' मराठी शाळांची वस्तुस्थिती आणि सरकारचा सावळा गोंधळ – वाचा डोळे उघडणारा लेख! – InMarathi

मराठी शाळांची वस्तुस्थिती आणि सरकारचा सावळा गोंधळ – वाचा डोळे उघडणारा लेख!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : सूचीकांत वनारसे

===

मराठी शाळांना मारक आहेत सरकारी धोरणे, नकारात्मक प्रचार, एकदम बॉंब पडल्यासारखे कुणालाही विश्वासात न घेता घेतलेले निर्णय, त्यातून पसरणारे गैरसमज, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले Activist,  अर्धवट शिक्षणतज्ज्ञ इत्यादी..

दुर्दैवाने यांच्यापैकी एकही इंग्रजी शाळांच्यामागे लागून इंग्रजी शाळांचा डब्बा गुल करण्याकरता प्रयत्न करत नाही. उठसूट यांना मराठी शाळाच दिसतात.

 

marathi-school-inmarathi
loksatta.com

 

पण यांना मराठी शाळा खरोखर समजल्यात का अशी शंका वाटते!

मराठी शाळा हा विषय समजून घेण्याकरता आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढे जावे लागेल, काही संज्ञांचे अर्थ समजावून घ्यावे लागतील तरच सर्वसामान्यांच्या आणि सरकारी बाबूंच्या देखील मनातून मराठी शाळांबाबतचे भ्रम कमी व्हायला मदत होईल.

शिक्षणाचे माध्यम म्हणजे काय?

हा प्रश्न ऐकल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया असेल ज्या भाषेतून आपण शिक्षण घेतो ती भाषा! अगदी बरोबर! अजून खोलात जाऊन विचार करू.

मिडीयम म्हणजे शिक्षक मुलांशी ज्या भाषेतून संवाद साधतात ती भाषा, विद्यार्थी एकमेकांशी ज्या भाषेत संवाद साधतात ती भाषा, शिक्षक मुलांना कोणत्या प्रकारे शिकवतात हा पण मिडीयमचाच भाग आहे.

उदा. फळ्यावर सोडवून गणितीय संकल्पना समजत नसेल तर त्यावेळी कृतीयुक्त पद्धतीचा आधार घेतला जातो, ते पण मिडीयमच, पुस्तकातली भाषा म्हणजे देखील मिडीयमच..

अर्थात संवादाची भाषा, कृती, शाळेतील वातावरण, पुस्तके अशा सर्व गोष्टी मिडीयमचा अर्थात माध्यमाचा भाग असतात. यावरूनच शाळेचे माध्यम ठरते.

मातृभाषेतून शिक्षण

जगभरातील तज्ज्ञांनी मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचे समर्थन केलेले आहे. अगदी युनेस्को-ब्रिटीश कौन्सिलदेखील मातृभाषेतून शिक्षणाचे समर्थन करतात. मातृभाषेतून शिक्षण हा भावनिक मुद्दा नसून त्याला शास्त्रीय बैठक आहे.

अगदी थोडक्यात ३ मुख्य मुद्दे तुमच्यासमोर मांडतो.

१. मातृभाषेतून शिकल्यास पोपटपंची कमी प्रमाणात करावी लागते. कारण बहुतेक बालके अपेक्षित वेळेत मातृभाशेतला मजकूर वाचून पूर्ण करतात, त्यामुळे वाचलेले त्यांच्या अधिक चांगले स्मरणात राहते याविरुद्ध परकीय माध्यमात मात्र अपेक्षित वेळेत वाचता न आल्याने पोपटपंची/पाठांतर मोठ्या प्रमाणात होते.

 

teaching inmarathi
thederal.com

 

२. मातृभाषेतून शिक्षण पूर्णपणे शास्त्रीय असून भाषा शिक्षणाची सप्तपदी अनुसरली जाते, हेच इतर ठिकाणी होत नाही. परकीय माध्यमातील शिक्षण म्हणूनच अशास्त्रीय आहे.

३. बालकांची बुद्धिमत्ता कोणत्या प्रकारची आहे हे कळण्याकरता मातृभाषेतून शिक्षणच उत्तम आहे कारण मुले मातृभाषेतून शिकत असताना अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त होतात.

