Site icon InMarathi

स्कुल चले हम : आमच्या क्रिकेटवीरांना साध्या साध्या गोष्टी पुन्हा शिकवण्याची गरज आहे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक चित्रपट, क्रीडा समीक्षक आहेत. विविध वृत्तपत्र, मासिकांमध्ये त्यांचे समीक्षणपर लेख प्रसिद्ध होत असतात.

===

“बेसिक गोष्टी” या ‘शाळेतच’ शिकल्या जातात. मग ते कुठलं शिक्षण असो वा खेळ असो. पण जसजसा व्यक्ती प्रगती करत समोर जात जातो तसं त्याला बहुतेकवेळा साध्या मूळ गोष्टी, बेसिक थिंग्स विसरायला होतात. त्यामुळे पुन्हा एकदा ‘शाळेत’ जाऊन मुळाक्षरे गिरवायची, व्याकरणाचे ‘बेसिक’ नियम शिकण्याची गरज असते.

भारतीय टीमला याचीच सध्या अत्यंत गरज आहे! पुन्हा एकदा शाळेत जाण्याची आणि क्रिकेटमधील मुळाक्षरे गिरवण्याची!

ज्या प्रकारे आणि ज्या चुका भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टेस्टमॅचमध्ये केल्यात त्या शालेय क्रिकेटमध्ये छोटी मुलं करतात.

s3.india.com

क्रिकेटच्या प्रशिक्षण केंद्रात अगदी सुरवातीला ज्या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं त्याच गोष्टी भारतीय टीममध्ये दुसऱ्या कसोटीत हार्दिक पांड्याने, पार्थिव पटेलने, पुजारा या “ट्रिपल पीने” केल्यात.

पहिल्या इनिंगमध्ये हार्दिक पांड्या ज्या प्रकारे बाद झालेला ते बघून जॉंटी रोहड्स बोलला ,” दक्षिण आफ्रिका संघातील कोणी खेळाडू असा आऊट झाला असता तर पुन्हा त्याला टीममध्ये घेतलं नसतं!”

वृत्तांत घडला असा –

विराट कोहली आणि पांड्याची सुंदर आणि अत्यंत महत्त्वाची भागिदरी सुरू असताना हार्दिक पांड्याने मिड ऑनकडे सहज शॉट खेळला आणि एक रन घ्यायला धावला, तिथे रन नसल्याने विराट कोहलीने “अबे नही!” म्हणत त्याला परत पाठवले. मिड ऑन च्या फिल्डरने किपरच्या एंडला स्टंप्सकडे अलगद हळू ‘थ्रो’ केला. कारण त्याला स्वतःला माहिती होतं पांड्या सहज क्रिजमध्ये पोहचेल. इथे पांड्याने अत्यन्त हलगर्जीपणा केला.

तो सहज क्रिजमध्ये पोहचत असताना त्याने बॅट क्रिजमध्ये न घासता अत्यन्त हळुवारपणे चालत क्रिजमध्ये गेला. तेव्हढ्यात मागून बॉल स्टंपवर आदळला.

आफ्रिका टीमलाही तो आऊट असेल वाटला नाही. पण ‘रिप्ले’मध्ये दिसलं की पांड्याने बॅट आणि पाय क्रिजमध्ये टेकवलाच नाही. तो हवेत होता.

 

timesnownews.com

तो खरोखरच हवेत होता, निष्काळजीपणाची, हलगर्जीपणाची हवा त्याच्या डोक्यात होती. यामुळे एक महत्त्वाची भागीदारी तुटली आणि भारताला पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेता आली नाही. उद्वेगजनक, चीड आणणारं त्याची ती कृती होती.

छोटी मुलं क्रिकेट खेळायला लागलीत की प्रशिक्षण केंद्रात, क्रिकेट स्कुलमध्ये ही बेसिक गोष्ट शिकवली जाते की रन घेताना क्रिजमध्ये पोहचताना बॅट घासत न्यावी.

त्यामुळे पुन्हा एकदा पंड्याला “आवो स्कुल चले हम!” म्हणण्याची गरज आहे.

दुसऱ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला बुमराहने अगदी सुरवातीलाच दोन धक्के दिल्यावर, पावसाच्या अडथळ्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला. तेव्हा पुन्हा बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला सुरेख बॉल टाकून मागे किपर पार्थिव पटेलच्या हाती कॅच द्यायला लावले. पण पटेलने अक्षम्य चूक केली.

 

firstpost.com

सोपा झेल घ्यायला डावीकडे झुकण्याऐवजी त्याने पहिल्या स्लिपमधील पुजाराकडे बघितलं. बॉल दोघांमधून सीमारेषेपलीकडे गेला.जी कॅच “विकेट कीपर”ची आहे हे शालेय विद्यार्थीही सांगू शकेल ती कॅच घेण्याचा प्रयत्नही न करण्याची अत्यन्त अक्षम्य चूक पार्थिव पटेलने केली.

तो प्रकार बघता दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट स्कुलमधील छोटी मुलेही हसली असतील.

पार्थिव पटेललाही पुन्हा ‘बेसिक्स’ पक्के करायची गरज आहे.

कसोटी क्रिकेटमधील भारतीय फलंदाजीचा कणा असलेले परम पूज्य पुजारा, ज्यांची ख्याति कधीच चांगला ‘रनर’ म्हणून नव्हतीच , त्यांनीही यावेळी सलग दोन बेसिक चूका केल्यात.

क्रिकेटमध्ये ज्याला “सुसायडल रन” घेणे म्हणतात ते कृत्य प. पू. पुजाराने केलं. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्याच बॉलवर जेथे रन नव्हता तो रन घ्यायला पुजारा स्वतःच धावला! त्याचं ते आत्मघातकी कृत्य बघून समोरील मुरली विजयही चक्रावला.

पुजारा रन आउट झाला. एका इनिंगमध्ये बेसिक चूक करूनही दुसऱ्या आणि महत्वाच्या इनिंगमध्येही प. पु. पुजारांनी तीच चूक केली आणि एका टेस्टमध्ये दोन्ही इनिंग्समध्ये रन आऊट होण्याचा रेकॉर्ड केला.

hindustantimes.com

कसोटी क्रिकेटमध्ये “रन आउट” होणे म्हणजे ‘क्राईमच’…! हा मोठा अपराध समजला जातो. याबद्दल अगदी लहानपणापासून उदयोन्मुख क्रिकेटर्सना शिकवलं जातं.

भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या कसोटीत ज्या “बेसिक चुका” केल्यात, ज्याला “स्कुल क्रिकेट एरर “ ही म्हणतात, त्यावरून पुन्हा भारतीय खेळाडूंना क्रिकेट शाळेत जाऊन बेसिक गोष्टी पक्क्या करायला हव्यात.

जोहान्सबर्गमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत भारतीय खेळाडू किमान बेसिक चूक न करोत ही इच्छा आहे.

नाहीतर “आओ फिरसे स्कुल चले हम!”

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version