' मानवाची उत्क्रांती माकडांपासून झाली तरी आजही माकडे का दिसतात? जाणून घ्या! – InMarathi

मानवाची उत्क्रांती माकडांपासून झाली तरी आजही माकडे का दिसतात? जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – कौस्तुभ इत्कुरकर
===

उत्क्रांतीवादाबद्दल शंका असणाऱ्या लोकांकडून हा प्रश्न कायमच विचारला जातो. आता प्रश्न पडणे हे तर चांगलेच मानायला हवे. मग ह्या प्रश्नात काय अडचण?

तर हा प्रश्न विचारणाऱ्या लोकांच्या मते ह्या एका प्रश्नावर गेली दीडशे वर्षे विज्ञानमान्य असणारी उत्क्रांतीची थियरी आणि त्याआधारे प्राणीजीवनाबद्दल आणि एकंदर सजीवसृष्टीबद्दल केलेले संशोधन आणि दावे शंकीत होतात.

आता इतका मोठा दावा म्हणल्यावर चर्चा तर होणारच!

 

charles-darvin-inmarathi
fthmb.tqn.com

 

पण खरेच हा प्रश्न इतका मूलभूत आणि प्रभावी आहे का? इतका साधा सरळ प्रश्न डार्विनला पडला नाही का? त्यांनंतरच्या हजारो वैज्ञानिकांना आणि जीवविज्ञानाच्या, मानववंशशास्त्राच्या लाखो विज्ञार्थ्यांना पडला नाही का? का इतक्या सोप्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्यांनी ह्या थियरीचा आणि संशोधनाचा डोलारा उभा केला?

तर नाही…

विचारणाऱ्या लोकांना जरी हा प्रश्न बेजोड वाटला तरी वैज्ञानिकदृष्ट्या तो दोन अतिशय चुकीच्या गृहितकांवर आधारित आहे. म्हणजे थोडक्यात हा प्रश्न अज्ञानातून उपजलेला आहे. Its an argument from ignorance. कसे ते आपण पाहू

१) मानवाची उत्क्रांती माकडांपासून झाली हेच मुळात चूक आहे.

मानव आणि माकडे (नेमकी कोणती माकडे? तर वादापुरते सगळ्या वानरसदृश्य प्रजाती) ह्यांची उत्पत्ती सामायिक पूर्वज प्रजातीपासून झाली हे खरे तथ्य.

ती प्रजाती साधारणत: वानरासारखी दिसायची म्हणून केवळ वर्णनहेतूने आपल्याला ‘मानवाची उत्क्रांती वानरसदृश्य प्राण्यापासून झाली’ असे शिकविले जाते. त्या प्रजातीचा आताच्या माकडांशी तेवढाच संबंध जेवढा आपल्याशी!

लिहिता-बोलताना आणि अगदी शिकता-शिकवतानाही तो “सदृश्य” हा शब्द नीट ठसवला जात नाही आणि मग ‘माणसाची उत्क्रांती माकडांपासून झाली अशी अवैज्ञानिक वाक्ये विनाकारण रूढ होतात.

 

humanevolution-inmarathi
fthmb.tqn.com

 

समजून घेण्यासाठी म्हणून हे थोडे आपल्या भाऊबंदकीसारखेच आहे. आपले आणि आपल्या चुलतभावंडांचे सामायिक पूर्वज आपले आजोबा असतात. आपण माकडांपासून उत्क्रांत झालो असे म्हणणे म्हणजे आपण चुलतभावंडांचे वंशज आहोत असे म्हणण्याइतके हास्यास्पद आहे!

शिवाय जितका दूरचा चुलतभाऊ तितके सामायिक आजी-आजोबा जुन्या पिढीतले हे जसे नात्यांत लागू आहे तसेच ते उत्क्रांतीतही लागू असते. चिम्पान्झी आपला जवळचा चुलतभाऊ तर लेमुर अगदी दूरचा.

म्हणजे चिम्पान्झी आणि आपले सामायिक पूर्वज हे लेमुर आणि आपल्या सामायिक पूर्वजांपेक्षा अलीकडचे! जास्त सख्खे म्हणा हवं तर…!

