Site icon InMarathi

विवेकानंदांचं ओढूनताणून ‘पुरोगामीकरण’ करण्याच्या प्रयत्नांना चोख उत्तर देणारा सणसणीत लेख

swami-vivekananda-4 InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

विवेकानंद जयंतीचं “औचित्य” साधून, दिनांक ११ जानेवारी २०१८ (स्वामी जयंतीच्या एक दिवस आधी) दैनिक लोकसत्ताने “विवेकानंदांचा ‘ईश्वरवाद’” नावाचा एक लेख प्रसिद्ध केला होता. लेखक होते विश्वांभर धर्म गायकवाड.

 

 

 

लेखात बरीच आश्चर्यजनक विधानं आणि निष्कर्ष होते.

विवेकानंदांबद्दल अगदी जुजबी माहिती असणाऱ्या कुणास हे सर्व वाचून असं वाटावं की आजपर्यंत ओळखलेले, जाणून घेतलेले विवेकानंद खरे नाहीतच!

===

सदर लेखावर, श्री श्रीकांत पटवर्धन ह्यांची प्रतिक्रिया दैनिक लोकसत्ताच्या “लोकमानस सदरात स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिनी, म्हणजे १२ जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध झाली. लेखकांच्या परवानगीने ती प्रतिक्रिया, इनमराठीच्या वाचकांसाठी पुढे प्रसिद्ध करत आहोत.

===

विवेकानंदांचे ओढूनताणून ‘पुरोगामीकरण’ अनावश्यक

विवेकानंदांचा ‘ईश्वरवाद'” हा लेख वाचला.

हिंदू धर्म, हिंदुत्त्व, वेदांत, संन्यास अशा शब्दांची “मागासलेपणा” शी मनोमन, घट्ट सांगड घालून, जे तथाकथित पुरोगामी विचार मांडले जातात, त्याचा हा नमुना म्हणावा लागेल.

हिंदू धर्मात किंवा हिंदू धर्माशी संबंधित असे जे जे काही निर्विवादपणे महान, भव्य, जगन्मान्य असे असेल, ते ते अगदी वेचून “वेगळे” काढायचे, आणि त्या गोष्टींचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नसल्याचे ठासून सांगायचे – अशी ही एकूण ‘वैचारिक’ मांडणी असते! असो.

 

winnipegfreepress.com

 

ह्या लेखापुरते बोलायचे, तर निदान विवेकानंदांच्या बाबतीत तरी ही मांडणी अजिबात योग्य नसल्याचे दिसून येते.

 

१. “विवेकानंद हे हिंदू धर्मशास्त्रा प्रमाणे पूर्ण संन्यासी नव्हते” – हे विधान वस्तुस्थितीला धरून नाही.

१८८५ – ८६ च्या सुमारास रामकृष्ण परमहंसांच्या अखेरच्या आजारात नरेंद्र (विवेकानंद) व इतर काही शिष्यांनी त्यांची सेवा शुश्रुषा केली.

आपला अंतकाळ समीप आल्याचे कळताच श्री रामकृष्णांनी शक्तिपात मार्गाने आपली सारी आध्यात्मिक शक्ती नरेंद्राला दिली.

त्याच वेळी त्यांना आपल्या इतर शिष्यांची काळजी घेण्यास, व इतर शिष्यांना विवेकानंदांचे नेतृत्त्व स्वीकारण्यास सांगितले.

विवेकानंद व हे शिष्य, ह्यांना ह्याचवेळी रामकृष्णांनी स्वतः भगवी वस्त्रे प्रदान केली.

अशा तऱ्हेने आध्यात्मिक दृष्ट्या संन्यासाची, शिष्यत्त्व स्वीकाराची प्रक्रिया जरी रामकृष्णांकडूनच पूर्ण झाली असली, तरीही त्यांच्या महासमाधी नंतर (१६ ऑगस्ट १८८६) म्हणजे १८८६ च्या ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला विवेकानंद आणि इतर आठ शिष्यांनी अधिकृतपणे – हिंदू परंपरेनुसार – संन्यास दीक्षा घेतली.

 

 

२. “हिंदू धर्मात संन्यासी जनतेपासून दूर असतात” – हे विधानही अपुऱ्या माहितीवर आधारित आहे.

फार लांब कशाला, खुद्द आद्य शंकराचार्यांचे च उदाहरण पुरेसे आहे.

त्यांनी भारतभर भ्रमण करून, वादविवाद, धर्मचर्चा केल्या, चार मठांची स्थापना केली, स्तोत्रे रचून लोकांना भक्ती सुलभ केली, पंचायतन पूजा सांगून धर्माला थोडे संघटित स्वरूप दिले, ते काय जनतेपासून दूर राहून?

