Site icon InMarathi

आभासकुमार गांगुली ते किशोर कुमार : एक दृष्टी आड घडलेला प्रवास

kishor kumar inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – सौरभ गणपत्ये
===

“आभासकुमार गांगुली” नावाचा गायक जगात नसता आला तर काय झालं असतं याचा अंदाज करवत नाही. मोबाईल हे जसं आज माणसाच्या हाताचं एक्सटेंशन झालंय तसं गाण्यात किमान रस असलेल्या प्रत्येक तरुण मुलाच्या संगीताचं किशोर कुमार हे  एक्सटेंशन  झालंय.

किशोरकुमारबद्दल अवधूत गुप्ते सारेगमपमध्ये फार सुंदर बोलून गेला होता.

बहुतांश तरुण मुले आपल्या गाण्याची सुरवात किशोरकुमारपासून करतात. मग पुढे गाण्यात करियर करू पाहणाऱ्या काहींचा सुरेश वाडकर होतो. याचाच अर्थ किशोरकुमारची गाणी ऐकायला आणि त्याहीपुढे उचलायला सोपी वाटतात. मीही असाच गाऊ शकतो असं किशोरकुमारचं गाणं ऐकणाऱ्या प्रत्येकाला मनोमन वाटतं.

इथेच खरी गफलत होते आणि किशोरकुमारचं महानपण कळेपर्यंत आपली मोठी फसगत झालेली असते.

 

आपण पामर असतो तेंव्हा आपली फसगत होणं आपला हक्क आहे. या अवलियाचं ग्रेटपण कळायला जगाला काही दशकं लागली – त्यात  जगाचा काय दोष?!

जेंव्हा मोहम्मद रफी व्याकुळ होऊन “झिंदाबाद झिंदाबाद,  ए मोहम्मद झिंदाबाद”  म्हणत होता तेंव्हा हा “सुरमा मेरा निराला, आखोंमे जिसने डाला” म्हणत होता. ज्या काळात रफी “सौ बार जन्म लेंगे, ए जाणे वाफ फार भी, हं तुम ना जुदा होंगे” म्हणत होता तेंव्हा किशोरकुमार ‘गंगा की  लहरे’ दुय्यम भूमिका स्वीकारत होता.

दिलीपकुमार-रफी, राज कपूर-मुकेश ह्या जोड्या अजरामर होत होत्या तेंव्हा देव आनंदला किशोरचा आवाज द्यायचा की नाही यावर चलबिचल होत असे.

दिल का भवर करे पुकार किंवा अच्छा जी मै हारी चालो मान जाओ ना ही देवची गाणी किंवा जवानीया ये मस्त मस्त बिन पिये किंवा बार बार देखो हजार बार देखो ही शम्मीची जॅझ गाणी किशोरला गेली असती असती तर?

पण हे होण्यातलं नव्हतं. जगाने याला गांभीर्याने घेतलं नाही कारण यानेच स्वतःला गांभीर्याने घेतलं नाही. दादामुनींनी त्याच्याबद्दल सांगितलेला किस्सा अघटित आहे.

आभासचा आवाज अजिबात चांगला नव्हता. काहीतरी भयंकर वाटायचं. एका जत्रेला पूर्ण कुटुंब गेलं असताना आभासची करंगळी कापली गेली. रात्रभर हा रडरड रडला. संपूर्ण घर डोक्यावर घेतलं. बाकी कोणालाही झोप लागली नाही. शेवटी सकाळी कधीतरी दमून झोपला. त्यानंतर त्याचा आवाज बरा यायला लागला. कदाचित रडरड रडून स्वरयंत्र साफ झालं असावं.

पट्टीचा गायक असूनसुद्धा “अजब है दास्तान ए जिंदगी तेरी’ (शरारत) त किंवा “अपनी आदत  है सबको सलाम करना” किंवा रागिणी (१९५८) मधील “मन मोरा बावरा” या गाण्यांत रफीने त्याच्यासाठी पार्श्वगायन करणं ही खरी त्याच्यासाठी रडू येण्यासारखी गोष्ट होती. बट शो मस्ट गो ऑन.