उत्क्रांतीचा वृक्ष आपण जर असाच उलटा (traverse) पाहत गेलो तर आपल्याला आपले आणि मांजरांचे, सापांचे, पक्ष्यांचे आणि माशांचे सुद्धा सामायिक पूर्वज मिळत जातील. पण म्हणून मग आपण त्यांच्यापासून उत्क्रांत झालो असे थोडेच म्हणणार आहोत?!!!

२) ‘माकडांपासून मानवाची निर्मिती होऊन माकडे अजून कशी’ असा प्रश्न विचारताना उत्क्रांती ही एकरेषीय (linear) प्रक्रीया आहे असे गृहीत धरले आहे. प्रत्यक्षात ती प्रक्रीया शाखावार पद्धतीने (branchiation) होते.

म्हणजे “एक प्रजात आख्खीच्या आख्खी बदलून दुसरी प्रजात तयार झाली” असे होत नसते.

बदलती भौगोलिक-पर्यावरणीय परिस्थिती, अनुवांशिक बदल अशा अनेक कारणांमुळे एका प्रजातीच्या अनेक शाखा तयार होतात. आणि त्या समांतरपणे उत्क्रांत होत जातात.

त्यातल्या किती टिकतील, किती प्रमाणात बदलतील, मूळ शाखेपासून किती वेगळ्या होतील, त्याची कारणे वगैरे हा तपशिलाचा भाग झाला. पण मूळ मुद्दा आहे शाखावार उत्क्रांत होत जाणे.

 

human_chimp_brains_inmarathi
icr.org

 

आपण हे लक्षात घेतले पाहिजे की मानव हे अशाच एका शाखेचे शेंडेफळ आहे.

आता इतर शाखांची फळे आजूबाजूला दिसली तर आपल्याला आश्चर्य का वाटावे? आणि त्याने उत्क्रांतीवाद कमजोर कसा पडतो? उलट तो सिद्धच होतो ना?!

म्हणजे आजूबाजूला माकडे दिसणे हे माणसाच्या उत्क्रांतीचे खंडन तर अजिबात नाही उलट त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे!

हे सगळं समजून घेतल्यावर आपल्याला हे लक्षात यायला हरकत नाही आपला मूळ प्रश्नच चूक होता. बात में कुछ दमही नहीं! तर त्याने उत्क्रांतीवादाला छेद देणं तर फार दूर राहिलं.

जाताजाता –

अनेकांचं असं म्हणणं असतं की डार्विन ने “नुसतीच थियरी” मांडली आहे, पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे उत्क्रांतीच्या थियरीला कोणतेही पुरावे नाहीत.

ह्या आरोपातसुद्धा तथ्य नाही.

उत्क्रांतीबद्दलच्या ह्या संकल्पना गेली दिडशे वर्षे तपासल्या गेलेल्या आहेत. त्यावर खूप अभ्यास आणि संशोधन झालेलं आहे. रोज उलगडत जाणारे सजीवसृष्टीतले वैविध्य आणि त्यातली सुसूत्रता, सापडणारे जीवाश्म आणि अगदी जेनेटिक पुरावे सुद्धा ह्या थियरीची पुष्टीच करतात.

उत्क्रांती”वादा”ला छेद देणारा पुरावा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे हे सर्व खरे असण्याबद्दल शास्त्रज्ञांना वाजवी विश्वास आहे.

पण विज्ञानाची खासियत ही की असा पुरावा उद्या मिळू शकतो ही शक्यता विज्ञानाला मान्यच असते. तसे झाल्यास ह्या सर्वांची फेरमांडणी करण्यासही हरकत नाही.

 

rechard-dawkins-inmarathi

 

पण आपण हे लक्षात घेऊया की असा पुरावा अथवा तर्क कुठल्या धर्मग्रँथातून, आठवी-नववीचे विज्ञान विसरलेल्या कुणा भाबड्या माणसाकडून, कुण्या राजकारण्याकडून किंवा ‘देशी विज्ञानाच्या’ कुणा चाहत्याकडून येणे अवघड आहे.

वैज्ञानिक संकल्पनांना छेद देणारे पुरावेही विज्ञान आणि वैज्ञानिकच आपल्याला देतील. तेच त्याची पडताळणी करून नव्या संकल्पना पुन्हा ‘पुराव्याने शाबीत’ करून दाखवतील.

नैसर्गिक जगाबद्दल खात्रीशीर दावे करण्याची तेवढी एकच पद्धत मानवाला माहीत आहे; तेवढी एकच पध्द्त कार्यक्षम आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?