आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
आजकाल जो तो अस्मिता नाचवत स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्याच्या प्रयत्नात दिसतो. ही अस्मिता इतिहासाची, भूगोलाची, जातीची, धर्माची, भाषेची, वेषाची, पंथाची, त्याच्या तथाकथित आध्यात्मि, वैचारिक गुरूची, नेत्याची, इतकच कशाला तर त्याच्या आहाराची देखील असू शकते. या अस्मितांच्या झुंडी एकत्र येऊन देशाच्या कायदा सुव्यवस्थेला प्रचंड मोठे आव्हान निर्माण करतात. सगळ्याच अस्मिता घटनेचे, संविधानाचे अस्तित्व नाकारतात. काही अस्मिता तर घटनेने शोषितांसाठी केलेल्या तरतुदीमधून निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांना पूरक विरोध म्हणून इतर अस्मिता त्यांचे झेंडे नाचवतात.
शोषितांना सन्मान मिळावा, अंत्योदय आणि जातीअंत या उदात्त हेतूंसाठी तसेच शोषितांच्या आयुष्याचा आलेख हा बौद्धिक, शारीरिक आणि आर्थिक समृद्धीच्या साहाय्याने यशाकडे चढता असावा या भावनेने राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदींचा समावेष केला गेला, आज त्याच तरतुदी विविध झुंडींचे कुंपण बनल्या आहेत.
त्या तरतुदींच्या आधारे एकमेकांवर वर्चस्व मिळवण्याच्या नादात घटनेची होत असलेली पायमल्ली आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे होणारे नुकसान हा विचार या अस्मिता नाचवणाऱ्यांच्या मनाला शिवत देखील नाही.
या अस्मिता पुरोगामी किंवा प्रतिगामी दोन्ही प्रकारच्या असतात. अर्थात आज जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात आणि शोषितांच्या अस्मिता नाचवतात त्यांनी स्वतःचे असे वेगळे प्रतिगामित्व सिद्ध केले आहे. शोषितांवर होणाऱ्या अन्यायाविषयी यांना जराही देणेघेणे नसून केवळ त्यांना शोषितांच्या बळावर सत्तेतला वाटा हवा आहे. त्यासाठी ते त्यांच्या अस्मिता शोषितांवर लादत आहेत.
प्रतिगामी हे सध्या केवळ भांडवलदार या स्वरुपात उरलेले असून त्यांना त्यांची सांपत्तिक भूक भागवण्यासाठी अस्मितांची गरज भासते. पुरोगामी आणि प्रतिगामी हे दोघेही झुंजी लावण्यात तरबेज असतात. त्यांच्या या तरबेजपणाला बळी पडणारे नंतर पस्तावतात.
‘कोणे एके काळी’ हे भूत एकदा डोक्यात शिरले की वर्तमानातील ‘सोन्यासारखे आयुष्य’ त्या भुताच्या स्वाधीन करून काही अस्मितेषु स्वतःचे भविष्य ‘काळोखी साम्राज्याच्या’ पायावर भक्तीभावाने वाहतात. अर्थात त्यांना या अवस्थेप्रत पोहोचवण्यामागे काही स्वार्थी माणसे असतातच. त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी त्यांना भडकलेल्या डोक्याची, रिकाम्या हातांची आणि उपाशी पोटांची गरज असते. त्यांची ही गरज देशाची चुकीची असलेली उद्योग, शिक्षण, अर्थ धोरणे भागवतात.
याचं झालं कि त्यांचं सुरु. त्यांचं झालं की यांचं सुरु … या रंगीबेरंगी खेळातून देश बाहेर कसा पडणार हे एक कोडं आहे.
