Site icon InMarathi

शनिवारची दुसरी “कसोटी” : अब रण है सेंच्युरिअन में! गरज आहे ती रन्स ची!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक चित्रपट, क्रीडा समीक्षक आहेत. विविध वृत्तपत्र, मासिकांमध्ये त्यांचे समीक्षणपर लेख प्रसिद्ध होत असतात.

===

कॉकटेलमध्ये दीपिका पदुकोणने दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या बिच वर बिकिनी शॉट देऊन केपटाऊन आणि पडद्यावरील वातावरण गरम केलं होतं; आणि तिथूनच, कॉकटेलपासूनच दीपिका पदुकोण ही ” दि दीपिका पदुकोण” बनण्याची सुरवात झाली होती. केपटाऊन..कॉकटेलपासून तिची कारकीर्द पूर्णपणे बदलली आणि पुढे मोठी स्टार होत गेली.थिंग्स चेंज्ड फॉर हर फ्रॉम केपटाऊन!

अगदी याच केपटाऊनपासून हार्दिक पांड्याचं करिअर बदलतंय ..वा बदलू शकतं असं दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातून वाटायला लागलंय.

पण याशिवाय भारताचं नशीब, कामगिरी आणि निकालसुद्धा याच केपटाऊनपासून यावेळीतरी बदलेल असं वाटत होतं पण ती शक्यता सामन्याच्या तिसऱ्या आणि औपचारिकरित्या चवथ्या दिवशीच केपटाऊनच्या टणक आणि (सध्या पाणी नसलेल्या)रुक्ष मातीत मिसळली.तसा भारत हा क्रिकेटमध्ये फार लकी ”विजिटर’ असतो, तो ज्या देशात खेळायला जातो (तिथे पैश्याचा ओघ वाढवतो या वाक्यातील ‘माहितीमूल्य’ आता संपले आहे.) त्या टीममधील किमान दोनएक खेळाडूंना स्टार बनवतो, किंवा कोणाचं बुडतं करिअरतरी सावरून देतो.

2.bp.blogspot.com

पण यावर्षी भारतीय टीमचे भाग्योदयकारक चरण कमल केपटाऊनमध्ये पडताच आणखी एक गोष्ट घडली! दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन भागात काही वर्षांपासून पाऊस नीट न झाल्याने तिथे दुष्काळ पडला आहे. पाण्याची खूप टंचाई आहे म्हणतात. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा नैसर्गिक झरे शोधून तेथील पाणी घरी आणावे लागतय. त्यामुळे म्हशीसारखे (इथे तांत्रिकदृष्ट्या रेडा म्हणावे लागेल)

पाण्यात (पूलमध्ये) तासनतास बुडायला आवडत असलेल्या भारतीय टीमला फक्त दोन मिनीटातच अंघोळ ‘उरकायला’ लावण्याची, चिमणीची अंघोळ करण्याची सूचना दिल्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून दिली गेली होती. पण सामन्याच्या तिसऱ्या दिवशी केपटाऊनमध्ये प्रचंड पाऊस झाला! ही आहे आमच्या भारतीय टीमची लकी चरणकमले.

भारत पहिला कसोटी समान तीन दिवसात हरलाय. आता पूढील सामना आहे तो, भारतीय टीमला खेळण्यास नेहमीच अत्यन्त कठीण असलेल्या ‘सेंच्युरिअन’मध्ये. जगातील फास्टेस्ट क्रिकेट पिच म्हणून ऑस्ट्रेलियातील “पर्थ पिच” ओळखल्या जातं, पण त्याखालोखाल दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरिअनचा नंबर लागण्यास हरकत नाही.

cloudfront.net

भारत आजवर सेंच्युरिअनला कसोटी जिंकला नाही. त्यामुळे आगीतून फुफाट्यात तशी केपटाऊनमधून सेंच्युरिनमध्ये अशी अवस्था होण्याची ‘शक्यता’ आहे. विराट कोहलीने “इन फॉर्म” असलेल्या रोहित शर्माला राहाणेऎवजी पहिल्या खेळाडूत स्थान दिले हा एक जुगार होता, जो उलटला. रोहित शर्माकडे मुळात ”कसोटी सामन्यात” खेळण्याचं तंत्रच मजबुत नाही. त्याचा “फ्रंट फूट” नेहमी त्याला सतावतो. तो कसोटी सामन्यातील लंबी रेस का घोडा नाही, विशेषत्वे भारतीय उपखंडाबाहेर.

रोहित शर्मा आणि युवराज सिंगमध्ये इथे साम्य आहे. दोघेही मजबूत वनडे , टी ट्वेन्टी क्रिकेट खेळाडू पण उपखंडाबाहेर कसोटीमध्ये अपयशी.वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा सिक्सर्सच्या गाड्या उडवणारा रोहित शेट्टी असतो पण टेस्टमध्ये त्याचा फ्लॉप ऍक्टर रोहित रॉय होतो.

