आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
सध्या भारतात हिवाळा सुरु आहे. गुलाबी थंडी हा कित्येकांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय. ऋतूचक्रानुसार विचार केला तर साधारणतः ऑक्टोबर ते जानेवारी हा काळ हिवाळ्याचा असतो. भारताच्या उत्तर भागात तुलनेने जास्त थंडी पडते. लोक रस्त्यावर शेकोट्या पेटवतात. जास्त म्हणजे किती? तर सरासरी १० ते १५ सेल्सियस.
महाराष्ट्रात सर्वात कमी तापमान पुण्यात ११ नोव्हेंबर २०१६ या दिवशी नोंदवले गेले. त्या दिवशी तापमान होते ९.४ डिग्री सेल्सिअस. उत्तर भारतात हिमालयीन पर्वतरांगांमधील जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये सर्वात कमी तापमान नोंदवले जाते. काश्मीर खोर्यात तापमान शून्याच्या खालीच असते. त्यामुळे तिथे परिस्थिती सामान्य माणसाने सहज रहावे अशी नसते.
पण असे एक गाव आहे ज्या गावात सरासरी तापमान शून्याच्या वरही जात नाही. म्हणजे कायम वजा! हे गाव जगातील सर्वात थंड ठिकाण म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण म्हणजे रशियाच्या सायबेरियातील बर्फाच्या घाटीत वसलेलं एक छोटसं गाव. ‘ओइमाकॉन’ किंवा Oymyakon असे या गावाचं नाव आहे.
हे एक असं गावं आहे जिथले विद्यार्थी ‘-५२’ सेल्सियस पर्यंत तापमान जोपर्यंत “वाढत” नाही तोपर्यंत शाळेत जाऊ शकत नाहीत!
या गावाला जगातील सर्वात थंड ठिकाणी वसलेलं गावं मानले जाते. काही काळापूर्वी या ठिकाणचे तापमान -६२ डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याची नोंद करण्यात आली आहे. एवढी थंडी खरंच असू शकते याचा आपण स्वप्नातही कधी विचार नसेल केला. पण या तापमानात देखील येथील लोक येथे आपले जीवन जगत आहेत.
Oymyakon हे गाव रशियाची राजधानी मॉस्कोच्या पूर्व दिशेने ३००० मैलाच्या अंतरावर आहे. येथे तुम्हाला कुठेही हिरवळ आढळणार नाही, जिकडे नजर जाईल तिकडे केवळ बर्फाची चादरच दिसेल. Oymyakon या गावाला हे नावं येथील नदीवरून देण्यात आले आहे, या शब्दाचा अर्थ, ‘एक अशी जागा जिथे पाणी गोठत नाही.’ पण या तापमानात पाणी काय पूर्णच्या पूर्ण माणूस गोठायचा!
जानेवारी महिन्यात येथील साधारण तापमान हे -५० डिग्री सेल्सिअसच्या जवळपास असते. येथे -७१.२ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची सर्वात कमी तापमान म्हणून नोंद करण्यात आली होती.
म्हणूनच Oymyakon ला ‘Pole of Cold’ म्हणजेच थंड ध्रुव देखील म्हटले जाते.
कधी काळी येथे सूर्य देखील नजरेस पडतो. पण हे तेव्हाच शक्य होते जेव्हा थंडी कमी असेल. पण तरी देखील सूर्याची उब ह्या लोकांना जाणवत नाही.
जर थंडीत कधी कोणी घराबाहेर निघाले, तर त्या व्यक्तीच्या पापण्या देखील बर्फाच्छादित होऊन जातात. यावरू आपण अंदाज लावू शकतो की, येथे किती थंडी पडत असेल.
१९३३ साली Oymyakon या गावात -६७.७ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली होती. हे त्यावेळी उत्तरी गोलार्धातील सर्वात कमी तापमान होते. मागील वर्षी २२ डिसेंबरला येथे -५८ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली होती.
यावर्षी संपूर्ण पृथ्वीतलावर थंडीचा कहर माजला आहे, तेव्हा या गावातील थंडीने देखील आपल्या सर्व सीमा पार केल्या आहेत. सध्या येथील तापमानात एवढी घट झाली आहे की, येथील लोकांच्या पायासोबतच त्यांच्या पापण्या देखील गोठल्या आहेत.
येथील अधिकृत हवामान खात्याने ‘Pole of Cold’ वर -५९ डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद केली आहे. पण नवीन इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर नुसार येथील तापमान -६२ डिग्री सेल्सिअस आहे.
Oymyakon या गावाचा इतिहास देखील अतिशय रंजक आहे. १९२० ते १९३० दरम्यान हे ठिकाण गुरे चारायला येणारे लोक तसेच सेनेच्या विश्रांतीचे ठिकाण होते. सोव्हियत सरकारला नौमेडिक लोकांवर नियंत्रण मिळविण्यात यश येत नव्हते तेव्हा त्यांनी या लोकांना येथे Oymyakon मध्ये वसवले.
तेव्हापासून Oymyakon हे गाव माणसांची वसाहत असलेले जगातील सर्वात थंड ठिकाण ठरले.
एकदा न्युजीलंडचा फोटोग्राफर Amos Chapple ने या गावाचा दौरा केला होता. तेव्हा त्यांनी येथील फोटो काढण्यासोबतच येथील काही गोष्टी देखील शेअर केल्या. त्यांनी सांगितले की, येथील लोक अश्या काही परिस्थितीत जीवन जगत आहेत ज्या परिस्थितीत राहणे सामान्य माणसासाठी अतिशय कठीण आहे. येथे तर आपण नळातून पाणी येईल याची अपेक्षाही करू शकत नाही.
त्यांनी हे देखील सांगितले की, येथे कुठल्या वाहनाला चालवायच्या आधी त्याला हिट असलेल्या गॅरेजमध्ये ठेवावे लागते. येथे एवढी थंडी होती की, त्यांच्या कॅमेऱ्याचा फोकस देखील जमत नव्हता कारण त्यांच्या कॅमेऱ्यातील झूमची रिंग देखील गोठून गेली होती.
Oymyakon एक छोटसं गावं आहे. येथील लोकसंख्या केवळ ५०० च्या घरात आहे. लोकांना आपल्यासाठी सामान्य असलेल्या लहान लहान गोष्टींकरिता देखील संघर्ष करावा लागतो. त्यांना येथे पाण्यासाठी देखील झुंज करावी लागते, कारण बघता बघता येथे पाणी गोठून जातं, जर पाणी हवेत उधळले तर ते खाली येण्याआधीच त्याचा बर्फ होऊन जातो. बाहेर निघालं की, चेहरा देखील बर्फाने झाकून जातो.
हे ठिकाण एवढे थंडे आहे की, आपण तेथे एक दिवस देखील काढू शकणार नाही, पण येथील लोकं एवढ्या विषम परिस्थितीत देखील येथे राहत आहेत.
बघा येथील आणखीन काही थक्क करणारे फोटोज :
स्त्रोत : BoredPanda
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.