यावर कडक आणि ठोस उपाय योजना करणं गरजेचं आहे. स्वच्छ पाण्यावर ज्याप्रमाणे शैवाल तयार होऊन त्या पाण्यातील जैवविविधतेला आव्हान निर्माण करतं तसच या अस्मितेषु विषारी आणि विखारी शैवालामुळे ‘विविधतेतून एकता’ हे ब्रीद असलेली राज्यघटना गुदमरते आहे. उघड उघड धार्मिक, जातीय, भाषीय घोषणा देऊन देशातील महत्वाच्या प्रश्नांना बगल मिळते आणि ती भांडवलदार राज्यकर्त्यांसाठी (सत्ताधारी, विरोधी दोघांसाठी) सोयीची ठरते.
यासाठी उपाय तर हवा. पण उपाय काय करणार ? ज्या शिक्षणाने या सार्वभौम देशाच्या ‘एकात्मतेचे पाईक’ घडवायचे तेच शिक्षण आज अस्मिता शिकवते आहे. ज्या विचारवंतांनी देशात समानतेचे वारे वाहण्यासाठी प्रयत्न करायचे तेच आज समानतेच्या विरुद्ध दिशेने वारे कसे वाहतील याचा विचार करून विचार मांडत आहेत. ज्या नेत्यांनी त्याच्या पाठीराख्यांना देशहितासाठी सर्वस्व पणाला लावण्यासाठी प्रोत्साहित करायचे तेच आज भावना भडकावण्याचे दुष्कर्म करताहेत.
ज्या उद्योग महर्षींनी देशात छोट्या उद्योजकांना उभं राहण्यास मदत करायची तेच आज मोठा मासा बनून छोट्या व्यावसायिकांना गिळत आहेत. हे कुठवर आणि कश्यासाठी ?
देशात भ्रष्टाचार, गुन्हेगारी, दहशतवाद या सगळ्याचे मूळ या अस्मितेषु राजकारणात आहे. या सगळ्यांचा जीव हा अस्मितेषु राजकारणात आहे. या मुळावर घाव घालण्यासाठी सर्वप्रथम स्वतःला तयार करणे ही प्रत्येक भारतीयाचे प्रथम कर्तव्य आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी ज्याप्रमाणे सर्वप्रथम स्वतःला धमन्यातून, मनातून आणि डोक्यातून पडताळून बघितलं त्याप्रमाणे आज आपण जिवंत देशवासीयांनी स्वतःला या अस्मितेषु राजकारणाविरोधात बाकी काही नाही पण डोक्यात दिलेल्या मेंदूतून पडताळून पाहणं गरजेचं आहे.
इतिहास इतकाही महत्वाचा नसावा कि ज्यामुळे वर्तमानाचे भान न राहता भविष्याचे नुकसान व्हावे.
किती नुकसान होतंय देशाचं आणि पर्यायानी आपल्या सर्वांचं ? नागरी प्रश्न राहिले बाजूला आणि या अस्मितांवर देशाचा पैसा आणि वेळ दोन्ही फुकट चालले आहेत. आज ज्याचे वृद्ध आईवडील खड्डे पडलेल्या रस्त्यांवर अडखळतात तो त्या अडखळण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या जातीचा झेंडा गाडीला लावून गावभर उंडारतो. आज ज्याची गरोदर पत्नी किंवा बहिण ज्या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे गाडीतच प्रसवतात तो गावगुंड त्यासाठी कारणीभूत असलेल्या नेत्याची भलामण करण्यात पुढे असतो.
ज्या गावात पाणी पोहोचत नाही तिथे देवळं मात्र नवसाला पावणारी असतात. दवाखाने नाहीत, दवाखाने असतील तर डॉक्टर नाही, डॉक्टर आहे तर औषधे नाहीत ही परिस्थिती ज्या गावात असते तिथे मोठ्यामोठ्या महापुरुषांचे पुतळे समारंभपूर्वक उभारले जातात. जिथे गडकिल्ल्यांची डागडुजी करून पर्यटनाद्वारे स्थानिकांचा आणि पर्यायाने राज्याचा महसूल वाढवता येऊ शकतो तिथे ते न करता चकाचक स्मारकांचा पर्यावरणाविरोधात जाऊन घाट घातला जातो. एक ना अनेक उदाहरणे देता येतील या अस्मितेषु राजकारणामुळे होत असलेल्या हानीची.
