आता IIT कानपूर हिंदू धर्मग्रंथाच्या प्रभावाखाली!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
तंत्रज्ञानाचे सर्वोत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी भारतातील मोजक्या ठिकाणी असणाऱ्या IIT ही संस्था फक्त देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहे. कानपूर येथे असलेल्या या संस्थेच्या शाखेने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार ही संस्था हिंदू धर्मग्रंथ आणि हिंदूंच्या पवित्र ग्रंथाचे डीजीटायजेशन करण्याची मोठी प्रक्रिया हातात घेणार आहे. या उपक्रमामार्फत हिंदू धर्मग्रंथ ऑडीओ आणि टेक्स्ट स्वरुपात उपलब्ध करून देणार असे संस्थेने सांगितले आहे. यात भगवद्गीता, रामचरितमानस, ब्रह्मसूत्र, नारद भक्ती सूत्र, वाल्मिकी रामायणाचे सुंदरकांड आणि बालककांड याचा ग्रंथांचा समावेश आहे.
हा उपक्रम यशस्वी झाल्यास धर्मग्रंथांचे डीजीटायजेशन करणारी ही भारतातील पहिली संस्था ठरणार आहे. महत्वाचे म्हणे तंत्रज्ञानाचे आधुनिक शिक्षण देणारी ही एक आधुनिक आणि नावाजलेली संस्था आहे. भारतीय तंत्रशिक्षणाचा चेहरा म्हणून जगभरात आय आय टी ची ख्याती आहे. असे असताना धर्मग्रंथ आणि पुराणांचा अनुवाद करत बसण्याचे काम संस्थेने हाती घेणे कितपत योग्य आहे?
आय आय टी जर हे काम करणार असतील तर तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याचे काम करण्यासाठी त्यांची निर्मिती झाली आहे की पुराणांचे अनुवाद करण्यासाठी, हा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे.
यावर आक्षेप घेणाऱ्या सर्व प्रश्नांना संस्थेत काम करणाऱ्या आणि या उपक्रमाशी संलग्न असणाऱ्या प्राध्यापकांनी घरचा रस्ता दाखवला आहे. संस्थेचे डायरेक्टर महेंद्र अग्रवाल आणि संगणक विभाग प्रमुख टी वी प्रभाकर यांनी या बाबतीत विचारलेले सर्व प्रश्न निकालात काढले आहेत.
“सर्व चांगल्या गोष्टींवर टीका होते. आपल्या धर्मग्रंथाच्या अनुवादाचे इतके महान कार्य कुणी करत असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय?” असे स्वतः डायरेक्टर म्हणत आहेत.
प्रश्न अग्रवाल सरांसारख्या धार्मिक लोकांनी त्यांचा धर्म पाळावा की नाही हा नाही . आय आय टी सारख्या सरकारी अनुदानित संस्थांमध्ये जनतेचा पैसा वापरून धर्मग्रंथाचे अनुवाद करत बसने बरोबर की चूक हा प्रश्न आहे. तंत्रज्ञानाचे शिक्षक, शास्त्रज्ञ यांनी नास्तिक असले पाहिजे अशी सक्ती कुणी करू शकत नाही. केली तर ते चूक आहे. पण याचा अर्थ लगेच तंत्रज्ञानाचे शिक्षण देणाऱ्या आय आय टी सारख्या संस्थांमध्ये गीता आणि रामायणासारख्या धर्मग्रंथांचे अनुवाद घडवून आणावेत असा होत नाही.
भारत हे राज्य म्हणून धर्मनिरपेक्ष (“सेक्युलर”) आहे. आय आय टी ही या सेक्युलर राज्याच्या निधीवर चालणारी संस्था आहे. आणि जनतेच्या पैशातून मिळालेल्या अनुदानावर स्वतःच्या (किंवा कुणाच्याही) वैयक्तिक धार्मिक श्रद्धा कुरवाळत बसने म्हणजे राज्याच्या सेक्युलर तत्वाचा गळा घोटण्यासारखे आहे.
धर्म म्हणून आपल्या ज्या काही पारलौकिक श्रद्धा असतील त्या खाजगी बाबतीत पाळाव्यात, सार्वजनिक आणि सरकारी ठिकाणी त्या आणू नयेत हे साधे तत्व प्राध्यापकांना आणि संस्था व्यवस्थापनाला उमजत नाही ही बाबच आश्चर्यचकित होण्यासारखी आहे. त्यात या अनुवादाचे, त्यावर खर्च होणाऱ्या वेळेचे आणि पैशाचे काय? असे अनुवाद तयार झाल्यानंतर त्याच्या व्यावहारिक उपयोगीतेचे काय हा प्रश्न विचारणेही दुरापास्त आहे.
जागतिक स्पर्धेचे भान असणारी आणि विज्ञाननिष्ठ युवा पिढी निर्माण व्हावी म्हणून नेहरूंनी पाया घातलेल्या या संस्थांमध्ये असे प्रकार घडणार असतील तर ते आय आय टी च्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यासारखे आहे. आय आय टी सारख्या संस्थांमध्ये फक्त तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जावे. तिथून शास्त्रज्ञ घडावेत ही त्यांच्या निर्मितीमागची माफक अपेक्षा होती. आय आय टी च्या या उपक्रमानंतर आणखी काही वर्षांनी धर्मग्रंथात पारंगत असलेले विद्वान मंत्रजागर करत बाहेर पडू लागले तर नवल वाटायला नको!
===
बातमीचा स्त्रोत : टाईम्स ऑफ इंडिया
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.