सेमीइंग्रजी म्हणजे काय?

सेमी इंग्रजी हे नाव ऐकल्यावर लोक बेधडकपणे सेमीमध्ये विज्ञान-गणित इंग्रजीतून शिकवले जाते आणि ते मातृभाषेतून शिकवायला हवे म्हणून गळे काढायला सुरुवात करतात.

यापैकी एकानेही सेमीतून शिक्षण घेतलेले नसते; ना सेमीमध्ये काय अपेक्षित आहे याचा त्यांना अभ्यास असतो.

सेमी म्हणजे बायलिन्ग्युअल शिक्षण पद्धती. तीच शिक्षणपद्धती जिचा अवलंब करून सिंगापूर प्राथमिक शिक्षणात जगातील प्रथम क्रमांकाचा देश बनला आहे.

जगातील साधारण ६०-७५% देशात बायलिन्ग्युअल अर्थात द्वैभाषिक शिक्षणपद्धती आहे. कॅनडा, इज्राएल, आयरलंड, पेरू, आखाती देश, इक्वाडोर, युरोपातले अनेक देश द्वैभाषिक शिक्षणपद्धतीचा अवलंब करतात.

या सर्व देशात मातृभाषेला प्राधान्य दिले जातेच पण त्याचसोबत द्वैभाषिक शिक्षणपद्धतीचा अवलंब केला जातो. या सर्व देशांमध्ये द्वैभाषिक शिक्षणपद्धतीच्या प्रत्यक्ष स्वरूपात कमी-जास्त फरक असू शकतो. उदा.

Transitional Bilingual Education – प्रथम भाषा पक्की झाल्यावर द्वितीय भाषा शिकणे..

Dual Language Immersion Bilingual Education – एकाचवेळी दोन्ही भाषांमधून शिकणे.

Late-Exit or Developmental Bilingual Education – जिथपर्यंत शक्य असेल तिथपर्यंत प्रथम भाषेतून/मातृभाषेतून शिकणे एका मर्यादेनंतर द्वितीय भाषेतून शिकणे. इ.

किंवा काही ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती, आव्हाने लक्षात घेऊन त्याप्रमाणे एखाद्या शिक्षणव्यवस्थेत आवश्यक बदल केले जाऊ शकतात.

सेमीइंग्रजी कधीपासून?

 

bilengual education inmarathi
change.org

 

शासनाच्या धोरणाप्रमाणे पहिलीपासून सेमीचा पर्याय उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे सहावी आणि आठवीच्यापुढे देखील असे पर्याय असतात.

प्राथमिक स्तरापासून काही ठिकाणी परिसरअभ्यास देखील इंग्रजीतून शिकवला जातो जे चूक आहे आणि यावर आक्षेप नोंदवायलाच हवा.

प्राथमिक स्तरापासून गणित शिकवण्याच्या शासनाच्या निर्णयावर शिक्षणतज्ज्ञ संबंधित वर्गांचे शिक्षक, धोरणकर्त्यांनी एकत्र बसून, सर्व्हे करून निर्णय घेणे अपेक्षित आहे.

मोठा शिक्षकवर्ग गणित विषय बायलीन्ग्यूअल/सेमी पद्धतीने शिकवण्याचे समर्थन करतो; कारण गणितात मुख्य भर आकडेवारीवर असतो.

सेमी इंग्रजी महाराष्ट्राला अजिबात नवीन नाही. गेली ५०-६० वर्षे महाराष्ट्रातील कित्येक शाळांमध्ये सेमीइंग्रजीचे वर्ग चालवले जातात.

बायलीन्ग्यूअल/सेमीइंग्रजीचे फायदे

जसे मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे आहेत त्याचप्रमाणे बायलिन्ग्युअल शिक्षणपद्धतीचे फायदे आहेतच. आपण पूर्ण मातृभाषेतून आत्ताच्या घडीला देखील शिक्षण घेत नाही. तांत्रिकदृष्ट्या ते शक्यदेखील नाही.

इंग्रजी माध्यमातून ११ वी, १२ वी आणि उच्चशिक्षण हा Late-Exit or Developmental Bilingual Education चा प्रकार आहे.