हाच रोहित शर्मा 2011 वर्ल्ड कपच्या काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत, मालिकेतील एकाही सामन्यात दोन आकडी रन्सही काढू शकला नव्हता.  तेव्हाही त्याचा फ्रंट फूट त्याला त्रास देत होता. त्यामुळे तो बोल्ड वा एलबीडब्ल्यू होत राहतो. दक्षिण आफ्रिकेत त्याचा खेळ कधीच बहरला नाही. असो, तो आता भुतकाळ आहे. तेव्हाचा रोहित शर्मा आणि आजचा ‘रॉहिट’ शर्मा खूप वेगळा आहे, मोठा खेळाडू बनला आहे.

amazonaws.com

पण तरीही त्याला सरळ कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या चार वेगवान तोफांच्या तोंडी देणे त्याच्यासाठीच अन्यायकारक आहे. वर्षभर भारतात क्रिकेट हंगाम असताना त्याला पूर्ण संधी दिली गेली नाही, तिथे पाचव्या सहाव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे, आणि इतर खेळाडुंना खेळवलं गेलं आणि आता सरळ आफ्रिकेच्या वेगवान मैदानमुलूख चार तोफेंच्या समोर टाकलंय. अजिंक्य रहाणेने यापूर्वी विदेशात नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः  2014 मधील लॉर्डस क्रिकेट ग्राउंडवर, जेथे क्रिकेट पिच कोणती आणि ग्राउंड कोणतं हेही ओळखता येत नव्हतं, कारण दोन्ही इतकं हिरवंगार होतं.

तेथे हात भर बॉल स्विंग होत असताना, इतर सर्व खेळाडू अपयशी ठरल्यावर अजिंक्य रहाणेने शतक ठोकलं होतं आणि भारताने तो सामना जिंकला होता. तेव्हापासून त्याने विश्वास आणि आदर कमावला.

मागील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अजिंक्य राहणेचं पाहिलं कसोटी शतक काही धावानी हुकलं होतं. त्या खेळीत भारताकडून बाद होणारा तो शेवटचा गडी होता. त्याचे ऑस्ट्रेलियामध्येही शतक आहे. त्यामुळे सध्या जरी तो फॉर्ममध्ये नाही, तरी त्याची ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लड येथील कामगिरी बघता तो कसोटी सामन्यात पुन्हा फॉर्म मिळवू शकतो असं वाटतं. कारण किमान रोहित शर्मापेक्षा अजिंक्य राहाणेकडे योग्य कसोटी तंत्र आहे.

ndtvimg.com

शिवाय योग्य संधी न मिळाल्याची खंत आणि आपणच पाच किंवा सहा जागेवर योग्य असल्याची खुमखुमी राहाणेत आता दाटली असल्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे तो खेळताना शर्थ करेल. हेच संघाला अपेक्षित असतं.

किमान रहाणेला खेळवणं हा एक कागदावरतरी योग्य निर्णय वाटतो. पण रोहित शर्माला काढून अजिंक्य रहाणेला “प्लेयिंग इलेव्हन”मध्ये संधी  विराट कोहली देईल याची शक्यता कमी वाटते. कारण महेंद्रसिंग धोनीप्रमाणे तो ही प्लेयिंग इलेव्हनमध्ये जास्त बदल करत नाही.

पण सद्यस्थितीत टेस्टमध्ये कमकुवत तंत्र असलेला रोहित शर्मा आणि कमकुवत फलंदाज असलेला रिद्धीमान साहा हे दोघे मिळून एक फलंदाज बनतात. या दोघांपेक्षाही विदेशात रवीचंद्रन अश्विन कोणत्याही दिवशी कधीही चांगला फलंदाज ठरतो. त्याच्याकडे योग्य तंत्र आहे. हलके हात आहेत.

याशिवाय एका कसोटी सामन्यात एक महत्वाच्या बाजूकडे विराट कोहलीने लक्ष देणे अति आवश्यक आहे , ती म्हणजे “स्लिप फिल्डर्स” शिखर धवनला स्लिपमधून काढून त्याजागी मुरली विजय किंवा रवी अश्विनला ठेवण्याची त्याला गरज आहे. नाहीतर धवन साहेब अश्याच कॅचेस सोडत राहतील. शिवाय शिखर धवनच्या जागी के एल राहुलला संघात घेणं योग्य ठरेल का हाही निर्णय कॅप्टन कोहलीला घ्यायचाय.

हा दौरा त्याच्यासाठी कठीण असणारच आहे.

शनिवारपासून सुरू होणाऱ्या  दुसऱ्या कठीण कसोटी सामन्यासाठी भारताला शुभेच्छा.ही कसोटी सोपी नसणार. कारण आगीतून जाऊन फुफाट्यात पडल्याप्रमाणे भारत केपटाऊनमधून सेंच्युरिनमध्ये पडतोय..जातोय.

पण 2008 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मंकी गेट प्रकरण झाल्यावर भारताने जगातील सगळ्यात वेगवान पर्थ पिचवर ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं.

त्यामुळे भारताने सेंच्युरिअन कसोटीसाठी त्यातून प्रेरणा घायला हरकत नाही.
अब रण है सेंच्युरिअन में! गरज आहे ती रन्स ची!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version