तसेच स्वामी रामतीर्थ, महर्षी दयानंद, परमहंस योगानंद, अलीकडच्या काळातील वासुदेवानंद सरस्वती, श्रीधरस्वामी, ही लोकसंग्रह करणाऱ्या, जनतेत मिसळणाऱ्या संन्यासांची उदाहरणे प्रसिद्धच आहेत.

हिंदू धर्मानुसार संन्यासाने एका ठिकाणी जास्त काळ (तीन रात्री पेक्षा जास्त) राहू नये, म्हणजेच सतत भ्रमण करीत असावे, असेच अभिप्रेत आहे.

त्यामुळे विवेकानंदानी परिव्राजक म्हणून (स्वतः व त्यांच्या शिष्यानीही) भ्रमण केले, तर त्यात पारंपारिक संन्यासाहून काही वेगळे केले, असे होत नाही.

३. “विवेकानंदानी कुठेतरी मठ स्थापून आराधना न घेता…परिव्राजक स्वरुपात (केवळ) भ्रमण केले…” हेही वस्तुस्थितीला धरून नाही.

उलट रामकृष्णांच्या महासमाधीनंतर लवकरच त्यांनी ‘बारानगर’ येथे एका पडक्या वास्तूत पहिला मठ स्थापला, जी पुढील रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन ह्या संस्थेची पहिली वास्तू ठरली.

ह्या बारानगर मठात त्यांनी व इतर शिष्यांनी पहिले काही महिने केवळ आध्यात्मिक साधना (जप, ध्यान इ.) केली.

१ मे १८९७ रोजी कलकत्ता येथे रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन (मुख्यालय बेलूर मठ), हिमालयात मायावती (अलमोरा जवळ) येथे अद्वैत आश्रम, तसेच मद्रास येथेही एक मठ स्वामी विवेकानंदानी स्थापला.

 

 

४. “आजपर्यंत विवेकानंदाना सोयीनुसार वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे व आजही होत आहे” – ह्या वाक्यात विवेकानंदांच्या जागी दुसऱ्या कोणाही धार्मिक नेत्याचे, संताचे नाव टाकले, तरी फारसा फरक पडणार नाही.

सर्वच संताना, धर्म संस्थापकांना, लोक (अनुयायी) अगदी आपल्या सोयीनुसारच ‘वापरत’ आलेले आहेत. त्यामुळे केवळ विवेकानंदांच्या बाबतीत हा आरोप फारसा पटण्यासारखा नाही.

५. विवेकानंदाना “निर्गुण ईश्वरभक्त” म्हणणे, हे तर अजिबात पटणारे नाही. कारण वस्तुस्थिती तशी नाही.

अमेरिकेतील आपल्या व्याख्यानांतून त्यांनी तथाकथित ‘निर्गुण उपासने’वर तर्कशुद्ध कठोर टीका केलेली आहे.

एके ठिकाणी ते म्हणतात,

“ईश्वराच्या अनन्तत्वा”ची कल्पना (ध्यान) करताना, ज्याच्या मनःचक्षुंपुढे अथांग पसरलेला सागर, किंवा अनंत आकाश यापैकी काहीच येत नसेल, असा मनुष्य संभवत नाही.

अथांग सागर, किंवा अनंत आकाश, ह्या शेवटी ,अगदी निश्चितपणे, “प्रतिमा”च आहेत !

त्यामुळे प्रत्येकजण, स्वतःला निर्गुण उपासक म्हणवणारा सुद्धा, खरेतर प्रतिमापूजक / सगुण उपासक च आहे !”

सगुण उपासनेचे मर्म इतक्या थोडक्यात, पण अचूकपणे विवेकानंदानी सांगून ठेवले आहे.

६. “विवेकानंद हे हिंदूंचे नसून भारतीयांचे आहेत.” – हे विधान हिंदू विचारसरणीचे नमुनेदार (typical) उदाहरण आहे.

एक सच्चा हिंदूच असे मत स्वीकारू शकतो, मांडू शकतो. मात्र –

हे म्हणत असताना, किती ख्रिश्चन, मुस्लीम, किंवा इतर पोथीनिष्ठ, एक प्रेषित / एक ईश्वर मानणाऱ्या (एकेश्वरवादी) धर्मांचे अनुयायी विवेकानंदाना “आपले” म्हणू शकतील, ह्याचाही विचार व्हायला हवा.

थोडक्यात, विवेकानंद जे आहेत, जसे समजले गेले आणि समजले जातात ते अगदी तसेच – “महान” आहेत.

त्यांना ‘पुरोगामी दृष्टीने महान’ (?) ठरवण्यासाठी ओढून ताणून – मानवतावादी, धर्मनिरपेक्षतावादी, समन्वयवादी, प्रगतीवादी, किंवा निर्गुण भक्तीवादी वगैरे ठरवण्याची काहीही जरुरी नाही.

===

सदर लेखाचा स्क्रिनशॉट :

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version