विज्ञान सांगतं, बायलीन्ग्यूअल/सेमीइंग्रजीमुळे मेंदूची तार्किक क्षमता, वाचनक्षमता, वैचारिक क्षमता, निर्णयक्षमता ;तसेच एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत मिळते. बायलीन्ग्यूअल मेंदूची रचना मोनोलीन्ग्यूअल मेंदूपेक्षा वेगळी असते.

 

Bilingual-Brain-inamarathi
tedtalks.com

 

ही झाली सर्व तांत्रिक माहिती.आता सर्वसामान्य पालक म्हणेल मी माझ्या मुलांसाठी नक्की कोणते माध्यम निवडू?

तर उत्तर आहे मराठी माध्यम!!! सेमी हे काही वेगळे माध्यम नाही, सेमीचे मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये वेगळे वर्ग भरतात. मराठी माध्यमात तुम्हाला अशा सर्व शास्त्रीय शिक्षणपद्धतीमधून शिक्षण घेण्याची मुभा मिळालेली आहे, तिचा लाभ घ्यावा.

मराठी माध्यमात शिकत असताना तुमच्या पाल्याचा प्रवास कसा होतो ते पुढील फ्लो-चार्ट द्वारे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजेल…..

 

Flow_Chart-inmarathi

 

यावरून आपल्या लक्षात आले असेल की मराठी शाळेत प्रवेश घेतल्यावर आपल्याला शिक्षणाचे २ उपयुक्त पर्याय मिळतात.

१. पूर्ण मातृभाषेतून शिक्षण

२. बायलीन्ग्यूअल पद्धतीने शिक्षण

आणि या दोन्ही पद्धतीने शिक्षण देण्याकरता सक्षम, उच्चशिक्षित आणि प्रशिक्षित शिक्षक वर्गसुद्धा! जो बहुतेक इंग्रजी माध्यमात मिळतच नाही!!!

पूर्ण जगभरात या दोन्ही शिक्षणपद्धतींचा मोठ्या प्रमाणात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात वापर केला जातो.

सर्व काही शास्त्रीय पद्धतीने मिळूनसुद्धा, मराठी शाळांच्या दर्जाबाबत सतत तक्रारी का असतात? याचं एकमेव कारण म्हणजे मराठीबाबतचा आपला न्यूनगंड! आपण म्हणजे आपण सर्वच!!! राजकीय नेते, मंत्री, शिक्षक, धोरणकर्ते, प्रशासकीय अधिकारी सर्वच!!!

सगळ्यांनी मराठी शाळांचं खेळणं करून ठेवलं आहे. आज मराठी शाळांचा आकडा ८० हजार ते १ लाखाच्या दरम्यान आहे, राज्यातली ७५% मुलं मराठी शाळांमध्ये शिकतात; त्यातली लाखो सेमीमध्ये तर लाखो पूर्ण मराठी वर्गांमध्ये शिकतात.

हजारो शाळा स्वबळावर, शिक्षकांच्या मेहनतीवर उभ्या आहेत. अनेक शाळा प्रयत्न करत आहेत;

असं असताना आजपर्यंत सरकारी शाळांमधल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची फसवणूक केली, दर्जेदार शिक्षण दिले नाही, असली आत्मघातकी वक्तव्ये राज्याच्या शिक्षण सचिवांनी करावीत यासारखे दुर्दैव नाही.

गेली कित्येक वर्षे मराठी शाळांना वाहून घेतलेल्या असंख्य शिक्षकांच्या, कार्यकर्त्यांच्या मेहनतीला एका क्षणात पाण्यात घालताना शिक्षण सचिवांना काहीच कसे वाटले नाही?

 

marathi schools inmarathi
indianexpress.com

 

शिक्षण सचिवांसाठी थोडक्यात माहिती :

जि.प . शाळेत शिकवणारा शिक्षक अनेक परीक्षारूपी चक्रव्यूहातून गेलेला असतो. अगदी पूर्वी १० वी नंतर डी.एड. होते, नंतर ते १२ वी नंतर झाले. त्यामुळे पूर्वी दर्जा होताच पण आता देखील शिक्षक दर्जेदार आहेतच.

