असे वारंवार सांगणे.
२) भारतीयांच्याबद्दल आणि सरकारबद्दल काश्मिरी जनतेमध्ये द्वेषभावना प्रस्थापित करणे.
३) येथील तरुणवर्ग आणि लहान मुलांच्या मनात प्रतिगामी विचार पेरणे.
येथील स्थानिक पातळीवरील नेतेमंडळीही यास कारणीभूत आहेत, अश्या गोष्टी होत असताना काहीच न करणे म्हणजे जे होत आहे त्यास मूकसंमती देणेच होय.
स्थानिक भागांत तैनात असलेल्या भारतीय सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करणे ही या अतिरेक्यांची पहिली पायरी असते. अश्याना ‘स्टोनपेलटर’ म्हणले जाते, यांची वेगळी संघटनाही आहे.
यांना दिवसाचे २ तास दगडफेकीचे पाचशे ते आठशे रुपये मिळतात. २०१६-१७ च्या काही ठराविक काळात संध्याकाळी ५ वाजता या स्टोनपेलटरचे आंदोलन होत असे.
“येथे उपस्थित सर्वांनी काळजीपूर्वक ऐकावे. आपण आपल्या शहीद झालेल्या बंधूंसाठी नेहमी शोक व्यक्त केला पाहिजे. त्यांच्यासाठी वारंवार घोषणा दिल्या पाहिजे. त्यांच्या बलिदानाला विसरता कामा नये.
ह्या सरकारला उलथवून लावले पाहिजे…आपण सर्व या भारत सरकारचे गुलाम नाही आहोत…! हम क्या चाहते…? आझादी! हम क्या मांगे? आझादी!“
अश्या पद्धतीची भाषणं मशिदीत दिली जातात (खासकरून जुना बारामुल्ला या भागात).
अतिरेक्यांना मदत करण्यासाठी OGW (Over Ground Workers) नावाने काम करणारा एक विशिष्ट गट आहे.
यामध्ये प्रामुख्याने अतिरेक्यांसाठी स्थानिकांच्याच घरात निवाऱ्याची सोय करणे, सुरक्षा रक्षकांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेऊन हवी ती माहिती पुरविणे, यांना मदत करणाऱ्या स्थानिकांचीही माहिती देणे,
स्थानिक आंदोलनांनंतर काही वेळा अर्धवेळ पत्रकारिता करणे (या माध्यमाने पक्षपाती कथा रचून जनतेची दिशाभूल करणे) अशी कामे काही सामान्य जनतेतून येणारी मंडळी इच्छेनुसार करतात.
जेंव्हा कोणाचा कायद्यावरचा विश्वास उडतो, सरकारच्या कार्यप्रणालीवरचा विश्वास उडतो, राज्यघटनेवरच्या विश्वासाला तडा जातो आणि जेंव्हा खुद्द सरकारच बचावकार्य झुगारून स्वतःच्या हेतुखातर धगधगत्या प्रश्नांवर डोळेझाक करते तेंव्हा आणि तेंव्हाच अलगाववाद, परकीयिकरण खूप खोलवर रुजत जाते.
कोणतीही गोष्ट विनामूल्य मिळत नसते, अगदी आतंकवादसुद्धा नाही.
‘साऊथ आशिया इंटेलिजन्स’ रिव्ह्यूनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील अलगाववादी आणि कट्टरवाद्यांना थेट पाकिस्तानातून दरमहा २५ ते ३० कोटींची रसद पुरविली जाते. काही सुरक्षा रक्षकांच्या माहितीनुसार सर्वात जास्त पैसा ‘लष्कर-ए-तय्याबा’ साठी येतो.
हा पैसा दरमहा काही कोटींच्या आकड्यात असतो. तसेच ‘जैश-ए-मोहोम्मद’ आणि ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ सारख्या संघटनांनाही हा पैसा पुरविला जातो. या व्यतिरिक्त हत्यारे आणि दारुगोळा यासाठी वेगळा खर्च पुरविला जातो.
हा जिल्ह्यानुसार असलेल्या सक्रिय ग्रुप्समार्फत पाठविला जातो. अतिरेक्यांच्या भरतीप्रक्रियेकरिता वेळोवेळी पैसा पुरविला जातो, स्थानिक भरतीसाठी २०-२५००० रुपये मिळतात.
भरती झालेल्या आणि प्रशिक्षण पूर्ण झालेल्या अतिरेक्यांना १०-१५००० रुपयांपर्यंत दरमहा या रूपाने वेतनही दिले जाते. दहशतवादाचा आणि आतंकी हिंसाचाराचा हा व्यवसाय प्रस्थापित करून पुढे नियमित चालू ठेवण्याकरिता विशिष्ठ पद्धतीने पैशाची विभागणी केली जाते.
दळणवळण यंत्रणा आणि उपकरणे, हत्यारे, स्फोटके, खाद्यसामग्री, ट्रेकिंगचे साहित्य अश्या पद्धतीने रीतसर वर्गीकरण करून हा व्यवसाय पसरविला जातो.
या व्यवसायात पैसा चॅरिटी बिजनेसद्वारे, सोशल वेलफेअर प्रोग्राम्सद्वारे, वैयक्तिकरित्या आणि खासकरून हवालाच्या रूपाने आणि ड्रॅग ट्रॅफिकिंगमार्फत आणला जातो.
ड्रॅगचा बिजनेस इथे नैसर्गिक उगविणाऱ्या चरस (marijuana) आणि अफगाणिस्तानच्या काही भागातुन येणाऱ्या ब्राऊन शुगरवर आधारित आहे. हे पुढे दिल्ली, पंजाब आणि शक्य असल्यास उर्वरित भारतात पोहचवला जातो.
अश्याप्रकारे येथील युवावर्गाला यासगळ्यात गोवण्याचा प्रयत्न खूप वर्षांपासून सुरू आहे आणि एका पिढीला नैतिकतेच्या पलीकडे ओढून नेले जाते जिथे चूक-बरोबर, नैतिक-अनैतिकतेच्या रेषा पुसट होतात.
पैशाच्या जोरावर आणि चुकीच्या धर्मांध गोष्टी डोक्यात भरवून, दहशतवादाच्या चिखलात या पिढीचे पाय पद्धतशीरपणे रोवले जातात.
जम्मू काश्मीरमधील जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करून भारताच्या कायद्याविरुद्ध भडकवीत राहणे आणि सरकारविरोधात उफाळून येणाऱ्या या रागाला ‘अतिरेकी-अलगाववादी’ नावाच्या धारदार शस्त्रांत रूपांतरित करून सरकार उलथविणे हा उद्देश घेऊन येथील दहशतवादी संघटना कित्येक वर्षें काम करत आहेत.
परंतु काश्मीर भारत देशाचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहणार हेच त्रिकालबाधित सत्य आहे.
अश्या अलगाववादयांपासून, त्यांच्या दहशतीपासून काश्मिरी जनतेची सुटका करून अर्थात ‘आझादी’ देऊन त्यांना एक सामान्य जीवन जगण्याचा अधिकार आणि मूलभूत हक्क पुरविण्याची जबाबदारी भारत सरकारची आहे, याची जाणीव ठेवणे प्रत्येक भारतीय नागरिकाचा धर्म!!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.