१९६७ साली कलकत्याला एक कार्यक्रम होता. त्यात मोहम्मद रफी, मन्ना डे, हेमंत कुमार यांच्याबरोबर किशोरने भाग घेतला होता. (साले बंगाली, इतका नशीबवान कसा काय रे देवा…!). अजूनही फार ग्रेट ओळख नाही. नायक म्हणून करियर संपलेलं आणि कौटुंबिक कटकटी. आपल्या  गाण्याची  सुरवात किशोरने हमिंग ने केली. (मेरे नैना सावन भादो, मेहबुबा १९७६ गाण्याची सुरवात आठवा).

पब्लिकने अक्षरश: कार्यक्रम डोक्यावर घेतला. तेंव्हाच नवीन काही घडू लागल्याची चाहूल लागली.

किशोरकुमार या माणसाच्या गाण्याचा पट मांडताना आर डी बर्मन या माणसाला दुर्लक्षित करणं पाप आहे.

१९६९ साली एक सिनेमा आला होता प्यार का मौसम नावाचा. नायक शशी कपूर. यात सगळीच गाणी रफीने (थोडक्यात अजरामर) गायली होती. सचिन देव बर्मन यांनी स्वरबद्ध केलेल्या या गाण्यांत एक गाणं आर डी ला जाम भावलं.

“तुम बिन जाऊ कहाँ, के दुनिया में आके कुछ ना फार चहा सनम, तुमको चाहके”…

आर डी ने आग्रह धरला. ‘मला हे गाणं किशोरकडून गाऊन हवंय’.

सचिनदा प्रतिकूल होते. गाणी गाऊन झाली होती. सिनेमा यायचा बाकी होता. आर डी हट्टाला पेटला. एक अत्यंत जुजबी प्रसंग तयार होऊन किशोरकडून ते गाणं गाऊन घेतलं गेलं. पडद्यावर बापाच्या भूमिकेतला, हिंदी सिनेमातला नशीबवान माठोत्तम भारत भूषण हातात तुणतुणं घेऊन.

यॉडलिंग कम हमिंग करत किशोर गाण्याची सुरवात करतो. समोर बर्फाचा आणि हिरवा डोंगर. गाणं अजरामर झालं. रफी शब्दांनी गायला तर किशोर सुरांनी. ह्याच्या आधी हेच ‘ज्वेलथीफ’ साठी घडलं होतं. खरं तर किशोरकुमारला त्याआधी सर्वाधिक संधी सचिन देव बर्मननीच दिली होती. सर्वात अजरामर असणाऱ्या ‘पडोसन’ मधे सुनील दत्तला सुद्धा मस्त आवाज बसला होता.

त्याच वर्षी आराधना सिनेमाच्या संगीताच्या वेळी सचिनदा आजारी पडले. त्यांची गाणी रफीने गायली होती. आर डी बर्मननी चार्ज घेतला.

“मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू”…”रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना”…

पुढची अठरा वर्षे क्रांतीची होती.

सगळेच बाजूला फेकले गेले. बाकी कोणाला जमू शकलं नाही ते किशोरने करून दाखवलं.

अनेकांना वाचायला आवडणार नाही…पण संगीताच्या क्षेत्रात नायक म्हणून किशोरने एक नव्हे तर दोन दोन सुपरस्टार तयार केले. राजेश खन्नाची सद्दी पूर्ण संपल्यावर अमिताभची जी काही अजरामर गाणी आहेत ती किशोरची आहेत. पिढी बदलली. नायक बदलले. लोकांचा मूड बदलला – पण गायक तोच…किशोर…!

(अमिताभशिवाय पान नं हलणे आणि इंदिरा गांधींचा पराभव या एकत्र जाणाऱ्या गोष्टी आहेत. त्यावरून स्थित्यंतर लक्षात यावे…!)

पार्श्वगायनात किशोरकुमार लोकांचा प्राण झाला तो याच काळात. वर उल्लेखिलेल्या मेरे नैना गाण्यातून आर डी ने त्याच्या गळ्यातून चक्क शिवरंजनी काढला. अगदी ‘सगीना’ मध्ये त्याने ‘साल्ला मै तो साहब बन गया’ म्हणत साक्षात दिलीपकुमारला आवाज दिला.

