६००० वर्षापूर्वीचे “दोन सूर्य” : प्राचीन भारतीयांच्या कुतूहलबुद्धीचा आविष्कार!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
लेखक – विनीत वर्तक
===
भारताच्या प्राचीन संस्कृतीचे दाखले आजही अनेक ठिकाणी सापडतात. काश्मीर मधील बुर्झाहामा या ठिकाणी एका दगडावर कोरलेले चित्र सुमारे ५० वर्षापूर्वी मिळाले.
संशोधकांच्या मते ते जवळपास ६३०० वर्षापूर्वीचे आहे. ह्या चित्रात दोन शिकारी, एक रेडा आणि दोन डिस्क दाखवल्या आहेत.
आधीच्या संशोधनाप्रमाणे ह्या दोन डिस्क म्हणजे दोन सूर्य असावेत असा तर्क मांडला गेला.
पण आकाशात एक सूर्य असताना दोन सूर्य दाखवण्यामागचे प्रयोजन काही संशोधकांना मान्य नव्हते.
इतक्या जुन्या काळातील हे चित्र एखादी ऐतिहासिक आणि महत्वाची घटना दाखवणारं असावं असं त्यांना वाटत होतं.
म्हणून ह्या दोन सूर्याच्या पाठीमागचे रहस्य शोधण्यासाठी भारतातून टी.आय.एफ.आर चे मयंक वाहिया आणि त्यांचे सहकारी आणि जर्मनी मधल्या संशोधकांनी अजून संशोधन केलं.
संशोधकांना पक्कं माहित होतं की दोन सूर्य दाखवणे ही चित्रकाराची चूक नव्हती तर त्या वेळेला आकाशात काहीतरी अद्भुत घडलं असावं!
आणि त्यांना दोन सूर्य किंवा सूर्याच्या प्रखरतेइतपत काहीतरी दिसत असावं म्हणून ते दाखवलं किंवा चित्रित करून पुढल्या पिढीला संदेश दिला गेला असावा.
संशोधकांच्या टीम ने इतिहासाची पाने पुन्हा एकदा अभ्यासाला घेतली.
सूर्याच्या प्रकाशाला तोडीस तोड अशी कोणती घटना आकाशात घडू शकते ह्याचा वेध आणि विचार करताना एका घटनेने त्याचं लक्ष वेधलं.
अवकाशात घडणारी पण हजारो वर्षात एकदा दिसणारी अशी घटना म्हणजे सुपरनोव्हा…!
सुपरनोव्हा म्हणजे काय?
जन्म होतानाच कोणत्याही ताऱ्याचा अस्त हा ठरलेला असतो. अणुप्रक्रियेमुळे निर्माण झालेली ऊर्जा किंवा बल आणि आपल्या वस्तुमानामुळे असलेलं गुरुत्वीय बल हे जोवर समान तोवर ताऱ्याचं आयुष्य.
ज्या वेळेला ताऱ्याचं आयुष्य संपुष्टात येत असतं, तेव्हा नुक्लीयर फायर किंवा अणुकेंद्रीय विखंडन आणि गुरुत्वीय बल ह्यांच्यातील एकसंधपणा संपुष्टात येतो.
सूर्याच्या बाबतीत बोलायचं झालंच तर १ बिलियन वर्षानंतर सूर्याच्या प्रकाशात १०% वाढ होईल. ही जास्ती नसली तरी तिचा पृथ्वीवर खूप मोठा परिणाम होईल.
त्या नंतर सूर्याचं आकारमान इतक वाढत जाईल कि बुध, शुक्र ग्रह तर आपली पृथ्वी पण त्याने गिळंकृत केलेली असेल.
तो एक रेड जायंट तारा झालेला असेल. त्यानंतर त्याचा प्रवास व्हाईट डार्फ ताऱ्याकडे होईल.
प्रत्येक ताऱ्याच्या बाबतीत असं होईल असं नाही. ताऱ्याच्या वस्तुमानावर त्याचा शेवट काय होणार हे ठरलेलं असतं. सूर्यापेक्षा कित्येक मोठ्या असलेल्या ताऱ्यांच्या बाबतीत ते वेगळे आहे.
महाकाय ताऱ्यांमधील रेडीएशन बल इतके प्रचंड असते कि, त्याच्या गुरुत्वीय बलाला वरचढ ठरते.
ह्यामुळे त्यातील समतोल राखणे ताऱ्याला आयुष्याच्या शेवटी अशक्य होत जाईल.
रेडिएशन बल इतके प्रचंड होईल कि त्यामुळे ह्या ताऱ्याचा विस्फोट होईल. हा विस्फोट इतका प्रचंड असेल की हजारो प्रकाशवर्ष दूरवर पण हा दिसेल.
त्याचा प्रकाश किंवा त्यावेळी आकाशात ही घटना इतकी तेजस्वी असेल की सूर्याच्या तेजामध्ये पण ह्याच अस्तित्व दिसून येईल.
संशोधकांनी अशी कोणती घटना आकाशात घडली होती का ह्याचा शोध घेतला. त्यानंतर जे समोर आलं ते थक्क करणारं होतं.
सुमारे ६००० वर्षापूर्वी एच.बी. ९ नावाच्या ताऱ्याचा असाच महास्फोट झाल्याच त्यांना आढळून आलं. काश्मीरमध्ये मिळालेल्या चित्राचा कालावधी आणि ह्या महास्फोटाचा कालावधी हे मिळतेजुळते आढळून आले.
हे समोर येताच संशोधकांनी अजून खोलवर ह्याचं संशोधन केलं.
त्यावेळचे आकाश कसे असेल आणि भारताच्या काश्मीरमधून हा महास्फोट कुठे दिसला असेल ह्याचा अभ्यास त्यांनी केला.
हा तारा ओरायन ह्या तारकासमुहात दिसला असेल ह्यावर एकमत झालं…!
ओरायन तारका समूह हा शिकारी शिकार करतानाच्या प्रतिकृतीचा समजला जातो. हेच सगळ चित्रातून दिसून येते.
शिकारी हा सेट ताऱ्यापासून तर त्याच्या उजव्या बाजूला असलेला प्राणी हा अन्ड्रामेडा आणि पेगासुस दाखवतो. तर –
भाला हा तेजस्वी ताऱ्याचा रस्ता दाखवतो…!
हे पूर्ण चित्र जेव्हा आपण आकाशाशी जोडतो तेव्हा आपल्या पूर्वजांनी बघितलेल्या अदभूत घटनेची साक्ष हे चित्र आजही ६००० वर्षांनी आपल्याला देत आहे.
संशोधकांच्या मते सगळ्यात जुनी अशी सुपरनोव्हा ची नोंद हि चीन मध्ये असून ती साधारण १००० वर्षापूर्वीची आहे. त्यामानाने काश्मीर च्या चित्रात बंदिस्त केलेला हा वैश्विक नजराणा तब्बल ६००० वर्ष जुना आहे.
ह्या चित्राने आपली संस्कृती किती पुढारलेली होती आणि आपल्या आकाशात घडणाऱ्या अनेक गोष्टींचं कुतूहल त्यांना वाटत होतं ह्याची साक्ष दिली आहे.
आपण अनुभवलेल्या गोष्टी त्याच सचोटीने पुढल्या पिढीकडे हस्तांतरण करण्यासाठी चित्राचा केलेला उपयोग खूपच अदभूत आहे.
आज तो सुपरनोव्हा नष्ट झाला असला तरी त्याची आठवण हे चित्र ६००० वर्षानंतर पण दोन सूर्याच्या रुपात आपल्याला करून देते आहे.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.