हे सर्व थांबवण्यासाठी या देशात कायद्याने तिरंग्याव्यतिरिक्त इतर झेंड्यांना बंदी आणावी. झेंडा हा एक मोठे कारण आहे या अस्मितेषु नाचकामाचे. शाळेत किंवा विद्यापीठात केवळ व्यापार उदीम, व्यवस्थापन, खेळ याच्याशी निगडीत असलेला इतिहासच अभ्यासक्रमात ठेवावा. नागरिकशास्त्र हा विषय पूर्णपणे वेगळा आणि स्वतंत्रपणे शिकवला जावा. थोडक्यात काय तर इतिहासाशी असलेली त्याची आजवरची युती तोडून त्याला स्वतंत्रपणे वावरण्यास वाव द्यावा.
राज्यघटना हा विषय इयत्ता पहिलीपासून ते पदवीधर होईपर्यंत सर्वांना सक्तीने शिकवला जावा.
कुठल्याही अस्मितेषु घटनेचा प्रचार, प्रसार, अफवा होणार नाही याची कठोरपणे दक्षता घेतली जावी. धर्म जात यांचे महत्व कमी करण्यासाठी त्यांना असलेले घटनेचे कवच काढून घ्यावे. पण अर्थात या साऱ्या अपेक्षा आहेत ज्या देशभक्त नागरिकांविना कधीही पूर्ण होणार नाहीत.देश आज ज्या नागरी हक्कांबाबत असलेल्या औदासिन्यातून जात आहे त्याची अपेक्षा रक्त सांडणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी कधीच केली नसेल. देशाबद्दल सोडा पण स्वतः रहात असलेल्या परिसराबद्दल लोक उदासीन आहेत. मी निवडणूक भ्रष्टाचाराबद्दल काहीही बोलणार नाही कारण सत्तेत कोणीही येवो नागरी प्रश्न जैसे थे असतात.
सत्तांतर झाल्यावर (–०) आणि (+०) यांच्यात जो फरक असतो तोच आधीच्या आणि नंतरच्या सत्तेत असतो. सत्तांतराचा नागरी प्रश्नांवरचा प्रभाव हा फक्त शून्य असतो. हे बदलू शकत नाही त्यामुळे नागरिकांनी स्वतःला बदलून व्यवस्थेला बदलण्यास भाग पाडणे हा एकच मार्ग उरतो. पण याच मार्गाआड अस्मितेषु राजकारणाप्रति असलेली नागरिकांची ओढ आणि नागरी प्रश्नांबाबत असलेली उदासीनता येते. हे अडथळे झटकून देण्याची आवश्यकता आहे.
माझ्या या सर्व लिखाणाचा उद्देश हा नागरी हक्कांबाबत जागृती करणे इतकाच आहे. माझ्या डोक्यात जर अस्मितांची भूतं नाचू लागली तर मी जाणूनबुजून राज्यघटनेतील नागरी हक्कांबाबतची कलमे डोक्यात घोळवू लागतो.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभरात कुठल्याकुठल्या नागरी प्रश्नांना मी सामोरा गेलो याची यादी डोळ्यासमोर आणतो. हे केलं की माझ्या डोक्यातील अस्मितेचं भूत हे अंतर्धान पावतं. अस्मितेच्या भुतांसाठी नागरी हक्क आणि प्रश्नांची जाण हे जणू मारुती स्तोत्र आहे.
थोडक्यात काय तर आज देशाला नागरी प्रश्न पडणाऱ्या नागरिकांची नितांत गरज आहे. देशाची ही गरज सुजाण आणि सुज्ञ नागरिकांनी भागवायला हवी.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.