‘अंदाज’ हा शम्मी कपूरचा नायक म्हणून शेवटून दुसरा सिनेमा. त्यातल्या अनेक पोस्टर्समध्ये राजेश खन्नाचा चेहरा शम्मीएवढा आहे. भूमिका २० मिनिटांची पण जतीन खन्ना होता सुपरस्टार.

आजही कोणीही सिनेमाचा विषय काढला की राजेश खन्ना, हेमा, त्यांची बुलेट आणि मागे “जिंदगी एक सफर है सुहाना” म्हणत “युडलेही युडलेही यु हू” म्हणत यॉडलिंग करणारा किशोर हेच डोळ्यासमोर येतात. भारतात हे कौशल्य एकट्या किशोरने वापरलं.

किशोरकुमार आणि अमिताभ बच्चन हे पडद्यावरचं समीकरण जीवघेणं होतं.

 

 

शेट्टीच्या गुंडांना रुग्णवाहिका नेऊन मारझोड करणारा अमिताभ हातात वाद्य घेऊन “तुम भी चलो, हम भी चले, चलती रहे ये झिंदगी” किंवा “रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन” म्हणतोय या गोष्टी किशोरने पडद्यामागे राहून श्रवणीय केल्या.

कोणीही तोंड उघडलं की गळ्यातून किशोरकुमारचा आवाज निघू लागला.

शराबी सिनेमाच्या वेळी त्याच्यात आणि अमिताभ मध्ये वाद झाला. अमिताभला आवाज द्यायला शब्बीरकुमार आला. (रफीसाब माफ करा त्याला. चुकतात माणसं…!).

“मर्द टांगेवाला मै हूँ मर्द टांगेवाला” किंवा “सून रुबिया, प्यार हो गया” ही गाणी आणि सिनेमात अमिताभ…अति झाल्याचं लक्षण होतं. त्यावेळी किशोरकुमार “यादे वादे आवाज देते ना काश” म्हणत जॅकी श्रॉफला अभिनेता म्हणून मोठा करत होता. हे त्याचं शेवटचं सुग्रास जेवण.

(त्याआधी “अंधेरी रातोंमे सुनसान राहोपर म्हणत” त्याचं अमिताभशी समीकरण जुळलं बाबा).

अनेकांना किशोरकुमारबद्दल चांगलं बोललं की रफीवर अन्याय झाल्यासारखा वाटतो. किशोरकुमारने ‘अमर अकबर अँथोनी’ मध्ये ‘परदा है परदा’ गाण्यात एकच (अकबर तेरा नाम नही है…) ओळ गायली होती. यावरून दोघांची दोस्ती लक्षात यावी. या दोघांनी एकत्रित सत्तर गाणी गायली आहेत.  आपल्या चर्चेच्या खूप पलीकडे आहेत हे दोघे.

जेमतेम २९०० गाणी (जेमतेम म्हणजे रफीच्या तुलनेमध्ये). उडकती, फडकती, धांगडधिंगा, पिकनिक गाणी, गझला आतडी पिळवटून टाकणारी विरह गीते…ह्या सर्वांमुळे किशोरकुमार हे आमचं सांस्कृतिक आयुष्य आहे.

‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ च्यावेळी किशोर नव्हता. नियती आणि आयुष्य किती क्रूर असतं त्याची ही झलक. अगदी “बचना ए हसींनो” म्हणणाऱ्या रणबीरलाही हा आवाज चांगला वाटला.

आज हे आठवलं कारण किशोरकुमार नसतानाच्या ३० व्या वर्षात आपण येतोय. काहीच बदलेलं नाहीये. घड्याळ तिकडेच थांबलंय.

The show has stopped…so has the life…

त्याच्याच लिहिलेल्या शब्दात (आणि दिलेल्या चालीत) सांगायचं झालं तर…

मैं अकेला तो ना था, थे मेरे साथी कई…
एक आंधी सी उठी, जो भी था लेके गयी…
ऐसे भी दिन थे कभी मेरी दुनिया थी मेरी…
बीते हुए दिन वो हाय प्यारे पलचीन…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version