हा ९० च्या दशकातील नवीन पिढीचा शिक्षक, भारतातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांपैकी एक आहे. अनेक परीक्षांच्या चक्रव्यूहातून तो तावून सुलाखून बाहेर पडला आहे.

आमचे शिक्षण सचिवांकरता काही प्रश्न आहेत –

  • या जि.प. शिक्षकाने १२ वी ला किमान ७०-७५ टक्के गुण मिळवलेत मग तो दर्जेदार नाही का?
  • मगच त्याला डी.एड.ला प्रवेश मिळाला. नंतर डी.एड. ला देखील हा शिक्षक उत्कृष्ट गुणांनी पास झाला, ६०, ६५,७० टक्क्याच्या पुढे गुण मिळवले, मग तो दर्जेदार नाही का ?
  • त्यानंतर प्रादेशिक निवड मंडळाकडून या शिक्षकांची परीक्षा घेतली जाते! त्याच्यामध्ये पात्रता परीक्षा पास होऊन ही मुलं शिक्षक झालीत, म्हणजे हा शिक्षक साधा आहे का?

मग नक्की कोणत्या आधारावर शिक्षण सचिवांनी आजपर्यंत सरकारी शाळांच्या शिक्षकांनी दर्जाच्या नावावर विद्यार्थ्यांची फसवणूक केली हे वक्तव्य केलं?

  • आज मराठी शाळांकडे सर्वकाही होतं; नव्हत्या त्या भौतिक सुविधा! त्यासाठी सरकारतर्फे काय पावले उचलण्यात आली?
  • सेमीच्या वर्गांना अजून सक्षम करण्याकरता, वेगळी बायलीन्ग्यूअल पुस्तके हवी होती, त्याकरता सरकारने काय पावले उचलली? १५ वर्षात पुस्तकं तयार करण खूप अवघड काम होतं का?
  • सेमी इंग्रजीसाठी सरकारने प्रशिक्षण देणं अपेक्षित होतं, दिलं का?
  • प्रत्येक शाळेत सेमी आणि मराठी असे दोन्ही पर्याय असायला हवे होते, सरकारने असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले का?

तरीही या सर्व आव्हानांना संधी समजून शिक्षकांनी स्वतःचा विकास साधत, सक्षम करत, कष्टाने शाळा उभ्या केल्या आणि फुलवल्या आहेत.  मग आहे ती व्यवस्था मोडीत काढण्याचा नैतिक हक्क तुम्हाला आहे का?

 

marathi teacher inmarathi
indianexpress.com

 

आहे ती परिस्थिती सुधारणे अपेक्षित आहे, मनात आलं तेव्हा चालू करायला, मनात आलं तेव्हा बंद करायला हा काही पोरखेळ नव्हे.

आम्ही केवळ मराठी शाळांचे समर्थक आहोत आणि तुमच्याकडे दाद मागतो आहोत, तुम्हाला प्रश्न विचारतो आहोत कारण या सगळ्याची नैतिक जबाबदारी तुमच्यावर आहे.

मराठी माध्यमाच्या शाळांना दर्जा नाही, मराठी शाळांमधून सेमी बंद करणार, असली वक्तव्ये देऊन राज्याच्या शिक्षण सचिवांनी राज्यातील विनानुदानीत, लुटारू, ५०% शिक्षक डीएड पण नसलेल्या, तटपुंज्या पगारावर शिक्षकांना राबवणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी रान मोकळे केले आहे.

आत्ता उलट सुलट वक्तव्यांनी मराठी शाळांचे जे नुकसान झाले आहे ते भरून काढायचे असेल तर मोठ्या प्रमाणात मराठी शाळा सक्षमीकरणाचे उपक्रम राबवावे लागतील.

आम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या पान-पानभर जाहिराती वर्तमानपत्रात रोज बघतो, आम्हाला महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांच्या मराठी शाळांच्या जाहिराती करणाऱ्या पान-पानभर जाहिराती बघायच्या आहेत.

 

uday samant inmarathi
ciol.com

 

जमल्यास परिस्थिती सुधारण्याकरता प्रयत्न करा! अजूनही वेळ गेली नाही…नाहीतर कारण नसताना, मराठी शाळा मोडीत काढल्याचं पाप तुमच्या माथी बसेल हे लक्षात ठेवा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?